नात्यांची वीण भाग1(सायली जोशी)

Katha Aai Ani Mulichya Natyachi

आईच्या काळजीने वीणाच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते. वीणाच्या लहान बहिणीचे, वैजयंतीचे लग्न झाले आणि पुष्पाताई एकट्या पडल्या. तसे वीणाचे लग्न होऊन पाच वर्षे उलटून गेली होती. वैजू आणि आई दोघी एकमेकींच्या सोबतीला असल्याने वीणाला आपल्या आईची फारशी काळजी नव्हती. वडील जाऊन दहा वर्षे झाली. पण आईच्या साथीने, आधाराने दोघी बहिणी अगदी छान राहत होत्या. 

लग्नाचं वय झालं आणि पुष्पाताईंनी वीणासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. 

"आई, मला नाही लग्न करायचे. तुम्हा दोघींना सोडून मी कशी राहू गं सासरी?" वीणाच्या डोळ्यात बाबांच्या आठवणीने पाणी आले.

"अगं रडूबाई, लग्नाचे वय झाले की सगळ्या मुली आपल्या सासरी जातात. जगाची रीत आहे ती आणि वैजू आहे माझ्या सोबतीला. मग काळजीचे काही कारण नाही." आई वीणाला समजावत म्हणाली.

"पण आज ना उद्या वैजूचे लग्न होईल. मग तू एकटीच कशी राहशील? त्यापेक्षा मी लग्न करत नाही. मग तू एकटीने राहण्याचा प्रश्नच येत नाही." वीणा आईच्या कुशीत शिरत म्हणाली.

"शहाणी आहेस..ही दोन स्थळ आली आहेत तुझ्यासाठी. बघ, या दोन्हीही पत्रिका जमतात तुझ्या पत्रिकेशी. त्यांनी पाठवलेले फोटो पाहून घे." आई खडसावून म्हणाली.

वीणाने दोन्ही मुलांचे फोटो पाहिले. त्यापैकी मनोहर तिला बरा वाटला. मनोहरलाही वीणा आवडली आणि दोघांचे लग्न झाले. वडिलांच्या माघारी आईने वीणाचे लग्न थोडक्या पण अगदी छान पद्धतीने करून दिले.

वीणाच्या सासरची माणसे चांगली होती. सासरी रुळलेल्या वीणाला तिच्या आणि आईच्या नात्यात एक वेगळीच प्रगल्भता जाणवली. आईच्या ओढीने ती माहेरी येत -जात होती.

आता मनोहरचे मात्र तिच्याविना पान हालत नव्हते. हळूहळू वीणाच्या अंगावर घरच्या जबाबदाऱ्या पडल्या. त्या सांभाळता सांभाळता ती फार व्यस्त झाली. 

पुढे पाच वर्षांनी वैजयंतीचे लग्न ठरले आणि आईच्या उत्साहाला उधाण आले. आई वीणाला म्हणाली, "वैजूचे लग्न आता तुम्ही दोघांनी पुढे होऊन करायचे. मी थकले आता. तशा वीणाच्या माहेरच्या वाऱ्या पुन्हा सुरू झाल्या. तिच्या सासुबाई, नणंदा मदतीला येऊ लागल्या. मनोहरने तर सख्ख्या मुलाप्रमाणे पुष्पाताईंना खूप मदत केली.

लग्न पार पडले आणि वैजयंती दूर सासरी निघून गेली. 

"आई, तुम्ही इथे एकट्या राहण्यापेक्षा आमच्या घरी राहायला चला." मनोहर पुष्पाताईंना म्हणाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all