Jan 22, 2022
General

नातीगोती

Read Later
नातीगोती

#नातीगोती

माझी लेक,अश्विनी..एकदम हुशार. आत्यावर गेलीय तिच्या. आत्याही अगदी हुशार,एकपाठी. सध्या येत नाही आमच्याकडे. नुसता नाकाच्या शेंड्यावर राग. मधे माहेराला आलेली. चांगली पंधरा दिवस राहिली. अहो,रहायला काय पंधराचे महिनाभर रहा पण इकडची काडी तिकडे म्हणून करत नाही. यांच्यानंतर तब्बल आठ वर्षाने झाली म्हणून सासूबाईंना न् ह्यांना भारी पुळका तिचा. असतील हिच्या घरी चारेक नोकरचाकर दिमतीला पण मग ते राणीपद सासरीच ठेवून यायचं की नाही!

माझं लग्न झालं तेव्हा कॉलेजात होती. तेंव्हाही असंच. घरात काय शिजवायचं ते यांच्या बबडीच्या मर्जीनुसार. तिला तळणीचे मोदक आवडतात तर तळणीचेच करायचे. बबडीला साखरेचं पुरण आवडतं तर तसंच करायचं. जसं काय ह्यांची लेक म्हणजे महाराणी. मग व्हायची वादावादी. जायची मी माहेरी. तिथेही तसलंच मेलं. मी माहेरी गेले की वैनीच्या कपाळाला ह्या आठ्या पडायच्या. मग तिची कंबर धरायची. अगदी लादी,कपड्यापासनं सगळी कामं माझ्या गळ्यात पडायची. पोळ्या माझ्या किंचीत जाडच होतात. भाऊ म्हणायचा..तुझ्या वैनीच्या पोळ्या कशा पात्तळ होतात. तुझ्या का नाही होत? मी मनातच फणकारायचे..होत असतील रे तिच्या पातळ पण माझे पाय दाराला लागले की तिच्या कंबरेला कुलुप लागतं त्याचं काय?

हे तर इतके मानी,कधी म्हणून फोन करत नव्हते. वैनीचं चालू व्हायचं..भाव किती वाढलैत वस्तुंचे..महागाईने अगदी कंबरडं मोडलंय..आमचंच कसंबसं भागवतो. मग समजायचं..निघायची सूचना..लगेच चंबुगबाळं गुंडाळायचे नि मुलांना घेऊन निघू लागायचे. धाकटा राजू भोकाड पसरायचा..सुट्टी आहे तर राहुदेना अजून म्हणायचा. त्याला समजवता समजवता नाकीनऊ यायचे माझ्या. आई म्हणायची,रहातोय तर जा ठेवून पण मग त्याचा मामा लगेच..आणि नाही राहिला..रडू लागला तर..यावर त्याची बायकुटली लग्गेच..हो वन्सं..रात्रीअपरात्री कोण आणून सोडणार याला. आईवेडा आहे राजू. घेऊन जा आपलं तुमच्यासोबत. मी मनात..अगं घेऊनच जाणार..तुझ्याकडे ठेवणार थोडीच पण दोन शब्द राहू दे म्हणलीस तर तेवढंच मला माहेरवासणीला भरुन पावलं असतं बघ पण हे सगळं मनात बरं का. घरी गेलं की लागा कामाला. कुठ्ठे म्हणून आराम नाही. मेली ती मोरीतली भांडी संपता संपत नाहीत.

नणंद काही महिन्यात परत येऊ लागली. राग गेला वाटतं तिच्या नाकावरचा. बरं आलीस तर बस ना निवांत तर ते नाही..माझ्या राजूला विचारणार..काय रे राजू किती मार्क? मग राजूने सांगितलं बाहत्तर टक्के तर लगेच सुरु..शाळेत जातोसच कशाला! माझा गोट्या बघ पंच्याऐंशी टक्के मिळवलान. वर्गात पहिला नंबर सोडत नाही हो कधी. माझ्या राजूचं लक्षचं नसायचं..तो नि गोट्या टायर फिरवायला पळायचे. मलाच लागायचं तिचं कुचकं बोलणं.

