Mar 03, 2024
सामाजिक

नाते.. ऋणानुबंधाचे! भाग - पाच (अंतिम भाग.)

Read Later
नाते.. ऋणानुबंधाचे! भाग - पाच (अंतिम भाग.)

नाते.. ऋणानुबंधाचे!

भाग - पाच. (अंतिम भाग )


"काय गं? तू तर मला प्रसाद आणून देणार होतीस ना? मग इतके दिवस कुठे गायब झाली होती?"

शामराव काही बोलायच्या आधीच राधिकाने तिला प्रश्न केला. स्वरात ती आल्याचा आनंद आणि इतके दिवस न आल्याचा रागही होता.


"हा प्रसाद." त्या स्त्रीने हातातील प्रसाद राधिकाच्या हातात दिला.


"तुम्ही?"


"मी आरती आणि ही माझी मुलगी प्राची." प्राचीच्या आईने ओळख करून दिली.


"अरे वा! छान नाव आहे की गं तुझं." प्राचीकडे बघून राधिका म्हणाली. "आणि तुम्ही बऱ्या आहात ना?"


"हो. मला बरे व्हावे म्हणून हिने तुमच्या बागेतील गुलाब देवाला वाहिले. मग बरी होईनच ना." ती शुष्क हसत उत्तरली.


"आत या ना. बसून बोलूया." तिच्यातील स्नेहभाव जागा झाला.


"नको हो. कामं पडलीत. तुमचे आभार मानायला म्हणून आले होते. पोरीनं निर्मळ मनाने तुमच्या बागेतील गुलाब गणपतीला वाहिले आणि देवच पावला बघा." डोळ्यातील पाणी पुसत ती म्हणाली."म्हणजे?" राधिकाला काही कळले नाही.


"दहा वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं. दोन वर्षात ही गोड पोरगी झाली. घरच्यांनी संबंध तोडला असला तरी आमचा संसार बरा चालला होता. मागच्या वर्षी मात्र संसाराला नजर लागली. कोरोनामुळे नवरा गेला आणि संसार उघड्यावर पडला. दुःख बाजूला सरून पोरीच्या मदतीने पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करतेय तर हे आजारपण डोकं वर काढत आहे. "


आरती सांगत होती. तिची कहाणी ऐकून राधिकाला स्वतःचे दुःख कमी असल्यासारखे वाटले. वाटलं मुलगा दुरावला म्हणून काय झाले किमान नवऱ्याची तरी सोबत आहे."तुम्हाला सांगू? इतक्या वर्षांनी पहिल्यांदा माझा भाऊ मला भेटायला आला. भेटायलाच नाही तर मला त्याच्यासोबत माहेरी घेऊन गेला. आता तिथेच त्याच्याजवळ थांब म्हणून आग्रह करत होता. तब्ब्ल दहा वर्षांनी पुन्हा आईबाबा भाऊ, वहिनीची भेट झाली ती देवाच्या कृपेमुळेच ना."


"हो गं." राधिका.


"भावाने तिथेच रहा म्हणून आग्रह केला पण मीच परत आले. त्याला सांगून आले की फक्त तुमची साथ सोबत असू दे म्हणजे परिस्थितीशी लढण्याचे बळही येईल." तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता.


"हे तुमच्यासाठी." क्षणभर थांबून तिने हातातील पिशवी समोर केली.


"काय आहे गं?" राधिकाच्या डोळ्यात कुतूहल होते.


"भावाकडून खरवस घेऊन आले, म्हटलं तुम्हाला आवडेल की नाही पण द्यावे."


"अगं न आवडायला काय झाले?" तिने हसून तिच्या हातची पिशवी घेतली.


"आणि हे माझ्याकडून." इतकावेळ गप्प बसलेली प्राची हातातील एक छोटी कुंडी पुढे करत म्हणाली. "तुमच्या बागेतील गुलाबाची फुले मी तोडली ना म्हणून मामाच्या घरून हे नवे रोपटे घेऊन आले. त्याला खूप फुले येतील."


राधिकाला आता खरंच भरून आले. प्राचीच्या डोळ्यातील निरागस भाव तिच्या हृदयात वसले होते. आजवर तिच्या लेकाने सुद्धा अशी मनापासून कोणती भेट दिली नव्हती पण या मायलेकींनी त्यांना जमेल तसे काहीतरी आणले होते.


"प्राची एक मिनिट हं." असे म्हणून राधिकाने कपाट उघडले आणि नुकताच पूर्ण विणून झालेला स्वेटर तिच्या हातात ठेवला. "ही माझ्याकडून तुला भेट. या थंडीत रोज घालत जा." तिच्या डोक्यावर हात ठेवून त्या म्हणाल्या.


"तुम्ही मला भेट दिलीत मग मला पुन्हा तुम्हाला काही द्यावे लागेल ना?" तिला प्रश्न पडला.


"हो तर." राधिका हसून म्हणाली.


"काय?"


"तुझा वेळ. तू मला रोज एकदातरी भेटायला येत जा. तेच मी माझे खरे गिफ्ट समजेन." तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत राधिका म्हणाली.


तिच्या बोलण्यावर प्राचीनेही हसून होकार दिला.


मायलेकीची जोडी घरी जाण्यासाठी निघाली तशी डोळाभर पाणी घेऊन राधिका पाठमोऱ्या दोघींना न्याहाळत राहिली.


"राधे, काय गं काय बघतेस अशी?" शामराव तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.


"आपल्या सुहासच्या लेकीकडून नातीचे सुख कधी अनुभवायला मिळाले नाही, पण प्राचीमध्ये मात्र मला माझी नात भेटली असे वाटते हो. खरंच काही नाते असेल का आमचे?" तिने भावनाविवश होऊन विचारले.


"हो आहे की." त्यांच्या बोलण्यावर तिने चमकून पाहिले.


"ऋणानुबंधाचे नाते आहे. राधिका तुझ्यासोबत मलाही डोळे वाचता येतात बरं. आणि तिच्या आणि तुझ्या डोळ्यात याच नात्याची दृढ वीण दिसली मला."


त्यांच्या बोलण्याने राधिकाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू उभे राहिले, यावेळी मात्र ते आनंदाश्रू होते.


***समाप्त***

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//