नऊ रूपे तिची.. भाग अंतिम

तिची नऊ रूपे
आठवे महागौरीचे..


"अगं ए काळे.. पटकन बाजूला हो." तो जोरात ओरडला.

"काळे काय?? गौरी नाव आहे माझे. तुला माहित नाही का?" गौरीने रागाने विचारले.

"तुझं फक्त नाव गौरी आहे.. पण आहेस तर काळीच ना.. किती टॅन झाली आहेस बघ." गौरीचा नवरा हितेश तिला हसत म्हणाला.

"लग्नाच्या वेळेस दिसलं नव्हतं का तुला? आता समजले का?" गौरीच्या डोळ्यात आपल्याला हिणवल्यामुळे पाणी आले.

"अगं ए लगेच रडतेस काय? मी मस्करी करत होतो तुझी." हितेश सावरून घेत म्हणाला.

"ही अशी मस्करी? ते ही रंगावरून? जो माझ्या हातात नाही." गौरी दुखावली गेली होती.

"चुकलं माझं.. पण आता ही रडारड नको." हितेश आत जात म्हणाला. गौरी मात्र स्वतःशीच विचार करत बसली. 'फक्त गोरेपणा हाच निकष लावायचा? माझी हुशारी, माझी कर्तबगारी याचे काहीच महत्व याला वाटत नाही का?' विचार करता करता तिची नजर शेजारच्या वर्तमानपत्रावर पडली. ती बातमी बघून तिच्या डोक्यात एक विचार आला. दुसर्‍याच दिवशी हितेशला न सांगता ती घराबाहेर पडली.

हितेश गौरीची मस्करी जरी करत असला तरीही त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होते. आता त्याला अधूनमधून तिला रंगावरून चिडवायची सवय लागली होती. त्याला स्वतःचाच राग आला. पोलिसांत सुद्धा तो जाऊ शकत नव्हता. त्याने गौरीला फोन करायचा खूप प्रयत्न केला. पण तिने फोनही बंद करून ठेवला होता. त्याला स्वतःच्या सासूसासर्यांना विचारायची देखील लाज वाटत होती. दोन दिवस वाट बघून शेवटी त्याने त्यांना फोन लावलाच.

"बाबा, गौरी आली आहे का तिथे?" हितेशने विचारले.

"येणार होती का?" त्यांनी उलट विचारले.

"ती माझ्यावर चिडून कुठेतरी निघून गेली आहे." हताश होऊन तो म्हणाला.

"काळजी करू नकोस.. लवकरच भेटेल ती तुला.." गूढ बोलत त्यांनी फोन ठेवला. गौरी सुखरूप आहे हे समजल्यावर हितेशचा जीव भांड्यात पडला. पण ती कुठे गेली असेल हा विचार डोक्यात होताच. जवळजवळ महिना होऊन गेला होता गौरीला घर सोडून. हितेशसाठी जगणं हिच शिक्षा झाली होती जणू. सकाळी उठून ऑफिसला जा. तिथेच चहा प्या, बाहेरच काहीतरी खा.. घरी तो फक्त झोपायला येत होता. सतत गौरीची आठवण त्याला येत होती. पण इलाज नव्हता. एके रविवारी काय करायचे हा प्रश्न पडून हितेश घरी बसला होता. तोच बेल वाजली. 'यावेळेस कोण?' असा विचार करत त्याने दरवाजा उघडला. दरवाजात गौरी होती. तिच्यासोबत तिचे आणि त्याचे आईबाबा होते. गौरीचा चेहरा खूप बदलला होता.

"कुठे गेली होतीस तू?" काहीच न बोलता तिने हातातला मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला. तो आश्चर्याने बघत असतानाच त्याच्या वडिलांनी मोबाईलमधली बातमी त्याला दाखवली.

"एका नामांकित कंपनीने मिसेस इंडिया ही स्पर्धा घेतली होती. त्यात गौरीने भाग घेतला आणि ती तो किताब जिंकून आली आहे." हितेश बघतच राहिला.

"पण मला कसं समजलं नाही.."

