नात्यांची दिवाळी

Festival of relations

शीर्षक -नात्यांची दिवाळी
विषय - दिवाळी - उत्सव नात्यांचा
स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी


दिवाळी आली व बाबांनी बर्‍याच वस्तुंची खरेदी केली . येणार्‍या सणासाठी भेटवस्तू देण्यासाठी इतका उत्साह!

प्रेरणा आत्याचा फोटो पाहून त्याला वाईट वाटायचं पण सगळं विसरून बाबा पुन्हा पूर्ववत राहतायत हे तो ऐकून होता. वडिलांचा भाऊबीजेचा उत्साह पाहून प्रद्युम्नला आनंद होत होता.
बाबांच्या मानलेल्या काही व चुलत - मावस वगैरे चार -पाच जणी बहिणी होत्या . त्या सगळ्या संध्याकाळी ओवाळणीसाठी येणार होत्या. बाबांना एक तरी सख्खी बहिण हवी होती असं प्रद्युम्मला नेहमी वाटे. ज्यांना बहिणी आहेत त्यांना खूपदा जाणीव नसते की त्यांच्याकडे काय संपत्ती आहे!
राखी पौर्णिमेला व भाऊबीजेला बहिणी कडून औक्षण करवून घेणे व तिला काहीतरी विशेष भेटवस्तू देणे यात किती आनंद दडलेला आहे हे तर ती व्यक्तीच जाणते. त्याला एक लहान बहिण प्रांजल आहे याचं त्याला खूप अप्रुप होतं.
तो सहजच आई जवळ बसला व म्हणाला की" बाबांकडूनच मी प्रेरणा घेतली व यावर्षी मी प्रांजलसाठी बघ किती सुंदर घड्याळ आणलीय. "
"अरे वा खरंच की! किती सुंदर आहे ही. तिला नक्की आवडेल."
"आई मला खूप छान वाटतंय की माझ्या पहिल्या पगारात मी तुला साडी आणली , बाबांना कुर्ता व प्रांजल साठी ब्रांडेड घड्याळ! दिवाळी तर फुल टू धमाल वाटतीय."
आई आनंदी आहे असं दाखवत होती पण तो आनंद चेहर्‍यांवर दिसत नव्हता.
तिला सहजच बोलतं करण्यासाठी तो म्हणाला , " मला एक तरी सख्खी आत्या हवी होती गं आई, आत्याची मायाच वेगळी असते. बाबांना तर किती आनंद झाला असता ना!"
"असून तरी काय फायदा , सख्खी सोडून परक्याला धार्जीन आहेत तुझे बाबा !"
"काय म्हणालीस ? सख्ख्याला सोडून परक्याला धार्जीन म्हणजे? बाबांना बहिण आहे?"
"जाऊ दे ना कशाला तो विषय? मी चुकून बोलून गेले."
"आईऽ तू काहीतरी लपवतीयस माझ्यापासून. . . प्लीज सांग ना!"
"नको रे! मी इतकी वर्षे दाबला हा विषय पण चुकून बोलून गेले.!"
"अगं, मी प्रेरणा आत्याला मिस करतो ऐकून आहे लहान पणा पासून की ती गेली पण "सख्खी असताना" असं म्हणालीस तू? ती तर नाहीये ना?"
आता मात्र आई अडचणीत आली व काय सांगावे कळेना!
वयाच्या अठराव्या वर्षी काहीतरी फिट्स आल्याने प्रेरणा आत्या अचानक पडली होती व कानाजवळ मार लागल्याने गेली होती असं प्रद्युम्न लहानपणापासून ऐकून होता.


आईला खूपच आग्रह केल्यानंतर तिने अशी गोष्ट सांगितली जी ऐकून प्रद्युम्नला काय प्रतिक्रिया द्यावी ते कळालेच नाही.


त्याचं प्रद्युम्न हे नाव ज्या आत्याने ठेवलं होतं अशी लाडकी एक प्रणिता आत्या आहे , जी वडिलांची सख्खी बहिण आहे पण वडिलांनी तिच्याशी संबंध तोडला होता. म्हणजे वडिलांना दोन बहिणी होत्या व त्यातली एक बहिण  प्रेरणा अपघाती  मरण पावली व दुसरी प्रणिता जिच्याशी वडिलांनी कायमचा संबंध तोडला होता.


