Login

नात्याला काही नाव नसावे ( भाग दोन )

अधुरी राहिलेली पूर्ण प्रेमकथा
नात्याला काही नाव नसावे..
भाग दोन...

मागील भागात आपण वाचले की, अनिरुद्ध आणि मोहिनीची भेट मुक्ताशी होणार होती काय झालं त्या भेटीत आता या दुसऱ्या भागात वाचूया...

सुसाट येणारी कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. मोहिनीने कारचा दरवाजा जोरात उघडला आणि तितक्यात जोरात पटकन लावला आणि ती मुक्ताकडे वळली. मुक्ता तिचे सौंदर्य पहातच राहिली.
हलका गुलाबी सलवार कुर्ता त्यावर मॅचिंग हलकीशी लिपस्टिक, उंच हिलची सॅंडल एका हातात मॅचिंग पर्स, हलकासा मेकअप लांब सडक केस, काळेभोर डोळे..

“खरंच अनिरुद्ध म्हणतो तसा सौंदर्य इथं थांबतं.”

मुक्ता हसून मनातच म्हणाली.

“तसा माझा अनिरुद्धही देखना आहे बरं.. उगाच नाही का या मोहिमेने त्याला पसंत केलं.”

तेवढ्यात मुक्ताला पायाला कसला तरी स्पर्श जाणवला. तेव्हा ती भानावर आली. पहाते तर काय! मोहिनी तिला वाकून नमस्कार करत होती. मुक्ताने तिला उठविले व तिचा मुका घेत छातीशी कवटाळले. हा सगळा सोहळा अनिरुद्ध हसत पाहत उभा होता. काही वेळाने अनिरुद्ध मोहिनीला म्हणाला,

“मॅडम, आपले आजोबा बरोबर आलेली दिसत नाही कुठे आहे ते?”

आजोबांचे नाव ऐकल्याबरोबर मोहिनी भानावर आल्यागत झाली आणि पटकन कारकडे सॉरी सॉरी करत वळली. लगेच तिने कारचे दार उघडले.

“सॉरी आजोबा त्याचं काय आहे ना, रोज एकटीने भेटायला यायची सवय झाली आहे ना त्यामुळे हा सर्व घोळ झाला सॉरी हं..”

“म्हटलं म्हाताऱ्याकडे लक्ष गेल्याशिवाय काही खाली उतरायचं नाही.”

हसत हसत अवधूत कारमधून खाली उतरत होता. अवधूतला पाहून अनिरुद्ध नमस्कार करायला लागलीच पुढे सरसावला. आणि इकडे मुक्ता तर दहाव्या मजल्यावरून कोणीतरी अचानक ढकलल्या गेल्यागत अर्ध मेली झाली होती.

“हा..हा..हा तर अवधूत...अवधूत पाटील.”

मनातल्या मनातही ती नीट बोलू शकत नव्हती. डोळ्यात पाण्याने जागा व्यापली होती. तिकडे अनिरुद्ध व मोहीम आजोबांची ओळख करून द्यायची म्हणून मुक्ताकडे वळले. तोच शॉक लागल्यागत अवधूत जागेवरच खीळून उभा राहिला.

“अरेच्या ही तर मुक्ता… माझी मुक्ता... मुक्ता देशपांडे... पण ही इथे? म्हणजे अनिरुद्ध हीचा नातू?”

“अरे देवा कशाला भेट घालवलीस रे इतक्या वर्षांने.”

मुक्ताच्या डोळ्यात पाणी पाहून अनिरुद्ध गांगरला.

“आजी अगं काय झालं? तब्येत बरी नाही का ग?
सांग ना गं..”

“नाही रे तुमच्या दोघांची जोडी पाहिली ना मन भरून आले एकदम आणि वेड्या हे अश्रू नये आनंदाश्रू आहे. कळलं?”

मोहिनी व अनिरुद्धने मुक्ता व अवधूत जी ओळख करून दिली. दोघांनाही सांगावसं वाटलं.

“अरे वेड्यांनो जेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो परंतु अवधूतला मुक्ताच्या पाणी भरल्या डोळ्यांनी जणू काही न सांगण्याची शप्पत दिली होती. दोघांच्याही मनात कमालीची घालमेल चालली होती.

“मुक्ता कुठे कुठे शोधलं ग तुला? पण तुझ्या आई आबांनी अशी काही गायब केली तुला की, पूर्ण वर्षभर शोध घेऊनही तुझा साधा पत्ता देखील लागू नये. मुक्ता माझी मुक्ता…”

अवधूत मनातून गलबलून गेला होता. डोळ्यात अश्रू येऊ न देण्याची खबरदारी तो घेत होता. त्याला वाटलं, आत्ता जाऊन मुक्ताला मिठी मारावी व तिला विचारावं,

“कुठे होतीस एवढी वर्ष? माझी साधी विचारपूस ही तुला करावीशी वाटली नाही? तेही एका शहरात असताना माझा साधा पत्ता देखील तू मिळवला नाही? आणि मी.. मी मात्र वेडा झालो होतो..”

