नात्यांची वीण भाग ३(अश्विनी ओगले)

कानात कोणीतरी गरम तेल ओतत आहे असेच काहीसे आशाला झाले.अश्विनी आणि अविनाश दोघेही हे सर्व ऐकून शॉक झाले होते.





कमल बोलू लागली,

"ताई , मी माझे दुःख कधीच तुला सांगितले नाही ; कारण तुला वाईट वाटेल. आता मात्र सहन होत नाही. वयोमानानुसार मला त्रास सुरू झाले आहेत. माझे शरीर मला साथ देत नाही. हात पाय थरथरतात. माझ्या पतीनंतर सर्वात जवळ कोणी होतं तर माझा मुलगा किशोर; पण त्याला आता मी नको आहे. त्याला मी जड झाले आहे.




तो मला म्हणाला आहे ,

" तो माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही."


" काय! असं म्हणाला तो?" आशा.


"ताई, तो असंच म्हणाला" कमल.


कमल पुढे बोलू लागली,


"मी मान्य केले, त्याला माझ्यासाठी वेळ नाही; पण त्याचे वागणे पहिल्यासारखे राहिले नाही. माझ्याशी नेहमी चिडून बोलतो. नेहमीच झिडकी देऊन बोलतो. माणसांसमोर चांगलं वागतो आणि पाठी तुटकपणे वागतो.


मी नेहमीच त्याचा चांगला विचार केला. त्याच्या सुखात माझे सुखं शोधले. त्याच्या मुलांना सांभाळायला , मुग्धाला नोकरीला जाता यावे म्हणून मी राजीनामा दिला. आयुष्यभर फक्त त्याच्या आणि त्याच्या संसाराच्या सुखासाठी झटले; पण मला त्याबदल्यात अशी वागणूक मिळेल असे कधीच वाटले नव्हते."


कमल रडू लागली.


कानात कोणीतरी गरम तेल ओतत आहे असेच काहीसे आशाला झाले.


अश्विनी आणि अविनाश दोघेही हे सर्व ऐकून शॉक झाले होते.


कमल पुढे बोलू लागली.


"त्या दिवशी वास्तुशांती होती, मी फार खुश होते. सर्व पाहुण्यांनी घर भरलं होतं. किशोरच्या कंपनीतले देखील आले होते. तसेच त्याचे साहेब देखील आले होते. मी प्रसाद वाटत होते. प्रसाद देताना साहेबांच्या शर्टवर प्रसाद पडला. हेच केशवने पाहिले. त्याला प्रचंड राग आला. त्याने मला उठवून बाजूला बसवले. मी जाणूनबुजून केले नाही. नंतर मी सर्व पाहुण्यांशी गप्पा मारू लागले; पण हल्ली बोलताना मी अडखळते, कधी कधी बोबडं बोलते म्हणून तेही आवडत नाही.


त्या दिवशी मी बोलताना चुकले तर सरळ त्याने मला रूम मध्ये बंद केले; कारण त्याचा अपमान झाला होता. किशोर असा वागेल वाटलं देखील नव्हतं. ताई,मी का का य नाही केलं त्याच्यासाठी? त्याच्या संगोपणात मी कसलीच कसर सोडली नाही. त्याला संस्कार देण्यातही मागेपुढे पाहिले नाही.


लहानपणी तो चुकला तर त्याला योग्य वळणावर आणले. तो चुकला म्हणून मी कधी त्याला रूममध्ये बंद केले नाही. उलट त्याच्यासोबत तटस्थपणे उभी राहिले.त्याला आधार दिला.







मुलीला खूप प्रेम असते म्हणे.आज वर्ष झाले. काव्या मला बघायला देखील आली नाही. तिलाही माझ्यासाठी वेळ नाही. तिला खूप कामं असतात सांगते. मी फोन केला तर फोनही उचलत नाही.मी रोज तिच्या फोनची वाट बघते."



ताई,मला किशोर,काव्याच्या वागण्याचा प्रचंड राग आला आहे.


ह्या संपत्तीचा काय उपयोग आहे? पोटची मुलं जर अशी वागत असतील तर म्हाताऱ्या आई-वडिलांनी जायचे कुठे?


