।। नात्यांची वीण भाग 3 (समीर खान) ।।

Natyanchi Veen Part 3 (sameer Khan)


।। नात्यांची वीण भाग 3 ( समीर खान)।।

अष्टपैलू लेखक महासंग्राम कथा स्पर्धा

याच साधारण रूपा मुळे तीने नरकयातना भोगल्या होत्या. लग्न जमवताना सतराशे साठ विघ्ने येत होती. यासाठी तिच्या वडिलांनी कितीतरी खस्ता खाल्ल्या होत्या. मोठा हुंडा देऊन अगदी थाटामाटात लग्न लावून दिलं होतं पण ईथेच घात झाला होता. हुंड्याच्या लालसेने केलेला हा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या वर्षभरात सासरच्या मंडळींनी तिला गर्भार असूनही अगदी मरणासन्न अवस्थेत पोहचवलं होतं. तिच्या माहेरी याची काहीच कल्पना नव्हती. वडिलांना ती अजून दुःखी करणार नव्हतीच. साखर मागण्यासाठी आलेल्या शेजारच्या राधा वहिनींनी जेव्हा तीला आतल्या खोलीत अगदी डांबलेलं पाहिलं तेव्हा त्या पुरत्या हादरून गेल्या. तिच्या सासूने राधा वहिनींना घालवून देण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी हिंमत करत तिला तिथून बाहेर काढलीच. राधा वहिनींचा नवरा पोलिस असल्याने त्या लोकांना जास्त प्रतिकार करता आला नाही. तातडीने वहिनींनी नवर्‍याला बोलवून घेतले. तिची अवस्था पाहताच तो ही संतापला. ते लोकं गडबड करताच त्याने पोलिसी खाक्या दाखवला. तिच्या वडिलांना बोलवत पुढचे सोपस्कार पार पाडले आणि तिला सरकारी इस्पितळात दाखल केली. चार महिन्यांची गर्भवती असूनही त्यांनी तिला जबर मारहाण आणि ऊपाशी ठेवली होती. तिच्या अंगावर जागोजागी वळ ऊमटले होते . आणखी एखादा जरी दिवस जरी दुर्लक्ष झाले असते तर ती दगावली गेली असती. या प्रसंगात तिचं बाळ गेलं. आईपणासाठी आसुसलेली ती गर्भवती होऊनही वांझोटीच राहीली. काळ कुणासाठी थांबत नसतो. तो पुढे सरकत राहिला. आपली लेक वाचली याचा आनंद मानावा की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं याचा शोक करावा या दुविधेत तिचे वडील दिवसेंदिवस खंगत चालले होते. त्यात या प्रकरणाची कोर्ट केस सुरू झाली. खोटे साक्षी पुरावे.. आरोप प्रत्यारोप, राधा वहिनी व त्यांचा नवराही तिची अजून जास्त मदत करू शकले नाही. त्यात त्या नालायकांची पोहोच खूप वरपर्यंत होती. त्यांनी तिला चारित्र्यहीन ठरवलं. तसे खोटे पुरावे कोर्टासमोर मांडले. मुलीचं होणारं चारित्र्य हनन सुमीच्या वडिलांना सहन झालं नाही. छातीत जोरदार कळ येऊन ते कोर्टातच कोसळले. हाॅस्पिटलला नेतानाच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत त्यांचा मृतदेह आणला गेला. काही दिवसांनंतर नवर्‍याचा मृत्यू आणि मुलीचा मोडलेला संसार या दुःखाने सुमीच्या आईलाही अर्धांगवायूचा झटका आला आणि त्या अपंग झाल्या. मेंहदी, शिवणकाम, शिकवण्या यात सुमी स्वतःला व्यस्त ठेऊ लागली पण सुखाचा एक घास ही तिची भावजय तिला गिळू देत नव्हती. आत्महत्या ती करू शकत नव्हती. तिच्या माघारी आईचं काय होणार ही चिंता तिला सतावत असे.

तिला पाहण्यासाठी जेव्हा ह्या बिजवराचं स्थळ आलं तेव्हा सोबत आरूषही होता. का कुणास ठाऊक पण तिला क्षणभर वाटलं की हे माझंच गेलेलं बाळ असावं जे ईतक्या वर्षांनंतर मला भेटायला आला असावा. ते लोकंही परिस्थितीचा फटका झेललेले होते. त्यांना अशा सुनेची गरज होती जी आरूष व पिहू ही दोन लेकरं आपली म्हणून सांभाळेल . या कलयुगात अशी स्री मिळणं महाकठीण काम होतं पण योगायोग म्हणा किंवा सुमीचं भाग्य आरूष व पिहूला घेऊन त्यांची आज्जी मंदिरात आली होती. सुमीही तिथे होती. प्रसाद वाटताना तिथल्या मुलांवर ती प्रेमवर्षाव करत होती. सुमीने यांना पाहिलंच नाही. बाहेर ती प्रसाद वाटण्यात दंग होती. नंतर ती निघूनही गेली मात्र जातांना या मुलांच्या आज्जीच्या मनात घर करून गेली. त्यांनी तिथेच आसपास तिची चौकशी केली आणि सुमीची करूणकहानी त्यांना समजली. वेळ न दवडता त्यांनी मध्यस्ताच्या मदतीने स्थळ पाठवलं. ही ब्याद ईथून जाईल या अत्यानंदाने तिच्या भावजयीने हे लग्न लवकरात लवकर कसं होईल याकडे जातीने लक्ष दिले. असंही त्यांना अशीच सुन हवी होती. एकापेक्षा एक सुंदर मुलींचे स्थळ आले असतानाही त्यांनी सुमीची निवड केली. सुमीशी बोलताना ती नक्कीच या मुलांना आईचं प्रेम देईल याची खात्री त्यांना पटली. यथावकाश हा विवाह पार पडला आणि सुमी सासरी आली.

🎭 Series Post

View all