नात्यांची वीण ३ ( मेघा अमोल)

नाते रक्ताचे हरले


भाग 3

असेच दिवसामागून दिवस जात होते. लक्षी मोठी होऊ लागली होती. अंग हळूहळू उभारू लागले होते. एकदिवस रात्री ती खाली सतरंजीवर झोपली होती. की तिला तिच्या पायाला स्पर्श जाणवू लागला. तो स्पर्श हळूहळू तिच्या पायावरून वरती सरकायला लागला होता. झोपेत असल्यामुळे तिने काहीतरी किडा असावा असे समजून पाय झटकला. थोड्या वेळाने परत तेच झाले. आता तिचे कपडे वरती जात आहेत असे तिला जाणवत होते. ओटीपोटावर खूप भार जाणवला. अंग दुखून आले. तसे तिने डोळे उघडले तर तिचा बाप तिच्या अंगावर होता. त्याचे ते लाल लाल राक्षसी डोळे बघून तिला खूप भीती वाटली. तो काय करतोय तिला समजले तर नव्हते. पण तिला ते खूप विचित्र वाटत होते. त्याने आपले तोंड तिच्याजवळ नेले तसे तिला खूप घाण असा दारूचा वास आला. तिला ते असह्य झाले आणि तिने पूर्ण जोर एकवटून त्याला आपल्या अंगावरून दूर ढकलले. तो पण शुद्धीत नसल्यामुळे बाजूला जाऊन पडला. घाबरून लक्षी घराबाहेर पळाली. मध्यरात्रीचा कीट्ट अंधार पसरला होता. आजुबाजूला कोण चिटपाखरूही नव्हते. घरात तो राक्षस, बाहेर कोणी नाही, तिला खूप घाबरुन आले. रडतरडत भिंतीला टेकून बसली. तेवढयात रामभाऊ तिच्या भोवती फेऱ्या घालू लागला. तिचा चेहरा, हात जिभेने चाटू लागला. तिने त्याला मिठी मारली. आणि तशीच रात्रभर त्याला आपल्या कुशीत घेऊन बसली. कधीतरी उशिराने तिचा डोळा लागला.

घरात जाण्याची, तिच्या बापाची तिला आता खूप भीती वाटत होती. दिवस कसेतरी निघून जात होता. पण रात्र वैऱ्याची ठरत होती. शेवटी तिने रामभाऊला आपल्या घरात आणत त्याच्या शेजारी झोपत होती. तो पण अगदी त्याच्यावर भावाची जबाबदारी असल्यासारखी तिचे रक्षण करत. त्याच्या बाजूने ती कुणालाही न घाबरता शांत झोपत होती.

लक्षी मोठी होत होती. वस्तीतल्या, आजूबाजूच्या लोकांच्या वाईट नजरा तिच्या शरीरावरून फिरत होत्या. काही लोकं, मुलं अगदी तिच्या जवळ जवळ करत.


"ए लक्ष्ये, हिकडं ये."

"का ओ गंगी मावशी? काय पायजेन का?" लक्षी गंगी जवळ जात म्हणाली. गंगीने तिच्या हाताला पकडत ओढले आणि तिला झोपडीच्या बाजूच्या सामटीत नेले.

"का ओ मावशी, असे कशापायी वागता?" लक्षी.

"शsss! चूप बस आधी." गंगी आजूबाजूला कोणी बघत तर नाहीये बघून म्हणाली.

"हो. पण का झालं? अन् आधी पहिलं माझं हात सोडा." लक्षी.


"तो राजू का म्हणत व्हता?" गंगी.

"तो नवे कपडे घिऊन देतो म्हणला."

"अन् तो तूज असा तुया छातीस हात का लावत व्हता?"

"तो म्हणला तिकडे शहरातून नवे कपडे आणतो. तर माप बघतो म्हणाला. लहान व्हायला नग म्हणून इथ असे दाबून बघत होता." ती आपली छाती दाबून दाखवत तो जसेजसे करत होता ते सांगत होती.

"तू पागल झाली का लक्षी? अन् अजून एवढा वेळ का बोलत व्हती?" गंगी थोडी चिडत म्हणाली.

"बरोबर माप नाय समाजाला, तर रातच्याला घरी ये म्हणाला. लै पैसा हाय ना त्याचाकडे, जेवास पुरणपोळी पण देतो म्हणला. चांगला हाय ना? मी बी ते लोकाईंचे उष्टे खाऊन दमली. आता छान जेवण करून इल पा." लक्षी .

"तूज काय अक्कल हाय का नाय? आसं कोणास बी आपल्या शरीरास हात लावू द्यायचा आसतो का? एक कपड्यांसाठी , एक वेळच्या पुरणपोळीसाठी आपली जिंदगी बरबाद करशील का?" ती

"मावसे, असी चिडत कशापायी हायेस? तुयासाठी आणते एक पुरणपोळी."

