नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) भाग 3

धाराऊ काय निर्णय घेईल?



नात्यांची वीण(प्रशांत कुंजीर) भाग 3

मागील भागात आपण पाहिले सईबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर बाळंतव्याधी जडल्याने अंगावर बाळाला स्तनपान करू नका असे वैद्यांनी सांगितले. नाईलाजाने दूध आई शोधायचा हुकूम आऊसाहेबांनी दिला. आता पाहूया पुढे.


"जीवा, कुणासाठी बघत अस्त्याल दूध आई? आस दुसऱ्या बाळाला दूध पाजायला कोण तयार व्हईल व्हय"

"भिवा आपून हुकमाच ताबेदार आऊसायेबांनी कामगिरी दिली. मंजी तशीच काय तरी नड आसल नव्हं?"

जीवा आणि भिवा आसपासच्या गावातील लहान लेकरू असणाऱ्या बायका शोधत होते. त्यांचे आरोग्य,घरदार,वागणे सगळे पारखत होते.

असेच फिरत असताना नसरापूर जवळ कापूरहोळ जवळ तुकोजी गाडे पाटलांची बायको धाराऊ बाळंत झालेली असल्याची बातमी मिळाली. जीवा आणि भिवा कापूरहोळला आले.

त्यांनी धाराऊ आणि तुकोजीची माहिती काढली. दोघांचे वागणे,बोलणे तसेच घराणे पाहून तुकोजीला विचारायचे त्यांनी ठरवले.


"तुकोबा,गडावरून निरोप घिवून आलोय आमी." जीवाने सांगितले.

"काय? गडावरून! काय हुकूम हाय राजांचा. मुहिम हाय का कुठं?" तुकोजी हरकला.


"काम तुमच्याकड न्हाय!" भिवाने उत्त्तर दिले.

"मंग व कुणाकडं हाय काम? आन काय हाय कामगिरी?" तुकोबा पाटलांनी विचारले.

"तुकोजी,आऊ साहेबांनी दूध आई हुडकायला सांगितलं हाय." भिवा चाचरत म्हणाला.

"तुमचं पॉर बी तान्हं हाय नव्हं!" "काय? मंजी धाराऊ?" तुकोजी गडबडला.

"इचार करून सांगा. कायबी जोर जबरदस्ती नाय." दोघेही निघून गेले.

धाराऊ बाळाला पाळण्यात घालून स्वयंपाकाला लागली. सकाळी शेतावर गेलेली माणसे आता परत येणार होती. भाकरी,झणझणीत कालवण,जोडीला घरचे दही. धाराऊ खुश झाली.


तुकाजी घरी आले. बाळाला घेऊन घरभर मिरवणारे तुकाजी आज जरा गप्पच होते. गुरे दावणीला बांधून गड्यांना सूचना दिली आणि पाटील जेवायला आले. गप्प बसून जेवणारे तुकाजी बघून धाराऊ अस्वस्थ झाली.

" धनी,काय झालं. आल्यापासन तुमी गप हायसा."

"धारा... गडावरून सांगावा आलाय."

"आव मंग आस नाराज काय व्हता. गडावरून सांगावा आलाय. राजांनी बोलावल हाय." धाराऊ आनंदी दिसत होती.

"कसली लढाई हुणार हाय का धनी?"

"सांगावा आमास्नी नाय आला."
"मंग व? कुणाला बोलावणं हाय?"
"तुला सांगावा हाय. आऊ साहेबांचा."

"बया,मला कशाला बोलावण केलं आसल? सांगा की धनी काय निरोप आलाय?" धाराऊ विचारत होती.

" आऊ सायबांना दूध आई पायजे हाय." तुकाजी खाली मान घालून बोलले.


\"दूध आई \" शब्द ऐकताच धाराऊने पटकन जाऊन तिच्या बयाजीला छातीशी कवटाळले.

"धनी,आव पर आस कस करू म्या? माज्या बाळाच्या तोंडचं दूध दुसऱ्याला दिवू व्हय?"

"धारा,त्यांनी फकस्त इचारल हाय. तुला नसल जायचं तर नग म्हणून सांगतो की म्या."

"धनी, आव राज म्हंजी मायबाप आन आऊ सायेब म्हंजी साक्षात जगदंबा. त्यासनी नाय म्हणायचं?"

"मगं कसं करायचं तू म्हणशीला तस करू."

धाराऊ जरा वेळ गप्प झाली. मग काहीशा निर्धाराने ती म्हणाली,"धनी,उद्या निगायची तयारी करा. तिथं जाऊन बगु तरी."


त्या रात्री धाराऊला झोप आली नाही. आपल्या लेकराचे दूध वाटायचे ही कल्पना कोणत्याही आईसाठी दुःखदायक आहे. धाराऊ अस्वस्थ होती. तरीही गडावर जायचे तिने ठरवले.

दुसऱ्या दिवशी न्याहारी बांधून तान्ह्या बयाजीला घिऊन धाराऊ आणि तुकोजी पाटील पुरंदरच्या वाटेवर चालू लागले.


जिवा आणि भिवा सोबत होतेच. त्यांना धाराऊने विचारले,"कुणासाठी पायजे दूध आई? बाळाचं नाव तरी सांग दादा."

जिवा म्हणाला,"आक्का,न्हाई सांगता यायचं. तुमासनी गडाव पोचवण येवढं आमचं काम हाये बग."

जिजाऊंना ही खबर आधीच पोहोचवली गेली होती. त्यांनी धाराऊला एकटीला बोलावले.

"मुजरा आऊसाब." धाराऊ आऊसाहेबांना प्रत्यक्ष पाहूनच धान्य झाली.


"धारा,तुम्हाला कशासाठी बोलावले आहे माहीत आहे ना?" आऊसाहेब म्हणाल्या.

"व्हय,पर...एक इचारायच व्हतं?" धाराऊ घाबरत होती.

"तुमच्या मनात काहीही शंका असेल ती विचारा. नाही म्हणायचा तुम्हाला अधिकार आहे." आऊसाहेब असे म्हणताच धाराऊ आश्वस्त झाली.

"मला बाळाचं नाव कळलं का? आन त्या आईला भेटला यील का जिच्या काळजाचा तुकडा मला संबळायचा हाय."धाराऊने विचारले.


जिजाऊ थोडेसे थांबल्या आणि म्हणाल्या," बाळराजे!"


प्रत्यक्ष युवराजांना दुग्धपान करायचे आहे. धाराऊ काय निर्णय घेईल? सईबाई भेटल्यावर काय होईल? ही नात्यांची विण कशी गुंफली जाईल. पाहूया अंतिम भागात.

©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all