किशोरचा वाढदिवस होता. त्याच्या अनेक मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या. बेल वाजली कुरिअरने पत्र आले होते. कमलचे पत्र होते.
"प्रिय किशोर,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अमेरिकेला गेलेच नाही. मी ताई सोबत गावी आहे. तुला एक गिफ्ट द्यायचे आहे. एक नोटीस पाठवली आहे वाच.
श्रीमती कमल यांचा बंगला आणि सर्व प्रॉपर्टी आश्रमाला दान करण्यात येत आहे.
त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी असा निर्णय घेणे तुला पटलेच नसावे. तुला काय वाटलं, मी मावशीला काहीच सांगणार नाही? तुझं रुक्षपणे वागणं, तू जसा माझ्याशी वागला ते सर्वकाही मी सांगितले आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात ते बरोबर आहे; पण आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि नाका तोंडात पाणी जायला लागलं की माणूस हात पाय मारतोच. तू, खूप दुखावलं आहेस मला. एकवेळ मुग्धाचे वागणे विसरू शकते ; पण तुझे वागणे अजिबात नाही.
तू तर माझा पोटचा गोळा होतास ना? तू काय कर्तव्य पार पाडलीस? उलट वडिलांच्या कमाईवर फक्त मजा-मस्ती करत राहिलास.
किशोर, मी आई म्हणून माझी सारी कर्तव्य पार पाडली; पण तू तर माझ्याशी साधं माणुसकीने देखील वागला नाहीस. ह्या काळात मला तुझ्या आधाराची खूप गरज होती आणि तूच मला वृद्धाश्रमात पाठवायला निघालास.
खूप ओझं झाली होती का रे तुझ्या डोक्यावर? तू लहान होतास तेव्हा म्हणायचा आई-बाबा मोठेपणी मी तुम्हा दोघांना सांभाळणार.
मन भरून यायचे. तुझा खूप आधार वाटायचा. ही अपेक्षा म्हाताऱ्या आई-वडिलांनी मुलांकडून करणं चुकीची आहे का? बरं हे चुकीचे असेल तर मग म्हाताऱ्या आई-वडिलांनी जायचं कुठे?
आयुष्यभर मेहनत करून थकलेल्या जीवांनी आधार शोधायचा कुठे? वृद्धाश्रमात? खूप सोप्पा उपाय निवडलास मला दूर करायचा. तुझ्या मनाला काहीच वाटलं नाही का? दुधातुन माशी काढावी अगदी तसंच तू मला तुझ्या आयुष्यातून बाजूला काढायला निघालास.
माझ्यासाठी तुझ्याकडे पाच मिनिटंही वेळ नव्हता. माझा आत्मसन्मान वेळोवेळी पायदळी तुडवलास.
किशोर, तुला सांगायचं राहून गेलं. तुझ्या वडीलांनी शेवटचा श्वास चालू असताना माझ्याकडून वचन मागितले होते.
माझ्यानंतर तुझी प्रॉपर्टी शेवटपर्यंत तुझीच राहिली पाहिजे. मी त्यांना वचन दिले होते; पण मनाला वाईट वाटत होते, त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला.
जेव्हा प्रॉपर्टीच्या कागदावर मी सही द्यायचं नाकारलं तेव्हा तुझं वागणं अचानक बदललं. तुझे वडीलच बरोबर होते. माझ्यापेक्षा चार पावसाळे त्यांनी जास्त पाहिले होते. त्यांना ह्या दुनियेचा अनुभव होता. माणसं ओळखायला त्यांना चांगलंच जमायचे.
आईपणाची मायेची पट्टी डोळ्यावर घट्ट बांधली होती. तुझ्या प्रेमापोटी आंधळी झाले होते. ती पट्टी तू तुझ्या वागण्याने दूर केलीस.
ह्याच दिवशी तुझं माझ्याशी नातं जोडलं होतं. आज मी हे नाते तोडते आहे. मुक्त करते आहे तुला ह्या ओझ्यातून. किशोर, आता तू माझा मुलगा नाही. तुझा मार्ग मोकळा आहे. लवकरात लवकर माझा बंगला खाली कर.
तुझीच,
नसलेली आई.
किशोर डोक्याला हात लाऊन मटकन खाली बसला.
आई असे काही करेल त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. डोक्याला हात लावून बसलेल्या किशोरला पाहून लगबगीने मुग्धा आली. तिने हातातील पत्र घेतलं आणि सारंकाही वाचलं. तीदेखील डोक्याला हात लावून बसली.
काही महिन्याने कमलच्या बंगल्याच्या बाहेर एक फलक लावला होता "कमल वृद्धाश्रम - वीण नात्यांची". आश्रमाच्या समोर बाकड्यावर बसून कमल आणि आशा दोघी आश्रमातील अश्या मजबूत नात्यांना पहात होत्या, ज्यांची वीण आधाराच्या,प्रेमाच्या,मायेच्या बंधनाने गुंफली होती. ते नातं रक्ताचे नव्हते; पण तरीही कमलसाठी तेच सर्वस्व झाले होते कारण ते नातं स्वार्थाने नव्हे; तर प्रेमाने,मायेने गुंफले होते.
कमल शेकडो वृद्धांची आधार झाली होती. पोटच्या पोरांसोबत नात्याची वीण जरी सैल झाली असली तरी तिने असे अनेक नातं घट्ट जोडले होते जे तिची साथ कधीच सोडणार नव्हते.
समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर लाईक, कंमेंट,शेअर जरूर करा. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा