नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 4

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 4

©️®️शिल्पा सुतार

सुरभीचा एक हात फ्रॅक्चर होता. दुसर्‍या हाताला सलाईन लावलेली होती. नर्सने औषध तिच्या सलाईन मधे टाकल. तिने थोडा वेळ आराम केला. तिला भूक लागली होती. ती बघत होती सचिन कुठे आहे.

"काय हव आहे? "

" भूक लागली आहे."

" हलका आहार द्या. " नर्सने सांगितल.

त्याने कॅन्टीन मधून खिचडी मागवली. तिच्या समोर टेबलावर ठेवली. खाणार कस? तो तिच्या जवळ बसला होता. ती त्याच्याकडे बघत होती. त्याने चमचाने तिला खिचडी खावू घातली. थोड खाल्यावर ती मानेने नाही म्हटली.

"आटोप पूर्ण खा. औषध घ्यायचे आहेत."

ती विचार करत होती. " हे चांगले आहेत. माझी काळजी घेतात. आम्ही कुठे जात होतो? असा कसा एक्सीडेंट झाला? मला का आठवत नाही काही?"

" काय झालं? काय विचार सुरू आहे? आटोप जेवून आराम कर. " त्याला समजल ती काहीतरी विचार करते आहे.

"मला आधीच काहीच आठवत नाही. " ती बोलली.

"आठवेल हळू हळू. जास्त विचार करायच नाही. तस ही नेहमी वर्तमानकाळात जगावं अस लोक म्हणतात. कश्याला आठवायच्या जुन्या गोष्टी. " दोघ हसत होते.

" अहो. मला नाही आवडत या हॉस्पिटल मधे. आपल्या घरी जायच." ती हळूच बोलली.

"हो ट्रीटमेंट पूर्ण झाली की जावू." सचिन आवरत होता.

"नाही आज जायच. " तिला इथे कंटाळा आला होता.

" असा हट्टीपणा करायचा नाही. चिडचिड करायची नाही. शांत रहायच. ट्रीटमेंट सुरू आहे ना." तो समजावत होता.

यांच नाव काय? ती आठवायचा प्रयत्न करत होती. तिला काही आठवल नाही." तुमच नाव काय? "

" सचिन. तुला आठवत माझ्या बद्दल. " तो हसला.

ती नाही म्हटली.

" आराम कर. उगीच विचार करत बसू नकोस. "

तिने गोळ्या घेतल्या. ती झोपली. तो समोर बसलेला होता.

थोड्या वेळाने ड्रायवरचा फोन आला. तो पोलीसांसोबत हॉस्पिटल मधे आला होता. सचिनने रूम नंबर सांगितला.

"सुरभी उठते का?"

ती दचकली." काय झालं?"

"हे बघ आता पोलिस येतील तुला भेटायला ."

का?

"तुझा एक्सीडेंट झाला होता ना. त्याची चौकशी करायला. तुला कंप्लेंट करायची आहे का? "

"नाही मला कंप्लेंट करायची नाही. अहो तुम्ही थांबाल ना माझ्या सोबत? मला फक्त तुमच्या सोबत रहायच आहे. कोणाशी बोलायच नाही. " बोलतांना ती दमली होती. तिचा कॉन्फिडन्स खूप कमी झाला होता. ती घाबरली होती.

" टेंशन घ्यायच नाही. जमल तर बोल. शांत हो. मी इथेच आहे. आणि मला अहो बोलू नकोस. सचिन बोल. "

ती थोडी हसली. " अहो इकडे या ना." ती मुद्दाम बोलली. आता सचिन ही हसत होता.

तो तिच्या जवळ गेला. तिने त्याला बसल्या जागेवरून हळूच मिठी मारली. आता तिला बर वाटत होत. थोड काही झाल तरी ती घाबरून जात होती. त्याच्याच एक आधार होता. त्याने तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला. तिचा खूप विश्वास बसला होता त्याच्यावर.

माझ्या ड्रायवरने हिचा एक्सीडेंट केला. हिची मेमरी गेली. हिच्या घरचे शोधत असतील हिला. नंतर समजल तर ही मला सोडणार नाही . तो विचार करत होता.

कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. आले वाटत पोलिस. "सुरभी बाजूला हो."

"नाही." ती अजून त्याला बिलगली.

"सुरभी हे हॉस्पिटल आहे. सरक अस करायच नाही." सचिन सांगत होता.

ती ऐकतं नव्हती. "राहु द्या ना तुमच्या जवळ."

"काय सुरू आहे हे? ते लोक आत येतील. सरक सुरभी."

आता ती थोडसं बाजूला सरकून बसली. पोलिस आले. ती गप्प होती.

"अरे रोहित तू? "

" सचिन मोहिते. राईट. बर्‍याच वर्षांनी भेटलो." दोघांनी हात मिळवले. ते लहानपणी सोबत होते. रोहित फाईल बघत होता. पेशंटच नाव सुरभी सचिन मोहिते लिहिल होत.

" सचिन तुझ लग्न झालं? "

" सांगतो नंतर. " तो हळूच बोलला.

"ठीक आहे मी चौकशी करून घेतो. "

"मॅडम तुम्ही याला ओळखता का?" ड्रायवर समोर उभा होता.

ती ड्रायवर कडे बघत होती. नाही.

"तुमचा एक्सीडेंट झाला तेव्हा हे गाडी चालवत होते. तुम्हाला यांची कंप्लेंट करायची का?"

ती नाही म्हटली.

" ठीक आहे सचिन तुम्ही आमच्या सोबत या."

हो आलोच. पोलिस बाहेर गेले.

" मी येतो पाच मिनिटात. "तो सुरभी कडे बघत बोलला.

"अहो तुम्ही कुठे जावू नका ना ." ती घाबरली होती.

" तू शांत हो. मी लगेच येतो. "

ती हो म्हटली.

तो काळजीत होता. सुरभी आता हल्ली खूप माझ्यावर अवलंबून आहे. हे अस बर नाही. तो बाहेर आला.

"सचिन काय सुरू आहे हे? "

" चल चहा घेवू. " दोघ बाजूला बसले होते. सचिन काय काय झालं ते सांगत होता. कसा गैरसमज झाला आहे. आता तो त्याला दूर करता येत नाही हे सांगत होता. "जावू दे ती आजारी आहे. तिला काही समजत नाही. तिला आधार प्रेम हव आहे."

"तु बरोबर करतो आहेस. काळजी करू नकोस. पण तु ओळखतो ना सुरभीला? मग तिच्या घरचे माहिती असतिल ना तुला?

" नाही कॉलेजमधे होती ती. तिच्या घरी कोण कोण आहे काही माहिती नाही मला. ती हरवली आहे अशी कंप्लेंट कोणी केली नाही का? "

" इथे शहरातल्या पोलिस स्टेशनमध्ये तरी अजून कोणी केली नाही.

"मग आता हिच्या घरच्यांना कस शोधणार? तिला जास्त प्रश्न विचारता येत नाही. ती माझ्यावर अवलंबून आहे. काय करू तिला अस सोडता येणार नाही. " सचिन सांगत होता.

हो ना.

"तुझ्याकडे कोणी चौकशी साठी आल की लगेच मला सांग. "

" हो. या ड्रायवरच काय करू या?" रोहित विचारत होता.

"चांगले आहेत हे ड्रायवर काका. कधी काही चूक झाली नाही त्यांच्याकडून. त्या दिवशी पाऊस खूप होता. समजल नाही. मी त्यांना गावाकडे पाठवून देतो." सचिन बोलला.

"हो चालेल. ते स्वतः दोन दिवसा पासुन काळजीत होते."

ते दोघ ड्रायवर काकां जवळ आले. ते घाबरले.

" साहेब ऐका तरी. त्या मॅडम ब्रिज क्रॉस करत होत्या. ते नियमाच्या बाहेर आहे. स्काय वॉक वापरायला हवा होता."

" हो काका तुम्ही काळजी करू नका. " सचिन बोलला.

" त्या मॅडमला कंप्लेंट करायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो आहे. तुमच्यावर कोणतीही केस नाहिये. या पुढे काळजी घ्या. थोडे दिवस गाडी वापरु नका. " रोहित बोलला.

" हो साहेब. "

" सचिन मी निघतो. "

"काही समजल तर सांग ."

