मोहनराव आणि मालतीताई यांची दोन मुले.... राघव आणि रश्मी ...
राघव आईसारखा होता दिसायला.. काळासावळा पण तरतरीत
रश्मी ने वडिलांचा चेहरामोहरा घेतला होता.. अगदी सुंदर होती दिसायला . त्यामुळे घरात सगळ्यांची लाडकी होती रश्मी... आईवडिलांना आपल्या नक्षत्रासारख्या मुलीचे खूप कौतुक होते.. तसे तर दोन्ही मुलांचे भारी कौतुक होते पण कांकणभर जास्त लाड रश्मीचे असायचे घरात..
मोहन व मालती यांनी मुलांवर उत्तम संस्कार करून मोठे केले होते.. राघव सिव्हिल इंजिनिअर तर रश्मीने सायन्स मध्ये पदवी घेतली होती.
अशातच राघवसाठी एक स्थळ चालून आले. मुलगी त्यांच्याच शहरातील होती. राधिका नाव तीचे. ..
मुलगी पाहण्यासाठी सगळे राधिकाच्या घरी पोचले.
मुलगी सुसंस्कारित होती. आर्टस् मध्ये पदवीधर होती. दिसायला साधारण होती पण तीचे वागणे, बोलणे, गोड मृदू स्वभाव, राघवला आवडून गेला.
घरी आल्यानंतर मोहन आणि मालतीने राघवला पसंती विचारल्यावर त्याने होकार सांगून टाकला.
रश्मी मात्र आश्चर्याने म्हणाली... अरे दादा तुला काय आवडलं तिच्यात? केवढी साधी दिसत होती ती आणि कपड्याची चॉईस तर नीट करायची ना तिने दाखवण्याच्या कार्यक्रमाला ... केवढे फिक्कट रंगांचे कपडे घातले होते तिने आज.. मला तर फार काही विशेष नाही वाटली... तुला कितीतरी छान मुली मिळतील.. बघ बाबा... !!
रश्मी राघव पेक्षा दोनच वर्षांनी लहान होती त्यामुळे दोघांमध्ये भरपूर चर्चा, वादविवाद व्हायचेच.. पण राघवला आजचा तिचा मुद्दा बिलकुलच पटला नाही... त्याने आईबाबांना सांगितलं.. की मला हीच मुलगी पसंत आहे..
मोहनराव आणि मालतीबाई खूष झाल्या.आणि त्यांनी राधिकाच्या घरी पसंती कळवली. रश्मी मात्र थोडी नाराज होती या निर्णयावर...
दोन महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त ठरला होता.
लग्नानंतर राधिका राघवची गृहलक्ष्मी बनून घरात आली.. ती होतीच समजूतदार आणि कामसू त्यामुळे अल्पावधीतच पतीराज, सासूबाई आणि सासऱ्याचे मन तिने जिंकून घेतले.. पण रश्मीच्या मनात मात्र अजूनही अढी होतीच.तिला राहून राहून वाटायचं दादाला शोभेल अशी काही बायको मिळाली नाही त्याला...
लग्नानंतर राघव रश्मीसाठी थोडे लवकर घरी यायचा.. तिला सतत खूष ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण रश्मीला हे मनातुन रुचायचंच नाही.. राघव घरी आला रे आला की तेव्हा मुद्दाम रश्मी राधिकाला कुठल्या ना कुठल्या कामात अडकवून ठेवायची... किंवा राघवशी कुठलातरी विषय काढून चर्चा करत बसायची..
एकदा राघव दोघांसाठी सिनेमाची ऑनलाईन तिकीटे बुक करत होता तेवढ्यात रश्मी येऊन म्हणाली.. काय दादा दोघेच जाणार वाटतं सिनेमाला... तू तर आम्हाला विसरूनच गेलास. घरात आम्ही पण राहतो.. विचारायचं तरी होतंस... आम्ही काही आलो नसतो लगेचच तुमच्याबरोबर...
असे म्हणून दाणदाण पाय आपटत ती निघून गेली... राघवला राधिकाला सरप्राईज द्यायचे होते पण सगळा प्रकार राधिकासमोरच घडला त्यामुळे दोघांनाही खुप वाईट वाटले.
