नात्यांची वीण (शुभांगी)भाग १

"आजकाल काय ती स्पेस वेस मिळावी म्हणून चाललयं का हे सगळं". "जबाबदारी नकोय का तुला तुझ्या आईची!" आत्याने ही री ओढली...

नात्यांची वीण (शुभांगी)

भाग १

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

फेरी दुसरी

-©®शुभांगी मस्के...


विचार केलायस का काही? लोक काय म्हणतील!". समाजात राहावं लागत? तुमच्या पिढीचा दोषच तो, बोलायच्या पाहिले विचार नाही आणि विचार करायच्या पहिले, भान ठेवायचं नाही...

"उचलली जीभ आणि लावली टाळ्याला"..."लोक शेण घालतील शेण, आमच्या तोंडात".

भाऊमामा, मिहिर आणि मधुरा बरोबरच, आजूबाजूला कोण आहे, वगैरेच भान विसरून सुमनवर चांगलेच भडकले.

"मिहिर, दोन चार वर्षात, शिक्षण आटोपलं की तुझं लग्न करावं लागणार".

"आजकाल काय ती स्पेस वेस मिळावी म्हणून चाललयं का हे सगळं". "जबाबदारी नकोय का तुला तुझ्या आईची!" आत्याने ही री ओढली...

"आजकाल बरयं, तुमच्या पिढीच"..

"माय बापाची जबाबदारी नकोच असते तुम्हाला"..

"तुम्ही विकून खाल्ली असेल लाज, आम्ही नाही खाल्ली... आम्हाला हे मान्य नाही".... "काय उगाच डोक्यात फालतू खुळ भरून घेतलंय तुम्ही भावंडांनी"

"माफ करा जावई बापू, पण तुम्ही तरी, विचार नको का करायला?".. " आणि काय ऐकतोय आम्ही?" "तुमच्या घरच्यांची ही साथ आहे म्हणे या निर्णयाला"... मग तर कल्याणच समजायचं...

भाऊ मामांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, किती चिडले होते भाऊमामा सर्वांवर.. मिहिर काहीच विसरला नव्हता.

--------

दारात, गाडी थांबली आणि सुमन कारमधून उतरली. गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, कानात सोन्याचे लांब झुमके आणि कपाळावर लाल चुटूक्क चंद्रकोर. भाऊमामा दिसता क्षणी, सुमनने भरल्या डोळ्यांनी, भाऊंना खाली वाकून नमस्कार केला..

"सुखी राहा... सुखी राहा, आयुष्यमान भव! सौभाग्यवती भव!" दोन्ही हात, डोक्यावर ठेवत भाऊंनी, सुमनला आशीर्वाद दिला..

"माझ्या सुमीच्या संसाराला आता कोणाची दृष्ट न लागो, पुटपुटतच, डोळ्यातून गालावर ओघळतं आलेल्या अश्रुंच्या टीपा त्यांनी खांद्यावरच्या दुपट्टयाने पुसल्या.. "सुखी राहा सुखी राहा म्हणत प्रेमाने थोपटलं".

चार मोठाल्या ट्रॉली बग्ज घेऊन, मिहिर सुमनच्या पाठोपाठ घरात आला. बहीण भावाच प्रेम जास्तीच उतू चाललयं. चालू द्या चालू द्या म्हणत.. सामान ठेवण्यासाठी आत निघून गेला.

"एकटीच आलीस",
"बाकी तुझ्या घरचे नाही आले". "येणार आहेत ना? वेणू वहिनीने, म्हणजे भाऊ मामाच्या पत्नीने, जरासा तिरकस कटाक्ष टाकत, सुमनला विचारलं.

"पोरींच्या कॉलेजच्या परीक्षा आहेत! परीक्षा संपली की लगेच येतील".. "निघणार आहेत उद्या!" सुमनने शांतपणे वेणू वाहिनीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"पोहचली मी सुखरूप, मिहिर आलेला घ्यायला स्टेशन वर, सुमनने सुखरूप पोहचल्याचा लगेच घरी कॉल केला.

"एकटीच आलीस! एवढ्या दुरून.. धाडसाची आहेस".. वेणू वाहिनीच्या कुरापती स्वभावात किंचित मात्र बदल झाला नव्हता.

"एवढ्या वर्षात एकटीच तर करतेय प्रवास"..."सवय झाली एकटीने प्रवासाची"... "तेव्हा नाही दखल घेतली कुणीच"... न बोलताच, मनातल्या शब्दांना.. सुमनने आतल्या आत विरघळवलं.

"हो वहिनी, एकटीच आली"... कधी मधुरा, कधी इकडे, कधी मिहिरकडे जाते हल्ली एकटीच!".. सुमनने तेवढ्याच परखडपणे उत्तर दिलं..

"किती रे पसारा हा मिहिर... तो ही असा हॉलमध्ये सोफ्यावर पडलेला पावडरचा डबा, तेलाची बॉटल, कंगवा बघून सुमन पुटपुटली...

"लग्न घर आहे ... पसारा होणारच"...
"नीटनेटकं होत घर, ती बाई पण चांगली आहे, सांभाळते छान सगळं"... वेणूवहिनी मध्येच बोलली.

"म्हटल तू ही नाही.. एकटा बिचारा नवरदेव काय काय करेन, म्हणून मुद्दाम आलो आम्ही लवकर, कालच आलो आम्ही".. लग्न घर म्हटल की पाहुणे आणि सोबत पसारा आलाच, जरास अस्ताव्यस्त झालयं घर"... वेणू वहिनी सारवासारव करत बोलत होती..

सुमनताईंनी, घरातल्या कोप ऱ्या कोपऱ्यावर नजर फिरवली... आणि त्यांच्या बोलण्यावर हलकेच मान हलवली.

"हो छान आहेत आशा काकू, एवढ्यातच ओळख झाली आमची".. जवळच राहतात, " इकडे घरी कुणीच नसतं, त्याच घराकडे लक्ष देतात हल्ली"

"आमच्या पैकी, कुणी येणार असेल तर घराची साफसफाई करून ठेवतात"... आशा काकूंची ओळख, सुमनने थोडक्यात करून दिली.

सुमन फ्रेश होण्यासाठी आत गेली, कपाट उघडलं, आंघोळीचे कपडे घेतले आणि अंघोळीला गेली.... अंघोळ आटोपली तयारी करून देवघरात जाऊन, देवाला नमस्कार केला.. सारं घर क्षणात नजरेत भरून घेतलं.

"आई.. आई अगं, इकडे ये बाहेर".. मिहिरने जोरात आवाज दिला.. तशा सुमनताई बाहेर आल्या.

मिहिरने, आईला हात धरून सोफ्यात बसवलं... खाली बसून, आईच्या मांडीवर हळूच डोकं टेकवलं.

"काय रे, तेल लावतोस की नाही!".. "किती रुक्ष रुक्ष झालेत बघ तुझे केस!"... मिहिरच्या गुंतलेल्या केसांमधून हळुवार हात फिरवत सुमनने दटावलही.

"डॉक्टर ना रे तू.. मग तेल, मॉलिश वगैरेच बरं रे तुला, सांगावं लागतं?" "आता ती सई आली की बघ कशी तुला सरळ करते". इति सुमन..

"आई, अगं .. असं.. नवरदेवाला रागवलं की पाप लागतं!" "ही घे तेलाची बॉटल" आणि रगड माझ्या केसांना, जवळचीच खोबऱ्याच्या तेलाची बॉटल मिहिरने आईच्या हातात दिली..

" वॉव!! काय छान वाटतंय गं"..

"सर जो तेरा चकराये.. तो दिलं डुबा जाये
आजा प्यारे दोस्त हमारे.. काहे घबराये .. काहे घबराये"

"मालिश तेल मालीश!"
गुणगुणतच, मिहिर डोळे बंद करून तसाच आईच्या मांडीवर डोकं ठेऊन बसून राहिला...

"अरे उठा... असं बसल्याने कसं चालेल", "लग्नघरात हजारो काम निघतात"... "कंबर कसून तयार व्हावं लागेल आता", "हे करायचयं ते करायचयं सुमनताईंनी तोंडपाठ.. लिस्ट वाचायला सुरू केली.

"आई, अगं.. तयारी झालीच तर आहे सगळी.. आणि हा आहे ना.. नवरदेवाचा लांडगा, काम करायला, गेट मधून आत येणाऱ्या सुमितकडे बघत मिहिर बोलला..

"मेरे यार की शादी हैं, मेरे यार की शादी है", म्हणत सुमित नाचत नाचतच घरात आला..
"कशी आहेस काकू", सुमितने विचारलं..

"मी छान, घरी सगळं ठीक ना रे". सुमन ने विचारलं

"टकाटक आहेत सगळे!", येतायत इकडेच, म्हणत... सुमित ही, सोफ्यावर पाय पसरवून बसला..

"आई अगं, झालीत सगळी कामं, शरीराने तिकडे असतेस मात्र महिना झाला मनाने इकडेच आहेस तू. दहा दिवस ही नाही झाले, तुला जाऊन... तूच तर केलीय सगळी तयारी" ,मिहिर बोलला...

मिहिरच्या मोबाईलची रिंग खनकली...
मिहिरने कॉल उचलला... येतो मी म्हणत घाईतच उठला, चप्पल पायात सरकवली.. कार काढली आणि एअर पोर्टवर गेला..

लाडकी लेक मधुरा, जावई, नातू, तिचे सासू सासरे येणार.. म्हणून सुमन इकडे त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागली.

मिहिरने, एअरपोर्टवर पोहचल्या पोहचल्या, सर्वांची गळाभेट घेतली.. "आईबाबा नमस्कार करतो" म्हणत, खाली वाकून नमस्कार केला..

"ओले, माझ्या शोण्या".. म्हणत, छोट्या भाच्याला रिदमला उचलून घेतलं. त्याच्या गोड गोड पाप्या घेतल्या सगळं सामान कारमध्ये भरलं...

"पोहचली का रे आई!"... मधुराने विचारलं..

"हो, सकाळीच".. मिहिरने उत्तर दिलं.

गप्पा करतच.. सगळे घरी पोहचले..

घरासमोर, मोठा मंडप घालणं सुरू होत. संपूर्ण घराला लायटिंग लावल्या जात होती. पलीकडे दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. स्वयंपाकाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. खूप प्रसन्न वाटत होतं...

हळूहळू जवळ जवळ सगळेच पाहुणे लग्नघरी पोहचले. मधुराच्या लग्नानंतर... सगळ्या नातेवाईकांची अशी एकत्र सुखासुखी भेट तशी पहिल्यांदाच झाली होती... मध्ये एकदा भेटले होते सगळे मात्र मनमिटाव, मतभेद, वादावादी यापलीकडे तेव्हा काहीच झालं नव्हतं.

सगळं विसरून, जणू पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी सगळे एकत्र जमलेत की काय असच वाटत होतं... सगळे पाहुणे, एकमेकांची अदबीने चौकशी करत होते..

मिहिरच्या लग्नाची हळद, मेहेंदी, संगीत, लग्न... उद्यापासून लग्नाचे विधी सुरू होणार होते.

दुसरा दिवस उजाडला, उरले सूरले सगळे पाहुणे लग्नघरी येऊन पोहचले...

बायकांच्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी, मंडपाचा एक कोपरा छान सजवला होता.. कासारीनबाई मंडपात आल्या, त्यांना मंडपाच्या त्याच सजवलेल्या कोपऱ्यात बसवण्यात आलं...

टोपलीतून कासारीन बाईने, रंगीबेरंगी बांगड्यांच्या माळा एकावर एक रचून ठेवल्या. चला या, "कुठे आहे सव्वाशिन?" " कुठे आहे वरमाय?" .. कासरीनबाईने जोरात आवाज दिला..

हातभार मेहेंदी लावलेली, लिंबू कलरची शिफॉन साडी नेसलेली.. मधुरा, आरतीच ताट घेऊन बाहेर आली.

"पहिला मान.. वरमायचा!! वरमायले बोलवा पहिले"... कासारीन बाईचं ऐकताच, भाऊ मामांनी जोरात आवाज दिला.

"सुमे बाई सुमे, वरमाय" आमची सुमन.. कुठाय.. तिला बोलवा पटकन!! म्हणा..काम काय होतच राहीन, पाहिले बांगड्या भरायला ये म्हणा....

"आनंदाच्या, सुखाच्या क्षणात" ..आजवर आई कशी मागे मागे राहायची.. आजवर तिला कसं डावललं जायचं... तिला काय वाटेनं एकडचा तिकडचा विचार न करता, तिला गृहीत धरून, तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं जायचं" ....

"आणि आज आईला,.. पाहिला मान!" मधुराचा कंठ दाटून आला! सुमन कासारिनसामोर बांगड्या भरायला बसली, मधुराने आरतीच्या ताटातलं हळदी कुंकू आईच्या कपाळाला लावलं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं" आणि आईचा सगळा जीवनपट तिच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा पुढे आला.

होईल नात्यांची ही वीण घट्ट.... जाणून घेण्यासाठी, वाचा कथेचा पुढचा भाग.. आवडल्यास एक लाइक द्यायला विसरू नका.. आणि हो प्रतिक्रिया पण द्या बरं का!!
-©®शुभांगी मस्के...


🎭 Series Post

View all