Jan 26, 2021
General

नवा डाव

Read Later
नवा डाव

नवा डाव

राजश्री व श्रेयस,दोघेही परदेशात वास्तव्यास होते व नुकतेच आईवडिलांना भेटावयास भारतात आले होते.

मायदेशी आल्यापासून श्रेयसचं रोमँटिझम अधिकच वाढलं होतं. कुठे आईबाबा दिसत नाहीसं बघितलं की लगेच राजश्रीला मागून मिठी मारे. तिच्या गोऱ्यापान मानेवर ओठ टेकवे. राजश्रीचा मात्र कोण बघतय का या भीतीने जीव अर्धामुर्धा होई.

शेजखोलीत ती त्याला चांगलेच रागे भरे. मग तोही लाडात येऊन म्हणे,"राज,तिथे असं कोण बघतय का या भितीत हळूच तुला मिठीत घेण्यात जे थ्रील असतं ना ते एकांतात मिठीत घेण्यात नाही गं." यावर राज म्हणे,"वेडा आहेस अगदी,प्रेमवेडा. हे प्रेम किती वर्ष उतू जाणार असं?"

"म्हातारे होईपर्यंत.. नव्हे चिरकाळ."
मग राज त्याच्या मिठीत विरघळून जाई.

श्रेयसची लहान बहीण रेवती तिच्या मुलाला,निरजला घेऊन दादावहिनीला भेटायला आली. दोन वर्षापूर्वी एका अपघातात रेवतीचे पती मिलिंद जागीच गतप्राण झाले होते. त्यावेळी श्रेयस व राजश्री तिला भेटायला आली होती. त्यांनी तिला माहेरी रहाण्यास सांगितलं होतं पण तिने नकार दिला होता.

ती मिलिंदच्या वडिलांसोबत सासरी रहायची. निरजचाही आजोबांवर फार जीव होता.

रेवती उच्चविद्याविभूषित होती. नामांकित कंपनीत मोठ्या पोस्टवर कार्यरत होती. पैशांचा प्रश्न नव्हता. तरी कुठेतरी काहीतरी अपुरं होतं.

त्यादिवशी राजश्रीला रात्री अचानक जाग आली. तिचा घसा कोरडा झाला होता. ती पाणी पिण्यासाठी स्वैंपाकघरात आली. वाजले किती बघण्यासाठी सहज हॉलमधे तिची पावलं वळली.

हॉलच्या टेरेसमधे तिला कोणतरी झोक्यावर बसल्यासारखं दिसलं.  राजश्री घाबरली तरी सगळा धीर एकवटून एकेक पाऊल पुढे टाकू लागली. काच उघडली नि पहाते तर काय,रेवती बसली होती झोपाळ्यावर.

राज रेवतीजवळ गेली व तिला विचारु लागली,"रेवती,अगं रात्रीचे अडीच वाजले. तुला झोप येत नाही का?"
रेवती गुढ हसली व म्हणाली,"ये बैस. झोपेचं म्हणतेस..झोप कधीच निघून गेली माझ्या आयुष्यातून माझ्या मिलिंदसोबत. आता फक्त मी आणि माझं एकटेपण."

"असं का म्हणतेस रेवा,आम्ही आहोत नं. नीरज आहे."

"तुम्ही सगळे अहातच गं नि निरज तो तर एकुलता एक आशेचा धागा आहे माझा. माझं अधांतरी आयुष्य त्या एका धाग्यावर लटकतय."

"रेवती,तुला कितीवेळा आईबाबांनीही समजावलं,दुसऱ्या लग्नाचा विचार कर म्हणून."

"राज,तू म्हणतेस तेवढं सोप्पं नसतं गं दुसरं लग्न करणं."

"का? काय कमी आहे तुझ्यात?  नुकतीच तीशी ओलांडलीस. अगं आजकाल मुली पस्तीशीपर्यंतही अविवाहित असतात. निरजला सांभाळणारा भेटला तर ठीक नाहीतर आम्ही सांभाळू त्याला. शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेस तू."

"आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र..एवढं सोप्पं मोजमाप नसतं राज लग्नाच्या बाजारात. बाई कितीही शिकली..तिने कितीही प्रगती केली तरी ती नवीकोरी लागते. नाहीतर सेकंडहँड गाडीसारखी बाईची किंमतही कमी होते नि त्यानुसार मागणी येतात. केवळ एक तडजोड असते ती. त्यात दुसरा जोडीदार आधीच्या अपत्याला समजावून घेणारा मिळाला तर ठीक नाहीतर आगीतून फुफाट्यात. अजुनच वैराण होऊन जातं आयुष्य."