ताई मी खूप सन्मानाने जगले. किशोरच्या वडिलांनी कधीच मला दुखावले नाही; पण किशोर आणि काव्या दोघेही असे वागले. असं वाटतं मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं. काय करायचं असे आईपण जिथे फक्त हेटाळणी केली जाते. आपलीच पोरं आपल्याला वाळीत टाकतात. परकं असल्याची वागणूक दिली जाते.


आपण आपल्याच मुलांसाठी ओझं होऊन जातो. ताई, मला ह्या वयात काय हवं आहे? फक्त प्रेमाचे दोन शब्द; पण ताई, हे देखील नाही. रोज नव्याने मरते आहे. असं जगण्यापेक्षा एकदाचे मरण आलं तर बरं होईल."


"कमली,असं अभद्र बोलू नकोस. तुझी ताई अजून जिवंत आहे. थांब त्याला चांगलाच धडा शिकवते." आशा कमलच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली.



इतका वेळ शांतपणे सर्वांचे बोलणं ऐकणारी स्वयंपाकीण ताई आली आणि म्हणाली,

"आशा मावशी, कमल मावशी 100% खरं बोलत आहेत. किशोर दादा आणि मुग्धा ताई फार वाईट वागणून देतात. मला वाईट वाटतं; पण मी काही म्हणाले तर म्हणतात तू तुझं काम कर. आमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याशी तुझा संबंध नाही.नाहीतर तुला कामावरून काढून टाकणार. मी काल किशोर दादाचे बोलणंही ऐकलं. ते कमल मावशीला वृद्धाश्रमात पाठवणार आहेत. तुम्ही खरंच घेऊन जा मावशीला. त्यांचे हाल मला बघवत नाहीत."


हे एकूण सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.



किशोर आणि मुग्धा आले.


आशा म्हणाली,


"किशोर, काही दिवसांकरता मी कमलला माझ्यासोबत घेऊन जाते. तिलाही थोडं बरं वाटेल. उद्याच आम्ही निघतो." आशाच्या बोलण्यात एक गूढ होते. अश्विनी आणि अविनाशला ते समजले.


आधी किशोर आणि मुग्धाने नकार दिला; नंतर मात्र दोघेही तयार झाले. असंही किशोरला माहीत होतं, आई काही झालं तरी घरात काय चालू आहे हे मावशीला कळू देणार नाही. आईच्या ह्याच वृत्तीचा जणू त्याने गैरफायदा घेतला होता. आई घरातील इज्जत घरात ठेवत आली होती म्हणून तो आईचा पावलोपावली अपमान करत होता आणि ते बघून मुग्धाही तशीच वागत होती.



दुसऱ्या दिवशी कमल,आशा सगळेच निघाले. कमलने स्वतःचा बंगला भरलेल्या डोळ्याने निहाळला. असंख्य कटू आठवणीसोबत ती गाडीत बसली. किशोर आणि मुग्धाला अजिबात पाहिले नाही. मुग्धा आणि किशोरने सुटकेचा श्वास सोडला होता. आता काही दिवस तरी कमलच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते.


जशी गाडी नजरेआड झाली तशी मुग्धा किशोरला म्हणाली,


"आईला वृद्धाश्रमात पाठवायचे

आहे तेथील साहेबांना सांगा त्या अमेरिकेहून आल्यावर येतील."


किशोरने लगेच फोन लावून सांगितले.


आशा, कमलला घेऊन खरंतर अमेरिकेला न जाता तिच्या गावच्या घरी गेली होती. काहीतरी महत्त्वाचे काम करायचे होते. त्या कामात अविनाश, अश्विनी मदत करणार होते.


दहा दिवस झाले. किशोरने मावशीला फोन लावला आणि म्हणाला,

"मावशी,आईला कधी पाठवते आहे घरी?"


"लवकरच ." आशा.


" ठीक आहे,मला जरा काम आहे मावशी नंतर फोन करतो." किशोर.







किशोरने वृद्धाश्रमात फोन लावून आई थोड्याच दिवसात येईल असे सांगितले.


कमलवर जीवापाड प्रेम करणारी बहीण असं सहज कसं निघून गेली? तिने राग गिळला होता? का आणखी काही कारण होते?


पाहू पुढच्या भागात..


क्रमशः


भाग आवडला असेल तर नक्की लाईक, कंमेंट

,शेअर करा.


अश्विनी ओगले.

धन्यवाद.


🎭 Series Post

View all