Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नात्यांची वीण भाग १ (अश्विनी ओगले)

Read Later
नात्यांची वीण भाग १ (अश्विनी ओगले)

 आज कमलच्या बंगल्यात वास्तुशांती होती. डोळे दिपावणारी रोषणाई केली होती. चहूबाजूने फुलांचा सुगंध येत होता. कमलची नातवंडं येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारात उभी होती. कमलचा मुलगा किशोर आणि सून मुग्धा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होते; पण, कमल जिचा हा बंगला आहे ती कुठं होती?कमल मावशीची मोठी बहीण आशा स्वतःच्या परिवारासोबत खास कमल मावशीच्या भेटीसाठी चक्क अमेरिकेहून आली होती.किशोरने आशाला पाहिले, तसा तो स्तब्धच झाला. आशा मावशी अशी अमेरिकेहून येईल ह्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.चेहऱ्यावर खोटे स्मितहास्य करून तो मावशीजवळ आला.मावशीच्या पाया पडतच म्हणाला.

"मावशी,तू तर मला धक्काच दिला. माझ्यासाठी तुमचं येणे अनपेक्षित होते."मावशी त्याला आशीर्वाद देत म्हणाली

"किशोर, अमेरिकेला वास्तव्य करुन तीन वर्षे झाली. पण का कोणास ठाऊक ? चार दिवस झाले मला कमलची खूप आठवण येऊ लागली. असं वाटलं माझ्या कमलीला इथे येऊन डोळे भरून पहावे. म्हणून अविनाशला मीच म्हंटलं काहीही झाले तरी दोन दिवस माझ्या कमलीकडे जायचेच,त्यात तुझं निमंत्रण आले. म्हणून आम्ही इथे यायचा विचार पक्का केला ."
अविनाश, किशोरला मिठी मारत म्हणाला.

"तुम्हा सर्वांना आम्ही खूप मिस करतो."

किशोर:"दादा,आम्हाला देखील तुम्हा सर्वांची आठवण येते."आशाची नजर कमलला शोधत होती. कमल कोठेही दिसत नव्हती.तोच मुग्धा आली.मावशी आणि तिचा पूर्ण परिवार पाहून तिलाही धक्का बसला.

ती मावशीच्या पाया पडली.अविनाश आणि त्याच्या बायकोला अश्विनीला नमस्कार केला.आशा चहूबाजूने नजर फिरवत म्हणाली

"किशोर, कमली कुठे आहे?"

किशोरने मुग्धाकडे पाहिले."मावशी, तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि चहापाणी करून घ्या. मी तुम्हाला आईच्या रूमवर घेऊन जाते.""कमली इथे का आली नाही. ती रूममध्ये काय करते आहे? तिची तब्येत बरी नाही का?" काळजीच्या स्वरात आशा म्हणाली."नाही तसं काही नाही , सकाळपासून त्याही माझ्यासोबत धावपळ करत होत्या ,म्हणून आम्हीच दोघांनी त्यांना रूममध्ये आराम करायला पाठवले.""बरं, ठीक आहे. चल मला तिच्याजवळ घेऊन चल.""मावशी एक महत्वाचे काम आहे. मी लगेच येतो." असे म्हणत किशोर घाईगडबडीत वरील रूमच्या दिशेने गेला."मावशी, चला आईंच्या रूमवर जाऊया." मुग्धा.मावशी, अविनाश, अश्विनी आणि मुग्धा कमलच्या रूममध्ये गेले.कमल देवाघरी गेलेल्या तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळत होती.कित्येक वर्षाने आपल्या लहान बहिणीला पाहून आशा प्रचंड खुश झाली.
थरथरत्या आवाजात तिने कमलला आवाज दिला."कमली."आपल्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून कमल लगेच मागे वळली.क्षणातच कमलचे डोळे काठोकाठ भरले. कंठ दाटून आला.ताई..आशा पुढे सरसावली.

आई आपल्या लहान बाळाला जशी मिठी मारते, अगदी तशीच आशाने कमलला मिठीत घेतले.आशा, कमलचे मुके घेऊ लागली. डोक्यावरून हात फिरवू लागली.दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला. ते दृश्य पाहून अविनाश आणि अश्विनीच्या डोळ्यात पाणी आले."बाळा,कमली कशी आहेस गं?" कमलचे डोळे पुसतच आशाने विचारले.

