नात्यांची घट्ट वीण (भाग २)

लघुकथा
नातीगोती

सचिनच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होतेच. पण, सचिनने धीराने घेतले. रात्रीचे नऊ वाजले होते. त्यामुळे सचिनने कैलासराव आणि समिधाला घरी जायला सांगितले.

"समिधा बाबांना घेऊन तू घरी जा आणि हवं तर उद्या सकाळी लवकर ये. बाबा आता थकले आहेत आणि बाबाना आता भूक लागली असेल."

समिधाचा पाय निघत नव्हता.पण, मुलेही वाट बघत होती.
सचिन बोलला,"आई सुद्धा वाट बघत आहे. तिचे किती वेळा फोन येऊन गेलेत."

हो नाही करता करता समिधा आणि कैलासराव निघाले.

समिधा घरी पोहोचताच मुले तिला बिलगली.
"आई बाबा कधी येणार घरी?"

"अरे, बाळांनो बाबांना ताप आला ना. म्हणून एक दोन दिवस ठेवणार आहे डॉक्टर काका. बरं तुम्ही जेवण केले का?"

"हो आई काकीने आम्हांला दिले जेवायला."

"बरं जा मग झोपायला आता."

समिधाने स्वतः च्या डोळ्यांतले अश्रू लपवत बोलत होती.

"समिधा कसा आहे सतिश? डॉक्टर काय म्हणाले? "

समिधाच्या संयमाचा बांध फुटला होता.

आई, असे म्हणताच आशाताईंच्या गळ्यात पडून समिधा रडायला लागली.

"बाळा, रडू नकोस. होईल सगळं काही नीट. काळजी करू नकोस. आधी तू दोन घास खाऊन घे. मग बोलू आपण."

कल्याणी सगळ्यांना जेवायला वाढ. त्यावेळी आशाताईंची भुमिका फार वेगळी होती. एका आईचं मन मात्र आतून हेलावून गेले होते.पण चेहऱ्यावर तसे न दाखवता त्यांनी हिमतीने घेतले.

समिधाने कसेबसे दोन घास खाल्ले आणि मुलांना बघायला खोलीत गेली.

"अहो, काय म्हणाले डॉक्टर? सतिशला अचानक काय झाले? काही सांगितले का? त्याला सुट्टी कधी मिळणार?

आशाताईंना बोलतांना कापरे भरत होते.

" अहो , बोला ना काही तरी!"

"हे बघ अजून नक्की काहीच सांगता येत नाही. उद्या काही टेस्ट होतील. तेव्हा कळेलच."

"तुम्ही माझ्याकडे बघून का बोलत नाही. माझ्या पासून काही लपवत तर नाही ना? "

कैलासरावांचे डोळे पाणावले होते. त्यांना आशाताईंना काय आणि कसे सांगावे समजत नव्हते.

आशाताईंचा जीव खालीवर होत होता.

त्याला कॅन्सर किंवा...

कैलासराव बोलता बोलता थांबले ‌

"किंवा काय?"

एड्स.

"अहो, काय बोलता तुम्ही. जरा डोकं जागेवर आहे का तुमचे . समिधाला माहिती आहे का याबाबत काही?"

"नाही. तिला अजून काहीच सांगितले नाही. जो पर्यंत रिपोर्ट येत नाही. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही."

नेमकं त्याचवेळी समिधा मुलांना झोपवून बाहेर आली. तिच्या कानावर हे शब्द पडताच तिला चक्कर‌ आली.

सगळ्यांनी तिला सावरले. आता मात्र तिच्या हातापायातली ताकद संपली होती. काय करावे सुचेना. "आई, असं जर झालं तर! मी काय करू ? "

"समिधा सावर स्वतः ला. असं काहीही होणार नाही. अजून पूर्ण टेस्ट कुठे झाल्या. त्यामुळे आपण आत्ता कोणत्याही निर्णयावर पोहोचायचे नाही. समिधा सावर स्वतः ला."
पण समिधा जोरजोरात रडायला लागली.

तिला कसेबसे शांत केले आणि झोपायला पाठवले. पण, आज सतिश आपल्या सोबत नाही यामुळे तिचे मन चलबिचल झाले. डोळ्याला डोळा लागत नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर करत होती. मनात भलतेसलते विचार येत होते. खरंच असं झालं तर. थांबलेले अश्रू पुन्हा ओघळायला लागले.

सतिश झोपले की नाही हे बघण्यासाठी तिने सचिनला फोन लावायचा ठरवला.

©® अश्विनी मिश्रीकोटकर





🎭 Series Post

View all