नात्यांची वीण भाग १ (मेघा अमोल)

नाते हे कसे?


लक्षी.. एक लक्ष्य आनंदी जगण्याचे.


"देवा, त्याने माझं जगणं कठीण केले. त्याला मरणप्राय शिक्षा दे. सोडू नको. मरताना एवढी माझी हाक ऐक देवा." ती हात जोडून रडत वरती आकाशाकडे बघून प्रार्थना करत होती.

"ओ ओ ओ ओ ताई, आवं थांबा थांबा.. आवं मराल ओ.. थांबा उडी नका घेऊ.."

लक्षी पळत, जोरजोराने ओरडत पुलाजवळ येत होती. पण ती तिथे पोहचेपर्यंत त्या स्त्रीने खाली पाण्यात उडी घेतली होती. एकही सेकंदाचा विचार न करता लक्षीने तिच्या पाठोपाठ पाण्यात उडी घेतली. लक्षीच्या आवाजाने तिथे बरीच गर्दी जमली होती. तिच्या पाठोपाठ आणखी दोन पुरुषांनी त्या स्त्रीला वाचवायला पाण्यात उडी मारली. तिघांनी मिळून पाण्यात बुडणाऱ्या त्या स्त्रीला पकडले आणि काठावर आणले. लक्षीने त्या स्त्रीच्या छातीवर दाबून तिच्या शरीरात गेलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या गर्दीतून सुद्धा काही स्त्रिया पुढे येऊन त्यांना जमेल या ना त्या पद्धतीने पाण्यात पडलेल्या त्या स्त्रीची मदत करत होत्या. खोकलत खोकलत ती स्त्री भानावर आली.

"मला जगायचं नाही. मरु द्या मला." ती रडत, चित्रविचित्र आवाज काढत होती..

"देवाने अजून तुम्हास साद नाय घातली. तो पत्ता पाठवल, तेव्हा जा." लक्षी म्हणाली.

लक्षीचे बोलणे ऐकून गर्दीतून हसण्याचा आवाज आला. लक्षीने पण आपले हसू दाबत एकदा सगळ्यांकडे बघत थोडे मोठे डोळे करत चूप राहण्याचा इशारा केला. तसे हसण्याचे आवाज बंद झाले.

तेवढयात कोणीतरी डॉक्टरकडे जायचे म्हणून ऑटोरिक्षा घेऊन आले.

"मी ठीक आहे." ती स्त्री म्हणाली.

"आओ चला, डॉक्टर एकदा बघून घेतील. तेवढेच आपल्या मनास समाधान." लक्षी म्हणाली.

"मी ठीक आहे." ती जागेवर उठून उभी होत, शांतपणे म्हणाली.

तिथे उपस्थित सगळ्यांनी ती ठीक असल्याची विचारपूस केली. कोणी पाणी, कोणी बिस्कीट, कोणी संत्र तिला खायला दिले. आता ती स्त्री बरीच स्थिरावलेली वाटत होती. लक्षीने तिला तिच्या घरी पोहचवून देण्याचे सर्वांना आश्वासन दिले, तसे सगळे आपापल्या वाटेने निघून गेले.

लक्षी त्या स्त्री जवळ जाऊन बसली. तेवढयात एक कुत्रं सुद्धा भो-भो करत लक्षीच्या पायाजवळ घुटमळू लागले.

"रामभाऊ, भूक लागली का?" म्हणत लक्षीने त्याच्या पुढ्यात हातातील काही बिस्कीट टाकले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला." माझ्या मागे पळून पळून लय दमला असशील ना र? घे खाऊन घे."

"काय मग, आम्ही सारे गेल्यावर परत पाण्यात कुदनार का?" लक्षी तिच्या डोळ्यांना डोळे भिडवत म्हणाली. तिच्या डोळ्यात तिला दु:खद अशी जीवघेणी किनार दिसली होती. मनात कुठेतरी तिला सुद्धा वाईट वाटले होते. ती स्त्री लक्षीला अजब नजरेने बघत होती.

"नाय म्हणजे, जोपर्यंत तो जो वरती बसला हाय ना, त्याची जोपर्यंत इच्छा होत नाय, तोपर्यंत आपण कोणी मरु शकत नाय. उगाच हातपाय तुटून बसतील, अपंग जीवन जगा लागेल. म्हणून म्हणलं, बाकी काय नाय." लक्षी परत निर्धास्तपणे म्हणाली.

