Aug 09, 2022
General

नवा गडी नवं राज्य

Read Later
नवा गडी नवं राज्य

#नवा_गडी_नवं_राज्य

टिंकूचा एकच घोषा चालू होता,'मला पप्पा पाहिजेत.' मेघना तर अगदी रडवेली झाली त्याला समजावता समजावता. चारच तर महिने झाले होते टिंकूचे पप्पा जाऊन. मेघनाही त्या दु:खातून आता कुठं सावरत होती. काही दिवस तिचे आईवडील येऊन राहिले तिच्यासोबत. तिला इथलं सगळं सोडून त्यांच्या गावी चलायला सांगत होते पण मेघना नाही म्हणाली. इथे या घरात तिच्या मकरंदच्या आठवणी होत्या. प्रत्येक वस्तुवर त्याचा स्पर्श होता जो अजुनही तिला जाणवायचा.

मेघनाचं ऑफिसही   त्यांच्या बंगल्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं व टिंकूची शाळाही जवळ होती. मेघना व मकरंदने हा बंगला तयार व्हायचा जणू ध्यासच घेतला होता. मकरंदला जवळचं असं कुणी नव्हतं. नाही म्हणायला एक आत्या होती. ती मकरंद व मेघनाच्या लग्नाला पंधराएक दिवस येऊन राहिली होती. मकरंद गेला तेंव्हाही ती मेघनाला भेटून गेली होती.

मेघना हळूहळू मकरंदच्या आठवणींसोबत जगायचा प्रयत्न करत होती. आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायचा प्रयत्न करत होती. अधनामधना कुणी नातेवाईक येऊन सांत्वन करुन,चार धीराचे बोल बोलून जात होते.

मेघनाचे आईवडील तिच्यासाठी दुसरा नवरा शोधण्याच्या विचाराप्रत येऊन पोहोचले होते. त्यांनी तसं मेघनाला कळवलं होतं पण मेघनाने दुसऱ्या लग्नाला ठाम नकार दिला होता. मकरंदशिवाय दुसऱ्या कुणाचाही ती नवरा म्हणून विचार करु शकत नव्हती. मकरंद तिचं पहिलं प्रेम होता,तिचं सर्वस्व होता. कित्येक रात्री त्या दोघांनी जागून काढल्या होत्या. कधी चांदण्यात हातात हात घेऊन फिरले होते तर कधी वाळून एकमेकांची नावं कोरली होती. मकरंद गोरापान,कुरळ्या केसांचा. मेघना थोडी सावळीशी.

एका गेटटुगेदरमधे दोघांची ओळख झाली होती आणि मग मैत्री वाढत गेली. दोघांच्या बऱ्याचशा आवडीनिवडी जुळत होत्या. मकरंदला पाहतच रहावं असं मेघनाला वाटू लागलं होतं, त्याच्या संपर्कात रहावं,त्याच्याशी बोलावं असं वाटत होतं.

मकरंदला आईवडील नसल्याने त्याला एक प्रकारचा कॉम्पलेक्स होता. तो तसा बुजरा होता पण मेघना सतत अवतीभवती रहायची त्याच्या नि तिनेच त्याला लग्नाची गळ घातली होती. मकरंद हुशार होता,सुस्वभावी होता व सीए होता. मेघनाच्या आईवडिलांनाही तो जावई म्हणून पसंत पडला.

लग्न झाल्यावर दोनेक वर्षात मुलगा झाला  त्यांना. तेंव्हाही मकरंदची आबाळ होते असं सांगून मेघना माहेराहून बाळाला घेऊन अवघ्या वीसेक दिवसांत मकरंदकडे आली होती. दोघांनी मिळून घरासाठी जागा बघितली होती. शहरापासून थोडीशी दूर,निवांत ठिकाण होतं ते.

