अश्विनीच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. दिवसभराच्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला होता.
"कमल, तू जा मी आलेच." आशा.
कमल आपल्या रूममध्ये निघून गेली. इथे आशाने किशोरला थांबवले.
किशोर मनात विचार करू लागला "मावशीला नक्की काय विचारायचे आहे, कशासाठी तिने मला थांबवले आहे?"
आशाने काळजीच्या स्वरात त्याला विचारले, "किशोर, कमलला काय झाले आहे? बोलताना अडखळते, मध्ये मध्ये काही शब्दही नीट बोलत नाही."
किशोर म्हणाला "मावशी, मी तुला सांगणारच होतो. आईला अचानक हा त्रास सुरू झाला आहे. हात,पायदेखील थरथरतात.मध्येच बोबडं बोलते. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर म्हणाले काही लोकांना असा त्रास वयोमानानुसार होतो."
हे सर्व ऐकून तिला प्रचंड दुःख झाले.
तिचे मन कासावीस झाले.
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बहिणीला हा त्रास व्हावा, हे ऐकून तिला रडू आले.
किशोर म्हणाला,
"मावशी, काळजी करू नकोस, आई बरी होईल. तू आता झोप. तू थकली असशील."
आशा जड पावलांनी कमलच्या रूममध्ये गेली. पाहते तर, कमल आशाचीच वाट बघत होती.
आशाला पाहिले तसे ती लगबगीने आशा जवळ आली.
"ताई मला काहीतरी बोला ..यचे आहे."जरा अडखळतच ती म्हणाली.
कमलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
आशाला जाणवलं नक्कीच तिला महत्त्वाचे बोलायचे आहे.
"कमल,तुझ्याशी गप्पा मारायलाच तर इतक्या लांबून आले आहे. तुझी खूप आठवण येत होती. कुठेच मन लागत नव्हते.सतत तुझाच विचार येत होता."
कमलने रूमच्या बाहेर कोणीही नाही याची खात्री केली. कमलने हळूच दार लावून घेतलं.
कमल बोलू लागली, तोच मुग्धाने दारावर थाप मारली. कमल खूपच दचकली.
"कमल, इतकं काय झाले दचकायला?" असे म्हणत आशाने दरवाजा उघडला.
मुग्धा आत येत म्हणाली "चांगल्या गप्पा रंगल्या आहेत वाटतं. सॉरी मावशी, ते आईंच्या रात्रीच्या गोळ्या द्यायला विसरले म्हणून आले. मुग्धाने हातात आणलेल्या गोळ्या कमलला दिल्या.
कमल नकारार्थक मान हलवत म्हणाली "मला न..को गोळ्या."
मुग्धा मावशीकडे पहात म्हणाली " मावशी, तुम्ही बघितले ? आईंच्याच तब्येतीसाठी खटाटोप चालू आहे, तरी देखील औषध नकोच म्हणतात. आता तुम्हीच त्यांना समजावून सांगा."
आशा दटावत कमलला म्हणाली,
"कमली, गोळ्या घे नाहीतर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही."
आशा बोलणार नाही ,म्हणून कमलची इच्छा नसतानाही तिने गोळ्या खाल्ल्या.
" चालू द्या तुमच्या गप्पा मी जाते." असे म्हणत मुग्धा निघून गेली.
कमल बोलण्यासाठी आतुर झाली होती.खूप काही साचलं होतं मनात. निचरा करायचा होता.
मुग्धा गेली. कमलने, आशाचा हात घट्ट पकडला आणि बोलू लागली "ता..ई, तुझ्याशी खूप बोलायचे आहे."
प्रत्येक वाक्य बोलताना जरा ती अडखळतच होती. आशा लक्षपूर्वक ऐकू लागली.
"मला कि.. शोर आणि मुग्धाविषयी बोलायचे आहे."
"काय बोलायचे आहे? "आशा.
"किशोरने सकाळी मला रूममध्ये बंद के..ले होते."
असे बोलून ती रडू लागली.
हे ऐकताच आशाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
"त्याने असे का केले?" कमल काय बोलणार यासाठी ती आतुर झाली होती.
कमलच्या डोळ्यावर झोप आली, अगदी तिला गुंगी आली आणि ती बसल्या बसल्या झोपून गेली.
आशाला हे ऐकून प्रचंड धक्का बसला.तिने ठरवलं ,उद्या किशोरला जाब विचारायचाच? आशा रात्रभर या अंगावरून त्या अंगावर करत होती. तिला झोपच लागली नाही.
मनात सतत विचार येत होते "का असे केले किशोरने?"
सकाळ झाली कोणीतरी दार वाजवले. आशाला वाटले मुग्धा किंवा किशोर असेल.
ती तडक उठली आणि जरा नाराजीतच दार उघडले. आशाच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या, पाहते तर अश्विनी होती .
"अश्विनी, तू?" आशा
"हो आई मी. आत येऊ का?"
"हो ये ना." आशा.
"आई ,मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे." अश्विनी म्हणाली.
" बोल अश्विनी काय बोलायचे आहे."
"आई, मी आधीच माफी मागते."
आशा म्हणाली "माफी कशासाठी?"
"मी जे बोलणार आहे, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुम्हाला माझा रागही येईल, पण मला बोलावं लागेल."
आशा म्हणाली "हे बघ अश्विनी, मी तुला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगितलं होतं, मनात कोणत्याही शंका कुशंका नको. सासू सून असलो तरी आपल्या नात्यात पारदर्शकता महत्त्वाची आहे."
अश्विनी "आई ,म्हणूनच तर मी तुमच्याशी बोलायला आले आहे."