पण आता नातवंडासमोर नको तो विषय म्हणून तो गप्प बसला आणि आता दोघांचेही संसार आहे तेही वेगवेगळे असा विचार मनात काढून अवधूत नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होता. इकडे मुक्ता या वातावरणात आता बऱ्यापैकी रुळली होती किंबहुना तिने स्वतःला रुळवून घेतले होते. भेटीचा कार्यक्रम आटोपल्यावर चौघांनी एकमताने एक ठराव पास केला. उद्यानात फारच गर्दी असल्याकारणाने तेथे फारशा मनमोकळ्या गप्पा करता येणार नाही तेव्हा पहिले एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करायचा. सबंध दिवस हिंडायचं फिरायचं. शॉपिंग करायची आणि रात्रीचे जेवण बाहेर केलं की, आजची भेट संपवायची. तसा प्लॅन अनिरुद्ध व मोहिनीचाच होता. मुक्ता व अवधूत त्याला फक्त दुजारा देत होते. ते दोघेही आपल्याच विश्वात रमले होते परंतु नातवंडाच्या आनंदावर विरजण नको म्हणून ते दोघेही सर्व जुन्या आठवणी, दुःख बाजूला सारून त्यांच्या आनंदात सामील झाले होते.

ठरल्याप्रमाणे ते चौघेही मोहिनीच्या कारमध्ये बसले मोहिनी ड्रायव्हिंग करत होती तर अनिरुद्ध तिच्या बाजूला बसला. अवधूत व मुक्ता मागच्या सीटवर विराजमान झाले होते. गप्पागोष्टीत गाडी अंतर कापत होती मुक्ता आणि अवधूत दोघांनी सीटचे दोन कोपरे पकडले होते. अंग चोरून दोघेही बसले होते. जणू काही एकमेकांचा साधा स्पर्शही त्यांना नको होता. जुन्या आठवणी दोघांच्याही मनात राहून राहून उफाळून वर येत होत्या. त्या आठवणींना दोघेही प्रतिकार करत होते. तेवढ्यात अवधूतने एक कागदाचा बोळा मुक्ताच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न केला. मुक्तांनीही घाबरत घाबरत का होईना परंतु तो कागद स्वतःकडे घेतला व पर्समध्ये टाकला. तिला फक्त यावेळेस तिच्या नातवाचा आनंद दिसत होता. ठरल्याप्रमाणे सबंध दिवस त्या चौघांनी एकत्र घालवला नंतर मुक्ता व अनिरुद्धने मोहिनी व अवधूतला निरोप देऊन घरचा रस्ता पकडला होता.

इकडे अनिरुद्ध चे आई-बाबा तर तिकडे मोहिनीचे मम्मी पप्पा काळजीत होते. परंतु दोघांसोबत विश्वासू व्यक्ती म्हणजेच आजी-आजोबा असल्याने कोणीही काहीही म्हणण्याची हिंमत केली नाही. घरी आल्या आल्या अनिरुद्धने जाहीर केलं की, आजी व त्याने बाहेरच जेवण केलेले आहे त्यामुळे अनिरुद्ध आपल्या खोलीत फ्रेश होण्याकरता निघून गेला. मुक्ताही थोडावेळ हॉलमध्ये घालवून आपल्या रूम कडे वळली. आता मुक्ताच्या मनातली घालमेल चांगलीच वाढली होती. रूममध्ये थोडा वेळ स्वस्थ बसून मुक्ता बाथरूम कडे वळली फ्रेश होऊन कपडे बदलवून ती अवधूतने दिलेला कागद वाचू की नाही या द्विधा मनस्थितीत होती. एकदा वाचून नंतर काय तो निर्णय घेऊ या विचाराने तिने पर्समध्ये तो कागद काढायला म्हणून हात टाकला तेवढ्यातच रूममध्ये अनिरुद्धने प्रवेश केला आणि विचारलं,

“आजी काय झालं ग तुला?”

“कुठे काय रे? काही नाही..”

अर्धवट काढलेली चिट्ठी मुक्ताने परत पर्समध्ये कोंबली.

“अग तुला घाम बघ किती आलाय.”

