नाते मैत्रीचे... जीवाभावाचे.

मैत्रीची गोष्ट.
नाते मैत्रीचे…जीवाभावाचे

"कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर मला सोडून गेला.माझ्या श्वासापेक्षाही हा शब्द मला प्रिय होता.काय करू मी डाॅक्टर…? काळ सगळ्यावर औषध असतं असं म्हणून माझं सांत्वन करून नका.माझा शब्द मला परत देता आला तर बघा….." हरीश


सकाळी सकाळी हरीशचा हा मेसेज वाचून डाॅक्टर मृदूला सुन्न झाली. सकाळच्या या सुंदर वेळेला एक गडद उदास भावना आपल्या भोवतीच्या वातावरणात भरून राहिली आहे असं मृदूलाला जाणवलं.

कृपा ही मृदूलाची पेशंट होती. हसतमुख, आनंदी, शब्दांवर प्रेम करणारी, शब्दांचा अर्थ समजून घेणारी.कृपा म्हणजे शब्द असंच समीकरण झालं होतं.

वैद्यकीय आयुष्यात औषध, रोग, रूग्णं, वेगवेगळी वैद्यकीय पुस्तकं, सेमीनार यापलीकडे मृदुलाचा शब्दांशी कधीही संबंध आलेला नव्हता.

सहा वर्षांपूर्वी कृपा मृदुलाची पेशंट म्हणून मृदुलाला भेटली. मृदुला नावाजलेली सायकयट्रीस्ट आहे. कृपा भेटली आणि मृदुलाच्या आयुष्यात बरंच काही बदललं.

कृपाचं हसणं, बोलणं, तिची आनंद देण्या घेण्याची वृत्ती या सगळ्यांनी मृदुलाला मोहात पाडलं.

त्याचवेळी कृपान तिचा एक काव्यसंग्रह मृदुलाला भेट दिला तो वाचल्यावर मृदुलाला शब्द त्याचा अर्थ त्यातील भावना या सगळ्याचा गोफ विणणारी कविता कळू लागली आणि मग तिने एकेक कवी झपाटल्यासारखे वाचून काढले.


त्या शब्दाच्या सहवासाने मृदुलाला वैद्यकीय व्यवसायात खूप आधार मिळाला तिला पूर्वीसारखा थकवा नैराश्य येत नसे. ती जास्तीत जास्त उत्साहाने आणि सकारात्मकतेने रुग्णांशी बोले त्यांना मानसिक आधार देई. तिच्या हुशारीबरोबरच या तिच्या वागण्याने तिला रुग्णांबाबत उत्तम रिझल्ट मिळू लागले.

हळूहळू मृदुलाची कीर्ती वाढली हे सगळ जिच्यामुळे झालं ती कृपा मृदुलाचाही शब्द झाली होती. तीच आज आनंदात विलीन झाले होती. हे केव्हा तरी होणार याची कल्पना वर्षभरापूर्वी सगळ्यांनाच आली होती. कारण कृपाला कॅन्सर झाला होता.

आज विज्ञान एवढं पुढे गेलाय तरी कॅन्सर म्हटलं की भल्या भल्यांची झोप उडते. मृदुलाच्या मनावर खूपच मरगळ आली पण कृपाकडे जाणं आवश्यक होतं. मृदुलाला आठवलं कृपा सोडून बाकी सगळे कॅन्सरला घाबरले होते. मृदुल सुद्धा डॉक्टर असूनही अस्वस्थ झाली होती.


कृपाने मात्र शब्दाच्या साखरेत कॅन्सरची वेदना विरघळून टाकली होती. येणारा प्रत्येक क्षण हसत मुखाने जगली. केवढे धैर्य होतं तिचं. कृपा मृदूलाची फक्त पेशंटच राहिली नव्हती तर एक छान मैत्रिणी झाली होती. तिच्या सहवासात मृदुलाही काव्यमय बोलू लागली होती. कविता वाटाव्यात अशा ओळी तीला सुचू लागल्या.

त्या दोघींच्या मैत्रीवर सुचलेल्या चार ओळी मृदुलाने कृपाला सांगितल्या

\"\"मैत्रीचा निरागस कोंब जेव्हा मनात उमलतो तेव्हा…. सगळेच संदर्भ बदलतात. शब्दापलीकडचे जग ओळखीचं होतं आणि स्पर्श पलीकडचा अर्थ समजतो."

हे ऐकल्यावर कृपा मृदूलाला म्हणाली होती,

"अग मृदुला किती छान ओळी लिहिल्या आहेस. तुझे शब्द आता वैद्यकीय क्षेत्रातले वाटतच नाहीत. माणसाळले वाटतात. लिही. शब्दांना दूर लोटू नकोस."

आज कृपाच ते बोलणं आणि त्यावरचं तिचं निरागस हसणं मृदुलाला आठवलं. कृपा गेल्याचा मेसेज वाचल्यावर काही ओळी मृदुलाच्या मनात होऊ लागल्या ,


"तुझे शब्द तुझा आवाज म्हणजे तुझं अस्तित्व होतं. माझ्या मनाच्या तळ्यात ते रुजलं होतं. रुजण्याचे बंध आत्ता कुठे आकार घेत होते तोच… तोच तू गेलीस लांब पलीकडे. दूरचे दिवे एवढ्यात का केलेस ग आपले? ऐलतीरावर तुझ्या आठवणींचा गंध घेणं हाच एक पर्याय माझ्या कडे उरलाय. मी एकटी उरले. मैत्री शिवाय… मैत्री शिवाय."