"किती भयानक आहे ना गं हे सगळं."

"हो गं. रात्ररात्र टक्क जागी असते,आशाळभूतपणे. मिलिंद येईल,मला कवेत घेईल म्हणून त्याची वाट पहाते. तो नाहीच येत. अंधाराच्या सावल्या अधिकच दाट होतात. मला घेरुन टाकतात चहुबाजूंनी. मी गुडघ्यात डोकं गच्च धरुन बसून रहाते. कधी वासना खवळते. त्याच्या देहाची आस लागते पण तसं मनात आणणंही पाप. नवरा गेला की बाईच्या न् बाई गेली की नवऱ्याच्या वासना आपोआप मरतात किंवा त्यांनी त्या माराव्या.

सापाला काठीने मारतात तसं वासनेच्या पिवळ्याधम्मक सापाला मी  ठेचून ठेचून मारते पण तो मरत नाही प्रत्येक रात्री पुन्हा नव्याने येतो. मला फुत्कारतो,मी पुन्हा हाती संयमाची काठी घेऊन त्याला बदडते. तो पुन्हा स्स स्स करत फणा काढून डोलू लागतो. मग मी अंगाचं मुटकूळं करुन एका कोनात बसून रहाते. रात्रीचा प्रहर संपून पहाटेची गार हवा येईस्तोवर. पहाटेचा गारवा माझ्या मनावर मायेचं पांघरुण घालतो. मला निजवतो. माझ्या सासऱ्यांनाही बहुतेक समजतय सारं. ते मला झोपू देतात. निरजची तयारी करतात.

सगळी माणसं देवासारखी भेटली आहेत बघ. मला समजून घेणारी,माझं मन जपणारी तरी मी अधुरी आहे माझ्या मिलिंदशिवाय. मिलिंद येणार नाही हे माहित असुनही त्याच्या वाटेला डोळे लावून बसणारी त्याची लाडकी रेवा,सकाळी मात्र मी परत माझा बुरखा चढवते आनंदाचा, हसण्याखिदळण्याचा,आत्मनिर्भरतेचा. हे असंच चालायचं आता.

कितीही नाकारलं तरी जोडीदाराची सोबत गरजेची असते गं. त्याचं नुसतं जवळ असणंही कितीतरी मोलाचं असतं."

"रेवा,आपण प्रयत्न करु. तुला समजून घेणारा जोडीदार मिळेल नक्की."

"अगं ते कथाकादंबऱ्यात असतं राज. आयुष्यात नसतं तसं. इथे बाईची व्हर्जिनिटी बघतात.. पुरुषाचीही. नवाकोरा जोडीदारच हवा असतो."

राज डबडबलेल्या डोळ्यांनी  मुखवट्याआतील रेवती पहात राहते.

दोघीही मग झोपायला गेल्या. श्रेयसला थोडीशी जाग येताच त्याने राजला कुशीत घेतलं. राजची मात्र झोप पुरती उडाली होती. ती टक्क जागी होती. रेवाचं व्हर्जिनिटीच्या हिंदोळ्यावर फडफडणारं आयुष्य पहात.

दुसऱ्या दिवशी राज तिच्या आईकडे गेली. श्रेयस त्याची थोडी कामं आवरून तिला जॉइंट होणार होता.  आईने राजसाठी तिच्या आवडीची सिताफळ रबडी केली होती. तिच्या आवडीचा वरणभात विथ साजूक तुप व लिंबाची फोड सोबत गावरान मटकीची उसळ तर राजच्या बाबांनी तिच्यासाठी टेंडर कोकोनट आईसक्रीम घरी बनवलं होतं. सेवानिवृत्त झाल्यापासून ते युट्युबवर पाहून चुकतमाकत का होईना एकेक रेसिपी शिकत होते व पत्नीला,सुनेला खाऊ घालत होते.

राज घरी आल्यामुळे तिच्या आईवडिलांना,भावाला,वहिनीला आनंद झाला. सगळेजण तिच्याशी भरभरुन बोलले. राज होतीच तशी,प्रत्येकासाठी हक्काचा खांदा अशी. सगळ्यांच सगळं ऐकून घेणारी,समजुतदार मुलगी.

दुपारी आई,वहिनी व तिच्या गप्पा रंगल्या असता राजच्या मित्राचा किरणचा विषय निघाला. राजची आई तिला म्हणाली,"राज, तुला सांगायचं राहूनच गेलं. तुझा शाळेतला मित्र,किरण त्याचं फार वाईट झालं गं. बाळंतपणात बायको गेली बिचाऱ्याची. सहा महिने होत आले आता. आपण किरणच्या घरी जाऊया गं संध्याकाळी."

