नाते.. ऋणानुबंधाचे! भाग -एक.

नव्या नात्याची गोड कथा
नाते.. ऋणानुबंधाचे!
भाग -एक.

"काय गं राधिके, आज चहात सगळी साखर रिचवलीस की काय? चहाची एकदम काकवी झालीये." हातातील कप बाजूला सारत शामराव बायकोला हाका देत म्हणाले तसे राधिका, त्यांची सौभाग्यवती तणतणतच स्वयंपाकघरातून बाहेर आली.

"नाही प्यायचाय ना तुम्हाला चहा तर नका पिऊ. उगाच नावं ठेवायचे नाही सांगून ठेवते." त्यांनी बाजूला ठेवलेला कप तिने हातात घेतला आणि पुढच्याच क्षणाला ओठाला लावला.

शामराव म्हणत होते तसाच चहा काकवीसारखा खूप गोड झाला होता, पण आता राधिकापुढे देखील दुसरा पर्याय नव्हता. ओठाला लावलेला कप रिकामा करूनच तिने खाली ठेवला आणि मग तोंड कसनुस करून पुसले.

तिची कृती बघून शामरावांना हसू येत होते पण ते ओठावर येऊ न देता गंभीर चेहऱ्याने तिच्याजवळ जाऊन ते उभे राहिले.

"राधिके, आधीच तुझ्या शुगरच्या गोळ्या सुरू आहेत. त्यात एवढा गोड चहा प्यायलीस. अशाने तुझ्या रक्तातील साखर आणखी वाढली असेल ना?" त्यांचा मिश्किल अंदाज तिला मात्र रुचला नाही. ती फणकाऱ्याने उठून उभी राहिली.

"आई गं.." उठताना गुडघे कुरकुरले आणि पायात एक कळ आली.

"अगं हळू.. आता का तू नवतरुणी राहिली आहेस होय? जी मला एवढा तोरा दाखवतेस. आपण म्हातारी माणसं. जपून रहायला हवं." तिला हात देत ते म्हणाले.

"हो, उठसुठ मी म्हातारी झाले हे ऐकवण्याची गरज नाही मला." त्यांचा हात झिडकारत राधिका स्वयंपाकघरात गेली.

"आता साठी पार केली तरीही ही तरुण कशी असेल बरं?" ती गेल्याच्या दिशेने पहात डोके खाजवत ते म्हणाले.


तर हे आहेत शामराव, पासष्टीच्या पुढचे आणि त्यांची सौभाग्यवती म्हणजे राधिका. तिचीही इतक्यात साठी पार झालीये. दोघांचं तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था आहे. रिटायर्डमेंटच्या पैशातून एक छोटेसे घरकुल उभारून दोघांची नवी इनिंग सुरू बऱ्यापैकी सुरू आहे. ही लूटपुटीची भांडणं नेहमीचीच. आजची चिडचिड देखील अशीच सुरू होती.


राधिकाचे काहीतरी बिनसलंय याचा तसा अंदाज त्यांना आला होता पण नेमकं काय हे कळत नव्हते. अर्थात तिच्याकडून कसे काढून घ्यायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. पण एकंदरीत तिच्या चिडचिडीमुळे प्रकरण जरा जास्तच गंभीर आहे याची त्यांना कल्पना आली होती.


"राधे.." स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी हळूच तिला साद घातली. कधीतरीच प्रेम खूप जास्त उतू गेल्यावर ते तिला 'राधे' म्हणून हाक मारायचे. लग्नाच्या इतक्या वर्षांनीदेखील त्या आवाजातील जादू कायम होती. तो आवाज ऐकला अन राधिकाचे हृदय एकदमच द्रवले. पण तरीही तिने त्यांच्याकडे पाहिले नाही.

"अगं एकटीच किती कामं करशील? आणि चिडतेस तरी किती? चल बाजूला हो. आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ जरा. तुझी स्वयंपाकघरातून आजच्यापुरती सुट्टी." ओट्याजवळ तिच्या शेजारी उभे राहत शामराव.

"तुम्हीच बाजूला व्हा. मी तुमच्या आवडीचा पुलाव करते." तिचा आवाज मघापेक्षा बराच नरम झाला होता.

"बरं. चल मग मी तुला मटार सोलायला मदत करतो. हेही नसे थोडके." एका हातात मटारची पिशवी आणि दुसऱ्या हाताने राधिकाचा हात पकडून ते तिला हॉल मध्ये घेऊन आले.


"सांग आता, काय झालेय माझ्या बायकोला? का अशी चिडली आहेस?" मटार सोलत त्यांनी विषयात हात घातला.

"चिडली कुठे हो? दुखावली गेली आहे." ती बोलली खरी, सोबत डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले.

"अगं अगं रडू नकोस ना. काय झालं ते तरी सांग." तिचे भरले डोळे बघून त्यांच्या काळजात दुखायला लागले.

"तेच तर सांगतेय ना. आपण एवढं कष्ट करायचे, त्यांना वाढवायचं, निगा राखायची, सुदृढ बनवायचं आणि लबाड लोकं स्वतःचा हक्क गाजवतात. माझ्या मेहनतीचे, कष्टाचे काहीच मोल नाही का?" तिने प्रश्नार्थक पणे त्यांच्याकडे पाहिले.

"असं कोण म्हणतं? तुझ्या कष्टाचे मोल आहेतच की." ती नेमके कशावरून बोलते आहे हेच त्यांना कळत नव्हते, पण सांगणार कसे ना?

"नाहीच आहे मोल. नाहीतर सुहास मला सोडून असा परदेशात स्थायिक झाला असता का?" ती.

राधिका कशाने एवढी दुखावली गेलीये? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
******

🎭 Series Post

View all