
खट्याळ सासूबाई
निर्मलाताईंना तीन मूल आणि तीन मुली,मोठा परिवार ,त्यांनी खूप कष्ट करून मुलांना शिकवले, तीनही मुले चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर कामाला होती,त्या गोष्टीचा त्यांना जरा जास्तच गर्व होता,सुनाही चांगल्या मिळाल्या होत्या, गावाला गेल्यावर सगळे एकत्र येऊन राहत होते,पण मुंबईला प्रत्येक जण वेगळे राहत होते ,सणासुदीला मात्र सगळे एकत्र जमायचे ,त्या मुंबईत आल्यावर मुलींकडे आणि सगळ्या मुलांकडे दोन दोन दिवस रहायला जात.सगळ्यात लहान मुलाचे ह्यावर्षीच लग्न झाले होते, लग्नानंतर दोन महिन्यातच अवधूतराव(निर्मलाबाईंचा नवरा) स्वर्गवासी झाले होते,तसे ते आजारीच होते ,पण सगळयांना या गोष्टीचे समाधान होते की,त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली होती,त्यांना सगळयात लहान मुलाचे लग्न झालेले पाहायचे होते. निर्मला ताईंना सुनांना धाकात ठेवायची सवय होती,त्या पहिल्यांदाच सगळ्यात छोट्या मुलाकडे राहायला जाणार होत्या ,मोठ्या दोघी तशा घरातच असायच्या ,ह्या त्यांच्याकडे गेल्या की,नवरा बायकोत भांडण झालंच पाहिजे ,मुलांनी त्यांच ऐकलं की,त्यांना या गोष्टीचे समाधान मिळे की ,मुल माझ्या ताब्यात आहेत अजून. सगळ्यात छोटी सून बाई तर जास्त शिकलेली होती आणि नोकरी करत होती ,त्यांना शनिवार ,रविवार सुट्टी असते म्हणून त्या शनिवारी सकाळी गेल्या . बाकिच्या कामाला बाई होती ,पण जेवण मात्र तिने स्वत: बनवले होते आणि सगळं त्यांच्या आवडीचं,पण तरी नेहमीच्या सवयीने त्या काही चूक काढणार नाही,असे कसे होईल. त्या म्हणाल्या ,पण तू गोड काहीच नाही बनवलं,तुला आनंद नाही झाला का ,मी आले त्याचा
सूनबाई -हे घर तुमचं आहे,गोड तर पाहुणे आल्यावर करतो ,तुमचंच घर आहे ,कितीही दिवस रहा आणि तुम्हाला जे गोड खावसं वाटतं ते हक्काने सांगा ,मला येत असेल तर मी बनवते ,नसेल येत तर ,तुमच्या कडून शिकणार ,चालेल ना आत्या.
निर्मलाताई - हो ,तू म्हणतीयेस ते अगदी खरं आहे
छोटा मुलगा थोडा आनंदी होतो ,कारण या आधी त्याने पाहिले होते,ज्यावेळी तो मोठ्या भावा बरोबर राहायचा ,काही ना काही कारणावरून भांडण व्हायचं,त्यामुळे तो त्याच्या आईला चांगलच ओळखत होता.
दुस-या दिवशी सूनबाई जाऊन आठवड्याची भाजी घेऊन आली ,तिने सगळी भाजी आत बसून साफ केली , निवडलेली भाजी फ्रिज मध्ये ठेवली आणि कचरा भरून परत त्याच पिशवीत ठेवला. निर्मलाताईंची दुपारची डुलकी झाली होती ,म्हणून ती सगळ्यांसाठी चहा ठेवायला किचन मध्ये गेली,तशा त्या लेकाला म्हणाल्या ,तुझी बायको किती आळशी आहे,भाजी आणली ,पिशवी तशीच ठेवली आहे,भाजी खराब होईल नाहीतर ,मी किती काट कसरीने माझा संसार केला आणि हिला पैशाची किंमतच नाही .
त्यावर तो काहीच बोलला नाही,हे पाहून निर्मलाताई थोड्या चिडल्या.
तोवर ती चहा घेऊन आली ,सगळे चहा पिले,तसं ती म्हणाली , मी दळण घेऊन येते.ती दळण आणायला गेल्यावर मुलगा उठला आणि पिशवी तिच्या समोर ठेवत म्हणाला,यात काय आहे ते पहा आधी.त्यांनी उघडून पाहीलं तर,कचरा होता,त्या काहीच बोलल्या नाहीत.
तसं मुलगा म्हणाला ,मला तिच्या समोर तुझा अपमान करायचा नव्हता ,तिने काय विचार केला असता.
निर्मलाताई तिथे राहिल्या तरी,दोघांमध्ये भांडण लावता आलं नाही, म्हणून नाराज होत्या ,त्यांना असं वाटायला लागलं की,आता हा मुलगा आपल्या हातातून निसटून चालला आहे ,असं वाटायला लागतं.
त्या बेचैन अवस्थेत गावाला जातात ,आता गहू काढायचा असतो ,त्या लहान मुलाला फोन करतात आणि सांगतात ,गहू काढायचा आहे ,तर मदतीला तुझ्या बायकोला जमत असेल तर पाठव . तो म्हणतो ,विचारून बघतो ,तिला सुट्टी मिळते का?