"तू मोबाईल कालपासून वापरला असशील तर ना.. " त्याची आई म्हणाली.

"पण हे लपूनछपून का करायचे?" हितेश थोडा वैतागला होता.

"तुला जाणीव करून द्यायला की गोरा रंग म्हणजेच सर्व काही नसतं. सावळा रंग असला म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. देव न करो.. मी तिथे हरले असते तर तुला परत बोलायची संधी मिळाली असती.. म्हणून नाही सांगितले." गौरी म्हणाली. त्याने सगळ्यांसमोर तिच्यापुढे हात जोडले. ते बघून त्याच्या आईला आठवली, काळी म्हणून लोकं चिडवायला लागल्यावर तप करून स्वतःला परिवर्तित केले ती महागौरी..

*************


रूप नववे.. सिद्धीदात्रीचे..


"या वर्षीचा उद्योगरत्न पुरस्कार जात आहे मिस सुमेधा यांना.. त्या करत असलेल्या विशेष कामाबद्दल. अनेक मुलंमुली जन्माला येतात. पण त्यातल्या काहीजणांना मात्र आपण कोणत्या लिंगाचे आहोत हे कितीतरी काळ समजतच नाही. त्यातून चालू होतात अनेक लढे.. आधी स्वतःशीच, नंतर घरातल्यांशी आणि शेवटी समाजाशी. अश्या अनेकांची आयुष्य आज सुमेधाजींमुळे सावरली गेली आहेत. त्यांना
मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर दोन शब्द बोलावेत." संचालिकेचे बोलणे पूर्ण होताच सुमेधा उठली. ते बघून टाळ्यांचा कडकडाट झाला. पदर सावरत ती स्टेजवर आली.

"नमस्कार.. सगळ्यात आधी या पुरस्कारासाठी धन्यवाद. दोन शब्द.. काय बोलू या दोन शब्दात? मी आज जी आहे ती आहे आमच्या शाळेतल्या बाईंमुळे. आत्ता या ताई म्हणाल्या तसं, अनेकांना आपण कोण आहोत मुलगा की मुलगी हेच समजत नसतं.. माझेही तेच झालं. येता जाता बायल्या म्हणून ऐकावे लागणारे टोमणे. हो.. मी याआधी मुलगा म्हणून जगत होते. तो मानसिक त्रास असह्य होऊन मी एकेदिवशी जीव देणार होतो आणि तिथे मला भेटल्या आमच्या परबबाई.. त्यांनी मला अडवलं, माझ्या दुखावलेल्या मनावर फुंकर घातली. मला जगण्याची उमेद दिली. एक काळ होता की माझ्या घरातले माझ्यासोबत नव्हते पण त्या कधीच मागे हटल्या नाहीत. मी शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागले. पण कुठेतरी घुसमट व्हायची. ती दूर करण्यातही त्यांनी माझी मदत केली. तिथेच जन्म झाला सुमेधाचा. मी जे भोगले आहे ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ही धडपड.. बस्स.. अजून काय बोलू? हा पुरस्कार माझा नाही माझ्या बाईंचा.. ज्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्यापाठी धीराने उभ्या राहिल्या."

परत एकदा टाळ्या वाजल्या. सगळं जग कौतुक करत होतं एका पुरूषाचं स्त्रीत झालेल्या रूपांतराचे.



नवरात्र सुरू झाले आणि अनेक लेखकांनी संकल्प केला नऊ रूपांवर कथा लिहिण्याचा. आधीच दोन दीर्घ कथांचे काम सुरू असल्याने मी तिकडे बघायचेच नाही असे ठरवले होते. पण.. बहुतेक देवीची इच्छा.. रोज एक रूप लिहून पोस्ट करणे शक्य नव्हते म्हणून एकाच भागात दोन रूपे लिहिली. ती आवडली तर तुम्ही सांगालच ही अपेक्षा.

युट्यूबरसाठी खास विनंती.. माझ्या कोणत्याही कथेचे व्हिडिओ बनवण्याची परवानगी नाही. तसे आढळून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all