नवरा माझा वंडरशेफ (टीम - बटाट्याची चाळ)

बटाट्याची चाळ सर्वांसाठी घेऊन येत आहे एक खमंग अशी फोडणी दिलेली चुरचुरीत कथा. एका गोड जोडप्याचा

नवरा माझा वंडरशेफ!
(टीम -बटाट्याची चाळ.)

" ऋषिकाssss... उठ ग बाईssss...! ९ वाजलेत. १० वाजता ऑफिस आहे. आज तरी वेळेत पोहोच. १० मिनिटावर ऑफिस आहे, तरी रोज उशीर कसा होतो गं तुला..? बॉस कामावरून काढत नाही नशीब...!
हा घे चहा, लग्नाची झाली तरी हातात चहा जेवण लागतं. पुढे काय नवरा देणार का...?"
ऋषिका - " झोपू दे ना गं आईsss. रात्रभर कामच करत होते. असं कसं ऑफिस मधून काढतील...! तसही माझे बॉस कूल आहेत, तुझ्यासारखे नाही. 
आणि दिलं हातात नवऱ्यानी तर काय होतं..? "
आई - " धन्य आहेस तू...! मला बाई नाही जमणार असा जावई शोधायला लोक हसं करतील‌. तूच तुझा बघ. "
बाबा - " काय गं सकाळी सकाळी माझ्या लेकीला त्रास देते. भाग्यलक्ष्मी आहे ती. तिला हवं ते तिच्या जवळ येतं. "
आई - " हो काsss..! घ्या मग हा नाश्ता आणि पोचवा तुमच्या भाग्यलक्ष्मीजवळ. "

ऋषिका एका छोट्या पण नामांकित फर्ममध्ये इंटेरियर डिझाइनर होती. तिच्या बॉसची स्टार एम्प्लॉइ सुद्धा. आपली कल्पना लोकांच्या गळी उतरवणे आणि निर्जीव जागेत जीव ओतणे ह्यात तिचा हातखंडा होता.  

आहे त्या वस्तू वापरून कमी खर्चात सुंदर असं वातावरण ती बनवून देत असे.

ऋषिका निवांत ऑफिसला पोहचली. सरांनी तिच्या हातात कॉफीचा मग देत "दिलखुष" या नामांकित हॉटेलच्या नुतनीकरणाचे स्वतंत्र प्रोजेक्ट तिला दिले.
तिच्यासाठी खूप छान संधी चालून आली. सर्व डिटेल्स घेऊन ती लगेच हॉटेलमध्ये पोहोचली. ५० वर्ष जूनं बांधकाम, फर्निचर, बघून ती मोहितच झाली. या हॉटेलचा जुनेपणा हरवु न देता आपण याचं नुतनीकरण करायचं असं तीने ठरवले. मालक गोदाजीकाकांनाही हे तिने पटवून दिले. बाहेरची थोडीफार मापं घेत किचनमध्ये जाताच तिचा पारा चढला. सगळं अस्ताव्यस्त कुठलेच ताळतंत्र कशाला नाही, बेसिन एकीकडे, ओटा दुसरी कडे, स्टोरेजचा पत्ता नाही. तसा तिचा काही संबंध नव्हता जुन्या डिझाईनशी पण एवढा सावळा गोंधळ बघून ती हेड शेफवरच बरसली.
ऋषिका - " अहो मिस्टर…! अशा अस्ताव्यस्त वातावरणात तुम्ही काम कसं करू शकता...?  जास्त खर्च न करताही साध्यासाध्या गोष्टी तुम्ही नीट मांडल्या तरी अर्धी कामे सोपी होतील,एवढी छोटी गोष्ट लक्षात येत नाही का तुमच्या..? "
ऋषिकाचं बरसणं अमोघच्या कानावरही पडत नव्हतं. तो नुसताच तिच्या तुफान अवताराकडे बघत होता.
ऋषिका - " अहो नुसतं बघत बसणार की बोलणार काही..? रॅम्पवरची मॉडेल नाहीये मी टुकुर टूकुर बघायला......! 
इंटेरिअर डिझाइनर आहे. "
अमोघ - " सॉरीऽऽ, पण खरंच मॉडेल दिसता तुम्ही! 
तुम्ही आधी इथे बसता का..? 
आत्ताच एक डिश बनवली आहे, ती खाऊन बघा. 