चेहऱ्यावरील घाम पदराने पुसत खोटं हसू आणत मुक्ता म्हणाली,

“अरे वेड्या, दिवसभर किती दगदग झाली ना म्हणून..आणि हो तुझी आजी आता म्हातारी झाली आहे म्हटलं! तेव्हा तिला पहिल्यासारखी धावपळ आता नाही रे सहन होत..”

“सॉरी गं आजी.. माझ्यामुळे किती त्रास सहन करतेस ग तू..”

“ये वेड्या हे काय खुळ भरवलंस डोक्यात भलतच? बरं हे सांग, आता झोपायचं सोडून माझ्या खोलीत कशाला आलास?”

“अगं महत्त्वाची गोष्ट आपली राहूनच गेली ना, मी तुला म्हणालो होतो ना की, फायनल डिसिजन तुझाच राहील म्हणून..”

“अरे कशाबद्दल बोलतोयस तू?”

“असं काय ग आजी.. मोहिनी बद्दल बोलतोय मी..”

“आलं रे माझ्या लक्षात.. मी तर मस्करी करतेय तुझी.. आणि हो माझा निर्णय म्हणशील तर, मोहिनी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही मनात आणला तर माझ्याशी गाठ आहे. समजलं?”

अनिरुद्ध मोठ्याने हसत म्हणाला,

“थँक्यू.. थँक्यू आजी थँक्यू.”

“अरे एवढ्या चांगल्या मुलीला नकार द्यायला मी काय तुला मूर्ख वाटली की काय? अरे मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की, तिने तुला कसं पसंत केलं?”

“ए आजी, तू काय आत्तापासूनच पार्टी बदलवतेस की काय? असं नाही हो चालणार.. आणि तुझा नातूही तुला काय कमी स्मार्ट वाटला की काय?”

दोघेही मोठ्याने हसत सुटले. अनिरुद्धने मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवल व मुक्ता सहज त्याच्या केसातून आपल्या मायेची बोट फिरवत होती. मुक्ता अगदीच बेसावध होती. तेवढ्यातच अनिरुद्ध म्हणाला,

“ए आजी, तुला तिचे आजोबा कसे वाटले ग?”

अनिरुद्धचा प्रश्न ऐकून मुक्ताला पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला. हृदय जोर जोरात धडधडायला लागले. केसातील बोटं थरथरत होती. कपाळावरील जागा घामाने व्यापली होती. या सर्व परिस्थितीही तिनं स्वतःला सावरलं व काही वेळाने बोलण्याचा प्रयत्न केला.

“म्हणजे तुला म्हणायचं काय अनिरुद्ध?”

“आजी, म्हणजे बघ आत्तापर्यंत मोहिनीच्या घरच्यापैकी आपण फक्त तिच्या आजोबांना भेटलो आहोत म्हणून म्हटलं, ती माणसं म्हणजेच फॅमिली कशी असेल ग मोहिनीची?”

“नाही, नाही.. फॅमिलीची तू काही काळजी करू नकोस, फारच छान कुटुंब आहे रे ते..”

“अगं तू तर अशी बोलतेस की मोहिनीच्या पंजोबापासूनच तू ओळखतेस त्यांना.”

मुक्ता पुन्हा घाबरली, आपल्या बोलल्यावर तिने ताबा मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न केला व म्हणाली,

“तसं नाही रे बाबा, घरंदाज लोक चटकन लक्षात येतात. हे केस काय तुझ्या आजीने उन्हात पांढरे केले असं वाटतं की काय तुला?”

अनिरुद्ध हसला तशीच मुक्ताला अवधूतच्या चिठ्ठीची आठवण झाली. ती अनिरुद्धला म्हणाली,

“बाळा आता मला फार झोप येतेय तेव्हा आपण राहिलेले उद्या बोलले तर चालेल तुला?”

“अगं चालेल म्हणून काय विचारतेस धावेल मला.. तशीही तुझी परवानगीच मला हवी होती ती तर मिळाली. आता मला छान झोप लागेल बघ.. चल शुभ रात्री..”

असं म्हणत अनिरुद्ध मुक्ताच्या रूम मधून बाहेर पडला. पुन्हा एकदा मुक्ता आपल्या विश्वात रमली. सर्वप्रथम तिने सर्वजण आपापल्या रूममध्ये गेल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर स्वतःच्या खोलीचे दार लावून घेतले. थरथर त्या हाताने तिने पुन्हा पर्समध्ये हात टाकला व अवधूतने दिलेली चिठ्ठी बाहेर काढली व वाचू लागली.

काय लिहीलं होतं त्या चिठ्ठीत? त्याचा परिणाम अनिरुद्ध आणि मोहिनीवर होणार होता? वाचा कथेच्या तिसऱ्या भागात
(कथा नावासोबत प्रकाशित करावी)

©®मीनल सचिन

🎭 Series Post

View all