नात्यांची वीण (शुभांगी) भाग २

"बाळा, जगण्याचा हक्क जरी माझ्यापासून नशिबाने हिरावून घेतला नसला तरी, तुझ्या बाबानंतर या समाजाने माझ्याकडून सजण्या सवरण्याचा हक्क मात्र हिरावून घेतलायं".
नात्यांची वीण (शुभांगी)
भाग २
अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा
फेरी दुसरी
-©®शुभांगी मस्के...

सुमन आणि केशव, दृष्ट लागावा, असा संसार होता दोघांचा. खूप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. मिहिर आणि मधुराच्या रूपात संसाराला पूर्णत्व ही आलं होतं...

सडपातळ, कमनीय बांधा, लांबसडक केसांची कमरेपर्यंत वेणी, फिक्या रंगाच्या शीफॉन साड्या, केसांच्या खाली वेनीवर, टपोरं लाल गुलाबाच फुल माळायची तेव्हा केशव तिने माळलेल्या गुलाबाचा सुगंध, श्वासात भरून घ्यायचा...

ऑफिसमधून येताना केशव नेहमीच कोपऱ्यावरच्या फुल विकणाऱ्या आजीकडून, सुमनसाठी गुलाब आणायचा. सुमनच्या केसांमध्ये तो लाल चूटूक्क गुलाब हळूच माळायचा. सुमनच्या चेहऱ्यावर दरवळणारा आभाळा एव्हढा आनंद तो नजरेत वेचून घ्यायचा.

प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करायचा केशव.. चौघांच्या गरज पूर्ण करता येतील, एवढं तर तो एकटा कमवून घ्यायचा. सुमन ही पदवीधर होती परंतु बाहेर नोकरी केली तर, मुलांकडे दुर्लक्ष होईल या विचाराने ती घरीच मुलांची ट्युशन घ्यायची.

नियतीच्या मनात मात्र काही तरी वेगळच होतं. एक दिवस कंपनीत, अचानक केशवच्या छातीत दुखून आलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सुमनवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुमनच्या हसत्या खेळत्या संसारावर आभाळ कोसळलं होतं.

सुमन पुरती कोलमडून गेली. आता कशातच तिला रस उरला नव्हता.. दोन लेकरांकडे पाहून मात्र जगणं क्रमप्राप्त होतं.

केशवचे सगळे, शेवटचे सोपस्कार आटोपले आणि घर रिकामं झालं. आलेले पाहुणे, आपआपल्या घरी निघून गेले.आता पुढे कसं? सांत्वणाच्या चार शब्दाशिवाय कुणीच काही बोललं नव्हत..

केशव गेल्यावर सगळी नाती, नावापुरतीच उरली होती. कोणावर अवलंबून राहायला, सुमनला ही आवडणार नव्हतं. सुमनने आता खंबीरपणे आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलं.

आजवर हौशीने सन समारंभ साजरे करणारी, संक्रांतीच हळदी कुंकू करणारी आई, आता काहीच करत नाही..

आईला मानाने हळदी कुंकुवाला बोलवणाऱ्या शेजारच्या काकूंनी, सर्वांना हळदी कुंकवाच निमंत्रण दिलं मात्र आईला बोलावलं नाही.

एवढंच काय पण.. आई शुभ कार्यात मागे मागे असते. कधी कधी तर आईला बोलवलं ही जात नाही. कधी कधी तर आई मुद्दामच शुभ कार्यात जायचं टाळते... मधुराला या सगळ्याच गोष्टी खटकायच्या.

चार वर्षाचा मिहिर आणि दहा वर्षाची मधुरा... बाबा परतून कधीच येणार नाही आणि बाबांच्या जाण्याने आपलं आयुष्य खूप बदलून गेलंय, हे समजण्या इतपत समज मधुराला आलीच होती..

