।। नात्यांची वीण भाग 2 (समीर खान) ।।

Natyanchi Veen Part 2 (sameer Khan)

।। नात्यांची वीण भाग 2 (समीर खान)।।

अष्टपैलू लेखक महासंग्राम कथा स्पर्धा


वरमालेनंतर पुढच्या विधींसाठी ती सज्ज झाली. सभोवताली तीने नजर फिरवली. व्हीलचेअर वर बसलेली तिची आई, तिच्या डोळ्यात वाहणाऱ्या गंगा जमुना, डोक्यावरचं ओझं उतरलं म्हणून निश्चिंत झालेला भाऊ, ब्याद गेली म्हणून आतून आनंदीत होणारी तिची भावजय, कुठलेही भाव चेहर्‍यावर नसणारा व कुठल्यातरी विचारात गढून गेलेला तिचा होणारा नवरा, अत्यानंदात असणारी होणारी सासू, फुगून बसलेली पिहू तर केवळ तिच्याच भोवती घुटमळणारा छोटासा आरूष. यावरून तिला येणार्‍या परिस्थितीची पुसटशी कल्पना आली होती.
कन्यादानाच्या विधी वेळी तिला तिच्या बाबांची प्रकर्षाने आठवण आली. किती खुश होते ते कन्यादान करताना. त्यानंतरच्या कितीतरी घटना आणि सायरन वाजवत येणारी रुग्णवाहिका आणि त्यातून आणलेला तिच्या बाबांचा मृतदेह. जोरजोरात धाय मोकलून रडावं अशी तिची अवस्था झाली. कंठ जड झाला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहताच होणार्‍या सासूबाई पुढे सरसावल्या आणि तिची पाठ थोपटत तिचं सांत्वन करू लागल्या. त्यांनी पाठीवर हात फिरवताच तिला सरसरून काटा आला अंगावर. क्षुल्लक कारणावरून मुलाला मारहाण करायला भाग पाडणारी सासू कुठं आणि मनाची अवस्था समजत सांत्वन करणारी ही सासू कुठं. दोन स्रियांमध्ये ईतकं अंतर असू शकतं याचा तिला साक्षात्कार झाला. खूप मोठा आधार वाटला तिला त्यांचा. तीने आपली मान त्यांच्या हातावर टेकवली. व्हीलचेअर वर बसलेली तिची आई हे दृश्य पाहून कृतकृत्य झाली. नात्याचा आणखी एक धागा विणला गेला. ज्याची गाठ पक्की बसली होती. असं पाहिलं तर गठबंधन वधुपक्षाकडील मंडळीच करतात पण त्या ही अवस्थेत तिने सासुबाईंनाच गाठजोड्याची गाठ बांधण्यास सांगितलं.

सप्तपदी करताना एका बेसावध क्षणी तिचा तोल जाणार तोच त्याने तिला सावरलं. या एका छोट्याशा कृतीने तिच्या मनातल्या बर्‍याचश्या शंका क्षणात दूर झाल्या. विवाह उत्तमरीत्या पार पडला. पाठवणीच्या वेळी तिच्या आईच्या गळ्यात पडून ती धाय मोकलून रडली. माहेरचे बंध तिच्यासाठी जवळपास आता संपल्यातच जमा होते.

" सांभाळून घ्या आमच्या सुमीला, मी असले, नसले तरी आता मला काही काळजी राहीली नाही तीची. " बोलत तिच्या आईने विहिणबाईंना हात जोडले. त्यांचे हात हातात घेत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी होकार दिला आणि सुमी सासरी आली.

दोघांचाही दुसरा विवाह असला तरी सुमीच्या सासूबाई सर्व रितीरिवाज हौसेने करत होत्या. गृहप्रवेशाची विधीही तितक्यात आत्मियतेने त्यांनी पार पाडली. मात्र ती आत येताच त्या भावनाविवश होऊन आतल्या खोलीत निघून गेल्या. ईकडे सुमीची चुळबूळ सुरू होती की ऊठून जाऊन बघावं तरी की सासूबाई असं का गेल्या? शेवटी काहीतरी बहाणा करून ती ऊठलीच. बंगल्यात पाहुण्यांची रेलचेल होतीच. ईकडे तिकडे बघताना तिला सासुबाई दिसल्या. आतल्या खोलीत मोठ्या टेबलवर ठेवलेली ती अतिशय सुंदर तस्बिर तिने पाहिली. ही तस्बिर कदाचित हाॅलमध्ये लावलेली असावी पण आता ती ईथे आत या टेबलवर दिसत होती. मोठे मासोळी डोळे, सरळ नाक, नाजूक ओठ आणि मुर्तिमंत खानदानी सौंदर्य. तिच्या मागोमाग आरूष आला आणि त्याला पाहताच ऊलगडा झाला की ही तस्बिर नक्कीच आरूषच्या आईचीच असेल आणि कितीही आनंदाने सासुबाईंनी तिचा गृहप्रवेश केला असला तरी अकाली गेलेल्या, दोन मुलांची आई असलेल्या त्यांच्या लाडक्या सुनबाईंची आठवण त्यांना अनावर झाली असावी. ते दृश्य पाहून हिचेही डोळे पाणावले. या सौंदर्यापुढे आपली कुठेही गिनती नाही तरीही सासुबाईंनी आणि पतींनी आपली निवड केली याचं तिला आश्चर्य ही वाटलं. अगदीच कुरूप नसली तरी सुमी देखणीही नव्हती. अगदी साधारण रूपाची होती ती.नाकीडोळी ठिकठाक. त्यात सावळा रंग.

🎭 Series Post

View all