Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नात्यांची वीण (शुभांगी मस्के)भाग ३

Read Later
नात्यांची वीण (शुभांगी मस्के)भाग ३


नात्यांची वीण (शुभांगी)

भाग ३

अष्टपैलू लेखक महासंग्राम

फेरी : दुसरी

-©®शुभांगी मस्के

रुसवे फुगवे दूर ठेवून, झालं गेलं विसरून, सुमनने सर्वांना आग्रहाचं आमंत्रण केलं होत. मामा, मामी, काका, काकू, आत्या, त्यांची मुलं.. मंडप अक्षरशःनातेवाईकांनी गजबजला होता.

काटकसर करून एक एक पैसा सुमनने मुलीच्या लग्नासाठी जमवला होता. मानापणात कसलीच कसूर तिने ठेवली नव्हती..

प्रतिकच्या नावाची मेहेंदी, मधुराच्या हातावर छान रंगली होती.. वाट्याला आलेली सगळी दुःख एकीकडे आणि लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद एकीकडे, लेकीच्या आनंदात जणू ही आई आपलं सगळ दुःख विसरून गेली होती...

"आई तू पण काढून घे मेहेंदी", खूप हट्टाने मधुराने आईला मेहेंदी काढायला बसवलं.. मेहेंदी हातावर काढून होते न होते तोच..

" अगं ये वहिणी!! जरा चार पोळ्या टाकतेस का?" ह्यांना पोळ्या गरमच लागतात... सर्वांचे हात मेहेंदीने रंगले आहेत. नणंद बाईंनी ऑर्डर फर्मावला.

" तशीही तुला कोणाच्या नावाची मेहेंदी मिरवायची आहे, नाही का?"..."रंगली काय...नाही रंगली काय, सारखीच!". आत्याच्या टोमण्याचा दोन्ही भावंडाना खूप राग आला होता.

आपल्या आग्रहाला मान देऊन आलेल्या पाहुण्यांचा मान ठेवायचा. उगाच कुणाशी वादविवाद वाढवायचा नाही.. "घरी आलेल्या पाहुण्यांची मर्जी सांभाळायची" आईने कटाक्षाने सांगितलं होत. आत्याच्या राग येऊन ही दोन्ही भावंडाना गप्प बसावं लागलं.

"आई थांब... मी टाकून देतो, पोळ्या"... म्हणत मिहिरने वेळेवर पोळ्या केल्या.. " आईसाठी काहीपण"... त्याचा ही मंडपात विषय झाला होता.

मधुराच्या लग्नात.. मंडप पूजन, देवपूजा, सगळ्या मानमोऱ्यात... सुमन मागे मागेच होती.. सासर माहेरची सगळी सौभाग्यशाली मंडळी सामोर सामोर होऊन शुभ कार्याचे सगळे विधी उरकत होते.

रंगलेली मेहेंदी, हातात भरलेला हिरवा चुडा, साज श्रृंगार आणि रंगीबेरगी जरी काठच्या महागड्या साड्या नेसून, सगळ्या बायका लग्न मंडपात आपला तोरा मिरवत होत्या.

आईला मात्र काहीच एन्जॉय करता येतं नाही, आईला सगळ्यातचं मागे मागे राहावं लागतं, मधुराला वाईट वाटत होतं.

बाबानंतर आईने खरं तर आमच्या आयुष्यात दुहेरी भूमिका बजावली.. आई बरोबरच ती आमची बाबा ही झाली... आईचं महत्व आमच्या आयुष्यात सर्वात पहिले... मानमोऱ्यात मागे असलेल्या आईबद्दल मधुराने सर्वांसमोर एक दोनदा बोलून ही दाखवलं.

लग्नाचा दिवस उजाडला.. नवरीच्या रुपात मधुरा खूपच सुंदर दिसत होती. मुहूर्तावर लग्न लागलं. जन्मोजन्मी साथ देण्याच वचन देत सप्तपदी ही आटोपली.

"कन्यादानासाठी, मुलीच्या आईवडिलांना बोलवा" पंडितजींनी बोलावताच... मधुराचे काका काकू कन्यादान विधीसाठी पुढे आले.

बाबा नाहीत मला, कन्यादान आईने केलेलं चालणार आहे का? मधुराने पंडितजीला विचारलं.

पंडितजींनी काहीही उत्तर द्यायच्या आत.. सगळ्या नातेवाईक मंडळींनी यावर आक्षेप दर्शवला.

"रूढी, प्रथा, परंपरेला काही अर्थ आहे की नाही.. की सारं काही वेशीला टांगून ठेवायचं आता". भाऊ मामा मधुरावर ही चिडले..

"मधुरा", सगळं विधिनुसार होऊ दे बाळा.. उगा हट्ट नको!! आणि विषाची परीक्षा ही नको... मंगल कार्य.. मंगलमय रित्या.. पार पडू दे... सुमन पुढे येऊन बोलली.

"माझ्यासारख्या विधवेला हा हक्क नाही", सुमनताईंनी स्वतः लेकीच कन्यादान करण्याला विरोध दर्शवला.

"बाळा, सौभाग्य दान आहे हे.. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या, सोबत असलेल्या, सौभाग्याशाली जोडप्याने करणं अपेक्षित आहे". सुमनने मधुराला समजावलं..

\"भरजरी मोठ्या धडीची जरीकाठाची बंगलोरी सिल्क, आवडीने आणली असताना आईने सिल्कची छोट्या बॉर्डरची साडी नेसली. दागदागिने, कुणाच्या डोळ्यात खटकणार नाही असेच घातले\". \"खूप आग्रह केला नथ घाल म्हणून तरी नथ घातली नाही... आग्रहाखातर तळहातावर थोडी मेहेंदी लावली फक्त.

"केवढे वर्ष झालीत बाबांना जाऊन, पण आई मात्र वैधव्य लेऊन रोज रोज मरतेय",बाबा होऊन आई बाबांची कर्तव्ये निभावू शकते.. मुलांचं पालन पोषण करू शकते. बाबांचं प्रेम देऊ शकते. दुहेरी भूमिका बजावताना, काहीच आडव येत नाही.. मात्र, सुखात, आनंदाच्या क्षणी, तिने केलेली कर्तव्ये मात्र विसरली जातात.. आणि तिच्या आयुष्यात आलेलं अधुरेपण, मात्र गोंजराल जातं. मधुराच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं..

आजवर कुठलीच जबाबदारी न घेतलेल्या.. काका काकूंनी मात्र.. कन्यादान करताना फोटोत मिरवून घेतलं. सासरी जाताना, निरोपाच्या वेळी मधुरा आईच्या कुशीत शिरून खूप रडली होती...

मिहिरचा मेडिकल एक्सामचा निकाल लागला, चांगला स्कोअर मिळाला होता. मुंबईच्या एम्सला त्याचा नंबर लागला. त्याला आता मुंबईला जावं लागणार होतं.

मी गेल्यानंतर, आई आता एकटीच.. आईला सोडून जाताना, त्याला गहिवरून आलं. काही केल्या घरातून पाय निघत नव्हता..

आईच्या वाट्याला आलेलं जीवघेणं एकटेपण, आई बोलून दाखवत नसली तरी, जाणून घेण्या इतपत जाणीव मिहिर आणि मधुरा दोघांना ही होती, त्यामुळे त्यांना आजकाल आईची जास्तीच चिंता वाटायची..

आईने आजवर खूप केलंय आपल्यासाठी. आईसाठी मात्र आपण काहीच करू शकत नाही, साधा तिला आपला वेळ ही देऊ शकत नाही, या विचाराने दोघेही अस्वस्थ होत. प्रत्येक क्षणी आईच्या विचारात मन कातर व्हायचं.

मीहिरची, सेमीस्टर झाली आणि पंधरा दिवसांच्या सुट्टीत मिहिर घरी आला. खायला काय करू नी काय नको, असं झालं होतं सुमनला.

शाळेच्या मित्रांनी मिळून, छोटंसं गेट टुगेदर करायचं ठरवलं, सगळेच मित्र एकत्र भेटणार म्हणून सगळेच एक्साईटेड होते. मिहिर घराबाहेर पडणार तोच मिहिरच्या मोबाइलवर कॉल आला..