प्रणिता आत्याने पळून जाऊन परजातीय मुलासोबत लग्न केलं होतं व त्याच्या बाबांनी रागाने संबंध तोडला होता.


कितीतरी वेळ तो आईला विश्वासात घेवून बोलत राहिला व सांगत राहिला.


दोन दिवस सणाचे होते.

तो शरीराने कुटुंबासोबत होता पण मनाने खूप विचारात हरवलेला होता.
बाकी सण झाले व भाऊबीजेचा दिवस उजाडला.
लगबग सुरू झाली. काही फराळाचे पदार्थ व वेगवेगळया मिठाया मागवल्या गेल्या.


संध्याकाळी भाऊबीज साजरी करायला प्रांजल उत्सुक होती . हातात औक्षणाचं ताट घेवून ती उभी होती. तिने भावाला पद्धतशीर ओवाळलं.
ओवाळणीतली घड्याळ पाहून ती खूप आनंदी झाली.
बाबांच्या दोन मावस बहिणी एक चुलत बहिण व दोन मानलेल्या बहिणी आलेल्या होत्या. हसत खेळत गप्पा चालू होत्या.


बाबा पाटावर बसले व  एक मावस बहिण उठली इतक्यात प्रद्युम्नने थांबण्याचा इशारा केला. इतक्यात  समोरच्या खोलीतून प्रणिता आत्या आली व सोबत औक्षणाचं ताट घेवून आली.


प्रद्युम्नचे बाबा स्तब्धच झाले.


"अगं आत्या बघत काय राहिलीस ? ओवाळ ना बाबांना,कर तुझी इच्छा पूर्ण!"


बाबांच्या मनातला राग २२ वर्षात निवळला होता पण केवळ ईगो पोटी ते पुढाकार घेवू शकत नव्हते. नेमकं भाऊबीजेच्या दिवशी लाडक्या सख्ख्या बहिणीला समोर पाहून ते रागच काय पण प्रेमही व्यक्त करू शकले नाहीत.


प्रणिताने साश्रू नयनांनी त्यांना औक्षण केलं. प्रद्युम्न ने बाबांच्या हातात गिफ्ट दिलं ते पण त्यांनी यांत्रिक पणे बहिणीला दिलं .
जेव्हा ती पाया पडायला वाकली तेव्हा मात्र दोघांचाही भावनिक बांध फुटला व आशीर्वाद देताना ते रडायला लागले.
मग बाकीच्यांनी पण औक्षण केलं . कार्यक्रम पार पडला. काहीही  बोलणं झालं नव्हतं .


"जावई कुठेत त्यांना का नाही आणलं?"


बाबांनी हे विचारताच प्रणिताने "दादाऽ" अशी हाक मारली व त्यांना बिलगली. लगेच प्रद्युम्न ने मामांना फोन केला व बोलावून घेतलं.


प्रणिताची दोन मुलं घेवून मामा पण आले.
जावयाचा आदर सत्कार केला. मुलांनाही मामा-मामी भेटले म्हणून खूप आनंद झाला.


सोबत जेवण खाण झालं. नात्यातली गाठ अलगद सुटली होती. मळभ दूर झालं होतं.


पुढाकार घेतल्याशिवाय नात्यातला गुंता सुटत नाही हे कळायला उशीर लागला होता.
हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी खूपच अविस्मरणीय राहिला.


रात्री बाबांनी प्रद्युम्नच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले, " कधी मोठा झालास रे कळालच नाही. तुला थँक्यू तरी कसं म्हणू?"


" बाबा, दिवाळीला नात्यांचा उत्सव म्हणतात ना ! मग असे नाते तोडून कसे चालेल?"


"पण तुला हे सगळं कुणी सांगितलं ? म्हणजे कसं सुचलं?" बाबा कौतुकाने म्हणाला.


"ते सगळं मी सांगते, उगीच त्याला जास्त सतावू नका!" आई आनंदात म्हणाली.


प्रद्युम्न साठी एक जुनं नातं पुन्हा जोडल्या गेल्यामुळे कुटुंब पूर्ण झाल्याची भावना मनात झळाळत होती.

खरंच हे सणवार आपल्या नात्यांना पुनर्जीवन देण्याचे काम करतात.


समाप्त
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक - ३०.१० .२२