नात्यांची वीण भाग3 (सायली जोशी)

Katha Aai Ani Mulichya Natyachi

'शेवटी आई ही आईच असते. तिची सर कोणालाही येत नाही.

आई आणि मुलगी एकमेकींची सावली असतात. माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, काळजी अशा अनेक दडलेल्या भावना आई आपल्या मुलांपर्यंत पोहचवण्याचे काम करते. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते, प्रसंगी कान पकडते. त्यांच्याशी वाद घालते, भांडते..अन् शेवटी समजून घेते. आई आणि मुलीचे नाते निराळेच असते.'

वीणाने आपले वडील गेल्यानंतर आईला खचून गेलेलं कधीच पाहिलं नव्हतं. पुष्पाताई सतत आपल्या मुलीच्या पाठीशी उभ्या राहिल्या. वडिलांची कमी भरून काढण्याचा प्रयत्न करतं त्यांनी मुलींना चांगले शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. आपल्या या तिघींच्या जगात पुष्पाताई खुश होत्या. सासरची, माहेरची जोडलेली नाती ताईंना मानसिक समाधान देत होती.

नंतर वैजयंतीचे लग्न झाले आणि पतीच्या निधनानंतर कोलमडून न जाता आपल्या मुलींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पुष्पाताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या. तो एकटेपणा त्यांना जाणवू लागला. नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकटेपणा त्यांना छळू लागला. नातेवाईक काही प्रसंगा पुरते येऊन जात, फोन करत. मात्र प्रत्येकाला आपापले व्यापही तितकेच होते.

हे वीणाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आईसाठी ती वारंवार माहेरी येऊ लागली. हे पाहून पुष्पाताई म्हणाल्या," वीणा तू सारखी सारखी इकडे येत जाऊ नको. तुझं लग्न झालं आहे. पदरात लहान मूल आहे. सासरची जबाबदारी आहे तुझ्या डोक्यावर. हे विसरून कसे चालेल? मला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोड. तुम्हा मुलींवर किती भार देऊ मी?" बोलता बोलता पुष्पाताई रडू लागल्या.

"आई, असे का बोलतेस? आम्ही प्रेमापोटी तुझी काळजी घेतो आणि सासरची जबाबदारी झटकून येत नाही गं आम्ही इकडे. त्याची जाणीव आम्हाला आहेच. तुला आम्ही इतर कुठेही पाठवणार नाही. काहीही झाले तरी आम्ही तुला अंतर देणार नाही." वीणा आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाली. 

तिने वैजयंतीला फोन लावला. आई काय म्हणते ते सांगितले. 

तशी वैजू धावत पळत माहेरी आली. थकलेल्या आईला पाहून तिला कसंतरीच झालं. आपल्या आईच्या गळ्यात पडून ती रडू लागली. 

"वेडे, अगं रडायला काय झालं? वयानुसार माणूस थकणारच. कधी ना कधी हे होणार, मी तुम्हाला सोडून जाणार..मुलींनो. मात्र तुम्ही आपली सासरची, माहेरची नाती घट्ट धरून ठेवा. घट्ट असलेल्या नात्यांची वीण मजबूत करा. आपल्या आजूबाजूला माणसे हवीत. म्हातारपणी याची जास्त गरज भासते." पुष्पाताई बराच वेळ बोलत, आपल्या जुन्या आठवणी मुलींना सांगत राहिल्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all