निर्मलाताई- तिची इच्छा असेल ,तर मिळेल आणि नसेल तर नाही मिळणार
मुलगा- असं नसतं,ते कामावर अवलंबून असतं
निर्मलाताई-नको बायकोची जास्त बाजू घेऊ,कमावते म्हणून डोक्यावर बसून ठेवशील
मुलगा-मी विचारून सांगतो
निर्मलाताई- मला फोन करून कळव
निर्मलाताईंना विश्वास असतो की, ती यायला तयार होणार नाही,मग त्या तिला चांगले खडे बोल सुनावतील,असे मनोरे रचत होत्या.
इकडे सुनबाईने सुट्टी काढली आणि गावाला जायला तयार झाली,गावाला गेल्यावर निर्मलाताई म्हणाल्या ,सकाळी पाच वाजता उठून शेतात जायचं आहे ,गहू कापायला .
सूनबाई - चालेल आत्या ,जाऊ ना
सासुबाईंचा मुद्दाम चाललेला खट्याळपणा ,तिच्या लक्षात आला होता,पण तीही तयार होती ,कारण वडिलांकडे असताना, सुट्टीत होस्टेल वरून आल्यावर ती शेतात मदत करू लागत असे.
दुस-या दिवशी सकाळी पहाटेच दोघी सासू सुना शेताला गेल्या ,नऊ वाजेपर्यंत गहू कापला ,मग घरी आल्या ,आंघोळी केल्या ,जेवण करून जेवल्या ,थोडा वेळ अंग टाकावं,असं वाटत होतं,तर सासूबाई म्हणाल्या ,जा शेतावर जाऊन आपली कपडे धुऊन सुकत घाल ,ती तशीच शेतावर गेली ,कपडे धुऊन,सुकत घालतच होती की,सासूबाई परत शेतावर हजर ,परत दोघींनी मिळून गहू कापला, सात वाजता घरी गेल्या ,जेवण बनवून जेवल्या ,तिने भांडी घासली आणि किचन आवरून अंथरूण टाकले. आज तिल्या पडल्या पडल्या झोप लागली.
सासूबाई मात्र विचार करत होत्या ,ही मला काहीच उलट उत्तर देत नाही. बघू अजून तीन दिवस आहे ,किती सहनशक्ती आहे तिच्याकडे,एवढी शिकलेली आहे ,म्हटल्यावर माझ्या समोर तिचा काही टिकाव लागणार नाही.
पुढचे दोन दिवस गहू कापण्यात आणि पेंढ्या बांधण्यात जातो.मग गहू करायची मशीन येते ,ती सगळया प्रकारची मदत करते ,शिकलेली असूनही ,असं कधीच म्हटली नाही की,मी हे का करू,नसेल येत तर म्हणायची तुम्ही सांगा ,मी करते .
जेवढ्ं शक्य होईल,तितक्या त्या चुका काढत होत्या ,पण तिने तरीही त्यांना एका शब्दाने दुखावले नाही , आता तिची सुट्टी संपणार होती ,त्यामुळे ती परत मुंबईला निघणार होती ,ती म्हणाली ,मी गावात जाऊन येते. गावात गेली काजू,बदाम ,मनुके,महिनाभरासाठी लागणारं सामान घेऊन आली ,त्यांना म्हणाली ,एकट्या राहता म्हणून काहितरी खाऊन दिवस घालवू नका,स्वत:ची काळजी घ्या ,तुम्हाला जेव्हा वाटेल,तेव्हा सगळ्यांकडे या.
दुपारच्या गाडीने जायला निघाली ,तेव्हाही हक्काने म्हणाली ,स्वत:ची काळजी घ्या.
सासूबाई-अगं मी तुझी सासू आहे ,तू माझी नाही ,शेवटी अंगातला खट्याळपणा थोडा कमी होणार आहे का
सूनबाई - आई म्हणाले ,तर तुम्ही म्हणाल्या, आत्या म्हण .
आता जे बोललात ,तेही बरोबरच आहे ,तुम्ही जसं हक्काने मला सूनबाई आहे ,म्हणून चार गोष्टी रागावून आणि समजावून सांगता ,तसंच सून या नात्याने मी तुम्हाला ,हक्काने आणि प्रेमाने तुमची स्वत:ची काळजी घ्या ,असं सांगते.
तितक्यात गाडी सुरू होते आणि ती सासुबाईंना डोळ्यांत पाणी आलेलं टिपताना पाहते .
सून मनातल्या मनात विचार करते,सासू सुनेच्ं नातं असं नारळासारखं असावं,सासू जरी वरचं टणक कवच बनली ,तर सुनेन्ं नारळातल्या खोब-यासारखं मऊ राहावं आणि आतल्या गोड पाण्याची चव चाखण्याचा आनंद कुटुंबाला घेऊ द्यावा.
ही कथा जर तुम्हांला आवडली असेल ,तर नावासहित शेअर करू शकता,हसत रहा,वाचत रहा,आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात