नात्यांचे मरण

About Relations
नात्यांचे मरण...
वाचून विचित्र वाटते ना ... पण बर्‍याच जणांनी कधीनाकधी हे अनुभवले असेल.. एक सुंदर नाते, ते कोणतेही असू शकते मित्र मैत्रीणीचे, बहिण भावांचे, शेजार्‍यांचे अगदी कोणाचेही.. छान बहरत असते.. पण मध्येच अचानक काहीतरी होते.. आणि एके दिवशी अचानक ते नाते संपलेले दिसते.. कारण माहीत नसते , भांडण नसते, काहीच नसते.. पण ते नाते मात्र जिवंत नसते..
यावर आधारित एका स्त्री लेखिकेची गोष्ट आठवते.. बहुतेक अरूणा ढेरे असाव्यात.. नक्की नाव आठवत नाही.. दोन शेजारी राहणारी कुटुंबे असतात.. अतिशय प्रेमाने रहात असतात.. सणसमारंभापासून सगळ एकत्र साजरे करत असतात.. एका घरात मुलगी असते आणि दुसर्‍या घरात मुलगा. त्यामुळे रक्षाबंधन आणि भाऊबीज तर खूपच जोरात असायची.. असे सगळे छान छान असताना अचानकच दुसरे घर पहिल्या घराशी बोलणे, संबंध कमी करते.. त्या लोकांना धक्का बसतो.. कारण विचारल्यावर ते लोक काहीच न सांगता घर सोडून जातात.. हे तर खूपच धक्कादायक असते.. त्या धक्क्याने मुलीचे वडिल मरतात.. पण त्या लोकांना यांची दया येत नाही.. अशीच काही वर्षे निघून जातात..त्या मुलाचे लग्न होते, त्याला बाळ होते या सगळ्या बातम्या त्यांना मिळत असतात.. पण या बाजूला ती मुलगी लग्न करत नसते.. आणि अचानक तो मुलगा आजारी पडतो आणि मरणाच्या दारात पोचतो.. आणि या लोकांना भेटायला बोलावले जाते. ती मुलगी आणि तिची आई दवाखान्यात गेल्यावर त्या मुलाची आई त्यांच्या गळ्यात पडून रडते. मुलीला वाटते कि सगळा दुरावा संपला.. यावर तिची आई एक वाक्य बोलते , अग हा तर वळवाचा पाउस होता.. आता त्यांना गरज होती म्हणून बरसला नंतर ओळख दाखवली तरी खूप.. आणि गोष्ट इथे संपते..
हा असा अनुभव बर्‍याच जणांना बर्‍याच वेळा येत असावा.. कि गरज असेल तेव्हा माणसे तुम्हाला आठवणीने फोन करतात.. पण एकदा गरज संपली कि कोण तुम्ही कोण आम्ही.. या वर एक मॅसेज वाचनात आला होता.. कि नशीब समजा तुम्ही लोकांच्या उपयोगी पडता वगैरे वगैरे... खरेतर ज्यांचा मदत करण्याचा स्वभाव असतो तो कोणीही काही केले तरी बदलत नाही पण त्याचा नेहमीच गैरफायदा घ्यायचा? आणि इथे प्रश्न मदतीचा नसून मानसिकतेचा आहे.. तुम्ही जेव्हा कोणाशीही संबंध ठेवता तेव्हा ती व्यक्तीही भावनिक रित्या तुमच्यामध्ये गुंतत असते. अशा वेळेस आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्या भावनांशी खेळायचा अधिकार खरेतर कोणालाच नसावा.. आणि कोणीही कितीही म्हंटले तरिही प्रत्येक जण हे धक्के पचवण्यासाठी तेवढाच समर्थ असेल असे नाही ना.. कामाची अडचण, जागा बदलणे, लग्न होणे यामुळे कमी होत गेलेले नाते आपण समजू शकतो ..आणि हळूहळू त्याची सवय होते.. पण छान चालते बोलते नाते जेव्हा तुटते तेव्हा समोरचाही मानसिक रित्या तुटू शकतो.. आणि तुम्हाला जर नाते टिकवायचे असेल तर मनात असलेली गोष्ट बोलून टाकणे योग्य नाही का? कारण माणूस गेल्यावर रडण्यापेक्षा तो समोर असतानाच बोललेले बरे नाही का?
सारिका..