"आव नालायक पोरी..@#@### @₹@₹#@" गंगीने तिच्या केसांना पकडून दोनचार घाणेरड्या शिव्या हासाडल्या.

"अशा गंद्या शिव्या कशापायी देते मज? अन् मी का केले? माझे केस सोड, दुखत्याय.\" लक्षीचा आवाज रडवेला झाला होता.

"पोरीस आय नाय का कोणी जवळची बाय नाय.." गंगीच्या डोक्यात विचार डोकावला तशी ती शांत झाली.

"लक्ष्ये, ह्या शिव्या तूज गंद्या वाटल्या ना? तसेच गंदे काम करास त्या राजुने तूज राताच्याला घरी बोलावले. कोण चांगला बिंगला पोरगा नाय तो. त्याच्या लफड्यात पडू नग. त्याच्या काय कोणत्याच माणसाच्या लफड्यात पडाच नाई. आपली उष्टी भाकरी बरी, पण त्याईची पुरणपोळी नग आपल्यास. समजलं का?"

लक्षी काही न समजल्यासारखे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.

"ते लोक, आपल्या बाईच्या शरीरासोबत खेळतात. गंदे गंदे स्पर्श करतात. इथं इथं.." असे म्हणत गंगी तिला पुरुष जसे स्पर्श करतात तसे स्पर्श करू लागली. तिच्या त्या स्पर्शाने तिला त्या दिवशीची भयानक रात्र आठवली जेव्हा तिचा बाप तिच्या जवळ आला होता. तिला ते सगळं आठवून किळसवाणे वाटत होते.

"मावशे.." ओरडत तिने गंगीला दूर ढकलले.

"पोरी, तूज कोणत्या भाषेत सांगू समजत नव्हते. पण समजलं न आता, का करास बोलावलं त्या राजुने?"

"ऐक पोरी आता तू मोठी व्हत हाय. आता चार पाच महिन्यात तूज पाळी सुरू व्हयील. आता आपण असं पोराई पासनं दूर राहायचं. कोणास बी आपल्या शरीराच्या कोणत्याच अंगास हात लावू द्यायचा नाय. कोण जबरदस्ती करत जवळ इत असल तर त्याच्या कानफाडात चांगल्या दोन वाजवून द्यायच्या. अन् पाय आता हे असे कापड, खाण्याचा लालुच लै लोकं दाखवतील, पण जायचं नाय. आपल्या बाई जातीस आपली इज्जत हाय तर सारं हाय. एकदाचं आपला जीव द्यायचा, पण पैकासाठी आपली इज्जत विकाची नाय." गंगी तिला समजावता येईल तसे लक्षीला समजावत होती.

"पाळी म्हणजी काय मावशे?"

"पाळी म्हणजे तेव्हा पासून आपल्या बाई जातीला पोरं पैदा करता येत्यात. लोकं त्यास बाईसाठी वरदान समजत्यात. पण आपल्या गरीब बाईसाठी श्राप हाय. पाप दुसरे करतात, भोगा आपल्यास लागते. वस्तू सारखे वापरतात अन् काम झालं का फेकून देतात, नायतर मारून देतात. एक लक्षात ठीव, लगीन झाल्या शिवाय कोणास बी आपल्या आजुबाजूस भटकू द्यायचं नाय."

लक्षीला फार काही समजलेले दिसत नव्हते. पण गंगी मावशीच्या बोलण्यातील तळमळ, तिच्या बद्दल वाटणारी काळजी मात्र तिला स्पष्ट जाणवत होती.

"समजलं का?"

"हो." तिने होकारार्थी मान हलवली.

"काय?"

"कोणास बी आपल्या जवळ येऊ द्याचं नाय, अन् आपल्या शरीरास हात लाऊ द्याचं नाय. अन् कोणी आलाच तर त्याच्या कानफाडात दोन वाजवून द्याचं."

गंगीच्या चेहऱ्यावर समाधानच हसू उमटलं होतं.

"लक्ष्ये पाय आता तू मोठी व्हतीस.आता तुज चार कापड लागतील. औषधपाणी लागल. आता आसं कुणाच्या उष्ट्यावर जिंदगी काढता इत नाय. आपल्यास आपली जिंदगी जगास काम करा लागते. करशील का?"

"हो मावशे."

"तुया बापास सांगू नग मी काम लावून दिले ते. नाय तर तो लय भांडल."

"हो, नाय सांगत."

"मी कामास जातो, तिथं बाजूच्या घरी भांडे धुवास अन् झाडूपोछा करास कामवाली पायजेल. हजार रुपे दील म्हणे कामाचं. अन् चांगलं काम करशील तर दोन घर आजुन भेटल. पाय लक्ष्ये आपल्या मेहनतीचा पैका तो आपला आस्त्यो. आपली कमाई. करशील का मग?"