दोनेक वर्षांत बंगला बांधून पुर्ण झाला.  साफल्य नाव ठेवलं बंगल्याचं. व्हरांड्यात लाकडी झोपाळा बांधला होता ज्यावर रात्री दोघं गप्पा मारत बसायची. बऱ्याचदा हातात हात गुंफून निवांत बसून रहायची. न बोलताच बरंच काही बोलायची. बाळाचं नाव कौशल ठेवलं होतं पण दोघंही त्याला टिंकुच बोलायचे. टिंकू जसजसा मोठा होत होता तसतशी मेघना त्याचं सगळं आवरण्यात,त्याच्याशी खेळण्यात व्यस्त होऊन गेली.

एकदा मकरंदने तिला मित्राच्या ऑफिसमधे नोकरी करशील का असं विचारलं तेंव्हा मेघना आधी नकोच म्हणाली पण मकरंदने तिला समजावलं की पुढे टिंकू शाळेत जाऊ लागला की तुला घरात करमणार नाही तेंव्हा तू आतापासूनच नोकरी कर. मेघनाही मग तयार झाली.

मकरंदने तिला कधीच कोणत्या गोष्टीची जबरदस्ती केली नव्हती. आपलं म्हणणं तो अत्यंत संयतपणे मांडायचा नि तिचंही म्हणणं नीट ऐकून घ्यायचा. कधी दोघांत भांडणं झालीच तर तोच तिला मनवायचा. मेघनाचा अबोला त्याला सहनच होत नसायचा.

दोन बंगले सोडून एका बंगल्यात वडनेरे काकू पाळणाघर चालवायच्या. टिंकूला त्यांच्या पाळणाघरात ठेवून मेघना कामावर जायची. सकाळी मकरंद मेघनाला बरीच मदत करायचा. दूध आणून देणं,कुंडीतल्या झाडांना पाणी घालणं,पांघरुणांच्या घड्या घालणं,गिझर लावणं,टिंकुला शंभो घालणं,डब्बे भरणं अशी बरीच. संध्याकाळीही दोघं मिळून स्वैंपाक करायचे.

टिंकू तर वडनेरे काकूंकडे इतर मुलांच्यात छान रमला. तो आता पहिलीत गेला होता आणि एके दिवशी ती दुर्घटना घडली. मकरंद घरी येत असताना एका ट्रकने त्याच्या बाईकला ठोकलं. मकरंद जागच्या जागीच गेला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं. मेघना तर दोनेक दिवस शॉकमधेच होती आणि टिंकूला सगळं दिसत होतं पण तितकसं कळत नव्हतं.

त्या आघातानंतर अडीच महिन्यांनी मेघना परत ऑफिसला जाऊ लागली होती. टिंकूचही पाळणाघराचं,शाळेचं रुटीन सुरु झालं होतं. दोघंही सावरत होती. नेहमीची कामं करताना सतत मेघनाला मकरंदची आठवण यायची,त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा नि तिचे डोळे तिच्याही नकळत वाहू लागायचे. टिंकू एखादं टॉवेल घेऊन तिचे डोळे पुसायचा. मेघनाला वाटायचं,किती समजदार झालाय टिंकू!

पण हल्लीच पंधराएक दिवसांत टिंकूचं बिनसलं होतं. त्याच्या पाळणाघरात एक नवीन मुलगा आला होता. टिंकूएवढाच होता शौनक.

शौनकला त्याचे पप्पा सोडून जायचे तेंव्हा तो पप्पांना घट्ट मिठी मारायचा. वडनेरे काकू कशीबशी ती बापलेकाची मिठी सोडवायच्या. संध्याकाळी घरी जातानाही शौनक धावत जाऊन त्याच्या पप्पांना मिठी मारायचा. तेही त्याचे खूप लाड करायचे. शौनक व त्याच्या पप्पांचं प्रेम पाहून टिंकूला त्याच्या पप्पांची आठवण यायची.