कुंभाराची मडकी तरी एकसारखी असतात का हो! हे बुद्धीचे माठही तसेच..कुणी कच्चे,कुणी पक्के. यांना सांगायला गेलं तर..'जाऊदे गं सवयच आहे तिची तशी'. यांच्याकडच्या माणसांनी कोणीही यावं टिचकी मारुन जावं. यांच एकच उत्तर असूदे..सोड..जाऊदे.

आमच्या आशूला भारी पुळका आत्याबाईचा. आत्याविरुद्ध काही बोलता येत नाही तिच्यासमोर. त्यादिवशी आली..बसली..तेवढ्यात आशूने मी आणलेली नवीकोरी साडी दाखवली तिला.

हिचं सुरु..असा काय रंग घेतलास..मळखाऊ वाटतो. कितीला घेतलास गं?

सातशेला

अय्या वैनी फसवलं बघ तुला. याच डिझाइनची,पोताची साडी माझ्या शेजारणीने चारशे रुपयात आणली होती आणि आता हिची फेशनही गेली. रंग टिकेलसा वाटत नाही. कुठल्या दुकानातनं आणलीस?

ब्रीजजवळचं वल्लरी

तिथून तर कधीच घेऊ नये. लुटतात अक्षरश:. पक्का महागरा आहे तो.

मग ह्यांचं..तरी जयू तुला सांगत होतो..बबडीला विचारुन जा.

बघा..हे अस्सं..सगळा नव्या साडीचा मुड घालवलान. कोणाला वाटेल ही बया यावीशी!

सासुबाई हिची लाखात एक हो पण ही नुसती आली की सासूच्या चहाड्या सांगणार. हिची सासू काम करत नाही म्हणे. सारखं डॉक्टरकडे न्यावं लागतं..परवत रहाते..ब्ला..ब्ला. अगं पण तुझी आई पण तेच तर करते. पण मी नाही हो बोलत असं कधी. कशाही असेनात. आधार आहे आम्हाला. घरात म्हातारं माणूस असणं केंव्हाही चांगलच. करायचं तेव्हा केलं त्यांनी. आता गात्रं थकली त्यांची. मी स्वैंपाक करताना पाट घेऊन बसतात नि लहान बाळासारख्या टुकुटुकु बघतात. 

 माझी पोरं माझ्यापाशी जे बोलायला बिचकतात ते आजीजवळ निसंकोचपणे बोलतात. हा राजू दोनदोन दिवस उत्तरपत्रिका दप्तरात दडवून ठेवायचा. झेंडे लावलेले असायचेना मग दोन दिवसांनी त्याची आजी वकिली करायची..पोराला बरं नव्हतं गं जयू..पुढच्यावेळी नक्की चांगले मार्क्स आणेल तो आणि राजूचे आपले पहिले पाढे पंचावन्न पण त्याच्या वाचनाच्या छंदाला आजीनेच उत्तेजना दिली नि आता प्रोफेसर झालाय मराठीचा. अश्विनीला गाण्याची आवड लागली ती आजीमुळेच. आजीसोबत किर्तन ऐकायला जायची नं ती. आता स्वतः किर्तनाचे कार्यक्रम करते रामाच्या देवळात. माझ्या पोरांच काही वाईट झालं नाही. झालं ते चांगलंच झालं. 

बबडीवन्संचे यजमान श्रीधरभाऊ..हो मी भाऊच मानते त्यांना. त्यांना सख्खी बहीण नाही. आग्रहाने पहिल्यावेळी भाऊबीजेला बोलावलं. आता हक्काने येतात. माझा बाई भांड्यात जीव..श्रीधरभाऊंना पक्कं ठाऊक आहे. भाऊबीजेला साडीचोळीसोबत एखादंतरी नवीन ट्रेण्डचं भांड देतात. दुधाचा कुकर, राइस कुकर, कॉबॉटमची भांडी,निर्लेप..दरवर्षी एकेक गीफ्ट.मीही छोटंमोठं गीफ्ट देते पण त्याहीपेक्षा माझ्या हातचे खव्याचे कानवले भारी आवडतात त्यांना. डबाभर कानवल्यांची फर्माइश असते त्यांची. अगदी हक्काने ऑर्डर करतात.

