नवरात्र ( भाग तिसरा )

मासिक पाळी एक निसर्ग दत्त देणगी. स्त्री त्या शिवाय अपूर्ण आहे.


नवरात्र ( भाग तिसरा )

विषय: तिचं आभाळ

माझी पाळी आलेली होती मला तर काय करावे तेच सूचेना. मी आपली सुन्न होऊन बसून राहिली. आई लवकर उठून देवीच्या समोर बसली होती. वडील जप करत होते.

आईला कसं सांगावे तेही मला कळेना. या कारणासाठी सुट्टी कशी मागावी , अशी सुट्टी ऑफिस मान्य करेल का हे देखील समजत नव्हत. प्रश्न खूप गंभीर होता. बाहेर बंदोबस्त करायचा असता तर थोडं फार समजून घेतलं  गेलं असतं. पण या अशा अवस्थेत नुसताच बंदोबस्तच करायचा नव्हता. तर त्या देवीच्या पवित्र गाभाऱ्यात आठ तास देवीच्या जवळ उभ राहायचं होतं. त्या कल्पनेनेच मी घाबरून गेली.

कीर्तनानंतर होणारी आरती. त्या आरतीमध्ये अंगात येणाऱ्या बायका .त्या घागरी फुंकणाऱ्या बायका. नऊ नऊ दिवस कडक उपास करणाऱ्या बायका . देवी या समोर चालणार होम हवन .कडक सोवळ पाळणारे गुरुजी . सगळया गाभारा भर पसरलेला तो धुपाचा वास. देवीसमोर पडलेल्या ओट्या, फळांचे ढीग. आणि फुलांच्या माळांनी  झाकलेला देवीचा घट. तो अखंड जळणारा दिवा आणि या सगळ्यात अंगभर हिरवं पातळ नेसलेली, दागिने घातलेली, मोठ्या मोठ्या डोळ्यांची ,जीभ बाहेर काढलेली, हातात शस्त्र घेतलेली देवीची तेजस्वी मूर्ती. पाळीच्या त्या अपवित्र दिवसात  तिच्या त्या तेजस्वी, पवित्र गाभाऱ्यात उभ रहायच्या नुसत्या कल्पनेनेच मला घाम सुटला. तोंडाला कोरड पडली. पोटात दुखायला लागलं.

आईला सांगायच्या आधी आपल्याकडूनच जर काही करता आल तर बघावं म्हणून मी  हेडक्वार्टरला फोन लावला. सिनियर इन्स्पेक्टरला माझी परिस्थिती सांगितली.  मला चार दिवसाच्या रजा मिळावी म्हणून त्यांना विनंती केली. परंतु माझं म्हणणं ऐकल्यावर मला सहानुभूती दाखवण्याऐवजी  ते माझ्यावर ओरडले,

" मिस रंजना,  तुम्ही हे जे कारण सांगतात आहात त्याला काहीही अर्थ नाही. सध्या सगळा पोलीस स्टाफ बंदोबस्तात लागलेला आहे. आणि अशा अवस्थेत मी तुमची रजा मंजूर करू शकत नाही .आणि जर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर सुट्टी घेतली तर तुमच्यावर मी शिस्तभंगाची कारवाई करायला मागेपुढे बघणार नाही. तेव्हा ताबडतोब तयार व्हा आणि बंदोबस्ताला जा. काय देवीचा कोप होईल ते बघून घेऊ ."

मी सुन्न होऊन त्या फोनकडे बघत होते माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. नाईलाजाने मी उठले सॅनिटरी पॅड घेतले . तयारी करायला बाथरूम मध्ये गेली.

तयार होऊन ड्युटीला जातांना आईला, " येते आई " असं म्हणताना माझे हातपाय थरथर कापत होते. आईला कशाचीच काही कल्पना नव्हती. मी घरातून निघाली. जसं मंदिर जवळ यायला लागल. तस तसे माझे पाय पुढे जायचं नावच घेईनात. अक्षरश:  माझ्या अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या. शेवटी मी देवीलाच मनातल्या मनात हात जोडले .म्हणाले ,

" देवी , हे जे काही झाल आहे. त्यात माझा काही दोष नाही. हे तुला माहित आहे . माझ्या मनात नसताना मी तुझ्या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करत आहे. याचा मला खेद आहे. पणं माझा नाईलाज आहे. मला क्षमा कर. मी नवरात्रा नंतर हातात दर्भ घेऊन, तळ्यात हात घालून तूझ्या कडून न्याय निवाडा करून घेईल. आता मात्र मला क्षमा कर. "

आणि मी गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीकडे न बघता मी माझ्या कामाला सुरुवात केली. अपराधीपणाची भावना माझ्या मनात आटोकाट भरलेली होती. बघता बघता नवरात्र संपून गेलं.

हाच तो मी केलेला अपराध. आता नवरात्र संपलेले आहे. देवीचा गाभारा मोकळा आहे आणि आता नवस  फेडण्याची माझी पाळी आहे. मी गुरुजींना कोरडा दर्भ मागितला. त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि दर्भ दिला. मी तो दर्भ घेऊन देवीच्या मागे तलावाकडे आली . डोळे मीटून देवीच स्मरण केलं . डोळे बंद असतानाच तलावाच्या पाण्यात हात घातला.

नंतर काय झाले ?

परिणाम तुम्ही बघताच आहात. नवरात्रात उत्कृष्ट ड्युटी बजावल्याबद्दल माझी पदोन्नती झाली. ही एक प्रकारे देवीची कृपाच आहे.

( समाप्त )
लेखक: दत्ता जोशी

( सदर कथा फक्त कथा म्हणून वाचावी. त्यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरीही जर कोणी दुखावले असेल तर मी आधीच माफी मागतो. )

🎭 Series Post

View all