कसं आहे ssss, पोट भरलं नांऽऽ, की चीडचीड होत नाही, खा बर आधी हे. "
ऋषिका गप्पच...! मी इतकं बोलूनही हा माणूस इतका शांत कसा..? 
वर खायला ही देतोय..! एक घास तोंडात घेताच तिचे डोळे बंद झाले. एक अप्रतिम अशी चव जिभेवर रंगाळली. २ मिनटात पूर्ण व्हेज पफ फस्त.  वरून अमोघने तिला थंडगार सोलकढीही दिली.
तृप्त झालेली ऋषिका त्याच्याकडे बघतच राहिली.
अमोघ - " मॅडम शेफ आहे मी, रॅम्पवरचा मॉडेल नाही. "
दोघेही खळखळून हसले.
अमोघ - " ते काय आहे नाऽऽ, मला फक्त पदार्थ बनवता येतात. त्यांच्यातच रमतो मी…! जीव ओतून माझ्यातलं असं काहीतरी काढून त्यांना देतो. त्यामुळे तेही छान बनतात.
 मी आणि हे पदार्थ तुमच्यासारख्या तृप्त चेहऱ्यांकडे बघून सुखावतात. बसsss एवढंच येतं मला.

ते मॅनेजमेंट, मार्केटिंग, ऑर्गनायझेशन या गोष्टी मला झेपत नाहीत. "
ऋषिका - " काळजी नका करू. मी बघेन ते सर्व. तुमच्या सोयीनुसार सर्व गोष्टीचे डिझाईन करून देईन. फक्त मला असेच भारी-भारी पदार्थ खाऊ घालत जा. माझी आई तर फार कटकट करते राव आयतं खाऊ घालायला. "
अमोघ - " ॲट युअर सर्व्हिस मॅम..!! तुम्ही इथे असेपर्यंत रोज. "