मोहनराव व मालतीताईनी रश्मीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण रश्मीच्या मनातली तेढ काही सुटत नव्हती..
एकदा राघव राधिकासाठी सरप्राईज म्हणून एक सुंदरसा ड्रेस घेऊन आला... रश्मीने पाहिला मात्र तिचा एकदम मूड गेला.. माझ्यासाठी तर कधीच काही आणलं नाहीस आणि वहिनीला मात्र सतत काहीतरी सरप्राईज द्यावं वाटतं तुला... हा रंग तरी सूट होणार आहे का तिला... माझ्यावर जास्त छान दिसेल हा ड्रेस... राधिका हे ऐकतच होती ती म्हणाली रश्मी तुला आवडला असेल तर ठेव तू हा ड्रेस... तसंही तुझ्या गोऱ्या रंगाला खुलून दिसेल हा ड्रेस...
राघव ने राधिकाकडे पाहिले... तिने मोठ्या मनाने नवऱ्याने आवडीने आणलेला ड्रेस सहजच रश्मीला देऊ केला.. आणि तिनेही घेऊन टाकला तो पटकन... राघवला राधिकेचा अभिमान वाटून गेला आणि बहिणीच्या वागण्याचं वैषम्य !!!
राधिका लहान बहिणीच्या मायेने रश्मीला बोलायला जायची पण रश्मी तिला आपल्या भावाच्या योग्यतेची मानायचीच नाही.
तीचे बोलणे, कपडे, रहनसहन, शिक्षण सगळंच आपल्यापेक्षा डाउन मार्केट आहे असंच तिला सतत वाटायचं. आणि ती कायमच तिच्यासमोर तोऱ्यात वावरायची.
याच दरम्यान रश्मीसाठी स्थळे बघणे चालूच होते..
पुण्यातील रजत आपटे चे स्थळ सांगून आले रश्मीसाठी... गर्भश्रीमंत घराणे, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक लहान बहीण....रिधिमा... रजत आणि रिधिमा दोघे बहीण भाऊ अगदी उच्च शिक्षित, देखणे होते.. श्रीमंतीचे आणि संस्कारांचे
वेगळेच तेज होते सर्वच आपटे मंडळींच्या चेहऱ्यावर !!!
आपटे मंडळी बघायला आली रश्मीला.. बघता बघता पसंती ही आली आपटे कडून कारण कपडा खरेदीसाठी रजतच्या आईने रश्मीला मुंबईला येण्यास सांगितले.. रश्मी आईसह गेली.. तेव्हा कपडे खरेदी करत असताना रश्मी जी साडी पसंत करायची रिधिमा, रजत ची बहीण त्याला नावे ठेवायची... काय ग वहिनी असली कसली पसंती तुझी.. शी बाई.. तुला काही चॉईसच नाहीये....
तिने हे म्हटल्याबरोबर मात्र रश्मीचा चेहरा खर्र्कन उतरला... तिला जाणीव झाली की आपण कितीदातरी राधिकाला असे उलटे बोललो आहोत पण तिने कधीच नात्यात कटुता येऊ दिली नाही...
रश्मीचा चेहरा पाहिल्याबरोबर रजत ची आई पुढे होतं म्हणाली... रिधिमा असे बोलणे बरोबर नाही बेटा... ती आपल्या घरची सून होणार आहे.. तिचा यथोचित सन्मान धाकट्या नणंदेने करायलाच हवा...
खरेदी आटोपून घरी जाताना रश्मी तडतडत आईला म्हणाली... काय समजते ही स्वतःला...
मला चॉईस नाही म्हणते काय...
आई म्हणाली अगं रश्मी असं तर तू किती तरी वेळा राधिकाला बोलली आहेस... तू तरी तिच्यापेक्षा काय वेगळी वागत होतीस ग??
तुला कितीही समजावून सांगितलं तरी ऐकायला तयार नव्हतीस.. बरं झालं तुला चांगला सोनार भेटला कान टोचणारा...
रश्मीला तिची चूक कळली आणि
झाल्या प्रसंगाने तीचे डोळे चांगलेच उघडले होते..
कपडे खरेदी करून घरी गेल्यानंतर रश्मीने राधिकेची मनापासून क्षमा मागितली आणि राधिकेनेही तिला बहिणीच्या मायेने जवळ घेतले.......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा