# नवरा हा नवराच असतो...

खरोखर नवरा म्हणजे नवरा असतो… तुमचा काय ? आमचा काय ? सगळ्यांचा सारखाच असतो..


"अरे बापरे एवढ्या फेसबुक रिक्वेस्ट ? हे बघ ताई , हा तुझ्या क्लासमधला ना दीपक ? त्यानेही तुला रिक्वेस्ट पाठवलीय. बघ तर खरं. भावजींसारखे तुझेही विचार बुरसटलेत वाटते. जाऊ दे." मृण्मयी मेघनाला म्हणाली.

"अगं जी गोष्ट आपल्या नवऱ्याला आवडत नाही ती करायचीच कशासाठी ? यांना सोशल मीडियावर आलेले आवडत नाही आणि परपुरुषांनाही बोललेले फारसे रुचत नाही हे माहितीय आहे ना तुला ? मग उगाच कशाला फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारून आपल्या घरात वाद निर्माण करायचा ?" मेघना समजूतदारपणे म्हणाली.

"पण ताई , तू तर लग्न झाल्यापासून अगदी भाऊजींच्या शब्दाबाहेर जात नाहीस त्याचा भाऊजी फायदा घेतात असेच मला वाटतेय.अगं मुलं किती मोठी झालीत तुझी ? आता कशाला हवय तुला कशाचं बंधन ? तुला हवं तसं तू वागू शकतेस ना. पण नाही भाऊजींना आवडत नाही म्हणून तू परपुरुषांना बोलण्याचं टाळतेस आणि अगदी मन मारून जगतेस." मृण्मयी म्हणाली.

" ये नाही हं मृण्मयी , हे वाक्य तू जरा चुकीचे बोलतेस. मी मन मारून वगैरे काही जगत नाही. कोणी सांगितलं ? चार परपुरुषांमध्ये बोलले तरच आपण आधुनिक वाटतो ? किंवा आपल्या बायकोचे पुरूष फ्रेंड असलेले ज्या नवर्‍याला आवडतात तेच नवरे आधुनिक विचाराचे असतात म्हणजे बायकोला स्वातंत्र्य वगैरे देतात. हे साफ खोटेय. प्रत्येक व्यक्ती स्वभावाने वेगळा असतो आणि लग्नानंतर आपल्या जोडीदाराला खूश ठेवत हे नाते सांभाळावे लागते. मला यांनी दुसरे कोणतेच बंधन कधीच लादले नाही. आपल्या आईबाबांचीही ते मुलासारखी सेवा करतात. मी परपुरूषासोबत बोललेले त्यांना आवडत नसले तरी, ते ही कधीच कोणत्या स्त्रीला विनाकारण बोलत नाहीत. कामानिमित्त होतेच माझेही ऑफीसमध्ये पुरूषांशी बोलणे तेव्हा ते कुठे काय बोलतात ? फक्त सोशल मिडीयासारख्या आभासी दुनियेवर त्यांचा विश्वास नाही बस इतकच." मेघना म्हणाली.

"पण बघच तू . देवांशशी लग्न करून , सुखाचा संसार करून मी भाऊजींचे हे मत खोडून काढते की नाही ते." मृण्मयी म्हणाली.

लांबूनच दोघी बहिणीचे संभाषण ऐकून मोहित हसत मृण्मयीजवळ येऊन म्हणाला ," सोशल मीडियाचा अतिवापर हा घातक आहे हे तुझ्या एक दिवस नक्की लक्षात येणार . सोशल मीडियावरचे फ्रेंड येणार नाहीत तेव्हा तुझ्या मदतीला. हा तुझा भाऊजी आणि ताईच असेल तुझ्या मदतीला."

फेसबुक फ्रेंड असलेल्या देवांशशी मृण्मयीचा विवाह अगदी थाटात पार पडला. दोघेही अगदी आधुनिक विचाराचे असल्यामुळे दोघांची मते एकमेकांना पटत होती. लग्नाच्या दोन महिन्यानंतर मात्र मृण्मयी सकाळी सकाळी मेघनाकडे येऊन तिच्या गळा पडून धायमोकलून रडू लागली.

"अगं काय झालेय तुला मृण्मयी ? का रडतेस तू ?" मेघना घाबरून म्हणाली.

"ताई नाही राहायचं मला देवांशसोबत. त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये , दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे त्याच." मृण्मयी म्हणाली.

