Login

।। नात्यांची वीण अंतिम भाग (समीर खान) ।।

Natyanchi Veen Part 4 (sameer Khan)
।। नात्यांची वीण भाग 4 अंतिम (समीर खान) ।।

अष्टपैलू लेखक महासंग्राम कथा स्पर्धा

सासुबाईंशी, लहानग्या आरूषशी तिचे बंध जोडले गेले तरी बाकी ईतरांशी तिच्या नात्यांची वीण गुंफणं बाकी होतं. हळू हळू ती संसारात रमू लागली. सासुबाईंची साथ होतीच. आरूषच्या कृष्णलीला तिला गदगदीत करत होत्या. नवराही काहीसा तिच्या बाबतीत काळजी, प्रेम दाखवायचा. पिहूला तिची सवय होत होती मात्र अजूनही ती तिच्याशी एकरूप झाली नव्हती.तरीही जे सुमीला आधी भेटलं नाही ते सर्व तिला या नात्याने मिळवून दिलं होतं. या घरात ती भरून पावली होती. सुखाचा संसार काय असतो याचा प्रत्यक्ष अनुभव ती घेत होती. तिची कुस ऊजवली नाही तरी आरूषसारखा मुलगा तिला लाभला होता. तिला एकच खंत होती ती म्हणजे पिहू.सगळं सगळं करून ती थकली होती मात्र ईतर सदस्यांप्रमाणे तिच्या सोबतची नात्याची वीण ती काही जोडू शकली नव्हती. भांडत नसली तरी पिहू तिच्या बाबतीत अगदीच रूक्ष असायची. हिचा मायेचा ओलावा ही तिचा कोरडाच वाटायचा मग सुमी रडत बसायची.
"होईल गं ती ठिक. तु काळजी करू नको. " सासुबाई तिला धीर द्यायच्या. तिने मात्र ही आशा सोडून दिली होती.
दिवसांमागून दिवस गेले. छोटी छोटी पिल्लं मोठी झाली. आपापल्या पायावर ऊभी राहीली. पिहूचं लग्न जमलं. लग्नाची लगबग सुरू झाली. मरमर मरणारी, धावणारी, लेकीच्या लग्नात कुठलीही कमी राहणार नाही याची काळजी करणारी सुमी पिहूने पाहिली. कधी नव्हे ते पिहूचं लक्ष सुमीने वेधलं होतं ते ही तिच्या नकळत. तिची ही आई सुमी घरात आल्यापासून ते आजपर्यंत चा तिचा प्रवास पिहूच्या नजरेसमोरून तरळून गेला. प्रेमाचा, मायेचा वर्षाव करणारी सुमी तर कोरडीठक्क राहिलेली पिहू. पिहूने आई म्हणून तिला कधी स्विकारलंच नाही. एकतर नकळत्या वयात देवाघरी गेलेली जन्मदात्री आई तर ही नवीनच आलेली ती ही आपल्या बाबांसोबत लग्न केलेली ही स्री याचा राग पिहूच्या मनात कुठेतरी घर करून राहिला होता. मात्र आई गेली असली तरी तिच्या रूपात आलेल्या या आईच्या मायेला आपण का समजू शकलो नाही याची खंत आता पिहूला जाणवत होती. ईतक्या वर्षांनंतर पिहूला ही ऊपरती झाली होती. मात्र आता तिचा या घरातला सहवास संपला होता. पिहूचे डोळे भरून आले. भावना अनावर झाल्या. कंठ दाटून आला. गर्दीतून ती आतल्या खोलीत निघून आली जिथे तिच्या आईची तस्बिर सजवून ठेवली होती. तिथे आल्यावर तिच्या भावनेचा बांध तुटला. तिच्या मागोमाग आज्जी, बाबा ही आले. पिहू आज्जीच्या गळयात पडून रडू लागली. सुमी अजूनही बाहेर पाहुण्यांच्या सरबराईत व्यस्त होती. पिहू, आज्जी, बाबा कुणीच दिसेना हे सुमीच्या लक्षात आलं. मागोमाग ती ही आतल्या खोलीत आली. त्या तस्बिरीत सुमीचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं.

" आई ऽऽऽऽऽ" पिहू तिला येऊन बिलगली. काही क्षण तिला काहीच सुचलं नाही. पिहू आजपर्यंत तिच्या जवळही कधी फिरकली नव्हती. आज अचानक तिच्यात ईतका बदल कसा झाला? मात्र पुढच्याच क्षणी सुमीच्याही मायेला पाझर फुटला आणि दोघी मायलेकी हमसून हमसून रडू लागल्या. पिहूला तिची आई गवसली होती तर सुमीला तिची लेक. आज खऱ्या अर्थाने तीचं कुटुंब पुर्ण झालं होतं. अखेरची राहिलेली नात्याची वीण आज विणली गेली होती. ईतक्या वर्षांची तिची तपश्चर्या आज फळाला आली होती.

समाप्त
समीर खान ©®
पोस्ट नावासहित शेअर करण्यास माझी हरकत नाही.

🎭 Series Post

View all