या ओळींबरोबर मृदुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने ते तसेच वाहू दिले. कृपाच्या जाण्याची बोच कदाचित त्यात वाहून गेली असती. पोकळी जाणवणारा एक दीर्घ नि:श्वास सोडत अत्यंत जडशीळ पावलाने मृदुला उठली. कृपाकडे जायला हवंय पण तिचं मन तयार होत नव्हतं.

मृदुलच्या उदासपणाचं तिच्या सासूला आश्चर्य वाटलं न राहून तिने कारण विचारलं मृदुलाने कृपा केल्याचा त्यांना सांगितलं. त्याही हळळल्या. एक निरागस हसू संपल म्हणून खंतावल्या प्रसंगाची जाण ओळखून त्यांनी मृदुलाला बळेबळे चार घास खायला लावलाय

"कृपाकडे गेलीस की किती वेळ लागेल कोण जाणे? चार घास खाऊन जात." म्हणाल्या. मृदुला सासूच्या म्हणण्याखातर चार घास पाण्याबरोबर पोटात ढकलून कृपा कडे जायला निघाली.


मृदुल कृपाकडे पोहोचली तेव्हा तिला तिथलं सगळं वातावरण निष्प्राण झाल्यासारखं वाटलं. शेजारी नातेवाईक यांची गर्दी होती पण त्या गर्दीला एक मरगळ आली होती. कळत नकळत सगळेच डोळे पुसत होते. मृदुलाला तिथल्या वातावरणात बदल झालेला दिसला.


स्वप्निल आणि सुकृत कृपाची दोन्ही मुलं काहीच न कळल्यासारखी बसली होती. हरीश हताशपणे बसलेला होता. हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये कृपाचा निष्प्राण देह ठेवलेला होता. तो बघताच मृदुलाला भडभडून आलं. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. निरागस कृपाचं हसणं मृदूलाच्या कानात, मनात घुमू लागलं.त्याने मृदूला आणखी अस्वस्थ झाली.कृपाचा आवाज आणि समोर पडलेला नि:ष्प्राण देह यांची संगती मृदुला घ्या मनाला लागत नव्हती.


बाहेर आता कृपाला नेण्याची तयारी सुरू झाली होती. हे बघून मृदुल खूप सैरभैर झाली. जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला जगवण्याचे अथक प्रयत्न केले जातात आणि तो जाताच त्याला लवकरात लवकर नेण्याची घाई सुरू होते. मृदुलाला हे सगळेच विसंगत वाटलं पण ती पद्धतच होती तशी. मनातलं दाबत मृदुला घरात सगळीकडे बघत होती.

तिच्याही नकळत तिने लहान्या स्वप्नीलला जवळ घेतलं. तसा तो तिला बिलगुनी रडू लागला. मृदुला त्याला हलकेच थोपटू लागली. तिच्या मनात आलं मोठ्यांचं सांत्वन शब्दांनी करता येईल पण लहानग्या जीवांचं कसं सांत्वन करणार? त्यांना स्पर्शातून सांत्वन झालं तर ठीक नाहीतर त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली आईची पोकळी नेहमीसाठी तशीच राहणार होती.


मृदूला संपलेल्या मैत्रीच्या कलेवराकडे बघत होती. कृपा गेली पण मैत्रीचा सुगंध मृदुलाच्या मनात ठेवून गेली. मृदुलाला शाळेपासून कधीच न कळलेली आणि मिळालेली मैत्री कृपा न दिली. ही मैत्री मृदुला आयुष्यभर जपणार होती.


त्या दोघींची ओळख झाली तो दिवस मैत्री दिन म्हणून जपणार होती. कृपा सारखीच निरागस निर्व्यास मैत्री गरज असेल त्यांना द्यायची हे तिने मनोमन ठरवलं. हीच कृपाला वाहिलेले श्रद्धांजली असेल असेही मृदुलाला वाटलं .

बाहेर एकच कल्लोळ उडाला.तशी मृदुला भानावर आली. कृपाला उचलून शववाहिकेत ठेवले. स्वप्निल आणि सुकृत हर्षला बिलगुल रडत होते. हरीश मुलांना थोपटत कसाबसावरून उभा होता.

तेवढ्यात कृपाच्या मावशीने मुलांना जवळ घेतलं तसा हरीश शववाहिकेत जाऊन बसला. हळूहळू शववाहीका गेटमधून बाहेर पडून स्मशानच्या दिशेने मार्गस्थ झाली.

कृपाच्या आठवणीत गोंधळलेले नातलग त्या दूर जाणाऱ्या शववाहिकडे गळ्यात हुंदका दाबत बघत होती. मृदुला या रक्ताच्या नात्यापलीकडली होती. कृपाशी शब्दांनी बांधलेली होती. हा बंध रक्तापेक्षाही माणसाला ओढाळ बनवतो. मृदुल बधीर मनाने दूर जाणाऱ्या त्या शववाहीकडे बघत मनात हुंदका दाबून उभी होती.

__________________________
लेखिका…. मीनाक्षी वैद्य