टिंकूला आठवायचं पप्पासोबत शॉवरखाली अंघोळ करणं,दोघांनी एकसाथ ब्रश करणं, घराच्यासमोर फुटबॉल खेळणं,ताऱ्यांची माहिती ऐकणं. आता टिंकूही त्याच्या पप्पाला खूपच मिस करु लागला होता. त्याचं जेवण कमी होत चाललं होतं. अभ्यासातही नीट लक्ष लागत नव्हतं. आणि याचाच परिणाम की काय टिंकूला बारीक बारीक ताप येऊ लागला.

टिंकू झोपेत पप्पा पप्पा तुम्ही कुठे अहात,लवकर या असं  बरळत होता. ते ऐकून मेघनाच्या जीवाचं पाणी पाणी झालं. रात्रभर ती टिंकुच्या उशाशी बसून होती. मकरंदचा फोटो जवळ घेत म्हणाली,"तुच सांग आता याला काय ते. कुठून आणू मी याच्यासाठी पप्पा? का आम्हांला असा सोडून गेलास. प्लीज ये ना रे परत निदान तुझ्या बाळासाठी तरी."

टिंकूच्या तब्येतीबाबत कळताच मेघनाचे आईवडील दोघे तिला भेटायला आले. पहाट होता होता टिंकू जरा शांत निजला होता. लेकीची दशा पाहून आईवडिलांना कळवळून आलं. लोकं म्हणतात माणूस गेलं की त्याच्याबरोबर त्याचं सारं संपतं पण नसतं तसं. गेलेल्या माणसाच्या आठवणी जाळतात त्याच्या जोडीदाराला,मुलाबाळांना,आईवडिलांना. साऱ्यांच्या जीवनात एक पोकळी निर्माण होते,कधीही भरुन न येणारी. काळाचं मलम हाच एक उपाय असतो यावर पण तरीही कधी खपली निघते नि परत आठवणी आसवांच्या रुपात भळाभळा वाहू लागतात.

मेघनाने चहा ठेवला. तिचे आईवडील फ्रेश झाले नि नातवाशेजारी जाऊन बसले. उठल्यावर आजीआजोबांना पाहून टिंकू खूष झाला. मेघनाने नाश्ता बनवून ठेवला व ती ऑफिसला गेली. आधी तिची नोकरी ही तिची आवड होती पण मकरंदच्या पश्चात तिची नोकरी ही तिची गरज बनली होती व मकरंदने तिला नोकरी करायचा दिलेला सल्ला हा किती योग्य होता याची तिला प्रकर्षाने जाणीव होत होती.

आजोबांच्या गोष्टींमधे,त्यांच्याबरोबर केरम खेळण्यात टिंकू थोडा रमला खरा. आजीने त्याला अंघोळ घातली,त्याला आमटीभात भरवला.

संध्याकाळी मेघनाने मिसळपावचा बेत केला. गोड दह्याचा मठ्ठाही बनवला. बेल वाजली. टिंकूने दार उघडलं तर दारात शौनक व त्याचे पप्पा उभे होते. टिंकूने त्यांना हाय केलं व आत बोलावलं. टिंकूने शौनक व त्याच्या पप्पांची त्याच्या मम्मीशी,आजीआजोबांशी ओळख करुन दिली. शौनक व टिंकू खेळायला पळाले. टिंकूला शौनकला काय दाखवू न् काय न काय नको असं झालं होत. मेघनाने शौनकच्या पप्पांना चहा दिला. शौनक व टिंकूला चॉकलेट दूध दिलं.

शौनकच्या पप्पांनी टिंकूच्या आजारपणाबद्दल चौकशी केली व टिंकू नसला तर शौनकही पाळणाघरात रमत नाही असं म्हणाले. टिंकूचे आजोबा शौनकच्या पप्पांशी गप्पा मारत बसले. शौनकच्या आईला स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे असं शौनकच्या पप्पांनी आजोबांना सांगितलं. हे सांगताना त्यांचे डोळे भरुन आले होते.