"हो मावशे. उद्याच तुझ्या संग येते"

"ऐक, तुझ्या बापास तू कामास जाते ते माहित तर पडलच. तर एवढे पैसे भेटते सांगू नग, हिसकून घेईल. थोडेच भेटते सांग, बाकी लपौन ठीव. तुझ्या अडीअडचणीस लागत्यात."

"हो."

"तुवा बाप कामावर गेला की ये तिथं." गंगीने तिला पत्ता समजावून सांगितला.

*****

ठरल्याप्रमाणे लक्षी कामावर जाऊ लागली. रामभाऊ सुध्दा रस्त्याने तिची सोबत करत. कुत्र्यांना आतमध्ये येऊ देत नव्हते. ती कामाला आतमध्ये गेली की तो मात्र तिथेच घुटमळत राहत. ती आली की तिच्या मागोमाग घरी येत.

लक्शी मन लावून प्रामाणिकपणे काम करत होती. तिच्या कामावर खुश होऊन तिला आणखी दोन घरी काम मिळाले होते. ती पैसा साठवू लागली. आता ती बाहेरचं उष्टे अन्न जमा करत नव्हती. सरकारने सुरू केलेल्या झुणका भाकर केंद्रातून भाकरी विकत घेत होती. रामभाऊ अन् ती दोघेही पोटभर स्वकष्टाचे खात होते. प्रामाणिक कष्टाची गोष्टच न्यारी न्यारी असते. कष्टाचं सुख तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. खाऊनपिऊन शरीर चांगलं दणकट व्हायला लागले होते. चेहऱ्यावर समाधानच सुख दिसत होते. पण हे सुख तिच्या बापाच्याने बघितल्या गेले नाही. एव्हाना त्याला कळले होते की ती काम करायला जाते. आणि आता तो पैशासाठी तिला मारहाण करू लागला. तिच्यापासून हिसकावू लागला. आता रोजची रात्र मार खाण्यात जात होती. पण आईच्र वाक्य तिला आठवत जेव्हा तो तिच्या आईला मारत,"बापाचं छप्पर डोक्यावर लागते." आणि ती चूप बसत.

******

"पाहुण्यांची सेवा कर. काय पायजे काय नाय बग. नाराज व्हायला नग." असे म्हणून तिचा बाप खोली बाहेर पडला.

तो काळा ढीग पुरुष तिच्या जवळ येऊ लागला. त्याला बघून तिला गंगी मावशीचे बोलणे आठवत होते.

"मला सोडा. मला काही नको. मला जाऊ द्या." ती हात जोडत त्याच्यापुढे विनवणी करत होती. घाबरून मागे मागे जात होती.

"सोडासाठी तुझ्या बापास एवढे पाचशे रुपे दिले होय." तो आपल्या शरीरावरून हात फिरवत तिच्या जवळ जाऊ लागला.

तेव्हा तिला कळले की तिच्या बापाने थोड्या पैशासाठी तिला एका रात्रीसाठी विकले होते आणि स्त्रीसाठी ही पुरुषजात किती भयावह आहे ते सुद्धा समजले होते.


तो तिच्या जवळ आला होता. त्याने तिच्या खांद्यावरून तिची ओढणी ओढली. त्या झटपतीत तिचा ड्रेस खांद्यावरून फाटला. त्या पौरुषी शक्तीपुढे तिची शक्ती आता कमी पडू लागली होती. ती वाचवा म्हणून ओरडायला लागली होती. पण दाराबाहेर बसलेला तिचा बाप पैसा आणि दारूच्या लोभात बहिरा झाला होता. त्याला त्याच्या पोटच्या पोरीच्या किंकाळ्या सुद्धा ऐकू येत नव्हत्या. तो तिच्याकडे मुलगी म्हणून नव्हे तर स्त्री एक भोगवस्तू आणि कमाईचे साधन म्हणून बघत होता. तेवढयात रामभाऊ तिथे येऊन जोरजोराने भुंकू लागला. त्याला सुद्धा तिच्या बापाने दगड मारून हाकलले होते. पण पाच मिनिटाच्या आताच तिथे चार पाच कुत्र्यांची फौज तयार उभी होती.

"कुत्रे साले, जगणं हराम करून ठेवले.." म्हणत त्याने परत चारपाच दगड उचलले आणि कुत्र्यांकडे भिरकावले. तसा त्यातला एक कुत्रा आला आणि त्याचा पायाला कडकडून चावा घेतला. कुत्र्यांचे भुंकणे, त्यात त्याचा कुत्रा चावल्यामुळे ओरडण्याचा आवाज, तिथे खूप गोंधळ होऊ लागला. आजूबाजूचे जागे झाले आणि बाहेर आलेत. खोलीतून लक्षी आवाज येत आहे बघून गंगी मावशीने लगेच जाऊन खोलीचा दरवाजा उघडला, तर बघते तो आणि लक्षीला चादरित गुंडाळून बाहेर आणले. तिच्यावर अतिप्रसंग व्हायच्या आत मावशीने तिला त्या माणसाच्या तावडीतून सोडवले होते.

