नात्यांची वीण भाग अंतिम (सायली जोशी)

Katha Aai Ani Mulichya Natyachi

"वीणा तू माझ्या माघारी वैजूची आई व्हायचं. तिला समजून घ्यायचं." बोलता बोलता पुष्पाताईंचा डोळा लागला.

"ताई, मी आईला घरी घेऊन जाईन. तू नको काळजी करू." वैजू वीणाला म्हणाली.

"नको गं. आई माझ्याकडेच राहील. मला तिच्याविना करमणार नाही. सारखी तिची आठवण येत राहील. ती वेळेवर जेवली असेल? तिला नीट झोप लागली असेल का? तिने औषधं, गोळ्या नीट घेतल्या असतील का? असे प्रश्न मनात येत राहतील. त्यापेक्षा ती माझ्या नजरेसमोर असलेली बरी." वीणा म्हणाली.

"नको ताई. तू थोडे दिवस निवांत राहा. मी आईला घेऊन जाईन. माझ्या सासुबाई, आजेसासुबाई, चुलत सासुबाई यांच्यासोबत राहील थोडे दिवस." वैजू आपला हट्ट सोडेना.

मुलींचे बोलणे ऐकून पुष्पाताईंना जाग आली. "आजकाल मुले आपल्या आई -वडिलांना सांभाळायला तयार नसतात. पण या दोघी मात्र आई माझ्याकडेच राहील यावरून भांडत आहेत. आपले संस्कार, शिकवण वाया गेली नाही म्हणायचे. खरचं मुलींना आईची किती काळजी असते! हे मुलीची आई झाल्यावरच कळते.

"वीणा आणि वैजू मी तुम्हा दोघींकडे राहायला तयार आहे. पण अशा भांडू नका गं. जवळ या पाहू." पुष्पाताई विणा आणि वैजूला आपल्या मिठीत घेतले. दोघी मुली आईच्या कुशीत शिरून मनसोक्त अश्रू ढाळत होत्या. या प्रसंगानंतर आई आणि या दोन्ही मुलींच्या नात्याची वीण अधिकच मजबूत आणि प्रगल्भ झाली.

म्हंटल्याप्रमाणे पुष्पाताई वैजयंतीकडे काही दिवस राहायला गेल्या. त्यामुळे वीणाला आईची काळजी लागून राहिली होती.

"अगं, आई वैजयंतीकडेच तर गेली आहे. ती घेईल तिची काळजी. शिवाय वैजयंतीचे घर म्हणजे भरलं गोकुळ आहे. आई छान रमली असेल तिथे. जसा तुझा आईवर हक्क आहे तितकाच वैजूचाही आहेच. अती काळजी करणे बरे नव्हे." मनोहर वीणाला आला समजावत म्हणाला.
हेही खरेच होते. "तशी आई तिच्या जगात खुश होती. तिने कधी कुठलीच तक्रार केली नव्हती. मग आपण सतत तिची काळजी करून ती एकटी आहे हे जाणवून का द्यायचे?" वीणाला मनोहरचे म्हणणे पटले. आईचे संस्कार, शिकवण आपल्या मुलीपर्यंत नक्की पोहोचविण्याचा मी प्रयत्न करेन. हे मनाशी पक्के करत वीणाने आपल्या मुलीला अगदी जवळ घेतले. तिला आई आणि मुलीच्या नात्याची ही वीण आपल्या आईसारखीच मजबूत करायची होती.


समाप्त.
©️®️सायली





🎭 Series Post

View all