नाते तुझे नी माझे

अनोखे मैत्रीचे बंध जपणारी मैत्री
अगं.. अगंगं.. थांब थांब.. उभी रहा तिकडेचं... अशी काय धावत घरात येतेयस.. यायचं नाही घरात!!

डोळ्यांनी वटारुन बघत, आजी धानीवर जोरात डाफरली. आणि सहा वर्षाची धानी, पोर्चमध्ये सांगितल्या जागी तशीच उभी राहीली.

काय करते आहेस? हात धुतले ना पाय.. आली तशीच माठाजवळ धावत... काय सांगावं बाई ह्या पोरीला, सहासात वर्षाची झाली तरी अक्कल नाही. आजी तिच्या नातीवर म्हणजे पृथावर चांगलीच चिडली.

काय गं आजी, धानीला पाणी हवयं.. शाळेतून आली ना ती आत्ता, तहान लागलीय तिला... कित्ती दूरुन पायी चालत आलीय ती, माहीती का तुला.. माझ्यासारखी व्हँन थोडीच येते तिला घ्यायला.. पायी जाते ती... पृथा तिच्या मैत्रिणीचं तोंडभरुन कौतुक करत होती.

तूच म्हणतेस ना..
आल्यागेल्याला, तहाणलेल्याला, पाणी द्यावं..
पाण्यासारखा नाही दुसरा धर्म
पाणी पाजणे हेच सत्कर्म.. म्हणतेस ना तू...
पोपटासारखी बोलतेस हल्ली.. नातीला कौतुकभ-या नजरेतून बघत, आजी हसत हसत पुटपुटली.

दे बाई दे... थांब मीच देते पाणी म्हणत.. कडकडणा-या गुडघ्यांवर हात ठेवत, आजी उठली..

मम्मा ऑफिसला जाते तशी धानीची आई कामाला जाते, पप्पा कसे टूरवर जातात, तसे तिचे बाबा ट्रक चालवतात किती किती दिवस तिचे बाबा, येत नाही घरी.

मला तुझ्यासारखी छान आजी आहे, माझी काळजी घेते, मला हवं नको ते बघते, मला रागावते तशी प्रेम ही करते.. तिच्याकडे तर आजी नाही..

शाळेतून

आजी, तू तिची पण आजी हो ना गं.. म्हणजे माझ्या धानूला पण आजी मिळेल...

मग असं, तिची आई कामावरुन, येईपर्यत तिला आपल्या घराच्या बाहेर पोर्चमध्ये नाही थांबावं लागणार..

आजी आपली प्रत्येक गोष्ट, बरोबर कान देवून, लक्षपूर्वक ऐकते, पृथाला माहीती असल्याने, पृथाची बडबड चालू होती..

घे हा चिवडा, आणि पाणी.. आजीने पृथाच्या हाती पाण्याचा पेला आणि चिवड्याची प्लेट दिली.

आजीने असाचं कुठला तरी वापरीत नसलेल्या पेल्यात, पाणी भरुन, पृथाच्या हाती दिलं होतं..

ऐक ना.. मी तुझी आजी आहे, तुझी एकटीची.. त्या खालच्या जातीच्या पोरीची धानीची आजी ... नको बाई मला बनवूस.. आजीने, पृथाला कडक शब्दात बजावलं..

आणि हो, ती पोळी तेवढी ठेवलीय ओट्यावर ती तुझ्या कावळेदादाला, नेवून टाक. केव्हाचा, काव काव करतोय तो..

चिवडा आणि पाण्याचा पेला तिने पोर्चमध्ये बसलेल्या धानीला दिला. धावत जावून तिने कावळ्यासाठी पोळी आणली आणि बाहेर एका कोप-यात ठेवली...

धानीचं खावून झालं, दोघी खेळण्यात मग्न झाल्या..

झाल असेल बाळा खेळून.. ये बरं घरात... दिवाबत्तीची वेळ झाली, हातपाय धु... आजीने, पृथाला घरात बोलवून घेतलं..

रोज आजीसोबत नित्यनियमाने शुभंकरोती म्हणायचं... पृथाचं आणि आजीचं ठरलं होतं..