"मी यासाठी पैसे मोजले हाय. सोड तिला." तो माणूस कपडे घालत ओरडला.

"तू बाप हायेस का कसाई? बापाच्या नावावर कलंक हायेस. तुया सारखा बाप आसल तर बाप नसलेला बरा." गंगी चिडून बोलत होती.

गोंधळ, मारामारी बघून पोलिस येऊन आपल्यालाच पकडतील, म्हणून जमलेल्या माणसांनी समजावून प्रकरण शांत केले. सगळे आपापल्या खोलीकडे परत गेले.


"लक्ष्ये, हा असा बाप तूज सुखानं जगू देणार नाय. पळून जा पोरी इथून. दुसरीकडं आपलं घर बनव."

"पण मावशे, कुठं जाऊ? कोणी बी नाय?"

"कुठं बी जा, पण आता इथं नग. हा माणूस तुज मारासाठी पण मागपुढं बघाचा नाय. आपण गरीब लोकं, आपल्यासाठी कोणी लढत बी नाय. उलट काही झालं तर आपल्यासच तुरुंगात कोंबल. थांब आली." म्हणत ती घरात गेली आणि काहीतरी घेऊन आली.

"हे घे दोन हजार हायीत. सकाळच्या टेंपोन निघून जा." तिच्या हातात पैसे कोंबत, डोळ्याला पदर लावत गंगी निघून गेली.

******

लक्षी आणि रामभाऊ घर सोडून बाहेर पडले. रस्ता नेईल तिकडे ती जात होती. पण एव्हाना तिला समजून गेले होते की हे जग तिच्यासाठी, एकट्या स्त्रीसाठी सुरक्षित नाही. तिला थोडं थोडं तिच्या आईचे बोलणे आठवत होते. तिला आजी मामा आहे, तिथेच जवळ एका वस्तीत राहतात. तिला वस्तीचे नाव आठवले तसे ती आणि रामभाऊ बसमध्ये चढले. कंडक्टरने कुत्र्याला बसमध्ये परवानगी नाही सांगितले. शेवटी दोघंही जमेल तसे चालत, अंतर कापत मामाच्या वस्तीत पोहचले. मामी तिला घरात घ्यायला तयार नव्हती. तिने आजीला आपबिती सांगितली. शेवटी आजीची माया, तिने लक्षीच्या मामाला लक्षीला ठेऊन घ्यायला राजी केले. आता घरातील सगळी कामं, शेतीतील कामं, सगळं लक्षी करत होती. रामभाउची मात्र घराबाहेर हकालपट्टी झाली होती. पण तो तिथेच आजूबाजूला घुटमळत राहत होता.

एक दिवस मामीचे सोन्याचे कानातले चोरी गेले. मामीने लक्षीवर चोरीचा आळ आणला. आकंत तांडव केला. आता आजीला सुध्दा काही बोलता आले नाही. शेवटी परत लक्षीची घरातून हाकलपट्टी झाली. रडत रडत लक्षीने घर सोडले.

बाहेर पडली तसे मामाचा मुलगा भेटला.

"माफ कर लक्षी, मम्मीचे कानातले मी चोरले." मामाचा १९ वर्षाचा मुलगा म्हणाला. ते ऐकून ती खुश झाली.

"तू चल. मी निर्दोष आहे असे घरी सगळ्यांना सांग."

"नाय लक्षी. मला पैश्यांची गरज आहे. पैशे परत नाय केले तर हेमल भाऊ माझा जीव घेईल. त्याच्याकडे माझी लय उधारी झाली आहे. मी सट्ट्यात खूप पैसे हरलो आहे. नाय दिले तर तो माझे हातपाय कापून फेकून देईल."

"मामीला माहीत हाय?"

"हो."

ती त्याचा बोलण्यावर कशीतरी हसली. शेवटी रक्ताच्या नात्यापुढे प्रमाणिक नातं भावनाहीन झाले होते.

ती परतीच्या दिशेने जाऊ लागली.

"लक्षी तू खूप चांगली पोरगी हाय." म्हणून तो पळाला सुद्धा.

ते ऐकून नशीबही आपली थट्टा करत आहे असे तिला भासत होते.

परत तिच्या डोक्यावरील छत हरवले होते. पण तिला आता चांगलेच कळले होते की तिच्यासाठी फक्त तीच आणि तिचा रामभाऊ आहे.

"रामभाऊ, कुठं जायचं र आता? पाय लै दमायला लागले. आता चालून होईना."

क्रमशः


🎭 Series Post

View all