अमोघला लहानपणापासुन पाककलेची खूप आवड होती. सतत आईच्या अवती-भोवती किचनमध्ये स्वैयंपाकात वेगवेगळे प्रयोग करत निरीक्षण चालू.
आई वडिलांनी त्याचा कल ओळखुन परिस्थिती प्रमाणे होमसायन्स दिलं. तिथे सर्व मुलीच असल्याने तो फार खुलू शकला नाही. कोणी टोमणे मारत, कोणी चिडवत पण त्याने कधी मनावर घेतलं नाही. कॉलेजनंतर खरखुरं शिक्षण घेण्यासाठी तो शहरातील सर्व गल्लीबोळीतील,छोट्यामोठ्या नावाजलेल्या ठिकाणी फिरला.अगदी कामही करू लागला. भेळ,वडापाव,खाणावळ,पकोडा,पावभाजी,
पिझ्झा,इडली,डोसा अशा अनेक जागा धुंढाळून काढल्या. बारकाईने निरीक्षण केलं. तसच मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा स्वतःच्या वेगळ्या टिप्सही त्यांना सांगितल्या,ज्याचा त्यांनाही खूप फायदा झाला. स्थिरता येण्यासाठी त्याने दिलखुशमध्ये काम चालू केलं व लवकरच हेड शेफ बनला.
---------------------------------
दिलखुषच्या नुतनीकरणाचे काम चालू झाले. ऋषिकाने खूप सुंदर डिझाईन्स लॅपटॉपवर तयार केले. जुनेपणात नाविन्य जपलेले डिझाईन्स गोदाजीकाकांनाही खूप आवडले.
ऋषिका रोज हॉटेलमध्ये येऊन करागिरांकडून काम करून घेऊ लागली. अमोघकडून किचनची कामं समजून घेऊन त्याचे डिझाईन्स रेडी केले. 
सकाळी न उठवताच ती तयार होऊन सईट वर पोहचत असे. अर्धा भाग गिऱ्हाईकांसाठी खुला ठेऊन बाकी भागाचं नुतनीकरण चालु झालं. अमोघ हॉटेलची पहिली डिश आधी ऋषिकालाच देई.
तिच्यासाठी रोज नवनवीन पदार्थ बनवण्याचा छंदच त्याला लागला होता. ऋषिका तर सातव्या आसमंतात होती. 
" एवढ्या प्रेमाने कसं कोणी इतके सुंदर पदार्थ बनवू शकतं..! " अमोघचं शांत आणि निरागस बोलणं तिला ऐकतच रहाव वाटे. गोदाजीकाकाही त्यांची मजा घेत व रोज भेटण्यासाठी काम लांबवू नका म्हणून चिडवत. ऋषिकाचं तडफदार वागणं, १० लोकांकडून सराईतपणे काम करवुन घेणं या गोष्टी बघुन अमोघ भारावून जाई.
----------------------------
एक दिवस एक आजोबा त्यांच्या नातवाला दिलखुषमध्ये घेऊन आले. तो हट्टच धरतो की लासंगा खायचाय. पण आजोबा त्याला समजावतात की " थोडं पौष्टिक खावं ,तब्बेत खराब होईल. " तेवढ्यात अमोघ तिथे गेला. त्याने त्यांची अडचण विचारली.
जोगळेकर आजोबा - 
" बघा कसा हट्ट धरलाय पोराने…? 
आता हा लासंगा की काय कसं आहे काय माहित…?
पोटं बिटं दुखलं तर काय करायचं…? 
आई-वडील पण नोकरीवर असतात ह्याचे. "
अमोघ - " काका तुम्ही बसा अगोदर. अहो sss लासंगा म्हणजे आपला लाच्छा पराठाच फक्त नाव इटालियन. तुम्ही खाऊन तर बघा नक्की आवडेल. "
आजोबा - " हो का…! बर आण बेटा."
अमोघनी आणलेला लासंगा आजोबा/नातू दोघांनाही खूप आवडला.
आजोबा आवर्जून अमोघला बोलावुन म्हणाले.....
" पोराsss जादू करतोस तू…..! कितीतरी वर्षांनी हिच्या हातची चव अनुभवली. माणसाकडे कितीही पैसा असला तरी गेलेल्या माणसाची कमी भरून नाही काढू शकत. आज तुझ्यामुळे ती असल्याची क्षणिक जाणीव झाली बघ...."
अमोघ - " काका आजवरचा मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे हा! "
ऋषिका अमोघची ही बाजू बघून त्याच्याकडे अजुनच आकर्षित झाली.
त्यानंतर आजोबा,नातू आणि असे बरेच लोक दिलखुषचे नित्यावळीचे ग्राहक झाले.
-----------------------------
३ महिन्यात काम पूर्ण होत आलं आणि अमोघच्या मनाची चलबिचल वाढायला लागली.
"आता रोज नवनवीन डिश खाऊ घालायच्या निमित्ताने तिला कसं भेटणार..!  माझ्या हातचे खातानाचा तिचा तो मोहक चेहरा आता रोज नाही बघायला मिळणार…!
समोरून कधी ऋषिका आली त्याला कळलंच नाही.
ऋषिका - "हॅलो..sss कुठे हरवलास…? आज काय नवीन केलंय..?"
अमोघ - "नाही sss, आज नवीन नाही काही."
ऋषिका - "ओए sss तू तर लगेच कंटाळला वाटतं, मला खाऊ घालून..!
वाटलं आयुष्यभर खाऊ घालशील..?