टिंकूच्या आज्जीने टिंकूचा पप्पा पाहिजेचा घोषा लावल्याबद्दल सांगितलं. शौनकच्या पप्पांनी टिंकूला जवळ बोलावलं व त्याला म्हणाले,"टिंकू,उद्यापासून तुही मला पप्पा म्हणू लाग." टिंकूचे डोळे चमकले. त्याने पप्पा म्हणत शौनकच्या पप्पांना घट्ट मिठी मारली.

शौनकचे पप्पा मेघनाला म्हणाले,"प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. सध्या टिंकूला मला पप्पा म्हणूदेत."

मेघनाने कसंबसं आपलं रडू आवरलं. त्या दिवसानंतर पाळणाघरासमोर शौनकच्या पप्पांची गाडी उभी रहाताच टिंकू व शौनक  दोघेही शौनकच्या पप्पांकडे धाव घ्यायचे. शौनकचे पप्पा त्या जोडगोळीला घेऊन बरीच ठिकाणं फिरायचे.

मेघना व तिची आई एकदा शौनकच्या घरी शौनकच्या आईला बघावयास गेली. खाटेवर अगदी सापळा झोपावा तशी दिसत होती ती. केस पुर्ण गळाले होते. इतक्या तरुणवयात ती आजारपणाने वार्धक्यात गेली होती. हातापायांच्या अगदी काड्या झाल्या होत्या. डोळे खोल गेले होते. त्याही स्थितीत तिने मेघनाचा हात गच्च धरला व म्हणाली,"तुझा टिंकू शौनकच्या पप्पांना पप्पा म्हणतो ना. माझ्या शौनकचीही काळजी वाटतेय गं मला. इतक्या कमी वयात मला परमेश्वराचं बोलावणं आलंय. हा संसार अर्धवट सोडून जावं लागणार मला. एक उपकार करशील माझ्यावर? आई होशील माझ्या शौनकची? शौनकच्या पप्पांशी लग्न करशील तू?"

मेघनाला काय बोलावे काहीच कळेना. त्या अस्थिपंजर देहातल्या मातेला ती नाही तरी कशी म्हणणार होती? हाच प्रश्न जर शौनकच्या पप्पांनी मेघनाला विचारला असता तर कितीतरी उत्तरं दिली असती तिने उदा. मी त्या द्रुष्टीने तुमच्याकडे पाहिलंच नाही, मकरंदशिवाय दुसऱ्या कुणाचाही मी पती म्हणून विचार करु शकत नाही, वगैरै वगैरै पण शौनकच्या आईसमोर तिला काहीच बोलता येईना. शौनकचे पप्पा हे सारं बघत होते. त्यांचेही डोळे भरुन आले. ते बायकोजवळ जात तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,"काही होणार नाही अदु तुला. अगदी ठणठणीत बरी होणारैस तू."

शौनकची आई खोलवर हसली. तेवढ्या हसण्यानेही तिला धाप लागली. मेघनाला म्हणाली,"नीट विचार करुन सांग. मी वाट पहातेय तुझ्या होकाराची."

"अदु काय म्हणाली असतील ती टिंकूची आई अन् आज्जी. का असा वेडेपणा करतेस!"शौनकचे पप्पा,अविनाश म्हणाले.

"अवी, मला अंदाज आलाय रे माझ्या निघण्याचा. मी असेपर्यंत आपलं मोडकळीस आलेलं घर पुन्हा सावरावसं वाटतंय मला. मशीनचा एखादा पार्ट बिघडला की तू नवीन पार्ट घालून मशीन चालू करतोस नं अगदी तसंच." दोघं मग बराचवेळ काहीच बोलली नाहीत. शौनक गोष्टीचं पुस्तक हातात घेऊन होता खरा पण त्याचं सगळं लक्ष मम्मीपप्पांच्या बोलण्याकडे होतं.