आजीने आवाज दिला तसं खेळण संपवून, पृथा धावतचं घरात गेली.

धानी पोर्चमध्ये तिथेच एका कोप-यात शाळेचा घरचा अभ्यास करत लागली. आई येईपर्यत तिथेच बसून तिला आईची वाट बघायची होती..

पृथा घरात आली, फ्रेश झाली. आजीने देवापुढे दिवा लावला, डोळे मिटून ती ही आजीसोबत देवापुढे उभं राहून शुभंकरोती म्हणू लागली..

आजीने तुळशीजवळ दिवा लावला. आजीसोबत वृंदावणाभोवती फे-या मारताना, तीचं लक्ष धानीकडे गेलं. धानी मांडीवर वही ठेवून, डोक खुपसून पेन्सिलने काहीतरी लिहित बसली होती.

आज्जी तू किती छान आहेस गं.. तू माझ्या धानुला, पोर्चमध्ये बसायला दिलस.. आजकाल पोलवरचा लाईट खराब झालाय म्हणून तिच्या घरासमोर अंगणात... काळाकुट्ट अंधारच असतो. आजी हलकेच हसली.

दोघी आजी नाती पोर्चमध्ये झोपाळ्यावर हलके हलके झोके घेवू लागल्या.. अधुनमधुन धानी अभ्यासातून डोक वर काढून त्यांच्याकडे बघत होती.

आजी, धानीसोबत मी ही माझा अभ्यास करु? पृथाने आजीला विचारलं.. काही नको.. तुझा अभ्यास वेगळा तिचा अभ्यास वेगळा...

तुझा अभ्यास कठिण आहे, आई आली की कर!! पृथाला समजावत, आजीने पृथाला स्वत:जवळ बसवलं.

आजी तू गाईला रोज पोळी देतेस.. म्हणतेस पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी करायची असते... मांजरीला दुध देतेस.. सकाळच्या चिवचिवाटाने तुला जाग येते, उठल्याबरोबर लगबगीने अंगणात येवून, तु चिमण्यांना दाणे टाकतेस. कबुतरांना भात खावू घालतेस. झाडावरचे वेगवेगळे पक्षी खाली दाने टिपायला येतात, किती आनंद होतो तुला..

बैल आणि नागदेवता शेतक-यांचे मित्र आहे असं सांगतेस..

अंगणातल्या झाडांची खूप काळची घेतेस.. झाडांना, फुलांना ओरबाडलेलं तुला आवडतं नाही... नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं की, नैवेद्य पवित्र होतो असं सांगतेस...

तु सगळ्या सगळ्यांवर प्रेम करतेस.. माझ्यावर करते तसं धानीवर का गं नाही प्रेम करत तू....

रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून, धानीला तिची आई रोज तुळशीचा पाला खायला देते, सर्दी खोकला होवू नये म्हणुन, रात्री तुळशीपत्राचा काढा प्यायला देते... धानीची आई एक दिवस आईला सांगत होती, हो ना गं धानी.. पृथाच्य बोलण्यावर , धानीने होकारार्थी मान डोलावली..

आज्जी मग एक सांग.. माझी धानी नाही का गं झाली पवित्र..

कृष्ण सखा सूदामा.. सुदामा तर खूप गरिब होता. कृष्ण सुदाम्याच्या मैत्रीचं नातं छान घट्ट होतं.. धानी आणि माझ्या मैत्रीचं नातं...कधीच घट्ट नाही का गं होणार, तुझ्या कृष्णासारखं..

हूं.. हूं .. करत.. नातीच्या गोड गोडूल्या गप्पांमध्ये रमलेली आज्जी निरुत्तरीत झाली होती...

धानीला बोलवून धानीचा हात पृथाच्या हाती देत आजी बोलली.. आहे की तुमची मैत्री घट्ट, कृष्ण सुदाम्यासारखी...

जे संस्कारांचे मोती, आजीने पेरले होते... ते तेवढ्याच ताकदीने उगवले होते.... आजी आज मनोमन सुखावली होती.
-©शुभांगी मस्के...