नाते मनाशी मनाचे

एक हृदयस्पर्शी कथा


कथेचे नाव- नाते मनाशी मनाचे

विषय- आणि ती हसली.
फेरी- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.

मी काॅलेजला जात असताना रोज एक मुलगी दिसायची. ती मुलगी परकर आणि गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेली होती. तिच्या अंगावरील ते कपडे मळलेले होते तर केस अगदीच विस्कटलेले. चेहरा माती चिखलाने माखलेला होता. ती अगदीच मंद झाली होती. तिला रोज पाहताना मला खूप वाईट वाटायचे. ती झाडूच्या पाठीमागे जे प्लॅस्टिक असते ते दोन्ही हातात घेऊन फिरायची. तिचा चेहरा अगदीच निरागस होता.

एक दिवस माझ्या गाडीचे टायर रस्त्यातच पंक्चर झाले, म्हणून तेथील जवळच्याच मेकॅनिककडे गेले. टायर पंक्चर काढायला देऊन मी तिथेच उभा राहिले. तेव्हा मला ती मुलगी तिकडून येताना दिसली. तिला पाहून माझे हृदय भरून आले, मला खूप वाईट वाटू लागले.
\"हिची अवस्था अशी कशामुळे झाली असेल? हिची कमजोरी काय असेल? या मुलीचा घरच्यांनी शोध घेतला नसेल का? की ही जन्मजातच अशी आहे?\" असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. त्या विचारचक्रात मी तिथेच उभी होते. इतक्यात माझा मित्र अभी आणि त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र असे तिघेजण जात होते. अभी मला पाहून थांबला. मी माझ्याच तंद्रीत होते. अभी पाठीमागून आला आणि त्याने माझे डोळे झाकले. मला काहीच समजेना. तितक्यात ती मुलगी पळतच तिथे आली आणि तिने माझा हात धरून मला बाजूला ओढले.

"पळ लवकर. जा लवकर. इथून जा.. जा.." असे म्हणून ती ओरडू लागली. मला काहीच समजेना. तेव्हा अभीदेखील माझ्याजवळ आला होता.

"अरे अभी, तू.. ही बघ ना, अशी काय म्हणतेय?" मी म्हणाले.

"जा.. लवकर जा.." ती पुन्हा ओरडतच होती. ते पाहून मला काही सुचले नाही. इतक्यात गाडी दुरुस्त झाली होती. मी पैसे दिले आणि गाडी घेऊन निघाले. गाडी चालवताना मनात अनेक प्रश्न घोळत होते. त्या दिवशी माझे मन कशातच लागले नाही. रात्रीसुध्दा मला झोप लागली नाही.
\"ती अशी का म्हटली असेल? तिच्या मनात काय असेल?\" असे प्रश्न माझ्या मनात घोळतच होते. मी रात्रभर त्याच विचारात होते.

सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा जयुला फोन केला. अभी आणि काही मित्रांना तिथे बोलावून घेतले. मी माझे सगळे आवरून आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यावर ती मुलगी एकटीच बसली होती. आम्ही आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा सर्वांनी एकच उत्तर दिले की आम्हाला काही माहित नाही. ती मुलगी वेडी असेल. शेवटी त्या मेकॅनिकजवळ येऊन आम्ही चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, "मॅडम, ही मुलगी गेली सहा महिने इथे आहे. आम्ही तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. त्यादिवशी मी सकाळी गॅरेज उघडण्यासाठी लवकरच आलो होतो. कारण एका कस्टमरची गाडी लवकर द्यायची होती. मी इथे आल्यावर पाहिलो तर ही मुलगी इथे बसली होती. मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण ही खूप घाबरलेली होती, शिवाय वेड्यासारखी डोके खाजवत होती. ते पाहून कुणीतरी वेडी असेल म्हणून मी सोडून दिले. नंतर ती झाडूचे प्लॅस्टिक घेऊन फिरू लागली. सगळेजण आपापल्या व्यापात असल्याने कुणाचेच लक्ष तिच्याकडे गेले नाही. मग मलाच तिची दया आली आणि मी तिला दोन्ही वेळा जमेल तसे खायला देऊ लागलो. तेव्हापासून ती त्यावेळी इथे येऊ लागली. इतर वेळी कुठे जाते काही माहित नाही. पण मॅडम, या सहा महिन्यात ती कालच पहिल्यांदा बोलली." त्या व्यक्तीने सांगितल्यावर माझ्या मनात पुन्हा विचारांचे वादळ उठले.