"ताई, मी बरी आहे. तू तू तशी आहे?" कमलआशाने, मुग्धाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले.कमल असे थांबून थांबून आणि बोबडे बोलते आहे हे बघून तिला वाईट वाटले.आशा कमलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली,

"तुला काय झाले ? व्यवस्थित बोलता येत नाही?अशी का बोलते आहेस?"हे ऐकून कमल गप्प बसली.पुन्हा तिच्या डोळ्यात काठोकाठ पाणी भरले. आशाने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाली, "बरं असू दे. बस आपण गप्पा मारूयात."तोच किशोर आला आणि म्हणाला," मावशी, तुम्ही सगळेच लांबचा प्रवास करून आला आहात तर थोडंसं फ्रेश व्हा, असेही आता पाहुणे गेल्यावर आपल्याला भरपूर वेळ आहे.आपण निवांत गप्पा मारूया."त्याने कमलकडे पाहिले आणि म्हणाला, "बरोबर ना आई?"कमलने फक्त होकारार्थी मान हलवली.

आशा, अविनाश,अश्विनी सर्वजण प्रवास करून थकले होते. तिघेही फ्रेश होण्यासाठी गेले. इथे कमलच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू बाहेर येत होते.तिला प्रचंड भरून आले होते. आशाला बघून तिच्या जीवात जीव आला होता. तिच्या तोंडातून काहीच शब्द फुटत नव्हते; पण आज कितीतरी वर्षानी आशा भेटायला आल्यामुळे ती मनोमन सुखावली होती.

सर्व पाहुणे गेले होते. आता निवांत वेळ भेटला होता. आशा, डोळे भरून कमलला पाहत होती. सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. किशोर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता.किशोर बोलू लागला."मावशी, तुम्ही सगळे आलात, मला खूपच छान वाटलं. किती वर्षानंतर मी तुम्हाला बघतो आहे. कमल फक्त बोलणं ऐकत होती.अविनाश बोलू लागला.

"हो किशोर,आम्हालाही कधी भारतात येतो आहे असं झालं होतं. लॉकडाऊन मध्ये काका गेले आणि आम्हाला तेव्हा यायला जमलं नाही. खूपच वाईट वाटलं. असं एकाएकी काकांचं जाणं फारच वाईट वाटलं. आई सुद्धा प्रचंड रडली. कमल मावशीची तिला सतत आठवणी येत होती; पण, काय करणार? आम्हाला यायला जमलच नाही.यंदा मात्र आई माझ्या पाठीच पडली

" काहीही झालं तरी कमल मावशीच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जायचंच." हे तिने ठणकावून सांगितले."त्यानिमित्ताने मावशीची भेट होईल आणि तुम्हा सर्वांची भेट होईल.मी देखील रजा काढली आणि आलो."किशोरचे वडील , म्हणजेच कमलचे पती शामराव कोरोना मध्ये गेले. शामरावच्या आठवणीने कमलचे डोळे भरून आले. तिने पदर डोळ्याला लावला. आशा तिच्या बाजूलाच होती. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे सांत्वन करू लागली."कमल, रडू नकोस जे झालं ते खरंच वाईट झालं. असे व्हायला नको होते; पण, आता तू स्वतःला सावर. गरिबीतून आपण वर आलो. इतकं सारं वैभव तू आणि शामभाऊने निर्माण केलं."कमल फक्त रडत होती आणि त्यात बहिणीचा सहवास लाभल्यामुळे आज तर हुंदके थांबता थांबत नव्हते.आशाने कमलचा हात हातात घेतला आणि म्हणाली,"कमली,सावर स्वतःला." तिने स्वतःच्या पदराने कमलचे डोळे पुसले.

कसंबसं कमलने स्वतःला सावरलं.मावशी पुढे बोलू लागली,

"किशोर, खूपच छान बंगला आहे. आज डोळ्याचे पारणे फिटले बघ."मुग्धा आणि किशोर एकमेकांकडे फक्त पहात होते.मावशी तिच्या सुनेला सांगू लागली,"अश्विनी, तुला सांगते आधीचे दिवस आम्ही खूपच गरीबीत काढले बघ. कधी कधी जेवायला दोन घास नसायचे. आई-वडिलांकडे गरीबी आणि नवऱ्याकडेही गरीबी आणि आता सोन्याचे दिवस आले, तर आमच्या दोघींच्याही नवऱ्यानी साथ सोडली. असो मरणाच्या दारात एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे. मी तर हे सारे वैभव डोळ्यात साठवून जाणार आहे. आता मात्र डोळे मिटले तरी काही हरकत नाही बघ."अविनाश , जरा रागातच म्हणाला