राज नुसतच हुं म्हणाली. राज फार विचारी,संवेदनशील व्यक्ती होती. ती विचार करु लागली,'किती क्षणभंगूर असतं हे आयुष्य. जो जन्माला येतो तो कधीतरी जाणारच पण अर्ध्यावर डाव मोडून जायला लागणं किती वाईट..जाणाऱ्यासाठीही व पाठी रहाणाऱ्यांसाठीही.'

राजला लहानपणापासून ते गाणं आवडायचं
भातुकलीच्या खेळामधली
राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी

राजने मनाशी ठरवलं,होता होईल तो अशा अधुऱ्या कहाण्या पुन्हा नव्याने सुरु होण्यासाठी हातभार लावायचा.

संध्याकाळी राज व तिची आई, किरणच्या घरी गेली. किरणच्या आईने दार उघडलं. काकू म्हणत राजने त्यांना गच्च मिठी मारली. या काकूंशी खूप घनिष्ठ नातं होतं तिचं. काकू आधी त्यांच्या शेजारी रहायच्या. हल्लीच सातेक वर्षापूर्वी नव्या सोसायटीत रहायला गेल्या होत्या.

बरेचदा काकूच्या हातची भाजी राज डब्यात घेऊन जायची. काकूंनाही मुलगी नसल्याने त्या तिच्यावर जरा जास्तच माया करायच्या. राजच्या मिठीत काकूंना भरुन आलं. त्यांचे डोळे पाझरु लागले. राज काकूच्या पाठीवर हात फिरवत राहिली. अकाली आलेल्या वार्धक्याने थकल्या होत्या काकू. इतक्यात पाळण्यातली छोटी रडू लागली. तिचा टँ टँ आवाज ऐकून काकूंनी आपले डोळे पुसले.

"काय झालं माझ्या परीला. भुकी लागली,ओलंपण केलं," असं म्हणत काकूंनी तिचं डायपर बदललं.

मग काकूंनी वाटीतून दूध कोमट करुन आणलं व परीला दोन पायांत घेऊन चमच्याने भरवू लागल्या. राज परीसाठी वाजणारी खेळणी घेऊन आली होती. त्या खेळण्यांचा नाद ऐकत परीने दुधू संपवलं मग आजीने तिला उभं केलं तसा तिने मस्त ढेकर दिला.

काकूंनी तिला ओल्या फडक्याने पुसलं,पावडरतीठ लावली. नवीन झबलं घातलं तशी ती अगदी फ्रेश झाली व इकडेतिकडे रांगू लागली. हे वर ठेव ते वर ठेव काकूंना क्षणाचाही उसंत नव्हता. दुखऱ्या गुडघ्यांनी त्या नातीला सांभाळत होत्या.

राजनेच विषय काढला.
"काकू,किरणला पुन्हा लग्न करायची इच्छा आहे?"

"नाही म्हणतोय गं तो पण तुच सांग मी कुठेपर्यंत पुरे पडणार? मी म्हणजे याच्या फाटक्या संसाराला तात्पुरतं सावरण्यासाठी जोडलेलं ठिगळ आहे झालं. तरणाताठ्या लेकाची अवस्था माझ्याच्याने नाही पहावत.  राज,तू समजावशील त्याला? तुझं ऐकेल तो. तू बालमैत्रीण नं त्याची. करशील एवढं तुझ्या काकूसाठी?"

राजने काकूंचे हात तिच्या हातात घट्ट धरले व डोळ्यांनीच काकूला शाश्वती दिली.

दाराची बेल वाजली. किरण आला होता. राजला अचानक बघून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं पण परत ते आपसूक मावळलं. किरण फ्रेश होऊन आल्यावर  राजला त्याने किती दिवस मुक्काम वगैरे विचारलं.

राजने किरणच्या दिवंगत पत्नीविषयी थोडंबहुत विचारलं. किरणनेही तिला मोजक्या शब्दांत  सांगितलं व विषय बदलला. तो परीशी खेळू लागला. तिला सांगू लागला,"बघ परी आत्तू आली आहे तुला भेटायला." बाबाच्या कुशीत परीची कळी खुलली. दोन्ही हातांनी त्याचे केस ओढू लागली. त्याच्या गालांना नुकत्याच येत असणाऱ्या दाताच्या कण्यांनी चावे घेऊ लागली.

राज निघताना म्हणाली,"किरण,उद्या रविवार आहे जरा बाहेर जाऊ. मला मिसळ खायची आहे रे अण्णांच्या हॉटेलातली. येशील नं?" किरण नाही म्हणूच शकला नाही. कितीतरी वेळा त्या दोघांनी तिथे मिसळ चापली होती.