मी अभीला तिच्यासमोर जायला सांगितले. जेव्हा अभी तिच्यासमोर गेला तेव्हा ती अगदीच अंग चोरून बसली. जयु गेल्यावर रिलॅक्स झाली. मग मी गेले तेव्हा ती पुन्हा "जा इथून.. लवकर जा इथून.." असे म्हणू लागली. तेव्हा मला काहीच समजेना. माझे मन भरून आले आणि डोळ्यात महापूर लोटला. मी हळूच तिच्याजवळ गेले.

"जा इथून.." ती हळूच म्हणाली.

"तू कोण आहेस? तुझे नाव काय?" मी म्हणाले.

"नाव.." असे म्हणून ती रडू लागली. पुढे ती काहीच बोलली नाही.

"सांग ना?" मी म्हणाले.

"नाव.." ती पुन्हा म्हणाली.

मी तिचे निरीक्षण करू लागले. तेव्हा ती डोके खाजवत होती. अंग चोरून बसली होती. मला तिच्या कुर्तीला एक खिसा असल्याचे दिसले. मी तिला विश्वासात घेऊन तिच्या कुर्तीच्या खिशात हात घालून काही सापडते का ते पाहिले. तेव्हा त्यातून एक चिठ्ठी निघाली.
ती अगदीच चुरगाळलेली होती. आम्ही ते उघडून वाचण्याचा प्रयत्न करू लागलो.

कधीतरी वेड्यागत मन उगाच हसत
तुझ्या आठवणीने हळूच गालात लाजतं

कधीतरी वेड्यागत मन हळव होतं
तुझ्या आठवणीने डोळ्यात आसव येतं

कधीतरी वेड्यागत मन उगाच जातं
हळूच तुझ्या कुशीत बिलगून तुला राहतं

कधीतरी वेड्यागत मन तुला पाहत राहतं
तू जवळ येताना उगीच गुंतत जातं

मेघना आपल्या दोघांचे हे प्रेम असेच खूप वर्षांपासून सुरू आहे, पण आपल्या लग्नाला तुझ्या घरच्यांनी मान्यता दिली नाही. तेव्हा आपण पळून जाऊन लग्न करूया. मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे आणि जर तुला माझ्याशी लग्न करायचे असेल तर तू वडाच्या झाडाखाली गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता येऊन मला भेट आणि खाली त्या व्यक्तीचे नाव होते.

हे वाचताना आम्हा सगळ्यांना एक आशेचा किरण दिसला. आम्ही सोशल मीडियावर त्या व्यक्तीचे नाव शोधू लागलो पण एकाच नावाचे तीस व्यक्ती आम्हाला सोशल मीडियावर दिसले आम्ही तिघेजण दहा-दहा व्यक्तींना विचारायचे असे ठरवले आणि प्रत्येकजण शोध घेऊ लागलो. या चिठ्ठीवरून ह्या मुलीचे नाव मेघना आहे असे आम्हाला समजले. आम्ही लगेचच त्या तयारीला लागलो. काहीही करून या मुलीचा शोध लावायचा असे आम्ही ठरवले होते. फायनली आम्हाला एक व्यक्ती भेटली की जो मेघना नावाच्या मुलीवर खूप प्रेम करत होता. पण तो मुलगा दिल्लीचा होता. आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याला इकडे येण्यास सांगितले. तोसुद्धा मेघनासाठी यायला तयार झाला. तो आल्यानंतरच काय सत्य आहे ते आम्हाला समजणार होते म्हणून आम्ही त्याची वाट पाहू लागलो.

