नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) भाग 1

आई मुलाच्या हळव्या नात्याचा इतिहासातून वेध घेणारी कथा

नात्यांची वीण (प्रशांत कुंजीर) भाग 1

कथा इतिहासातील व्यक्तींवर आधारित असली तरी यात ऐतिहासिक सत्याचा दावा नाही. फक्त त्या व्यक्तींच्या मानसिक अवस्थेला आणि विचारांना धरून कथा लिहिलेली आहे. पूर्णपणे काल्पनिक.


थोरल्या महाली महाराणी सईबाई अधीर झाल्या होत्या. महाराजांचे आगमन गडावर होणार असल्याची वर्दी मिळाली होती. जवळपास तीन महिन्यांनी भेट होणार होती. महाराणी ओवळणीचे ताट करून सज्ज होत्या.

"राणीसाब, आव राज आल." रखमा धावत आली.

" रखमा,किती वेळा सांगितले असे मोठ्याने ओरडुन वर्दी देऊ नये." सईबाई बोलत असताना त्यांना उबळ आली.

तितक्यात पहारेकरी सजग झाले. पडदे हलले आणि साक्षात चैतन्य प्रकटले.

" राणीसाहेब,असे काय पाहताय निरखून?" राजांनी मिश्किल हसत विचारले.

"बालपण सरून आपण किती बदलला. काळ किती भुरकन उडून गेला नाही." सईबाई महाराजांना पाणी देत बोलत होत्या.

काहीशा थकलेल्या तरीही चेहऱ्यावर तेज असलेल्या आपल्या सखीकडे पाहून महाराज मंद हसले.

" इथे बसा बघू. जरा निवांत बोला आमच्याशी." महाराजांनी त्यांना हाताला धरून शेजारी बसवले.

"मोहीम संपली वाटते? आता स्वारीनी काही काळ गडावर थांबावे." सईबाई राजांची तलवार खुंटीवर ठेवत म्हणाल्या.

"महाराज,जेवण तयार आहे. आऊसाहेब थांबल्या आहेत." वर्दी आली तसे महाराज आणि सईबाई निघाल्या.

सदरेतून त्या जात असताना हाक आली,"आक्का, बऱ्या हायसा नव्हं?"

मुरारबाजी असे म्हणत असताना त्याने महाराजांना पाहिले आणि पटकन गप्प झाला.

" मुरारबाजी तुम्हा बहीण भावात आम्ही नाही बोलणार बर." महाराज हसले.

" महाराज,आव मानलेली असली तरी बी सख्ख्या बहिणीपरास जास जीव हाय आक्काचा आमच्यावर."
मुरारबाजी झरकन निघूनही गेले.


नुकतेच महाराजांचे थोरले बंधू संभाजराजे यांचे निधन झालेले होते. अशा वेळी गडावर थोडे गंभीर वातावरण होते.

"आव सईबाईसाब,थांबा. ह्ये बगा म्या काय आणलं हाय?"सगुणा पळतच आली.

महाराज दिसताच तिने ओट्याचा काचा आवळला आणि धूम ठोकली. तोवर सगळेजण जेवणाच्या ठिकाणी जमले.

"सोयरा,तुपातली गव्हाची खीर बनवली ना?" आऊसाहेब आत आल्या.

" जी,आपण सांगितले तसे बनवले आहे. थोरल्या बाईंना काही त्रास होणार नाही." सोयराबाईंनी उत्तर दिले.

कित्येक दिवसांनी महाराज पंगतीला होते. पुतळाबाई वाढत असताना हळूच चोरून त्यांनी सईबाईंना लोणचे वाढले.

"पुतळा,आमचे लक्ष आहे म्हंटल." आऊसाहेब म्हणाल्या.

"पण थोरल्या बाईंना खूप इच्छा होतेय हो कालपासून." पुतळाबाई असे म्हणाल्या आणि महाराज जोरात हसले.


"तरीच सगुणा ओट्यात काहीतरी लपवून पळून गेली. चिंचा होत्या ना?" महाराजांनी पाहिले तशा सईबाई लाजल्या.


आज सगळा पुरंदर अगदी आनंदात न्हाऊन निघाला होता. सईबाई साहेबांची चोर ओटी भरली जाणार होती.

सगळी आखणी आऊसाहेब स्वतः जातीने करत होत्या. लहानगी सई त्यांच्या डोळ्यांसमोर मोठी झाली होती.


लवकरच चोर ओटी भरून झाली आणि सगळ्या गडाला आनंदाची बातमी समजली. राणीसाहेब गर्भार आहेत.

मुरारबाजीने ताबडतोब जेजुरीच्या खंडोबाला साकडे घातले,"ह्या बारीला मामाच्या मिशा वडायला भाचा पायजे. स्वराज्याला धाकलं धनी मिळू दे."

सगळा समारंभ आटोपून सईबाई महाली आल्या.

"सई,आता विश्रांती घ्या. वैद्यांनी दिलेली पथ्य पाळा." महाराज काळजीने बोलत होते.

सईबाई महाराजांच्या फक्त पत्नी नव्हत्या. त्यांची सखी आणि मैत्रीण होत्या.

"सई,स्वतः ला जपा." महाराज कातर आवाजात म्हणाले.


"थोरल्या बाई,आम्ही येऊ का आत?" मागून आवाज आला.

"कोण पुतळाबाई? अहो विचारता काय? या ना!" सईबाई हसून म्हणाल्या.

पुतळाबाईंनी पदराखाली काहीतरी लपवून आणले होते.

"पुतळा,काही सांगायचे आहे का?" सईबाईंनी विचारले.

" ते...आम्ही आमच्या दादासाहेबांना सांगून खाऱ्या मिरचीचे आईच्या हातचे लोणचे आणले आहे." पुतळाबाई उत्तरल्या.

" अहो मग द्या लवकर तोंडाला पाणी सुटले." सईबाई पुढे झाल्या.

"थोरल्या बाई...आमच्या हातून नको ना! थांबा मी सगुणाला बोलावते." त्या सगुणाला आवाज देत होत्या.

"पुतळाबाई थांबा! आम्हास तुमच्याच हातून खायचे आहे. उद्या आम्हास काही झाले तर तुम्ही आमच्या बाळाला आईची माया द्याल. याचा जगदीश्वर साक्षी आहे." सईबाईंनी उत्तर दिले.

" बाळाला न्हाऊ माखु घालायला तुम्हीच यायचे पुतळा." सईबाईंनी पुतळाबाईंना मिठीत घेतले.


हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला. उष्णतेने सईबाईंना त्रास होई.
सगुणा त्यांना अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकून देई.
पुतळाबाई स्वतः त्यांच्या पायाला चंदनाचा लेप लावत.
जिजाऊ तर सावली बनून सईबाईंची काळजी घेत होत्या. दिवस भरत आले होते. कोणत्याही क्षणी गोड बातमीने किल्ले पुरंदर आनंदाने न्हाऊन निघणार होता.


पुढे सईबाईंच्या आयुष्यात एक अवघड क्षण येणार होता. सईबाई कशा सहन करतील हे सगळे?

©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all