Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नात्यांची वीण भाग 1 (समीर खान)

Read Later
नात्यांची वीण भाग 1 (समीर खान)
।। नात्यांची वीण...भाग 1 ( समीर खान ) ।।

अष्टपैलू लेखक महासंग्राम कथा स्पर्धा


" स्वस्ती श्री गणनायकम.. गजमुखम्.. मोरेश्वरम... "

भटजी मंगलाष्टक म्हणत होते. तिच्या डोळ्यात कितीतरी भाव दाटून आले होते. काळजीचे, चिंतेचे, भयातिरेकाचे, दुःखाचे, असहायतेचे. लग्नाला जमलेल्या मंडळींच्याही चेहर्‍यावर यापेक्षा वेगळे भाव नव्हते.

" गंगा, सिंधु, सरस्वतीच, यमुना ,गोदावरी, नर्मदा,
कावेरी, शरयू, महेंद्रतनया, चर्मण्वती ,वेदिका, क्षिप्रा ,वेदवती, महासुरनदी, ख्याता जया गंडकी, पुर्णा पुर्ण जलसमुद्रसरीता ऽऽ कुर्यात सदा मंगलम.. ऽऽऽ शुभमंगल सावधान ऽऽऽऽ " तिच्या डोळ्यांतही साक्षात या सर्व नद्या वाहू लागल्या.

आंतरपाटाआड ऊभी व्यक्ती खरंच आपली साथ देईल की नाही याबाबत ती अधिकच सांशक होती. आंतरपाट बाजूला झाला. मात्र दोघांचीही एकमेकांना पाहण्याची कसलीच ऊत्सुकता नव्हती. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. आंतरपाट दूर होताच तिची सर्वात आधी नजर पडली ती लहानग्या आरूषवर. आपल्या बाबांचं लग्न होतंय याची त्याला पुसटशी कल्पना होती मात्र हे सर्व समजण्याचं त्याचं वय नव्हतंच. अवघ्या सहा वर्षांचा होता तो. तर त्याच्यापेक्षा मोठी अकरा वर्षांची पिहू तिथून लांब जाऊन दूरूनच आत्यासोबत बसून हा विवाह पाहत होती. आरूषला पाहताच त्याच्याविषयी तिच्या मनात कणव दाटून आली. करोना नामक भयंकर महामारीने त्यांची आई हिरावून घेतली होती. तेव्हा तर तो अवघ्या चार वर्षांचा होता. असंही तिच्या पहिल्या घटस्फोटानंतर ती पुर्नविवाह करणार नव्हतीच. मात्र तिचा नाईलाज झाला होता. आजारी, अपंग आई , हिच्या दुःखाने वडील वारलेले, भांडकुदळ, कजाग भावजय आणि असून नसून सारखाच असणारा तिचा भाऊ, लोकांच्या सततच्या टोचणार्या नजरा आणि तितकेच कुजकट संवाद यांना ती आता कंटाळली होती. घटस्फोटीत स्री म्हणजे उपभोगाची वस्तू या मानसिकतेचा तिला पदोपदी अनुभव आला होता. कित्येक लांडगे अशा असहाय हरणींच्या शिकारीसाठी टपलेली तीने पाहिली होती. बाहेर तिचा आतापर्यंत निभाव लागला असला तरी घरच्या परिस्थितीमुळे तिने शरणागती पत्करली होती. दुसरा विवाह करण्याशिवाय तिच्यासमोर पर्यायच उरला नव्हता.
त्यात हे स्थळ आलं आणि त्यांच्यासोबत आलेल्या लहानग्या आरूषला पाहताच तिच्यातली आई जागी झाली.तिला तीचं न जन्माला आलेलं बाळ आठवलं. नात्याचा पहिला धागा तिथेच विणला गेला. ती हे स्थळ नाकारूच शकली नाही. मायेने विचारपूस करणारी होणारी सासू यांचे आशीर्वाद घेताना जेव्हा ती खाली वाकली तेव्हा,

" मुली आईच्या पाया पडत नाही बेटा.. "
हे शब्द तिने जेव्हा ऐकले तेव्हा कितीतरी वेळ ती त्यांच्या जवळ रडत होती. नाहीतर.. पांढर्‍या पायाची अवदसा, करंटी मेली, पनौती हे शब्द ऐकून ऐकून तिचे कान विटले होते. सोसता येईल त्या पेक्षा कैकपटीने जास्त तिने सोसलं होतं मात्र जेव्हा अगदीच नाईलाज झाला तेव्हा मरणासन्न अवस्थेत सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जेव्हा अगदी तिच्या शेजार्यांनी प्रसंगी सासरच्या लोकांना मारहाण करून तिला दाखल केली तेव्हा तिच्या सोबत होणार्‍या अत्याचारांना वाचा फुटली होती. तेव्हाच मेले असते तर सुटले असते हा विचार तिला तरळून गेला. मात्र पुढच्याच क्षणी धावत तिच्या जवळ आरूष आला आणि याच्यासाठीच देवाने आपल्याला वाचवलं असावं का? हा ही विचार तिच्या मनात डोकावून गेला. अजून काहीही नातं नाही पण मनाने जुळलेली नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त पक्की असतात ना? तसंच काहीसं तिचं झालं होतं.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//