"जगू तरी कोणासाठी? आता माझं कोणी उरलं नाही. मला मरू द्या, मला मरू द्या.." ती स्त्री रडत. आरडाओरडा करत म्हणाली.

"अच्छा, असा प्रोब्लेम झाला म्हणायचा? मला एक सांगा, तुमचा जन्म झाला तेव्हा कुणाला सोबत घेऊन आल्या होत्या?" लक्षी.

"तुला मजाक सुचत आहे? इथे माझं दुःख मलाच माहिती." ती थोडी रागाने म्हणाली.

"माझं सोडा, हे दोन माणसं, ज्यांनी तुम्हाला वाचवायला आपल्या जीवाची काहीही पर्वा न करता पाण्यात उडी घेतली, ते कोण होते ओ तुमचे? तुम्ही बरोबर हाय का नाही बघेपर्यंत इथ थांबले होते, ते कोण होते ओ तुमचे? ते तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जायला ऑटो घेऊन आले, ते कोण होते ओ तुमचे? " लक्षी.

"मला वाचवा म्हणून मी कोणाला म्हणाले नव्हते."

"हो ना, मूर्ख हायेत सगळी. आपली कामधाम सोडून, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवायला आली." लक्षी तिच्यावर थोडी रागवत म्हणाली.

तशी ती स्त्री थोडी शांत झाली.

"आओ ताई, माणुसकीच्या नात्याने आलीत समदी तुम्हास वाचवायला. जरा आभार बाळगा. ते ज्या नात्याने तुम्हास वाचवायला, तुमची मदत करायला आले, तेच नातं तुम्हास जपायच हाय, असे समजा."

"माझ्याच नवऱ्याने माझ्या जीवाचे हाल केले. जिवंतपणी मरण पदरात घातले. आता जगू तरी कोणासाठी?" ती परत रडत होती.

"मी पहिले पण म्हणलं ना, जन्म घेतांना एकटे आलो, मारताना पण एकटेच असणार. कोण कितीही प्रेमाचा माणूस असेल तरी आपल्याला मरणासाठी सोबत करत नाही. आपण नशीबवान आहोत, आपल्यास सुदृढ जन्म भेटला. जीवन म्हटलं तर संघर्ष आलाच. स्वतःसाठी जगायचं." लक्षी.

"असे प्रवचन देणं सोपी आहे. पण ज्याचासोबत घडते, त्यालाच ठाऊक असते, जगणं किती कठीण होते ते."

"असं काय झालं? सांगाल का? नाही म्हणजे फैसला करता येईल." लक्षी.

"कशाचा फैसला?" ती.

"जगायचं की मारायचं." लक्षी.

"मघापासून बघतेय, तुला सगळी मजाकच वाटते आहे ना?" ती जरा रागात लक्षीकडे बघत म्हणाली.

"तुम्ही आयुष्याला मजाक समजून बसल्या आहात. इथं लोकांना जगायचं असते, आपल्या लेकरांसाठी, पण वेळ काळ धोका देतो. अन् तुम्ही माजून राहिलात." लक्षीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होतेच की तिने पापण्यांची उघडझाप केली आणि ते डोळ्यांतच विरले.

"माझा जीव काय वाचवला, तुला तर जसे काही हक्कच मिळाला मला नको ते बोलण्याचा? तू आता जास्त बोलत आहे,असे वाटत नाही? ती स्त्री म्हणाली.

"माफ करा. जरा चुकलेच. आपले समजली म्हणून बोलली."

"कोण कुठली ग तू? आली माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारी."

"हेच, हेच तिकडे नवऱ्याला सूनवून यायचं होते. चूक त्याची म्हणत होत्या ना? मग त्याची सजा पण त्यास द्यायची होती. पण नाही, आल्या इकडे उडी मारायला. कमीत कमी त्याला मारून तरी उडी घ्यायची होती." लक्षी.

"एवढ सोपं आहे हे सगळं?"

"सोपं तर काहीच नाही राहत. तुम्हाला जन्माला घालने तुमच्या आईला सोपी होते? किती त्रास भोगला असेल त्या माऊलीने?" लक्षी.

"खरं माहिती पडले तर मला कोणी जगू देणार नाही. ना नवरा, ना समाज."

"अशा बोलणाऱ्या समाजाच्या उलट्या हाताने एक थोबाडीत ठेऊन द्यायची." लक्षी.