सुमित, मिहिरचा वर्गमित्र आणि आता मेडिकल कॉलेजमध्ये ही दोघे सोबतच होते. सुमित मीहिरचा बेस्ट फ्रेंड होता. फोन वर सुमितच्या काकूंचा एक्सीडेन्ट झाल्याचं कळल. लगेच, सगळ्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

सुमितच्या काकांची नुकतीच बाहेरगावी ट्रान्स्फर झालेली असल्याने त्यांना यायला वेळ लागणार होता. सुमितचे आईबाबा एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. घरी सुमितच्या दोन चुलत बहिणी रिया सिया ला सांभाळणं कठीण होतं...

एकटा, सावरणार तरी कुणाला होता. महिन्याभऱ्यापासून कुटुंबापासून दूर असलेल्या काकांना.. पाच मिनिटात जाऊन येते!! म्हणत बाहेर गेलेली आई, आता कधीच परतणार नाही. आईची वाट बघणाऱ्या आणि काळाने डाव साधून आईच्या मायेचं छप्पर डोक्यावरून नेहमीसाठी हिरवलेल्या बहिणींना.. ट्रीटमेंट दरम्यान काकू लांबच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. सुमित हादरला होता....

आतंक आणि आक्रोशच आक्रोश होता.. मीहिरला आता सुमितच्या बहिणींच रिया आणि सियाच दुःख स्वतःच वाटत होतं.

सगळे सोपस्कार आटोपले आणि मिहिर घरी आला. आईला कवटाळून तो खूप रडला.. "आई, देव असा कसा गं!! लेकरांपासून, आई वडिलांना हिरावून घेतो.

इतर वेळी, मिहिरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर समर्थपणे, देऊन समाधान करणाऱ्या एका आईजवळ, या प्रश्नाच उत्तर पूर्वी ही नव्हतं आणि आज ही नव्हतं..

"मिहिर बाळा, पाऊस पडणार तो पडतोच, कुठल्याच परिस्थितीत पडायचा राहत नाही, वेळ निमित्त आणि आपण निमित्तमात्र फक्त. आल्या परिस्थितीला सामोरे जावं एवढंच आपल्या हाती असतं"..

तोच देव, सावरायची पण शक्ती देतो, बोलताना सुमनचा कंठ दाटून आला होता. " बाळा तू जास्ती चिंता करू नको, रिया सिया, सावरतील बघ लवकरचं"... "त्यांचे बाबा आता आईची भूमिका ही बजावतील" .

"जोडीदार गेला की, तो देवच देतो शक्ती" लेकरांच्या आयुष्यात, त्यांच्या मनात, कमतरता भरून काढण्याची.. सुमन समजावत होती.

"कालपासून, पोटात अन्नाचा एकही कण नसलेल्या, मिहिरला, सुमनने कसेबसे चार घास भरवले. त्यानंतर किती तरी दिवस मिहिर आणि सुमनला साधं जेवण ही गोड लागलं नव्हत.

सुट्ट्या संपल्या आणि मिहिर आणि सुमितचं कॉलेज सुरू झालं.. दोघेही हॉस्टेलला निघून गेले. रिया सिया सोबत आता, मिहिर भावनिकरित्या जोडल्या गेला होता.

-------

मधुरा आणि प्रतीक आपल्या संसारात खुश होते. कधीकाळी प्रतीक टूरला जायचा चार दिवसांचा एकटेपणा मधुराला खायला उठायचा. प्रतीक नेहमीच आपल्या सोबत असावा तिला वाटायचं, विरह तिला नकोसा व्यायचा.

\"आईने बाबांशिवाय एवढं मोठं आयुष्य कसं काढलं असेल!\",\"लहान वयात आलेलं वैधव्य, पाठी आलेल्या जबाबदाऱ्या.. जोडीदाराचा विरह, आणि वाट्याला आलेला एकटेपणा\".. आईसाठी एकट्याने जगणं किती कठीण जात असेल, जाणिवेने मधुरा अस्वस्थ व्हायची.