"आई,तू हे काय बोलते आहे ? डोळे मिटले म्हणजे काय? तू आम्हाला हवी आहेस. असं पुन्हा अजिबात बोलू नकोस."अविनाशच्या बोलण्याला दुजोरा देत अश्विनी म्हणाली,"हो ना आई, तुम्ही ना खरंच काहीही बोलता कशाला असा वाईट विचार करता? तुम्हाला काही होणार नाही. शंभर वर्ष तुम्हाला पार करायचेच आहेत आणि तुमची शंभरी आपण थाटामाटात साजरी करायची आहे बरं का."हे ऐकून आशा स्वतःचा चष्मा सावरत म्हणाली," बरं, यमराज मला घ्यायला जर आला ,तर मी त्याला तुमचा प्लॅनिंग सांगेल. त्याला म्हणणार माझ्या मुलाने आणि सुनेने शंभरीचे प्लेनिंग केले आहे, ते झालं की मगच ये बाबा. शंभरी पार होईल तेव्हाच येईन तुझ्यासोबत."सर्वजण हसू लागले.अविनाश " आई तू पण ना खरंच.."

"अविनाश,मी फक्त गंमत केली रे, इतकं मनाला काय लावून घेतोस?" आशा.अविनाश:"अशी गंमत पुन्हा नको आई."आशा:"बरं बरं, अशी गंमत पुन्हा नाही."

आशा :" कमली, बोल गं काहीतरी."कमल बोलण्याचा प्रयत्न करू लागली.ता ई मला खू खुप बोलावे वाटते..मुग्धाने आईस्क्रीम पॅक आणला होता.सर्वांना आईस्क्रीम देत म्हणाली"आता बारा वाजले आहेत, आपण झोपूया. सर्व थकले आहेत आणि मावशी, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त थकल्या आहात."घड्याळाकडे पाहिले खरंच बारा वाजत आले होते."मुग्धा, खरं तर मी खूप थकले आहे; पण कमलीला आणि तुम्हाला पाहून माझा थकवा क्षणात गायब झाला बघ." कमलच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

आशा मावशी, सत्तरीला पोहचली तरी, ठणठणीत होती ; पण, कमल मात्र आशापेक्षा लहान असून जरा जास्तच अशक्त झाली होती .

आशा मावशी उठली आणि म्हणाली,

" मी आज माझ्या बहिणीच्या रूममध्ये झोपणार आहे. आम्हा बहिणींना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही."किशोर "मावशी तुला मी वेगळा रूम देतो त्यात निवांत झोप.""अजिबात नाही, मला कमलीकडेच झोपायचं आहे. आम्ही बहिणी किती वर्षानंतर भेटलो आहोत. आज रात्रभर आम्ही खूप सार्‍या गप्पा मारणार आहोत."

कमलला हायसे वाटले.

ती सुद्धा प्रचंड खुश झाली. आज आपल्यासोबत ताई झोपणार ह्या विचाराने सुखावली.अविनाश म्हणाला

"बरं मावशी, झोप तू आईसोबत."

सर्वजण झोपायला निघून गेले.इथे अश्विनी आणि अविनाश वेगळ्या खोलीत आले."अवी, मला माहित नाही, का? पण वेगळंच काहीतरी वाटतंय."अश्विनीअविनाश म्हणाला "वेगळं काहीतरी वाटतंय? म्हणजे नक्की काय वाटतं आहे?"अश्विनी म्हणाली "अवी, मला किशोर आणि मुग्धा या दोघांचं वागणं जरा विक्षिप्त वाटतंय.असं काहीतरी गुपित असल्यासारखं."अविनाश "अगं अश्विनी, तसं काही नाही. हल्ली तू सिरीयल जास्तच पाहू लागली आहेस ,म्हणून असे बोलते आहेस. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी तुला काही ना काही संशय येतो बघ."

अश्विनी म्हणाली

" मी खरंच सांगते आहे, मला दोघांच्या वागण्यात काहीतरी वेगळेपणा वाटतोय."अविनाश म्हणाला "काही वेगळेपणा नाही, सर्व व्यवस्थित आहे. मावशीचा किती छान बंगला आहे बघ. छान पूजा झाली. किती पाहुणे आले होते. अजून काय हवं आहे?"अश्विनीला आता पुढे काय बोलावं हे कळत नव्हतं. नक्की अश्विनीच्या मनात काय चालू होतं? खरंच काही गोंधळ होता का अश्विनीचा हा फक्त भ्रम होता? पाहू पुढच्या भागात.

क्रमशः©®अश्विनी ओगले.

 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..

//