लक्षीच्या अशा रोखठोक बोलण्याने ती स्त्री नरमली.


"मी प्रीती. आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले. घरी कोणालाच रवी आवडला नव्हता. तो चांगला मुलगा नाही म्हणून भावाने पण खूप समजावले होते. पण तरीही मी पळून जाऊन लग्न केले." प्रीती.

"अच्छा, म्हणून आईवडिलांशी संबंध तुटला तर."

"हो. "

"बरोबर हाय त्यांचं. एवढे कष्ट घेऊन पोरीला मोठं करायचं, भावाने लहानपणापासून राखीचं कर्ज चुकवत राहायचं. कोणी बहिणीला डोळे वर करून बघितले की त्याची सुताई करायची. अन् बहिण दुसऱ्याचा हात धरून पळते. काय जमाना आला हाय."

"मी बीएससीच्या शेवटच्या वर्गाला शिकत होते."

"हा? म्हणजे तुम्ही अनपढ नाय, शिकलेल्या हात? तरी असेकासे त्याच्या प्रेमात आंधळे झाल्या?" लक्षी तोंडाचा आ फाडत, तोंडावर हा ठेवत आश्चर्यचकित होत म्हणाली.

"समजतंय मला माझ्या चुका मोजून दाखवत आहेस ते.. "

लक्षी हसायला लागली.

"तो कॉलेजच्या बाजूला एका ऑफिसमध्ये नोकरी करत होता. येताजात नजरानजर व्हायची. एकदोनदा त्याने मदत पण केली. गोड बोलत. भविष्याची सुंदर सुंदर स्वप्न दाखवायचा. गोडगुलाबी स्वप्नात रमायला लागली. प्रेमात पडलो. मनाने, शरीराने जवळ आलो. शिक्षण अर्ध्यातच सोडून त्याचा सोबत लग्न केले. ३-४ महिने छान गेले. पण नंतर.." ती अचानक स्तब्ध झाली. कुठेतरी हरवल्यासारखी वाटली.

"नंतर?" लक्षी.

"तो कधीच नोकरी करत नव्हता. माझ्यासोबत खोटं बोलला होता."

"पैशांसाठी तुमच्यावर दबाव आणत होता?"

"तो मला परपुरूषांसोबत रात्र घालवायला फोर्स करतो. मी आधी नकार दिला, तर मला खूप मारले. मित्रांना पार्टी द्यायची म्हणे.. आणि मला त्यांच्यासोबत रात्र घालवायला जबरदस्ती केली."

लक्षीला तर काय बोलावे, कळत नव्हते. ती एकटक तिच्याकडे बघत होती.

"त्याने आमच्या दोघांमधील प्रायव्हेट क्षणांचे व्हिडिओ बनवले आहेत. परत त्याच्या मित्रांसोबत पण व्हिडिओ बनवले आहेत. आणि ते पण असे बनवले आहे की, त्यात त्यांचा चेहेरा अजिबात दिसत नाही. मी मात्र स्पष्ट दिसते. आणि आता तो मला..तो मला.." बोलता बोलता प्रीतीचा कंठ जड झाला होता. तिच्या अंगावर अक्षरशः काटे उमटले होते. अंगाला कंप सुटला होता. तिचे शब्द \"तो मला \" यावरच येऊन अडकले होते. तिला पुढे बोलवत नव्हते.

"तो मला.. काय ताई?" तिचा हात घेत, आपला हातात गुंफत, प्रेमळ स्वरात लक्षी म्हणाली.

"तो मला रोज रात्री विकतो. त्यात मी तीनदा प्रेग्नंट राहिले. त्याचे अबोर्शन करवले. आधी फक्त रात्रीच चालत, आता तो दिवसाला ७-८ माणसं पाठवतो. विकृत पद्धतीने संबंध ठेवायचे असल्यास तो लोकांकडून डब्बल पैसे घेतो. ते लोकं माझ्या शरीराचा नको तसा छळ करतात. मी नकार दिला तर ते घाण व्हिडिओ (ज्यात मीच आहे) यूट्यूब, फेसबुकवर पोस्ट करण्याची धमकी देतो. माझ्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देतो. माझे आयुष्य नरक बनले आहे. कशी जगू, सांग ना?" प्रीती तिच्या हातापाय, कंबरेवर सिगरेट वगैरेचे असलेल्या जखमा दाखवत रडत रडत बोलत होती.