बर चल sss जे आहे ते तर दे. मग लागते मी कामाला. फिनिशिंग राहिलेय आता फक्त."
अमोघ एकदम चमकलाच. 
"नक्की काय अर्थ होता हिच्या बोलण्याचा...!
आयुष्यभर म्हणजे…! तीच्या पण मनात काही आहे की मैत्री म्हणून असंच बोलली…?
आज सोक्षमोक्ष लावावाच लागेल. नाहीतर ४ दिवसात ही निघून जाईल कायमची."
संध्याकाळी अमोघने ऋषिकाला थांबवुन घेतलं. एक अफलातून डिश करणार आहे असं सांगुन. आऊटडोअर डिझाईन एवढं सुंदर होतं की त्याला अजुन काही करावच लागलं नाही. टेबल्सच्या चारही बाजुंनी पाणी. त्यात कमळाची फुलं आणि इसेंशिअल ऑईलचा सुगंध. मधेमधे नाजूक झाडांची हिरवळ. त्याने ऋषिकाला फोन करून टेबल क्र. १ जवळ बोलावलं. समोर तिचा फेव्हरीट व्हेज पफ ठेवला व त्याखाली नोट -
" रोज तुझ्यासोबत दिवसाची सुरुवात करण्याची सवयचं झालीय. घरी जाताना तुला बाय केल्याशिवाय निघावच वाटत नाही. आता टेबल क्र. २ जवळ जा." 
ऋषिका थोडीशी गोंधळली.
"असं का लिहिलंय ह्याने.? कुठे जाणार आहे का हा…? " 
 टेबल क्र. २ वर एक हार्ट शेपची पेस्ट्री आणि नोट.
“ माझ्या पदार्थांना सगळेच प्रतिक्रिया देतात पण जेव्हा तू डोळे मिटुन त्या चवीत हरवुन जातेस तेव्हा मीही तुझ्यात हरवुन जातो. आता टेबल क्र. ४ जवळ जा."
ऋषिकाला आता चांगलच धडाधडायला लागलं. पुढे हा काय विचारणार.? याचा अंदाजही घेऊ लागली. खूप आनंद आणि थोडी थोडी भीती. दोन्ही भावना मनात गोंधळ घालु लागल्या. त्या गोंधळातच ती टेबल क्र. ४ जवळ पोहोचली. त्यावर काहीच नव्हते. पण इतर टेबलपेक्षा तो उंच होता. ऋषिका खाली वाकून बघते. टेबलाखाली सुंदर असा गालिचा अंथरलेला. 
त्यावर गुलाबाच्या पाकळ्या, बारीक गोल्डन लाईट्सची सिरीज, एक शॅंपेन बॉटल, बाजुला रिकामा ग्लास व त्यामध्ये रिंग आणि नोट.
"‌ माझ्या हातच्या आणि प्रेमाच्या चवीत आयुष्यभर हरवायला आवडेल का तुला..??"
ती डोळे बंद करून तिथेच बसुन राहिली. अमोघने समोर येऊन तिचा हात हातात घेतला.
" मी तुला आवडतो हे मला माहिती आहे पण तेवढे पुरेसं नाही. मला तुला शाश्वती द्यायची आहे.. जशी तू आहेस तशीच मी तुला आयुष्यभर जपेन. तुझ्या स्वावलंबीपणा आणि कर्तृत्वाचा मला अभिमान आहे आणि नेहमी राहील. तुला वेळ हवा असेल तर वाट बघेन. "
ऋषीेकाने डोळे उघडून एक गोड स्माईल दिली. अमोघ तिथेच घायाळ. अंगठी स्वीकारून छान शॅंपेन एन्जॉय करून दोघेही घरी गेले.
काही दिवसातच घरच्यांचीही पसंती मिळाली. अमोघच्या घरचे गावी राहत असत. अधून मधून भेटायला येत. ऋषीेकाकडे तर आनंदीआनंदच होता. एकुलती एक लेक, गावातच राहणार, त्यात नवरा शेफ....! 
----------------------------
काही दिवसातच दिलखुषमध्ये साखरपुडा व गावी लग्न करून दोघे अमोघच्या फ्लॅटवर आले. त्याच्या अस्ताव्यस्त फ्लॅटचा तिने पूर्ण कायापालट केला. मोजकेच फर्निचर, रंगीबेरंगी कुशन्स, पडदे, टेरेसला कव्हर करून सुंदर असा बगीचा आणि एक सोफा. बरेचदा ते दोघं तिथेच झोपत. त्यांची पहिली रात्रही तिथेच साजरी झाली.
दोघांचं रूटीन खूप छान सुरू झालं. रोज सकाळी ९ वाजता मॅडमच्या बेडवर चहा आणि नाश्ता येई. स्वतःचं आवरून तिला मांडीवर घेऊन तो उठवे. तिच्यासाठी हे स्वप्नच होतं.
ऋषीेका (त्याच्या मिठीत शिरून) - " तू हे नेहमी केलं नाही तरी चालेल. माझ्या वाईट सवयी मोडायच्या ऐवजी वाढतच आहेत. 
हे तुला जड जाईल बरंऽऽऽ...!"
अमोघ - " तेवढी जाड नाही गं तू, एकदम हलकी आहेस. "
ऋषीेका - "हाहा sss."
अमोघ - " मला आवडतं तुझ्यापासून दिवस चालू करायला. मी बनवलेले पदार्थ तुला माझ्या हाताने खाऊ घालायला. त्यामुळे त्याचं ओझ नको वाटून घेऊ. जन्मभर बायका त्यांच्या नवऱ्याला, घरच्यांना खाऊ घालतात ते चालत असेल तर हे का नाही...!!! 