"अगं वेडी आहेस का तू ?असे कसे म्हणू शकतेस ? प्रेम नसते तर त्याने तुझ्याशी लग्न केले असते का?" मेघना म्हणाली.

"अगं ताई , मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेय , रोज तो कोणाशी तरी चॅटिंग करतो आणि मी आले की डिलीट करतो .हे बघ हा मी स्क्रीनशॉट घेतलाय." मृण्मयी रडत रडत म्हणाली.

"तू आधी शांत हो बरं! देवांशला इथे बोलवून खरे काय ते पाहूया?" मोहित म्हणाला.

मोहितने देवांशला फोन केला. देवांश विलंब न करता मोहितच्या घरी आला. देवांश आल्यानंतर मृण्मयी म्हणाली ," आधी मला फेसबुकवरून पटवले आता दुसऱ्या कोणाला तरी पटवतोय हा. बघा स्क्रीन शॉट घेतलाय मी त्याच्या चॅटिंगचा."

"हो ,हो मी ही पाहतोय ही कोणालातरी पटवतेय." देवांश म्हणाला.

"काय ? काय बोलतोयस तू हे ?" मृण्मयी रागाने म्हणाली.

"खरं तेच बोलतोय. हा बघ मी ही स्क्रीन शॉट घेतलाय. काय म्हणत होती तू ," यातले देवांशला काहीही कळू देऊ नका प्लीज. आणि तिकडूनही रिप्लाय येतोय अजिबात नाही. त्याला यातलं काहीच कळणार नाही." देवांश म्हणाला.

"बघू तो मोबाईल इकडे." म्हणून मृण्मयीने देवांशच्या हातातील मोबाईल घेतला. आणि तिला संभाषण वाचल्यावर लक्षात आले की , तिने देवांशला आपल्या भिशीच्या पैशातून बाईक घेण्यासाठी बाईक बुक केली होती आणि हे तिला देवांशला आताच कळू न देता त्याच्या वाढदिवसादिवशी त्याला सरप्राईज द्यायचे होते. म्हणूनच तिने शोरूममधून आलेल्या मेसेजला असा रिप्लाय दिला होता. हे तिने सांगितले आणि त्या नंबरवर कॉलकरून सिद्ध करून दाखवले.

"सॉरी !" म्हणत देवांशने कान पकडले. पण मृण्मयी म्हणाली ," तुझ्या स्क्रीनशॉटचे उत्तर दे आधी. "
देवांशने मृण्मयीला त्या नंबरवर कॉल करायला सांगितले .मृण्मयीने स्क्रीन शॉटवरील नंबरवर कॉल केल्यावर देवांशच्या खिशातच मोबाईल वाजत होता आणि तिला समजले देवांश हे सगळे मुद्दाम करत होता..

"लग्न म्हणजे काही पोरखेळ नाही. आज तुम्ही दोघेही फार चुकीचे वागलात. एवढ्या तेवढ्या कारणांवरून भांडत बसलात तर मुलांवर काय संस्कार करणार ? ते काही नाही यापुढे असे चालणार नाही." मेघना तावातवाने म्हणाली.

"सॉरी ताई ! यापुढे असे होणार नाही." देवांश म्हणाला.

"हो ताई सॉरी ! आणि काँग्रॅच्युलेशन भाऊजी ! तुम्ही जिंकलात. सगळे नवरे एकसारखेच असतात हे आलय माझ्या लक्षात… त्याचबरोबर सोशल मीडियाही आभासी दुनिया आहे हे ही मी मान्य केलेय." मृण्मयी शरमेने मान खाली घालून म्हणाली.

"ही काही स्पर्धा नव्हती पण तुम्ही दोघांनी सुखाने संसार केल्यावर आम्हाला आनंद वाटेल. तसेच या आभासी दुनियेपासून दूर राहिल्यावर." मोहित म्हणाला.
"हो भाऊजी." म्हणत मृण्मयी आणि देवांशने चुकलो म्हणून मोहितचे पाय पकडले.

खरोखर नवरा म्हणजे नवरा असतो… तुमचा काय ? आमचा काय ? सगळ्यांचा सारखाच असतो…पटलंय ना तुम्हांलाही ? कमेंट मध्ये नक्की सांगा..

सौ.प्राजक्ता पाटील