नाते.. ऋणानुबंधाचे! भाग -चार

नव्या नात्याची गोड कथा

नाते.. ऋणानुबंधाचे!

भाग- चार.


"आई आजारी आहे ना म्हणून. मला वाटलं जरा वेगळं फूल वाहिलं की बाप्पा खूश होईल आणि आईला लवकर बरे करेल. आजचा शेवटचा दिवस होता. आजी घेऊ ना मी हे फूल?" तिच्या निरागस व्यक्तव्याने राधिकाचे डोळे भरून आले.


"हो बाळ खुशाल घेऊन जा." राधिका काही बोलत नाही हे बघून शामराव म्हणाले.


"पण आजी?" तिला राधिकाची संमती जास्त गरजेची वाटत होती.


"हं, ने ते फूल आणि पुन्हा हवे असेल तर घेऊन जा." भरल्या स्वराने राधिका म्हणाली.


"नको, आजच हवे होते. आई बरी झाली की मी प्रसाद घेऊन येईल." तिने अलगद फूल खुडले आणि 'धन्यवाद' म्हणून लगेच निघूनही गेली.

******

इकडे राधिकाच्या मनात मात्र चुटपुट लागली होती. मनात फूल गेल्याचे दुःख नव्हते उलट त्या छोटया मुलीबद्दल सहानुभूती आणि कुतूहल निर्माण झाले होते.


"झाली असेल का हो त्या छोटीची आई बरी? प्रसाद घेऊन येते म्हणाली पण आलीच नाही." दोन दिवस कसेबसे घालवल्यावर शेवटी राधिकाने शामरावांना विचारलेच.


"कोण छोटी? अच्छा ती गुलाबचोर होय? ती कसली येते आता? तू शिक्षा करू नयेस म्हणून काहीतरी थाप मारली असेल बघ." ते मुद्दाम तिला चिडवत म्हणाले.


"चोर नका हो बोलू तिला. ती खरं तेच बोलत होती. तिचे डोळे किती निरागस होते. डोळ्यांची भाषा कळते मला. सुहास नाही का? इथून जाताना लवकर परत येतो म्हणाला होता? पण त्याच्या डोळ्यात मला तेव्हाच दिसलं होतं की पोराला आता आईबाबांची गरज उरली नाहीये. त्याला तिथे परदेशातच राहायचं आहे. झालं ना तेच खरं?" तिची गाडी पुन्हा सुहासवर येऊन थांबली.


"हं, लेक येणार नाही म्हणतेस आणि दर हिवळ्यात त्याच्या लेकीसाठी स्वेटर विणत बसतेस. आठ वर्षात आठ स्वेटर विणलेस. तेव्हा नाही का कळत तुला?" तिच्या हातातील लोकर आणि सुया बघून त्यांना पुन्हा छेडायचा विषय भेटला. मात्र ती परत रडेल म्हणून त्यानी तो विषय तिथेच गुंडाळला.


पुढचे तीन दिवस असेच गेले. ती येईल म्हणून रोज सकाळी उठून राधिका फाटक उघडे ठेवू लागली पण ती परत यायचे चिन्ह काही दिसत नव्हते. शामराव म्हणाले तसे ती चिमणी खोटे बोलली असेल असेही तिला वाटून गेले. तिचे ते निरागस डोळे आठवले की मात्र ती खरे बोलत असावी असेच वाटत होते. खऱ्या खोट्याच्या द्वन्द्वात अडकलेली राधिका पुन्हा चिडचिड करायला लागली.


"खरंच कोणावर जीव जडायलाच नको. पोटचा पोर असो की मग दारातली ती. तो सुहास, तो गुलाब अन ती.. तिचे तर नावंही ठाऊक नाही. विश्वास ठेवला तर विश्वासघातकी निघाली." मोठ्याने बडबडत राधिकाने स्वेटर पूर्ण करायला घेतला.


तिची तगमग बघून शामराव जवळ आले. "राधे, इतक्या वर्षात कुणाची अपेक्षा करायची नाही हे शिकली नाहीस का गं? पाच मिनिटासाठी भेटलेली ती पोर. कोण? कुठची? काहीच ठाऊक नसताना कशाला त्रास करून घेतेस?" तिच्या खांद्यावर हात ठेवताना त्यांचा आवाज देखील जड झाला.


ती काही बोलत नाही हे बघून तिच्या हातातील स्वेटर त्यांनी कपाटात ठेवायला घेतला.


"सुरेख विणलास हं स्वेटर. पूर्णही झाला. आता पड जरा. मीही वामकुक्षी घेतो." असं म्हणत ते दार लोटायला गेले तर फाटक उघडून एक स्त्री आत येताना दिसली. 


अंगावर साधीशी साडी, बुजऱ्या डोळ्यात आत यावे की नाही हे भाव.


"कोण हवंय?" तिची चलबिचल बघून त्यांनी विचारले.


"आज्जी घरी नाहीत का?" त्या स्त्रीच्या मागून गोड आवाज आला आणि ती छोटी समोर आली.


\"आज्जी\" शब्द ऐकला मात्र आणि राधिका झटकन उठून बाहेर आली. समोर ती छोटी त्या स्त्रीचा हात पकडून उभी होती.


"काय गं? तू तर मला प्रसाद आणून देणार होतीस ना? मग इतके दिवस कुठे गायब झाली होती?"

 शामराव काही बोलायच्या आधीच राधिकाने तिला प्रश्न केला. स्वरात ती आल्याचा आनंद आणि इतके दिवस न आल्याचा रागही होता.


कोण होती ती छोटी? आणि कुणाबरोबर आलीय? वाचा पुढच्या अंतिम भागात.


🎭 Series Post

View all