नाते जपलेले जिवापाड... भाग 3

कार्यक्रमाचा दिवस उजाडला, सकाळपासूनच गडबड चालली होती सगळ्यांची, सायली परेश सतीश प्रिया सकाळपासूनच कामाला लागले होते


नाते जपलेले जिवापाड... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.......

सगळ्यांची आवरायची गडबड होत होती, बाहेर गाडी आलीच तेवढ्यात, सायली तिचा नवरा परेश मुलगी परी गाडीतून उतरले, सतीश बाहेर सामान काढायला मदत करत होता, सायली येऊन नाना माईंना भेटली, छोट्याशा परीचे लाड सुरू होते, सायलीने फिरून पूर्ण घर बघितलं, अगदी जसच्या तस आहे सगळं, अजिबात बदल नाही काही, हाच तर कोझिनेस आहे इथला, घरातल्या प्रत्येक वस्तूत नाना माईंचा चेहरा दिसतो, किती छान वाटत आहे आणि किती स्वच्छ ठेवल आहेस घर तु माई आणि अजूनही आमच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत, माई ना खूप भरून आलं होतं, दोघं मुलं सून जावई घरी नातवंड, बऱ्याच दिवसापासून ते असे एकत्र जमायचे स्वप्न बघत होते ते,

सतीश आणि सायली भेटले, किती बोलू आणि किती नको असे झाले होते त्यांना, या घराच्या बऱ्याच आठवणी आहेत, दोघ आठवणी काढत बसले, त्यांच्या गप्पां ऐकत बाकीचेही रमले, माईंनी वाढायला घेतलं, प्रिया आणि सायली ही मदतीला गेल्या, सगळं सायलीच्या आवडीचं केलेलं, सायलीच्या डोळ्यात पाणी होतं,

"आज कित्येक दिवसांनी मी आईच्या हातचा खाणार आहे" ,... सायली येवून माईंच्या गळ्यात पडली,

परेश कौतुक बघत होता, मुलं येऊन बसले जेवायला,
आज मम्मीच्या आवडीच सगळं जेवण, परीला आश्चर्य वाटत होत, मम्मी तुला हि भाजी आवडते हे मला माहितीच नव्हत, आजीला कसं माहिती, हास्यविनोद करत जेवण झालं

सगळ्यांसाठी आणलेले गिफ्ट दाखवले, आईसाठी भारीतली साडी नेकलेस सेट, बाबांसाठी घड्याळ कोट गिफ्ट बघून आई-बाबा भारावुन गेले,

"कशाला एवढा खर्च केला, पूर्ण कार्यक्रमाचेही एवढं बजेट नसेल एवढाचं तू गिफ्ट आणला आहे" ,.. नाना

"हे गिफ्ट मी एकटीने आणलेलं नाही आहे ते मी आणि सतीश ने मिळून घेतल आहे, अर्ध अर्ध आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं केला आहे, त्या मानाने हे गिफ्ट काहीच नाही",.. सायली

फुल वाला आला....

" काल का नाही आला रे शाम? आता बघून घे किती फुलं लागणार ते आणि उद्या लवकर ये डेकोरेशन ला",. माई

" किती वाजता आहे कार्यक्रम "?,.. शाम

" असं किती वाजता वगैरे काही नाही पण दिवस भर सेलिब्रेशन आहे ",.. माई

" आज संध्याकाळी करू का डेकोरेशन"?,.. शाम

" नको उद्या पहाटे लवकर ये ताजी फुलं घेऊन, आज संध्याकाळी तू आजची फुलं वापरशील ",.. माई

या वयातही माईंचा व्यवहारिक पणा वाखाणण्याजोगा होता, सतीश सायली नाना हसत होते, त्यांना या गोष्टी पूर्वीपासूनच माहिती होत्या, माईंच्या हुशारीमुळे तर एवढं सगळ टिकून होत, संसारात काटकसर केली त्यांनी, मुलांना चांगलं शिकवलं, नानांची चांगली साथ दिली, पै पै चा हिशोब असायचा त्यांच्याकडे, एवढं करूनही अडलेल्याला निडलेल्याला मदत करायच्या माई,

कार्यक्रमाचा दिवस उजाडला, सकाळपासूनच गडबड चालली होती सगळ्यांची, सायली परेश सतीश प्रिया सकाळपासूनच कामाला लागले होते, आज नाना माईंना काहीही करू द्यायचं नाही असं ठरवलं होतं त्यांनी, आशा ही लवकर आली कामाला, आज फार मोठा बेत होता स्वयंपाकाचा त्यामुळे तिने मदतनीस सोबत आणली होती, तिला काय हव काय नको ते बघायला माई उठल्या तसं सायली आणि प्रियाने त्यांना दटावून खाली बसवले, प्रियाने जाऊन सगळं सामान काढून दिलं

जरा वेळाने बाहेर गाडी आली, त्यातून नाश्त्याचे सगळं सामान आलं

"आता कशाला बोलावलं नाश्त्याला आपल जेवण होतच आलं होतं",... माई

"असू दे ग माई",. सायली

सायलीने नाष्टा उतरवून व्यवस्थित एका टेबलावर रचून ठेवला.

दहा मिनिटातच नाना माईंच्या ज्येष्ठ ग्रुपचे सदस्य आले, सगळ्यांनी मोठा पेढ्याचा पुडा आणि फुलांचा गुच्छ आणला होता, त्यांना बघून नाना माईंना खूप आनंद झाला, ग्रुप सदस्यांनी मिळून छान गाणी म्हटली, ओळख करून दिली, सगळ्यांनी हास्यविनोद करत नाश्ता झाला, त्या प्रसंगी एक छोटा केकही नाना माईंनी कापला, खूप मस्त गेला सकाळचा दोन तीन तासाचा वेळ, सगळ्या सदस्यांनी निरोप घेतला.

🎭 Series Post

View all