रोज गार्डनमध्ये खेळायला घेवून जाणारी आई आता आपल्याला फार कुठे घेऊन जात नाही. आपल्याला छान छान आवडत ते करून खाऊ घालत नाही. छोट्या मिहिरला ही हे जाणवायचं.

छोटा मिहिर बाबांच्या आठवणीत एक दिवस खूप रडला... कधी नव्हे ते सुमनने मिहिरवर हात उचलला... मिहिरवर उठलेला तोच हात पकडुन सुमन खूप रडली होती..

"आम्हाला आमचे बाबाचं हवेत.. आमचे बाबाच छान आहेत, ते आम्हाला कधीच मारत नाही, ओरडत नाही. खूप प्रेम करतात".. बाबा तुम्ही कुठे गेलात?बघा ना, तुम्ही असता तेव्हा आई छान वागते आमच्याशी, हसते, खेळते, लाड करते, आमच्यावर प्रेम करते".

"मला माझे बाबा पाहिजे.. मला माझे बाबा पाहिजे" "बाबाकडे जायचयं मला....! बाबांकडे जायचयं मला.....! मिहिरने आकांड तांडव केला आणि सुमन खऱ्या अर्थाने हादरली.

दुःख विसरून, मुलांसाठी जगावं लागणार. सुमन काळजावर दगड ठेऊन हळूहळू जगणं शिकु लागली. केशवला विसरता येण तर शक्य नव्हतं. तरी जगावं लागत होतं.

----

कुटुंबात, अगदी जवळच्या नात्यातच एक लग्न होतं... जावं लागणारचं होतं... नेहमी कार्यक्रमात जाताना, करून द्यायची तशीच छान तयारी सुमनने मधुराला करून दिली. मधुरा, कपाटातल्या आरशात स्वत:ला निरखून निरखून पाहत होती.

बाबा गेल्यानंतर , आई कुठे कार्यक्रमाला जातच नव्हती. मधुरा आणि मिहिर दोघेही खूप खुश होते.

सुमनने, कपाटातल्या साड्यांवर एक नजर फिरवली. केशवने मोठ्या आवडीने आणलेली, ठेवणीतली छान मोठ्या बोर्डरची साडी तीने नेसण्यासाठी काढली. साडीवरून हळुवार हात फिरवला.. तिच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली.

सुमन तयार होताना, मधुरा नेहमीच आईच्या अवतीभोवती असायची. आज बऱ्याच दिवसांनी आई तयार होणार, तिला आनंद झाला होता. डब्यातून एक एक दागिना तिने आईला काढून दिला.

गळ्यात, आर्टिफिशियल मंगलसूत्र, गळ्याभोवती मधुराच्या इच्छेखातर, बारीक मोत्याचा नेकपीस घातला, मॅचींग बांगड्या मनगटात सरकवल्या. टिकली लावताना, तिचा हात थरथरला. मधुराने आईचा हात धरला, सुमनने कपाळावर टिकली चिटकवली गालावर ओघळणारे अश्रू हळूच पुसून घेतले.

घरच्या कुंडीत छान गुलाबाला फुल आलेलं, पण फुल का तोडलसं? उगाच आईचा ओरडा नको म्हणून.. मधुरा गप्प बसली होती.

आईला बघून आज, तिला खूप छान वाटलं. दोन्ही लेकरांना सोबत घेऊन सुमन लग्नात गेली..

"नवरा मेलाय कोण म्हणेल हिच्याकडे बघून". कपाळावर लाल कुंकू तर असं मिरवतेय की जणू जिवंतच आहे हीचा नवरा"..

"गर्दीतल्या बायका... कुजबुजत होत्या". मधुरा समोरच हा प्रकार घडला, आईबद्दल असं ऐकून तिला वाईट वाटलं. पण आईबद्दल बोलणारी, सगळीच तिची जवळची माणसं होती, एवढासा जीव काय बोलणार होता....

"बाळा, जगण्याचा हक्क जरी माझ्यापासून नशिबाने हिरावून घेतला नसला तरी, तुझ्या बाबानंतर या समाजाने माझ्याकडून सजण्या सवरण्याचा हक्क मात्र हिरावून घेतलायं".