तिला आठवायचं.. पलंगावर तिच्या शेजारी झोपलेली आई, या कडावरून त्या कडावर होत रात्र रात्र जागून काढायची. " झोप कमी झालीय गं" वाढत्या वयाच निमित्त करून, होणारी चिडचिड, मूड स्विंगच्या नावे खपवायची. आईच्या आयुष्यातली अगतिकता मधुराला अवस्थ करायची.

आता तर, किती एकटी पडली असेल आई. तीच काम, ध्यान, योगा, थोड सोशल होऊन सुद्धा घरात आल्यावर. घराच्या चार भिंतींमध्ये आईला किती एकटेपणा जाणवतं असेल.

एकीकडे आपलं करियर, संसारात मग्न आपण आणि दुसरीकडे एकटी आई. आपण काहीच करू शकत नाही, हा विचार मधुराला अस्वस्थ करायचा..

मिहीरची मैत्रीण सई त्याच्या वर्गातलीच.. मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला लागलं. सई त्याला आवडायला लागल्या पासून आजकाल त्याला ही प्रेम आणि आयुष्यात जोडीदाराची जागा. जोडीदाराच्या सोबत असण्यातलं सुख आणि सोबत नसण्यातली अगतिकता, तो विरह... जवळून जाणायला लागला होता..

-------

एक दिवस, एक कॉल फक्त आणि सुमित खूप खुश झाला, सर्वांसाठी त्याने आईसक्रीम ऑर्डर केलं. आता सगळं छान होणार, सुमितच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सुमितच्या काकांना, रिया आणि सियाने, लग्नाला तयार केलं होतं. आईच्या जाण्याने बाबांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, वाट्याला आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी रिया आणि सियाने धाडसी पाऊल उचललं होत.

"घरी आई आणायची".. "हरवलेलं घराचं घरपण वापस आणायचं"... रिया, सियाने ठरवलं आणि सुमितने यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता.

ऐकूनच मिहिर विचलित झाला. आईला विसरण कसं शक्य आहे? एखाद्या परक्या बाईला आईची जागा देणं शक्य आहे का? मिहिरच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले.

एक नवीन सुरुवात होऊच शकते? "आयुष्याच्या एका टप्प्यावर सुख उपभोगून झाल्यावर जोडीदार शारीरिक सुख देण्याच्या अपेक्षेखातर नाही तर सोबत म्हणून हवा असतो!" जो आपल्या सुख दुःखाचा भागीदार असतो. ज्याला आपल्यासाठी पुरेपूर वेळ असतो..

उडून जाती पाखरे, दूरदेशी
कर्तव्य त्यांची तयांना खुणावती
सुन्या घरट्यात उरतो फक्त
जोडीदार होऊनी सोबती?

पिंजऱ्यातून पाखरं उडून जातील तेव्हा... सुख - दुःख वाटून घ्यायला.. मनातलं ऐकून घ्यायला... जोडीदार हवाच. नाही का?

भविष्यात घडू बघणाऱ्या आमच्या ग्रेट ग्रेट.. भावी लेखिका मॅडम रिया... चे हे विचार... सुमित एक्सप्लेन करून सांगत होता. तोंड भरून रियाच कौतुक करत होता.

वडिलांची एक अट, मात्र त्यांनी सर्वार्थाने मान्य केली होती. बाबासाठी अशी एक जोडीदार हवी होती जे एकमेकांना खऱ्या अर्थाने साथ देतील. एकमेकांचे सहचर बनतील.. विचारांची सोबत करतील, जे एकमेकांसाठी असतील.

सुरुवात तर झाली.. "काका तयार झालाय लग्नाला तेच महत्वाचं"... सुमित खूश झाला, "खाओ खाओ,यारो!" त्याने एक्साईटमेंटमध्ये सर्वांसाठी पुन्हा पेस्ट्रीची ऑर्डर दिली".

जोडीदार सोडून गेल्यानंतर... उरलेलं आयुष्य आठवणीत जगत राहायचं की जोडीदाराच्या आठवणी पुसून टाकुन नवी सुरुवात करायची.. विचारात द्वंद्व सुरू झालं होतं..

काय करेन मिहिर!! कुठलं पाऊल उचलेल. वाचत राहा नात्यांची वीण...
-©®शुभांगी मस्के...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//