मेघनाने खूप विचार केला. तिची आईही म्हणाली,"मेघना,बाळा हट्ट सोड राजा. मकरंदच्या आठवणींत तू आयुष्य काढशील पण टिंकूचं काय! मकरंद असता तर त्याच्या पाठीवर तुम्हाला एखादं बाळ झालं असतं. टिंकूला मनातल्या भावना शेअर करायला भावंड मिळालं असतं. आत्ता त्याला पप्पाही नाहीत नि भावंडही नाही. तू एकटी किती मुखवटे घेऊन वावरणार त्याच्यासमोर! सगळ्या नात्यांचा आपलाआपला होरा असतो तो असा भूमिका पार पडल्यासारखा नाही पार पाडता येत गं."

मेघनाला आईचं म्हणणं पटलं. टिंकू व शौनकसाठी तरी अविनाशशी लग्न करणंच सार्थ ठरेल असा कौल तिला तिच्या मनाने दिला. मकरंदचा फोटो उशाशी घेऊन ती रात्रभर त्याच्याशी या पुढच्या प्रवासाची जुळवाजुळव करत राहिली. जणू त्याला सांगत होती,मकरंद आपल्या टिंकूसाठी मला दुसरं लग्न करावं लागतय. रागावणार नाहीस नं माझ्यावर!  दुसऱ्या दिवशी तिने आपला निर्णय आईवडिलांना सांगितला. ती दोघंही खूष झाली. लेक पुन्हा मार्गाला लागतेय याचं समाधान झळकलं त्यांच्या चेहऱ्यावर.  वैदिक पद्धतीने लग्न झालं मोजक्या माणस़ाच्या उपस्थितीत. लग्नात मकरंदची आत्याही आली होती.

मेघना आणि टिंकू आता अविनाशच्या घरी राहू लागली.  शौनकच्या आईचं सगळं करायला नर्स होतीच. शौनक व टिंकूच्या बडबडीने घराला घरपण आलं. मेघना शौनकच्या आईशी गप्पा मारायची, तिच्या वेदनांना समजून घेत होती,तिला धीर देत होती. 

शौनकची आई,अदितीने मेघनाला अविनाशचा स्वभाव,त्याचा मितभाषीपणा,हळवेपणा,शौनकच्या सवयी याबद्दल समजावून सांगितलं. आठवडाभर झाला असेल. एका रात्री शौनकची आई देवाघरी गेली. अविनाश व शौनक खूप खूप रडले. मेघना व तिच्या आईवडिलांनी त्या दोघांना सावरलं.

दोनेक महिन्यांत शौनक बऱ्यापैकी सावरला. मेघना,अविनाश आपापला कामधंदा सांभाळून दोन्ही मुलांकडे लक्ष देत होते. शौनकला मेघनाच्या रुपात नवी आई भेटली होती तर टिंकूला अविनाशच्या रुपात नवीन पप्पा पण मेघना व शौनक मात्र आपापल्या चौकटीतच होते.

एकदा मेघनाचे आईवडील लेकीचा नव्याने मांडलेला संसार बघायला आले तेंव्हा त्यांना ही गोष्ट जाणवली.  मुलं खेळायला गेली असताना मेघनाच्या आईवडिलांनी मेघना व अविनाशला एकत्र बसवलं व या गोष्टीचा जाब विचारला तेंव्हा दोघंही म्हणाली की मुलांना सुख मिळालं ना बास. आम्हांला परस्परांशी संबंध प्रस्थापित करणं  म्हणजे पुर्वीच्या जोडीदाराशी प्रतारणा केल्यासारखं वाटतं तेंव्हा मात्र मेघनाच्या वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही जोवर शरीरसंबंध ठेवणार नाही तोवर तुमचं आभाळ एक होणार नाही.  तुम्हाला तनाने मनाने एक व्हावंच लागेल.

मेघनाचे आईवडिल शौनक व टिंकूला घेऊन मेघनाच्या जुन्या घरी गेले. इकडे घरी अविनाश व मेघना दोघेच. रात्रभर प्रथमच एकमेकांशी बोलत बसले. शौनकने प्रथमच मेघनाचा हात हातात घेतला. मेघनाच्या कपाळाचं चुंबन घेतलं. मेघनाही त्याच्या उबदार मिठीत शिरली.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now