मिसळची ऑर्डर देऊन किरण व राजश्री समोरासमोर बसले होते.

राजनेच विषय काढला
"किरण,काकू म्हणत होत्या तू लग्नाला तयार नाहीस?"

"डोकं फिरलंय तुझ्या काकूचं. पुन्हा लग्न कर म्हणे. सोप्पं का आहे ते. माझ्या सावीच्या आठवणींत जगायला आवडेल मला. पुन्हा त्या वाटेला जाणं नको. आता फक्त एकच ध्येय..परीला मोठं करायचं,बास."

"इतका स्वार्थी कधीपासून झालास?"

"का मी काय स्वार्थीपणा केला?"

"संकुचितपणा..स्वतःपुरता विचार करत आहेस तू."

"अच्छा,तुझ्या काकूने पढवून पाठवलय तुला."

"किरण,मारेन हं तुला..अरे तुझ्या लहानपणी तुझे वडील गेले तेव्हापासून काकूंनी खानावळ चालवून एकहाती सांभाळलं तुला."

"मी कुठे नाही म्हणतोय?"

"अरे मग त्या माऊलीच्या सुखाचाही विचार कर की जरा. तिला वाटतय तुझा संसार नव्याने सुरु व्हावा,परीला आई मिळावी तर तिची इच्छा पुर्ण कर."

"दुसरी बायको केली आणि तिने आईला,परीला नीट सांभाळलं नाही तर.."

"का आधीच नकारघंटा लावतोयस."

लाल तवंग ल्यालेल्या मिसळच्या प्लेटी,कांदा,फरसाण,लिंबू त्यांच्या समोर आलं.

मिसळीवर कांदा,फरसाण घेऊन,लिंबू पिळून दोघं मिसळचा आस्वाद घेऊ लागली.
मिसळ संपताच कॉफी मागवली.

कॉफीचा सिप घेत असताना राज म्हणाली,"किरण माझ्या नणंदेशी करशील लग्न?"

"काय?"

"हो सॉरी. चुकलच माझं. ती व्हर्जिन नाही.
ती विधवा आहे. एक चार वर्षांचा मुलगा आहे तिला. तुमचं जमलं असतं तर त्या मुलाला,निरजला बाबा मिळाले असते,परीसारखी गोंडस बहीण मिळाली असती,काकूंची चिंता मिटली असती,जरा जास्त जगल्या असत्या.  परीला भाऊ.आई मिळाली असती."

"तू समजतेस तेवढा जुन्या वळणाचा मी नाही. तुझी नणंद म्हणजे ती रेवती नं. अगं खूप वाईट झालं तिचं. आई बोलली मला. पण तू म्हणतेस ते अशक्य आहे. मी एक बँकेतला साधासुधा केशिअर नि तुझी नणंद,रेवती..केवढी शिकलेय ती..मोठ्या कंपनीत कार्यरत आहे ना."

"म्हणजे मेल इगो आड येतोय तर ..इनकम डिसपँरिटी..उत्पन्नातली तफावत."

"ती दुर्लक्षित करुन कसं चालेल! इगो असं नाही पण उद्या ती मला माझ्या तिच्याहून कमी असलेल्या उत्पन्नाबाबत  हिणवणार नाही कशावरुन? तसंच ती माझ्या परीला सांभाळेल? माझ्या आईला आपलं मानेल?"

"सगळं तुझ्या मनासारखंच होईल."

"जर तसं असेल तर माझी काहीच हरकत नाही."

"राज आनंदाने चित्कारली."

दोन दिवसांत तिने रेवती व किरणची भेट घडवून आणली. दोघांनी सविस्तर चर्चा केली. एकदुसऱ्याची मतं समजून घेतली.

निरजलाही राजने समजावलं. आधी नाखूष होता पण तिने त्याला परीराणीसाठी गोड गोजिरी बहीण मिळणार असं आमिष दाखवताच तोही खूष झाला. काही निवडक मंडळींच्या उपस्थितीत किरण व रेवतीचं लग्न लागलं. किरणच्या आईने व रेवतीच्या सासऱ्यांनी राजचे भरपूर आभार मानले.

राज व श्रेयस परदेशी जायला निघाले तेंव्हा किरण व रेवती आपल्या दोन्ही मुलांसोबत त्यांना निरोप द्यायला एअरपोर्टवर आले होते. निरजने बाबाची बोटं घट्ट पकडलेली तर छोटी परी रेवतीच्या कडेवरुन सारीकडे टुकुटुकु बघत होती.

-----सौ.गीता गजानन गरुड.