ती पुढे बोलू लागली.
"आई, काल पासून मी बघते आहे, मला किशोर आणि मुग्धाविषयी काहीतरी सांगायचे आहे. खरं तर मला दोघांचं वागणं जरा विचित्रच वाटतं आहे, मला जो संशय आला तो खरा आहे हे मला रात्रीच समजले ; म्हणून, तेच सांगायला मी आले आहे."
अश्विनी हळू आवाजात बोलू लागली.
"आई, मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा रूमच्या बाहेर आले, पाहते तर मुग्धा तुमच्या रूमला कान लावून ऐकत होती."
हे ऐकून आशाला धक्का बसला.
आशा रागानेच बोलू लागली.
"काय? ती आमचं बोलणं लपून ऐकत होती? पण का?"
अश्विनी म्हणाली "तेच तर मला आल्यापासून किशोर आणि मुग्धा दोघांचं वागणं योग्य वाटत नाही, काहीतरी लपवल्यासारखं करत आहेत.
"कमली, मला आल्यापासून म्हणते आहे, तुला काहीतरी सांगायचे आहे आणि झोपण्यापूर्वी तिने मला सांगितलं की, किशोरने तिला खोलीमध्ये बंद केले होते."
अश्विनी आवाज वाढवत म्हणाली,
" देवा! कमल मावशीला रूम मध्ये बंद केले होते?"
आशाच्या डोळ्यात अश्रूंची धार लागली. अश्विनी आशाच्या दिशेने सरसावली, ती आशाचे अश्रू पुसत म्हणाली
"आई, हे असं कमजोर होऊन कसं चालणार? आपल्याला मार्ग काढावा लागणार."
आशा शून्यात नजर लावून बसली होती, खरं तर हा मोठा धक्का होता. आपण बहिणीला भेटायला आलो होतो. सुखाचे चार क्षण वेचायला आलो होतो. हा सर्व प्रकार ऐकून डोकं सुन्न झाले होते आणि रागही आला होता.
"आत्ताच्या आत्ता किशोरला जाऊन जाब विचारते, माझ्या बहिणीचे असे हाल लावले आहेत."
असे म्हणत बाहेरच्या दिशेने पाऊल ठेवले.
अश्विनी, आशाला थांबवत म्हणाली.
" आई ,तुम्ही थांबा, प्लीज असे काही वागू नका. असे तडक जाऊन विचारणे योग्य नाही. आधी तुम्ही कमल मावशीसोबत सविस्तरपणे बोला. त्या काय बोलताय ते पाहू आणि पुढे काय करायचे ते विचार करूयात."
" तू बरोबर बोलते आहेस अश्विनी. आधी मी कमलला विचारते आणि मग काय करायचे ते बघू."
तितक्यात किशोर आला म्हणाला
"मावशी, झाली का झोप?"
आशाला तर किशोरचा प्रचंड राग आला होता. त्याच्याशी बोलू वाटत नव्हते, तरी आता उगाच बोलायचं म्हणून ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली
"हो, झाली झोप."
"आई अजून झोपली आहे."
म्हणत तो कमलला उठवायला गेला, त्याने कमलला हलवले तशी ती उठली.
किशोरला पाहिले तसे तिने तोंड पाडले.
"काय आई ?किती झोपायचे. उठवलं म्हणून रागावलीस की काय ?" किशोर.
अश्विनी आणि आशा आता बारकाईने लक्ष देऊ लागल्या होत्या.
कमलला उठवलं म्हणून ती नाराज नव्हती, तर किशोर वर आधीपासूनच नाराज होती असे वाटत होते.
अरे वा! सर्वच इथे आहेत, चला नाष्टा तयार आहे आपण सर्वजण नाष्टा करूया."
मुग्धा प्रसन्न चेहऱ्याने आत येत म्हणाली.
" हो आम्ही आवरून लगेच येतो." अश्विनी.
डायनिंग टेबलवर अनेक पदार्थ ठेवले होते, मुग्धाने स्वयंपाकीण ताईकडून बरेच पदार्थ केले होते, चकचकीत ताटं, चमचे ,ग्लास सर्व पद्धतशीर मांडले होते.
अश्विनी,अविनाश,कमल, आशा सर्वजण आले. मुग्धा सर्वांना वाढत होती, तोच कमलच्या हाताचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली पडला. सर्व पाणी टेबलवर आणि फरशीवर पडले. मुग्धाला प्रचंड राग आला.
ती रागाने म्हणाली "हजार वेळा सांगितलं आहे तुम्हाला, पाण्याचा ग्लास लांब ठेवत जा म्हणून."
तोच ती भानावर आली, सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच तिने सूर बदलला, खरंतर ती कमललाच चिडून बोलली होती; पण, स्वयंपाकीण बाईला आवाज देत म्हणाली
"हजार वेळा सांगितले आहे तुम्हाला, पाण्याचा ग्लास दूर ठेवत जा म्हणून; पण,तरी तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला माहित आहे ना आईच्या हाताचा धक्का लागून हातातून वस्तू पडतात."
हा प्रसंग पाहून सर्वांनाच मावशीसाठी वाईट वाटले. नाष्टा झाला. सगळे गप्पा मारत बसले होते.
मुग्धाने, किशोरला आवाज दिला. किशोर गेला. इथे आशाने कमलकडे विषय काढला.
"कमल, रात्री तू काय सांगत होतीस? किशोरने तुला खोलीत बंद केले होते म्हणून."
कमलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
क्रमशः
अश्विनी ओगले.
भाग आवडला असेल तर लाईक,कंमेंट करायला विसरु नका.