हो. पोलिस गेले.

ड्रायवर काकांना तिकडे गावातल्या फॅक्टरीवर जॉब दिला. "थोडे दिवस ड्रायव्हिंग करू नका. आणि घरी कोणाला काही बोलू नका."

"हो साहेब." ते गेले.

सचिन आत आला.

"काय म्हटले पोलिस?" सुरभी अधीर झाली होती.

"काही नाही. थोडी चौकशी केली. ते गेले."

"मग तुम्हाला आत यायला इतका वेळ का लागला?" सुरभी चिडली.

"हळू. त्रास होईल. फोन वर बोलत होतो बाहेर. इथे रेंज नाही ना. " त्याने सांगितल.

" मला सांगायचा ना. मी किती काळजीत होती. "

"सुरभी अश्या छोट्या छोट्या गोष्टीच टेंशन घ्यायच नाही. मी आहे ना. बिनधास्त रहायच. घाबरायचं नाही. लोकांनी तुला घाबरल पाहिजे. " सचिन बोलला.

ती आता हसत होती." तुम्ही कुठे जावू नका. "

"बर. इथे बसू का सोफ्यावर? " तो मुद्दाम तिला विचारत होता.

हो. ती बोलली.

त्याने जेवण मागवल. ती त्याच्या हाताने जेवली. ती शांत झोपली होती.

बरीच रात्र झाली होती." साहेब तुम्ही घरी जा मॅडम उठणार नाही. औषध घेतल आहे." नर्स बोलली.

"नाही मी झोपतो इथे. उगीच ती उठली तर घाबरते."

त्याने कॅन्टीन मधे जावुन खावून घेतल. उद्या ऑफिसला जाव लागेल. बाबा येतील. सुरभी जवळ कोण राहील? काय करू.
........

संध्याकाळी सौरभ दादा ऑफिस हून येतांना त्याच्या गावाच्या पोलिस स्टेशन मधे आला." काही समजल का माझ्या बहिणी बद्दल?"

नाही .

"राहुलला चौकशी साठी बोलवा ना. तो सांगू शकतो. आता चोवीस तास झाले कंप्लेंट करून." सौरभ वैतागला होता.

"हो बाकीचे काम सुरू आहेत. उद्या तुमची केस हातात घेवू."

तो बाहेर आला. पोलिसांना जास्त बळजबरी करता येत नाही. त्याने राहुलला फोन लावला.

" तुम्ही मला सारख का फोन करत आहात. "तो बोलला.

" सुरभी बद्दल काही समजल का?"

"नाही."

" प्लीज काही माहिती असेल तर द्या. मी घेवून जाईल माझ्या बहिणीला. तुम्हाला त्रास होवु देणार नाही." सौरभ बोलला.

" मला खरच काही माहिती नाही. "राहुल आता काळजीत होता.

" ठीक आहे मग उद्या पासून पोलिस चौकशी सुरू होईल. मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे. "

" मला खरच काही माहिती नाही. सुरभी त्या दिवशी इथून गेली. त्या नंतर ती मला भेटली नाही. तिचा फोन ही बंद आहे." राहुल सांगत होता.

" माझ्या बहिणीला त्रास दिला तुम्ही लोकांनी. हे चांगल नाही केल. मी सोडणार नाही. एकेकाला जेल मधे पाठवेल. " सौरभ खूप चिडून बोलत होता. राहुलने फोन ठेवून दिला. तो घाबरला होता.

" राहुल काय झालं? " त्याची आई विचारत होती.

तो सगळं सांगत होता.

"काय कटकट आहे त्या पोरीची घरातून गेली तरी शांती नाही. "

" आई सुरभीला शोधायला हव. "

" काही गरज नाही. शांत रहा. करू दे तिच्या भावाला किती कंप्लेंट करतो ते. आपल्याला काही माहिती नाही तर काय करणार. "

सौरभ रागाने घरी आला. पूजा पोळ्या करत होती." काही समजल का हो सुरभी बद्दल? "

" नाही तीच काळजी वाटते आहे मला. कुठे गेली असेल ही पोरगी? " त्याने देवाला हात जोडले. सुरभी सापडू दे देवा. आता पूजा ही काळजीत होती.
......

