नात्यांची वीण भाग 2(सायली जोशी)

Katha Aai Ani Mulichya Natyachi
आता मुलीच्या सासरी, जावयाच्या घरी असे कसे राहायचे? पुष्पाताईंनी नकार दिला.

"एकटीने राहण्याची सवय होईल मला. काही लागलं तर मी नक्की सांगेन." पुष्पाताई आपल्या जावयाला म्हणाल्या.

हळूहळू पुष्पाताईंना एकटीने राहण्याची सवय झाली. काही लागलं, दुखलं, खुपलं तर वीणा आणि मनोहर दोघेही जातीने हजर व्हायचे. मनोहर आपल्या आई प्रमाणे पुष्पाताईंची काळजी घ्यायचा. वीणाच्या सासुबाई तिला आग्रहाने माहेरी पाठवायच्या. आईला इकडे घेऊन ये म्हणायच्या. "अहो पुष्पाताई, हे घर तुमच्या मुलीचे आहे. इथे तुम्ही कधीही हक्काने राहायला येऊ शकता. आपण दोघी मिळून अगदी बहिणीसारख्या राहू इथे. तुम्हाला परकं वाटेल असं कोणी वागणार नाही या घरात." वीणाच्या सासूबाई पुष्पाताईंना समजावून थकल्या.
पण पुष्पाताई ऐकायचं नाव घेईनात. आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये असे पुष्पाताईंना सारखे वाटत होते.
मुलीच्या सासरी राहायला जाणे, पुष्पाताईंना काही केल्या पटत नव्हते. हल्ली वयानुसार पुष्पाताई थोड्या हट्टी झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव एकलकोंडा आणि चिडचिडा बनत चालला होता.

वय जसं वाढू लागलं, तशा पुष्पाताई थकू लागल्या. नाही म्हणायला वैजयंती त्यांना दोन -चार वेळा आपल्या सासरी घेऊन गेली. पण तिच्या सासरचा गोतावळा मोठा असल्याने वैजयंतीचे आईकडे नीट लक्ष लागेना आणि सासरी अजून ती नवखी होती. त्यामुळे सासरच्या मंडळींना काय रुचेल हे तिला माहीत नव्हते.

मग पुष्पाताई पुन्हा आपल्या घरी आल्या. त्यांनी स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून घेतले. सकाळी फिरायला जाण्यापासून ते संध्याकाळच्या बागकामापर्यंत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या अंगाला लावून घेतल्या.
मध्येच वीणाचे बाळंतपण पार पडले. गोड मुलगी झाली तिला. चार महिने माहेरी राहून वीणा पुन्हा आपल्या सासरी आली. आपल्या बाळाच्या संगोपनात गुंतून गेली.
पण पुष्पाताईंकडे तिने अजिबात दुर्लक्ष केले नाही. प्रसंगी बाळाला सासुबाईंकडे सोपवून ती पुष्पाताईंकडे मदतीला जात असे. सासुबाई म्हणायच्या, "आईकडे लक्ष देणे हे मुलीचे कर्तव्यच आहे. त्यात तुझी आई एकटी असते. त्यांचं दुखलं, खुपलं तुलाच पाहावं लागणार."
"एकट्या आईला सांभाळणे हे मुलीचे कर्तव्य कसे असू शकते? त्यामागे एकच भावना आहे, ती म्हणजे आई नि मुलीच्या नात्याची वीण घट्ट विणलेली असते. आई आणि मुलीचे नाते कुठल्याही शब्दात बांधताच येत नाही. लेकीने हक्काने माहेरी यावं आणि अगदी वय झालेली आई देखील तिचे माहेरपण सजवते.

क्रमशः

🎭 Series Post

View all