जो ज्या कामात सराईत आहे त्याने ते करण्याची लाज बाळगू नये. हां जेव्हा मी बिझी असेल तेव्हा तू किचन सांभाळत जा, एकानीच करावं असंही काही नाही."
ऋषिका - "अॅम द लिकियेस्ट वूमन इन द होल वर्ल्ड."
अमोघ - " बर चला आवरा पटापट आणि निघू लवकर. तुला ऑफिसला सोडतो आणि मी हॉटेलला पळतो."
-----------------------------------
बघता बघता वर्ष निघून गेले. ऋषीेका ऑफिस सोबत स्वतंत्र कामही घेऊ लागली. अमोघला मात्र रूटीनचा कंटाळा आलेला. एके संध्याकाळी लवकर घरी येऊन तो टेरेसवर बसलेला. त्याला असं बघून ती एका मगमध्ये कॉफी घेऊन त्याच्या बाजुला बसली. एकाच मगने दोघही‌ कॉफीचा एक एक घोट घेऊ लागले.
अमोघ - "सगळच आहे पण काहीतरी मिसिंग वाटतंय, कळत नाहिये. आपलं हक्काचं असं काही आहे का जे आपली छाप सोडेल..?"
" आपलं हॉटेल सुरू करायचं...! " 
दोघंही एकदाच बोलले. एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चमकला. 
गोदाजीकाकांनी त्या दोघांना जड मनाने पण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अमोघने नोकरी सोडली व दोघंही तयारीला लागले. एक आराखडा तयार केला. किती प्रकार असतील, स्टाफ किती असेल, बांधकाम कसं हवं हे सगळं ठरलं. अमोघने गावाकडची जमीन  गहाण ठेवायची ठरवलं, पण तरीही अर्धी रक्कम बाकी होती. दोघांचे सेव्हींग्ज् तर पुढचे दिवस काढण्यासाठी लागणार होते. ३-४ महिने फिरून ३ इन्वेस्टर्स तयार झाले. आज त्यांची फायनल मीटिंग असते. 
रात्री ११ वाजता अमोघ घरी येतो काही न बोलता झोपी जातो. ऋषीेका समजून जाते की त्याला फायनान्स नाही मिळाला. सकाळी अमोघ उशिराच उठतो. ऋषीेका त्याच्याजवळ चहा नाश्ता घेऊन जाते. तो पुन्हा दिलखुषमध्ये नोकरी करायची म्हणून सांगतो. ती त्याला काही दिवस थांबायला सांगते.
काही दिवस थांबून अखेर तो दिलखुषमध्ये जाण्यासाठी निघतो.‌ रमत गमत हॉटेलवर पोहोचतो. अमोघ तिथे ऋषीेकाला बघून चमकतो. ती त्याच्यापुढे एक फाईल ठेवते. त्यांच्या नवीन हॉटेलचे पेपर्स असतात. अमोघ पेपर बघून उडतोच.
ऋषीेका - " ही सगळी तुझीच मेहनत आहे. कॉलेज झाल्यानंतर तू ज्या ज्या नावाजलेल्या स्ट्रीट स्टॉलवर काम केलं त्यांना मी भेटले. एक कल्पना सांगितली की त्यांचं नाव, त्यांचे पदार्थ एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये ठेवले जातील. खाऊ गल्लीत मिळालेला मान त्यांना आता रेस्टॉरंटमध्येही मिळेल. सर्वांनी आपल्या परीने पैसे गुंतवले आणि सर्वात मोठा शेअर गोदाजीकाका आणि जोगळेकर आजोबांनी दिला."
अमोघच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.
गोदाजीकाका - " जाओ बेटाsss दिल खुश कर दो सब का."
जोगळेकर आजोबा - "आता रोज मी माझ्या हक्काच्या घरी जेवायला येणार बरं."
अमोघ व ऋषिका त्यांचा आशिर्वाद घेऊन कामाला सुरुवात करतात.
६ महिन्यात एक मनमोहक असं गार्डन रेस्टॉरंट तयार होतं. व नाव ठरत "खाद्यरंग."

रम्य वातावरण, आकर्षक ॲंबियंस आणि शहरातील सगळ्या खवय्यांच्या आवडत्या डिशेस एकाच छताखाली.

गोदाजीकाका व जोगळेकर आजोबा रिबीन कापतात. अमोघ पहिला पदार्थ ऋषीेकाला देतो.
अमोघ - " हॅव अ टेस्ट माय प्रिन्सेस....! "
चव घेताच डोळे बंद करून 
ऋषीेका म्हणते - 
" यू आर रिअली माय 
  वंडरशेफ.! " 
------------------------------------------------------------
समाप्त

नमस्कार मंडळी..!

मी ईरा चँम्पयन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत माझी अतरंगी  टिम 'बटाट्याची चाळ' सह उतरले आहे.
आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक कथांना तूम्ही भरभरून दाद दिलीय तशीच दाद ह्या कथेला भरघोस व्ह्युज देऊन द्या,व माझी टीम विजयी करा. 
ही कथा कशी वाटली हे कमेंट्समधे सांगायला विसरू नका.
धन्यवाद
@रेवपुर्वा