Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नात्यातला ओलावा..

Read Later
नात्यातला ओलावा..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

विषय :- रक्षाबंधन 

नात्यातला ओलावा..

आठवतं मला.. लहानपणी आई राखीपौर्णिमेच्या पंधरा दिवस आधीच राख्या घेऊन ठेवायची. मोठ्या "मेरे भैया” लिहलेल्या, मोठ्या फुलांच्या, वर स्वस्तिक चिन्ह असलेल्या.. हात भरून जाईल अशा.. पोस्टाच्या पिवळ्या रंगांच्या पाकिटात राखी, छोटी कुंकवाची, अक्षतांची पुडी, गुलाबाच्या पाकळ्या आणि तिने लिहलेली चिट्ठी.. ती चिट्ठी लिहताना डोळ्यांतून वाहणाऱ्या गंगा यमुना..  "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरच्या सुवासाची कर बरसात " हे गाणं गुणगुणत, आसवं टिपत गावाकडचा मामा, मामी,आजी, तिचे चुलत, मावस भाऊ, काका काकू दूरच्या सगळ्या नातेवाईकांची खुशाली विचारलेली असायची. अन काय सांगू..! बरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या गावी पोहचायच्या. जास्त शाळा न शिकलेली माझी आई..! पण कसलं भारी वेळेचं नियोजन होतं तिचं.. माया होती ना..! त्या साठी कुठे कोणत्या शाळेत जावं लागतं..! माया स्नेह आतून हृदयातून येतो ना..!

आदल्या दिवशी आम्ही आईला मेहेंदीची पानं आणून द्यायचो. आई ती पानं पाट्यावर वाटायची. रंग येण्यासाठी थोडासा पानांचा कात, लिंबू घालून केलेला कोरा चहा त्यात घालायची. रात्री उशीरापर्यंत अगरबत्तीच्या काडीने टिपक्या ठिपक्यांची पिंपळ पानाची नक्षी असलेली मेहेंदी आई हातावर काढून द्यायची. सकाळी गडद लाल झालेली मेहेंदी हातावर छान खुलून दिसायची. सकाळी पहाटे लवकर उठून आई दारापुढे छान सुंदर रंग भरलेली रांगोळी रेखायची नंतर जेवणात पुरणपोळीचा, नारळीभाताचा बेत आखला जायचा. कटाची आमटी, कांदेभजी, तळलेल्या कुरडया पापड्या असा छान साग्रसंगीत बेत असायचा. श्रावणात श्रावणसरी बरसत असतानाही आपल्या चिमुकल्यांना घेऊन माहेरी येणाऱ्या माहेरवाशीणींची लगबग असायची. सर्वांच्या घरातला आनंद ओसंडून वाहायचा.

एक राखी देवापुढे ठेवून आई प्रथम देवाला औक्षण करायची. "पाठीराखा बनून कायम पाठीशी रहा" जणू प्रार्थनाच करायची. बसण्यासाठी दिलेल्या पाटाभोवती सुबक रांगोळी काढायची. दादाला पाटावर बसवून मला दादाला औक्षण करायला सांगायची. मी दादाला कुंकूमतिलक लावून अक्षता भाळी त्याच्या चिटकवायची. आई म्हणायची, "जेवढ्या जास्त अक्षता भाळी चिटकतील तितकं जास्त प्रेम असतं आपलं आपल्या भावावर.."

तिची भाबडी समजूत. औक्षण झाल्यावर दादाने बाबांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून भेट दिलेलं टिकल्याचं पाकीट, दादाच्या राखीसोबत बाबांना आत्याची गावावरून आलेली राखी बांधताना बाबांना आलेला गहिवर अजूनही लक्षात आहे. दूरदर्शनवर लागलेली जुनी गाणी.. "मेरे चंदा मेरे भैया मेरे अनमोल रतन", "फुलों का तारो का", इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया" ओवळीते मी लाडक्या भाऊराया" आणि आईचा दाटून आलेला कंठ.. सारं आठवतंय..

पुढे काळ बदलला. सुबत्ता आली. डिजिटलच्या जगात वाटचाल सुरू झाली. पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, पोस्ट पाकीट भूतकाळात जमा झाली. लोकल, बसने प्रवास करणारे स्वतःच्या मोटरगाडीतून प्रवास करू लागले. माहेरच्या भेटीला लागणारं दोन तासांचं अंतर आता तासावर आलं. मोबाईल, फोन आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडीओ कॉल ने एकमेकांना दिसू लागलो. राखी खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होऊन "ऑनलाइन शॉपिंग" चा काळ आला..पूर्वी राखी घेऊन येणाऱ्या पोस्टमनकाकांच्या पण हाती आई राखी बांधायची. ऑनलाइन शॉपिंगमूळे आता पोस्टमन काकांचं येणंच होत नाही. "आत्या" नावाचं नातं हरवत चाललं. मामाच्या खांद्यावर बसून रानात फिरण्याची मजा लोप पावत गेली. जणू नाती हरवत चालली. मायेची ओल कमी झाली. कदाचित नाती व्यवहारिक झाली आणि भावना बोथट झाल्या. आपुलकीची नाती व्यावसायिक व्यवहारात बदलत गेली. स्वार्थ असेल तरच नाती सांभाळली जाऊ लागली. काम संपलं, नातं अनोळखी होऊन जाऊ लागली.

हे वास्तव केवळ शहरापुरतं नाही, गाव खेड्यातसुध्दा याची लागण झाली आहे. शेवटी काय..! ‘ कालाय तस्मै नमः’ म्हणून पुढे चालायचं. भूतकाळ कुरवाळत बसायला कोणालाच वेळ नाही आणि ती भावना पण नाही. म्हणूनच वाटतं मनाला.. जुना काळ खरंच छान होता. नात्यांची ओढ होती. नात्यात ओलावा होता.

हे सुभद्रेचा बंधू कृष्णा.. श्रीरंगा.!! हरवत चाललेल्या नात्यांना पुन्हा सांधायला येशील का? नात्यांचे सेतू पुन्हा एकदा बांधायला येशील का? तो पूर्वीचा काळ परत घेऊन येशील का? नात्यात ओल निर्माण करायला पुन्हा एकदा येशील का?

©® निशा थोरे.. (अनुप्रिया)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//