"ताई, त्याचा गुन्ह्यासाठी तुम्ही स्वतःला शिक्षा करत होत्या? तुम्ही मेल्या असत्या. त्याला काही फरक पडला नसता. उलट त्याचं रान मोकळं झाले असते. तो दुसरी मुलगी पटवणार. दुसरं लग्न करणार, आणि परत तिच्यासोबत असेच करणार. तुमच्या चुकीमुळे कितीतरी मुलींचे आयुष्य खराब होणार. आणि कदाचित तुमच्यापासून सिख घेऊन तोच दुसऱ्या मुलींना आत्महत्या करायला भाग पाडेल नाहीतर मारेलही. तुम्ही खरं तर त्याचा मर्डर करून इकडे उडी घ्यायची होती." लक्षी.


"तू माझं संत्वान करत आहेस की धीर देत आहेस की माझा मजाक उडवत आहेस?"

"काय तुमची गाडी मजाक शब्दावरच अडकली हाय?"

"हा तर तू सगळं मजाक मध्येच घेत आहे."

"हे देवा, रामा, विठ्ठला.."लक्षीने डोक्यावर हात मारला. "मी सांगत हाय स्वतःचा बँड वाजवायचा आधी त्याचा बँड वाजवा, तर तुम्ही माझ्यावरच येऊन थांबत हाय."


"तुला वाटते आहे तेवढे हे सगळं सोपं नाही. "

"तुम्हाला वाटते तेवढे कठीण बी नाय."

"तू पिक्चर खूप बघते का?"

"तुम्हीच बघत होत्या, म्हणून काजोल बनून शाहरुख शोधत बसल्या. आजकालच्या पोरियांचा हाच प्रोब्लेम हाय, किरण बेदी बनायचं सोडून मल्लिका बनत फिरत्यात."

"तू पुन्हा सुरू झाली?"

" आधी पोलिसात तक्रार करा."

"पण त्याने धमकी दिली आहे जर मी पोलिसात गेले तर ते व्हिडिओ व्हायरल करेल."

"आये त्याचा धमकीची तर ऐसी की तैसी. आजकाल तसले लय फेक व्हिडिओ पण बनवतात. खरीखुरी पोरगी नसली तरी फोटने तिचा चेहरा एडिट करत्यात. उगा टेन्शन घेता. अन् काहीच नाही झालं तर आपण मराचा फैसला करू.\"

"मग? काय करू?"

" पोलिसात जा. पण त्या अगोदर तुमच्या घरी, आईवडिलांच्या घरी जा."

"पण ते मला स्वीकारणार नाही. आणि हे सगळं झाल्यावर, समजात त्यांची पण बदनामी होईल."

"बदनामीचा विचार तर पाहिले करायचा होता ताई. कोणतंही पाऊल फूंक फुंककर उचलना पडता है."

"तशी नाही ती म्हण.." प्रीतीला खूप हसू आले. ती मनमोकळी हसू लागली.

"बघा हसतांना किती छान दिसत आहेत. असे हसून जगण्यासाठीच आपला जन्म असतो. डर को मारो गोली.. ढीशक्याऊ…"

"पण आता कसे करू?"

"हॅलो, हा नंबर ज्यांचा आहे त्यांनी चंदन जंक्शन च्या जवळ असणाऱ्या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली." बोलून लक्षीने फोन कट केला.

"हे काय? हा तर माझा फोन आहे? आणि हे कुणाला फोन केला होता?" प्रीती अवाक् होत तिच्याकडे बघत होती.

"तुम्ही कुदत होत्या तेव्हा हा फोन तिथे खाली पडला. ते एका माणसाने आणून दिला होता. फोन तुमच्या घरी आईबाबा नावाने जो नंबर होता, तिथे केला. त्यांना तुमची काळजी असेल, नातं तोडले नसेल तर ते इथे येतील."

"खरंच येतील? मला स्वीकारतील?"

"माहिती नाही, पण आपण वाट पाहू."

बराच वेळ निघून गेला होता, पण तिथे अजूनही कोणीच आले नव्हते. प्रितीचे आईवडिलांनी येऊन तिला घेऊन जावे म्हणून लक्षी वारंवार हात जोडत मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती

***
प्रितीचा परिवार तिला घ्यायला येईल काय?

क्रमशः

🎭 Series Post

View all