नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) भाग 2

बाळाचे आगमन नीट होईल का? सईबाईंच्या मनात नेमके काय आहे?

नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) भाग 2
मागील भागात आपण पाहिले की सईबाईंच्या गर्भार असण्याच्या बातमीने स्वराज्यात आनंद पसरला.आऊसाहेब स्वतः सईबाईंना जपत होत्या. दिवस भरत आले होते. आता पाहूया पुढे.


पुरंदरची उष्ण हवा सईबाईंना सहन होत नव्हती. त्यात त्यांची प्रकृती नाजूक.

"जगदंबे, सई आणि त्यांच्या बाळावर कृपाशीर्वाद राहू दे!" आऊसाहेबांनी साकडे घातले होते.

पुतळाबाई कडक उपास करत होत्या. भर उन्हाळ्याचे दिवस सुरू होते. आज सकाळपासून सईबाईंच्या हालचाली मंदावल्या होत्या.

अनुभवी सुईणी सज्ज झाल्या. सुतिकागृह कधीचेच तयार होते. सईबाईंनी सुतिकागृहात प्रवेश केला.

किल्लेदार मुरारबाजी म्हणाले,"किल्ल्यावरच्या समद्या देवास्नी साकडं घाला. आक्का आणि बाळ सुकरुप असले पायजे."

आऊसाहेब अधिष्ठान करायला बसल्या. रखमा आणि सगुणा इकडे तिकडे धावत होत्या. बाळंतवेणा सुरू झाल्या.

सईबाई प्रकृतीने नाजूक त्यामुळे सुईणी काळजीत होत्या.
त्यांच्या कपाळावरचा घाम पुसत रखमा म्हणाली,"आई शिरकाई धाव. समद नीट व्हवू दे. तिखट गोड निवद घिऊन यील."

जो तो काळजीत होता. तेवढ्यात बाळाच्या रडण्याने पुरंदर आनंदला. रुद्र जन्मला होता. सईबाई ग्लानीत होत्या.


"आर तोफांना बत्ती द्या. युवराज आल."मुरारबाजी आनंदाने आदेश देत होते.

जिजाऊ शांतपणे दालनात सईबाईंच्या कपाळावर हात फिरवत होत्या. थोड्या वेळाने बाळ रडू लागले.

"सई,बाळाला पदराखाली घ्या."

सईबाईंनी बाळाला घेतले. बाळ काही रडायचे थांबेना. पान्हा फुटत नव्हता.

"आऊसाहेब,आम्हास काय होतेय असे?"

"सई,नका चिंता करू. सगुणा गायीचे दूध आण. कधीकधी लागतो वेळ."

जिजाऊ असे म्हणाल्या खऱ्या पण त्यांच्या मनात मात्र एक शंकेचा नाग फणा वर काढत होता.

इकडे सईबाई अस्वस्थ होत्या. गर्भात बाळ आल्यावर आई आणि मुलाच्या नात्याची विण गुंफली जाते. तर बाळाच्या जन्मानंतर पान्हा फुटून ती पूर्णत्वास जाते.


\" माझे मातृत्व अपुरे आहे का? मला असे काय होतेय.\"

विचार थांबत नव्हते. त्याच ग्लानीत सईबाई झोपी गेल्या. थोड्या वेळाने रखमा आत आली. तिने सईबाईंना हात लावला आणि चटकन मागे घेतला. अंग विस्तावसारखे गरम होते.

रखमा तशीच धावत निघाली."आऊसायेब,थोरल्या राणी सरकार..."

रखमाचा कापरा आवाज ऐकून जिजाऊ ताडकन उठल्या.

"रखमा,अशीच वैद्यांना बोलवायला जा."

जिजाऊ दालनात पोहोचल्या. तोवर बाळ पुन्हा रडू लागले होते.


पुतळाबाई बाळाला शांत करायचा प्रयत्न करत होत्या. सोयराबाई सईबाईंच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवत होत्या.

वैद्य येताच आऊसाहेब पुढे झाल्या." बाळ रडत आहे. पान्हा फुटत नाहीय. वैद्यराज काय झाले असेल?"

जिजाऊ अस्वस्थ होत्या. वैद्यांनी सहाणेवर मात्रा उगाळून दिली.

"ज्वर उतारास लागेल थोड्या वेळाने." वैद्य बाहेर पडले त्यांच्याही मनात शंका डोकावत होती.


सईबाई बाळाला जवळ घेत परंतु पान्हा जास्त येत नसल्याने बाळ रडत असे. वैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.


शेवटी वैद्यांनी सांगितले,"आऊसाहेब,बाळंत व्याधी आहे. तुम्ही बाळ राजांसाठी दूध आई पाहा."

जिजाऊंच्या पायातील बळ नाहीसे झाले. इतक्या धिराच्या आऊसाहेब पण कोलमडल्या. कोणत्या तोंडाने सईला सांगायचे? शेवटी आऊसाहेब दालनात आल्या.

बाळ अंघोळ करून झोपी गेले होते.

"सई,आम्ही काही सांगितले तर ऐकाल?"

"आऊसाहेब,तुमचा शब्द म्हणजे जगदंबेचा शब्द. तुम्ही सांगाल ते करू आम्ही."

"सई,बाळाला अंगावर पाजू नका असे वैद्यांनी सांगितले आहे."

"काय? आई जगदंबे! अशी अपुरी विण का गुंफलीस?"

"सई,सावरा स्वतः ला. बाळासाठी हा निर्णय घ्यायला लागेल."

सईबाई फक्त होकारार्थी खिन्न हसल्या. एवढ्यात महाराज आल्याची वर्दी आली.


महाराज दालनात आले. पाळणयातील बाळराजे पाहून महाराज आनंदले त्याच वेळी म्लान आणि तेजहिन सईबाईंना पाहून त्यांचे मन व्यथित झाले.

"सई,पडून रहा. आराम सांगितला आहे ना वैद्यांनी!" उठणाऱ्या सईबाईंना थोपवत महाराज म्हणाले.

" आम्हास काही झाले तर बाळाला पुतळाबाईंना सोपवाल?"

"सई,असे बोलू नका. ह्या स्वराज्याला महाराणी दुसरी मिळेल पण आम्हास आमची सखी मिळेल का?" महाराज डोळ्यातले पाणी थोपवत होते.

शेवटी आऊसाहेबांनी विश्वासू माणसे बोलावली,"खास कामगिरी आहे. बाळ राजांसाठी दूध आईचा शोध घ्या."

माणसे पांगली आणि जिजाऊ साहेबांनी जगदंबेला हात जोडले.

बाळ आणि आईच्या नात्याची ही अपुरी विण पुरी होईल का? पाहूया पुढील भागात.

©®प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all