तो फ्लाईटने येणार होता त्यामुळे लवकरच येईल असा आमचा अंदाज होता. आता मेघनाला कुठे घेऊन जायचे तर ती यायला तयार नव्हती. आहे ती जागा ती सोडायला तयार नव्हती त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आमच्या कामाला निघून गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा मेघनाला जाऊन भेटलो. तो मुलगा अजून काही आला नव्हता. सोशल मीडियावरून आम्ही त्याचा नंबर घेतला होता त्यामुळे तो कुठेपर्यंत आला हे आम्हाला वेळोवेळी समजत होते आणि तो इथे आल्यानंतर आम्हाला फोन करणार होता. त्याप्रमाणे तो इथे पोचल्यावर त्याने आम्हाला फोन केला. आम्ही त्याला घेऊन मेघनाच्या समोर आणले.

"ही मेघना आहे. तुम्ही हिला ओळखता का?" असे मी विचारले. तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याने "मेघना" असा शब्द उच्चारला. तेव्हा मेघनाने वर पाहिले तर त्या मुलाला पाहून क्षणाचाही विलंब न करता मेघना त्याच्या मिठीत शिरली आणि ओक्साबोक्सी रडू लागली. बराच वेळ ते दोघे त्या स्थितीत होते नंतर त्या मुलाने आमच्याकडे पाहिले

"आम्ही दोघे पळून जाणार होतो. पळून जाऊन लग्न करणार होतो. पण त्यादिवशी मला वडाच्या झाडाजवळ जाण्यास उशीर झाला. माझे खूप महत्त्वाचे काम होते ते लवकर संपेल असे मला वाटले पण ते काही केल्या लवकर संपले नाही आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला मेघना तिथे दिसलीच नाही. ती आली नसेल असा माझा समज झाला आणि मी माझ्या कामात गुंग झालो. पण हिची अशी अवस्था कशी झाली?" तो मुलगा म्हणाला.

"आम्हाला यातील काहीच माहित नाही. तुम्ही आम्हाला मेघनाच्या घरचा पत्ता द्याल का? फोन नंबर असेल तरी द्या." मी म्हणाले.

"तिच्या घरच्या लँडलाईनचा नंबर माझ्याकडे आहे, शिवाय तिचा पत्तासुद्धा मला माहित आहे." असे म्हणून त्या व्यक्तीने घरचा नंबर आणि पत्ता आम्हाला दिला. आम्ही घरच्या लँडलाईनला फोन करून सत्य परिस्थिती त्यांना सांगितली. तिच्या घरचे मेघना पळून गेली आहे असा समज करून ते कामात व्यस्त होते. मेघना घरातून पळून जाताना तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामुळे घरच्यांना नक्कीच ती कोणाबरोबर तरी पळून गेली असेल असे वाटून त्यांना खूप वाईट वाटले होते. सगळ्यांसमोर आपली अब्रू गेली असे वाटून त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. मेघना घरातून निघाली, ती वडाच्या झाडाखाली जाऊन पोहोचली देखील होती पण तो मुलगा येण्याअगोदरच कुणीतरी तिच्यावर हल्ला केला होता. तिच्या पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबून तिला गाडीत घालून घेऊन दूरवर तिच्यावर वार (बलात्कार) केला होता. एक नव्हे, दोन नव्हे, पाच नराधनांनी तिच्यावर वार केला होता. ती पळून जाऊन लग्न करणार या आनंदात होती, पण अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तिला काहीच समजू शकले नाही. हा हल्ला इतका प्रचंड होता की तिच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झाला आणि ती अशी वेड्यासारखी फिरू लागली. तर ती इकडे आमच्या शहरात कशी आली? तर गाडीतून त्या नराधमांनीच तिला इथे आणले होते आणि असे टाकले होते.

त्या दिवशी पहाटे जेव्हा मेकॅनिक गॅरेज उघडण्यासाठी आला तोच पहिला दिवस होता. पहाटेच्या वेळी ती शुद्धीवर आली तेव्हा अंग आकसून बसली होती. तिला आपण कुठे आलो आहोत? कसे आहोत? आपल्याला कुठे जायचे आहे? आपले नाव गाव काहीच बोलता येईना. इतका प्रचंड आघात तिच्या मनावर झाला होता. घरचे ती मुलाबरोबर पळून गेली असेल अशा विचारात होते; तर तो मुलगा ती माझ्यासोबत येणार नसेल अशा विचारात होता. फक्त काही वेळेच्या अंतराने ही गोष्ट घडली पण एका मुलीचे आयुष्य उध्वस्त झाले.