बबडीवन्संचा गोट्या आयुर्वेदिक डॉक्टर झाला. माझ्या आशुच्या मनात त्याच्याविषयी थोडं.. नाही म्हणजे मला नाही आजीलाच सांगितलं तिने. आजीने कडेकडेने लेकीला विचारलंन,तर म्हणते कशी नको गं बाई. मला डॉक्टर सुनबाईच हवी. ही बीए शिकलेली गायिका नको. पहिल्यांदा रडली आशू माझी.. आजीच्या मांडीत डोकं खुपसून. इतकं भरुन आलं मला. नाही म्हणायचीही एक पद्धत असते हो. ही अशी तोंडफाटकी लोकं आयुष्यात असली नं की आयुष्यात कधी येऊन तोंडावर पायताण मारतील सांगता येत नाही. असले स्वतःला नबाब,बेगम म्हणवणारे चार पावलं लांबच बरे नाही का!

एक स्थळ स्वत:हून चालत आलं आमच्या आशुसाठी. मुलगा चांगला वकील आहे. त्याचे वडीलही वकील आहेत. ठाण्याला स्टेशनजवळ बंगला आहे त्यांचा. जे होतं ते चांगल्यासाठीच ना. गोट्यासाठी बबडीआत्या डॉक्टरीन शोधतेय पण ऐन तारुण्यात गोट्याला टक्कल पडल्याने डॉक्टरनी दुरुनच नमस्कार करताहेत. 

असो. बबडीवन्संसारखी अक्कडबाज विहिणबाई न मिळाल्याने मी मनातल्या मनात भारी खूष आहे. आशुही
भावी नवऱ्यासोबत अगदी छान तयार होऊन फिरायला जाते नि विशेष म्हणजे जावईबापूंनाही आमची आजी फार आवडलेय. झालं ते बरंच झालं..नात्यात लग्न करु नये म्हणतात आणि आमच्या आशुला ते आकर्षण की काय वाटलेलं तेवढ्यापुरतं पण ते दोन्ही बाजूने हवं होतं. एकतर्फी प्रेमाचं कसं होतं ठाऊक आहे ना. आशु वाचली माझी..सावरली त्यातून ते केवळ आम्ही तिला समजून घेतलं म्हणून हो. हे वयच अल्लड असतं. वासरु कसं वारं पिऊन उंदडतं तसं हे वय तारुण्याचं वारं पिऊन उंदडतं. संस्कारांचा,मायेचा हात लागतो अशावेळी पाठीवर पोरांच्या. 

गोट्यासाठी दोनतीन डॉक्टरनींची स्थळं आली चालून. त्यातल्या एकीचा खालचा ओठ जाडा..तर दुसरी छान गब्दुल म्हणून बबडीवन्संनी नाकारली. तिसरी हेमू.. दंतवैद्य. शिक्षण छान पण क्लिनिक घालण्यापासून सारं करावं लागणार म्हणून बबडीवन्सं नाराज होती पण गोट्या कसला ऐकतोय,म्हणू लागला.."आई गं,अशी चॉइस करत बसलो.. थोडेफार कपाळावर उरलेत तेही जातील." 

लेकापुढे काय चालणार नं बबडीवन्सचं. हेमू दिसायला नक्षत्रासारखी. बोलायलाही गोड आहे पोर पण बबडीवन्संची सवय काही जाणार नाही. तिच्या उणिवा आमच्याकडे येऊन सांगत बसायची नि मला मग माझ्या आशुबद्दलही सासरी असंच बोलत असतील का या विचाराने भयभीत व्हायला व्हायचं.

पण बाई आशुचे फोन येतात वरचेवर..सासू खूप बरी आहे म्हणते. थोडंसं उन्नीसबीस असतंच. तेवढं चालायचंच आणि तिथे आजीसासू आहे तिची पांढुरक्या केसांची,इवल्याशा अंबाड्याची म्हणजे मला धास्तीच नाही माझ्या लेकीची.

-----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now