घरी आल्यावर, एवढ्या सोप्प्या शब्दात समजावतं सुमनने एक एक दागिना डब्ब्यात काढून ठेवला होता" आणि दागिन्यांचा डब्बा नेहमीसाठी वर ठेऊन दिला.

त्या दिवसापासून सुमन, इतर कुणाच्या नजरेत येणार नाही अशी छोटीशी मरून कलरची टिकली आणि गळ्यात काळ्या मण्यात गुंफलेल छोटसं कंठी मण्यांच मंगळसुत्रच घालायची.

ज्याच्या नावाचं मंगळसूत्र होत, तोच राहिला नव्हता. मंगळसूत्र घालायची इच्छा नसताना, मात्र समाजातल्या अघोरी नजरांपासुन आपलं संरक्षण करण्यासाठी तिला ते घालावं लागणार होतं.

घरी ट्युशन आणि घरी राहून कॉलेजच्या मुलांचे डब्बे बनवून आता ती एकटीने घर चालवत होती. मधुरा आणि मिहिर दोघेही अभ्यासात हुशार होते. सुमनने त्यांच्यावर चांगले संस्कार केले.

दिवस थांबत नाहीत... दिवस रात्र मेहनत करून, कष्ट उपसून, दोघांना ही तीने चांगल शिकवलं. मधुरा इंजिनिअर झाली, कॉलेज कॅम्पसमध्ये सीलेक्शन झालं आणि बंगलोरच्या एका मोठ्या नामांकित कंपनीत तिला मनासारखी नोकरी ही मिळाली.

नोकरी निमित्ताने आता तिला दुसऱ्या राज्यात जावं लागलं. घरात मिहिर आणि सुमन दोघेच उरले होते फक्त.

उंच झेप घेण्यासाठी आपल्या पंखात बळ देणारी आई. आपण शिकण्यासाठी किंवा नोकरी निमित्ताने, घरट्यातून बाहेर पडल्यावर आई एकटी पडेल.. या विचाराने मिहिर मधुरा विचलित होत असले तरी, त्याच आईने कधीच आपले इच्छा आकांक्षाचे पंख छाटले नाहीत तर तिने नेहमीच मोठी स्वप्ने बघण्याची प्रेरणा दिली.

लेकरांसाठी स्वतःमध्ये ताकद एकवटलेली आपल्या लेकरांची कमजोरी कशी बरं बनणार होती..

"बाळा, तू तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे कर. खूप शिक, शिकून मोठा हो!". आईला तुझ्या मार्गातला अडथळा व्हायला कधीच आवडणार नाही...! एकमेकांची काळजी मनात ठेऊन, सगळेच एकमेकांची ताकद बनत होते. मिहिरची मेडिकल एन्ट्रस परीक्षेची तयारी जोरात सुरू होती.

मधुरा इंजिनिअर झाली होती.. मोठ्या नामांकित कंपनी मध्ये, नोकरी ही होती. मधुरासाठी आता निरोप येऊ लागले. बंगलोरच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असलेल्या प्रतीकच स्थळ समोरून चालून आलं..

उच्च शिक्षित, उच्च विचारसरणी असलेल्या घराण्यात दैवयोगाने मधुराच लग्न, प्रतीकशी पक्क झालं.

फार काही अपेक्षा नव्हत्या प्रतीकच्या कुटुंबाकडून, तरी सुमनने काहीच कमी ठेवली नव्हती.. "लेकीच लग्न!" सुमनच स्वप्न, जे आता पूर्णत्वाला येणार होत..


काय होईल पुढे..वाचत राहा.. नात्यांची वीण.. आवडल्यास एक लाइक द्यायला विसरू नका.. आणि हो प्रतिक्रिया पण द्या बरं का!!
-©®शुभांगी मस्के...


🎭 Series Post

View all