सुरभी सकाळी उठली. सचिन सोफ्यावर झोपलेला होता. ती त्याच्या कडे बघत होती. किती शांत निरागस वाटता आहेत हे. ती खुश होती. हे खूप काळजी करतात माझी. मी लवकर बर होईल यांच्या साठी. ती लाजली.

तिला बाथरूमला जायच होत. जागेवरून उठायला डॉक्टर नाही म्हटले होते. काय करू. नर्सला आवाज दिला तर हे उठतील. ती तशी शांत बसुन होती.

नर्स आत आली. "झाली का झोप मॅडम? बर वाटतय का? काय हव आहे?"

तो उठला.

" मला बाथरूम मधे जायच आहे." तिने सांगितल.

"तुम्हाला डॉक्टरांनी जागेवरून उठायला नाही सांगितल आहे." नर्स बोलली.

"प्लीज मला बाथरूम मधे जायच आहे . मला बर वाटत आहे."

"ठीक आहे तुमच्या मिस्टरां सोबत जा." तिने सलाईन काढली.

सचिन ऐकत होता. अरे काय हे आता नवीन. बोलू का हिला की आपल्याला अस करता येणार नाही. नको. उगीच तिच्या मनावर परिणाम होईल. तिला अजून जास्त त्रास झाला तर मी स्वतःला माफ करणार नाही. ती माझ्या वर अवलंबून आहे. खूप विश्वास ठेवते. ज्याला जे म्हणायच ते म्हणू दे. मला माहिती आहे ही कोण आहे ते. मी हिला नीट बर करेल. तिची मेमोरी परत आली की तिला तिच्या घरी सोडून देईल.

ती हळूच उठली. "अहो."

तो आला. "झाली का झोप?"

"हो आता बर वाटत आहे."

तिने त्याच्या हात धरला. अगदी हक्काने. त्याला कसतरी वाटत होत. तो गप्प होता. तिला चालता येत नव्हत. ती पडणार तेवढ्यात त्याने तिला उचलून घेतल. ती लाजली होती.

नर्स हसून बाहेर गेली. किती छान आहे ही जोडी.

ती त्याच्या कडे बघत होती. तो खूप चांगला आहे हे तिला पटल होत. दिसायला ही किती रूबाबदार आहे. दोन दिवस झाले इथे आहे तरी छान दिसतो आहे. प्रेमळ अगदी.

ती आत बाथरूम मध्ये गेली.

"दार लावु नकोस. मी इथे बाहेर आहे." तो बोलला.

थोड्या वेळाने ते दोघ कॉटवर येवून बसले.

नर्स आली. "सलाईन काढली तर कपडे बदलून घ्या."

नर्सने कपड्याचा दुसरा सेट आणून दिला. ती बाहेर निघून गेली. तिने दार लोटल. आता रूम मधे ते दोघ होते. ती तीच आवरत होती. तिच्या दृष्टीने तो परका नव्हता. तिची काळजी घेणारा नवरा होता. ती शर्ट काढणार तेवढ्यात तो उठून उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावर गोंधळलेले भाव होते. कस सांगू हिला माझ्या समोर कपडे बदलू नकोस. काय करू? तो पटकन बाथरूम मधे निघून गेला.

तिने एका हाताने कपडे बदलले. ती नुसती बसली होती. तो बाहेर आला. "अहो माझे केस नीट करून द्या ना ."

"नाही पट्टी आहे डोक्याला. काळजी घे." त्याने केस एकत्र करून रबर लावल.

"अस नाही सारखे सुटतात ते केस. वेणी घाला ना." ती आग्रही होती.

"मला कशी येईल वेणी घालता. राहू दे असे मोकळे केस. छान दिसतात." तो सहज बोलला.

"झाल का आवरून मॅडम? चला आता खावून घ्या गोळ्या घ्या. " नर्स बोलली.

तिचा नाश्ता झाला.

" मी थोडा वेळ ऑफिसमध्ये जाऊन येतो.

ती हो म्हटली. आज बाबा येणार होते तो काळजीत होता. पूर्ण दिवस बिझी होता.


🎭 Series Post

View all