नावडतीचे मीठ अळणी.. अंतिम भाग

सुख शोधता आले पाहिजे


नावडतीचे मीठ अळणी.. भाग ३



वृंदाताई चपापल्या.. त्या काही बोलायच्या आधीच त्या बाईंनी बोलायला सुरूवात केली.." म्हातारपण वाईट हो.. असेच असते.. आपण आपल्या मुलांसाठी कष्ट घ्यायचे.. आणि त्यांना आपल्यात काहीच रस नसतो.. मी बघा एक शिक्षिका होते.. शाळेत शिकवत होते.. पण त्या शिकवण्याचा घरात त्रास व्हायला लागला.. आणि इथे यावे लागले.." त्या बाईंना भरपूर बोलायचे होते.. त्या थांबतच नव्हत्या. " घरी जेवायला सुद्धा नीट मिळायचे नाही हो.. कोणाला माझ्याशी बोलायला वेळ नसायचा.. शेवटी इथे निघून आले.. पेन्शन मिळते आहे.. त्यावर जगते आहे.. तुमचे काय झाले?" त्यांनी असे विचारताच वृंदाताईंच्या डोळ्यासमोर आली त्यांची नातवंडे.. जी स्वतःच्या अभ्यासात मग्न असतानाही यांच्या ठसक्याचा आवाज ऐकून पळत पळत पाणी घेऊन यायची.. कितीही दमला असला तरी दोन शब्द बोलल्याशिवाय झोपायला न जाणारा मुलगा.. रोज न चुकता फोन करणारी मुलगी. महिन्यातून एकदातरी भेटायला येणारा जावई. . आणि आपण हे आवडत नाही ते आवडत नाही असे बोलत असताना रोज आवडेल असे पदार्थ करणारी मीनल.. हि अशी प्रेमाची माणसे असताना आपण क्षुल्लक गोष्टींवरून आपलेही मनस्वास्थ्य घालवतो आणि मुलांचेही.. त्यांच्या डोळ्यात पाणी आले.. ते पाहून त्या बाईंना वाटले, कि इथे यायला लागले म्हणून त्या रडत आहेत. त्या त्यांची समजूत काढणार इतक्यात सलील आणि सुचेता तिथे आले.. "अरे हि तर मगाशी आलेली मुले.. तुमची आहेत का?" त्या बाईंनी विचारले.. वृंदाताईंनी मान हलवली.. "नशीबवान आहात..." एवढेच बोलून त्या मान हलवत आत निघून गेल्या.. वृंदाताई सुचेताकडे वळल्या.. "तू मुद्दाम केलेस ना हे?"
" आई माफ कर आम्हाला.. ताईला तसे काही म्हणायचे नव्हते.." सलील मध्ये म्हणाला..
" तू तिची बाजू घेऊ नकोस.. मला माहिती आहे, हे तिचेच डोके आहे.. ती चांगली ओळखते मला आणि मी तिला.. तिला माहीत होते सांगून काही मला पटणार नाही. म्हणून तिने मला इथे आणले. माझी चूक मला दाखवून दिली.."
" आई चूक असे नाही ग. पण तुझ्याच्याने काम होत नाहीतरी तुझा काम करण्याचा अट्टाहास इतरांनाच काय पण तुला स्वतःलाही त्रासदायक ठरतो आहे. खरेतर तुझ्या मैत्रीणी आहेत. त्यांच्यासोबत तू गप्पा मारू शकतेस, भेटू शकतेस अगदी ते ही नसेल होत तर जवळच्या बागेत जाऊन फक्त बसू शकतेस.. त्यानेही तुला मोकळे वाटेल. घरात सतत बसून बसून नको ते विचार मनात येतात.. आणि नको ते शब्द बाहेर पडतात.. मने दुखावतात.. तूच बघ ना जगात अशा अनेक वृद्ध व्यक्ती आहेत ज्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्यासाठी वेळ नाही किंवा असेल तरिही त्यांना त्यांच्यासोबत तो घालवायचा नसतो.. अशावेळेस तू तुला काय मिळाले आहे त्याचा थोडासा विचार कर ना.."
वृंदाताई ऐकून घेत होत्या.. सुचेताचे बोलून झाल्यावर त्यांनी सलील आणि तिला मिठीत घेतले.. आणि म्हणाल्या " थॅंक यू.. वाढदिवसाची एवढी सुंदर भेट दिल्याबद्दल.. आजपासून नावडतीचे मीठ अजिबात अळणी लागणार नाही मला...."


कथा कशी वाटली ते नक्की सांगा....
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all