मेघनाच्या घरच्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. ते मेघनाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर योग्य तो उपचार सुरू केला. मेघनावर योग्य तो उपचार व्यवस्थितरित्या झाला आणि तिची तब्बेत सुधारली. तिचे आईबाबा तिची काळजी घेऊ लागले. सगळे काही व्यवस्थित झाले.

आम्ही काही दिवसांनी तिला भेटण्यासाठी गेलो होतो. तिच्यावर प्रेम करणारा तो मुलगाही आमच्या सोबत होता. आम्ही तिचे सर्व कुशल विचारले. तिच्या घरचे तर आमचे आभार मानत होते. उपकाराची परतफेड कशी करावी हेच समजेना असे म्हणत होते. मेघना चांगली झाली याचेच आम्हाला समाधान वाटले.

"मेघना, त्यादिवशी तू मला इथून निघून जा.. असे का म्हणत होतीस?" मी म्हणाले.

"अगं, हा तुझे डोळे धरला ना तेव्हा मला पाठीमागून तोंड धरलेले आठवले त्यामुळे मी तसे ओरडले." मेघना म्हणाली.

"मग मेघना, आता पुढे काय?" जयु म्हणाली.

"काही नाही. नोकरी करायची आणि स्वतंत्र निवांत रहायचं. तुम्ही मला त्या भयाण भुयारातून बाहेर काढलेत. आता काही वाटत नाही. मस्त रिलॅक्स जीवन जगायचं." मेघना एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली.

"आणि आम्ही आहोत ना? ती आमच्यासोबत आनंदात राहिल." मेघनाची आई म्हणाली.

"मला काही बोलायचं आहे. मी बोलू का?" तो मुलगा म्हणाला.

"हो बोला ना. तुमच्यामुळेच तर आम्हाला मेघनाचे आईबाबा मिळाले. तुमचेही खूप आभारी आहे." मी म्हणाले.

"या मुलामुळेच मेघनाच्या आयुष्याचे वाटोळे झाले आहे. हा इथे कशाला आला आहे?" मेघनाची आई म्हणाली.

"काकू, खरंतर त्यांच प्रेम होतं. जर तो वेळेत आला असता तर आता तो तुमचा जावई असता. असो. आता त्याला बोलू द्या." मी म्हणाले.

"माझं खरंच खूप चुकलं. पण मी हे मुद्दामून नाही केलं. खरंच माझं खूप महत्त्वाचं कामं होतं. पण मी माझी चूक सुधारणार आहे. मी मेघनाशी लग्न करणार आहे. तुम्ही त्यासाठी संमती द्या." तो मुलगा म्हणाला.

"मला कोणतेही उपकार नको आहेत. आता कुणीच माझा स्वीकार करणार नाही. म्हणून मी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे रहायचे ठरवले आहे." मेघना म्हणाली.

"उपकार कसले ग मेघना? त्यावेळी माझे जितके प्रेम तुझ्यावर होते तितकेच आताही आहे. एक तसूभरही कमी झाले नाही. उलट तू आली नाहीस म्हणून मी लग्न करणार नव्हतो. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कुणी नव्हतं आणि यापुढे नसणारही. मी प्रेम केलंय ते फक्त आणि फक्त तुझ्याशीच. सो लग्नही तुझ्याशीच करणार ना? मेघना, माझी अर्धांगिणी बनून माझे आयुष्य पुर्णत्वाला नेशील का?" असे तो मुलगा म्हणाला पण सगळ्यांचेच डोळे पाणावले. मेघनाने होकार दिला आणि तिने त्याला मिठी मारली.

"हॅलो मॅडम, आम्ही आहोत इथे." असे मी म्हणताच ती लाजली आणि ती गालातच खुदकन हसली.

(ही कथा काल्पनिक आहे. याचा कुणाच्या आयुष्याची मिळताजुळता संबंध आला तर निव्वळ योगायोग समजावा. यातील नावे ही काल्पनिक आहेत.)

समाप्त..

©® प्रियांका अभिनंदन पाटील.
जिल्हा-कोल्हापूर.