नाते जन्मांतरीचे (टीम- बटाट्याची चाळ)

The story of two sisters, who love each other as well as hate each other.

नाते जन्मांतरीचे…..!
(टीम -बटाट्याची चाळ.)  

"आईऽऽऽऽ…....... "
 किंचाळतच शिप्रा स्वप्नातून जागी झाली. घामाने डबडबलेलं आणि भीतीने कापणार शरीर पाहून आईच्या डोळ्यातून तर अगदी पाणीच येऊ लागलं. 

“ काय झालं बाळा, ठीक आहेस ना तू ? कस वाटतंय तुला आता? ”

शिप्राने आईला घट्ट मिठी मारली.

“ आई मला खूप भीती वाटत आहे गं . पुन्हा तेच स्वप्न, पुन्हा सगळ्या त्याच गोष्टी दिसत आहेत. "

“ थांब मी बाबांना आणि अनुला
 बोलवते. "

“ आई प्लिजऽऽ ऐकतेस का माझं, नको नाऽ तू उठवू त्यांना. "

“ बाळाऽऽ, मला माहित आहे. तू बाबा नव्हे, अनु येऊ नये म्हणून बोलवू नकोस असं म्हणत आहेस. अगं पण स्वप्न ते स्वप्नच, इतकं का ते मनावर घ्यायचं असत ! अनु तुझी बहीण आहे. आणि अशी एखाद्या स्वप्नामुळे तू तिच्याशी फटकून वागतेस बर दिसत का ते? “

“ आई, सॉरी, मला अस नसत गं वागायचं अनुसोबत, पण तिला पाहिलं तरी मनात अनामिक भीती वाटते मला, कधीकधी तर तिचा खूप जास्त राग येतो.मला माहित आहे तुमच्या सगळ्यांचच माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मी हे असं मुद्दाम करत नाही,पण होत माझ्या हातून . “

“ जाउदे गं बाळा, नको जास्त विचार करुस. झोप आता, उद्या बोलू आपण. ये इकडे माझ्या मांडीवर. "

शिप्रा आईच्या मांडीवर शांत झोपली. 

आईने शिप्राला थोपटत डोळे मिटले.

" काय अवस्था झाली आहे माझ्या शिप्राची. कस माझं हसत खेळत घर होत. माझ्या हसऱ्या गोकुळाला कुणाची बरं द्रुष्ट लागली..?
हा त्रास थांबवला पाहिजे. उद्या सकाळीच यांच्याशी सविस्तर बोलते. ”
      --------------------------

दुसरा दिवस.सकाळची वेळ. 
शिप्राची आई स्वाती किचनमध्ये काम करत होती. एवढ्यात शिप्राचे बाबा मिस्टर माने तिथे आले. 

" काय बायकोऽऽ! आज काय चहा-नाश्ता वगैरे मिळणार आहे कि नाही?
 का आज उपाशी जायचं ऑफिसला?? "

स्वाती मात्र शांतच होती कारण बाबांचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहचतच नव्हता. 

" स्वातीऽऽऽ अगंऽऽ मी काहीतरी बोलतोय, लक्ष कोठे आहे तुझं ? "

"अंऽऽऽ ... काय म्हणालात ? 
माझं लक्षच नव्हतं. "

" हो मॅडम आलं ते लक्षात. मला माहित आहे शिप्राच्या स्वप्नामुळे तू चिंतीत आहेस. " 

" हो नाऽऽऽ..., काल पुन्हा तिला स्वप्न पडलं. पून्हा तीच बेचैनी.रात्री तुम्हाला हाक मारणार होते पण शिप्रा नको म्हणाली आणि तीच म्हणणं मला मोडवेना. "
"हरकत नाही, पोरीची तब्बेत चांगली राहणं आणि दोन्ही पोरींनी पुन्हा एकत्र येण माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. “

"थांबा हंऽऽ,मी हाक मारते नाष्ट्यासाठी. "
"अनु, शिप्रा पटकन नाष्टयाला या "

दोघीही थोड्याच वेळात डायनिंग टेबलवर आल्या. 

"शिप्रा, ऐक नाऽऽऽ, आज शॉपिंगला जाऊयात का?  खूप दिवस झाले ना आपण दोघी बाहेर जाऊन. मस्त शॉपिंग, फिल्म,जेवण असा काहीतरी प्लॅन 
करू. "

"अंऽऽ ... नको , आज नको. जाऊ कधीतरी नंतर. " 
नजर चोरत शिप्रा म्हणाली. 

एवढ्यात आई तिथे आली. 
 
" अनु एवढं म्हणत आहे तर जा ना तिच्यासोबत. "

शिप्राने फक्त एक नजर आईकडे वळवली. यावरून आई समजून गेली की हिला समजून सांगण्यात अर्थ नाही. 
 "अनु, राहूदेऽऽ. आज नको. नंतर कधीतरी जा तुम्ही किंवा आपण जाऊ एखाद्या 
रविवारी फिरायला. "  
    -----------------------------

शिप्राचा विचार करतच आईचे मन भूतकाळात तरंगले.

१७-१८ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अनुचा जन्म झाला. सगळेच खूप खुश होते. अनुच्या बारश्याला येत असताना स्वातीच्या दिरांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि शिप्रा पोरकी झाली. तेव्हा शिप्रा एक वर्षाची होती. स्वातीने अनुसोबतच शिप्राला सुद्धा वाढवायचे ठरवले.

अनु आणि शिप्राला कधीच कळू दिले नाही कि त्या चुलत बहिणी आहेत. त्या सख्ख्या बहिणी  सारख्याच वाढल्या. दोघींमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. पण गेल्या मे महिन्यापासून शिप्राला सारखी काही स्वप्न पडू लागली. एकेदिवशी तिने आई बाबांना बोलताना ऐकले .

" अहोऽऽऽ, आपण शिप्राला प्रेम देण्यात कूठे कमी तर पडत नाही ना ? 
तिला का असा त्रास सुरु झाला असेल? "

" नाही ग स्वाती, मी पाहिलंय तुला, दोघींवर प्रेम करताना तू कुठेच कमी नाही पडलेलीस. दादा वाहिनींच्या माघारी तू  त्यांची कमी तिला कधीच भासू दिली नाहीस."

हे ऐकताच शिप्राच्या पायाखालची जमीन सरकली. पण तिलादेखील माहित होते कि आईवडिलांचे आपल्यावर किती प्रेम आहे. त्यामुळे ती काहीच व्यक्त झाली नाही. पण थोड्यावेळात बाबांचे शिप्राकडे लक्ष गेले. त्यांनी सगळी परिस्थिती तिला नीट समजावून सांगितली आणि तिनेही ती समजून घेतली. 

पण या घटनेनंतर शिप्राला पडणाऱ्या स्वप्नांची तीव्रता अचानक दिवसेंदिवस वाढत गेली.

तेवढ्यात अनुने आईला आवाज दिला. आणि स्वाती भानावर आली.
      ---------------------------

" हे असच करतेस तू आईऽऽ., गेलो असतो ना आम्ही आज. "

"अग बाई जा ना नंतर तुम्ही."

" ठीक आहे, तू म्हणतेस तर नंतर जाईन ."

अनुची नेहमीसारखी दंगामस्ती चाललेली कारण तिला कोणतीच गोष्ट माहित नव्हती. ना तिला स्वप्नांबद्दल माहित होते आणि ना शिप्राबद्दल.

एवढयात आईने बाबांना खुणावले की काहीतरी बोलायचे आहे. 

" स्वाती मला ऑफिसला जायला वेळ होतोय. जरा माझं सामान काढून देतेस का ? "

" हो चला. तुम्ही पुढे व्हा, सामान ठेवलय काढून तरी तुम्हाला मी आल्याशिवाय काही सापडणार नाही त्यामुळे मीच येते."

"हो ग बायकोऽऽ, तुमच्या तिघींशिवाय कोण आहे मला !!!"

" बर चला आता लाडात येऊ नका. "

दोघेही बेडरूम मधे येतात. 

" ऐका नाऽऽ.., मी काय म्हणते, आपण जरा सायकॅट्रिस्टची अपाँईण्टमेन्ट घेऊयात का शिप्रासाठी ? 
बघा ना तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर. मला शिप्राची खूप काळजी वाटते आहे. जरा काऊंसिलींग झालं किंवा नेमका कोणता त्रास आहे हे समजलं तर लवकर तिला या त्रासातून बाहेर काढता येईल. मला आपलं घर पहिल्यासारखं हसरं बघायचयं होऽऽ... "

 " माझ्या पण डोक्यात बरेच दिवस झाले हाच विचार घोळतोय आणि खरंतरं मी डॉक्टर बघायला सुरुवातही केली आहे. माझ्या एका सहकाऱ्याने एका नामांकित मानसोपचारतज्ञाचे नाव सुचविले आहे. तू  म्हणत असशील तर लगेच सोमवारची अपॉइंटमेंट घेतो. "
 
" ठीक आहे. घ्या तुम्ही अपॉइंटमेंट. मी सुद्धा शिप्राशी बोलून घेते. "

" ह्यापासून लांब राहावे आणि मनावर काही परिणाम होऊ नये म्हणून अनुला एका आठवड्यासाठी आजी-आजोबांकडे पाठवते म्हणजे शिप्रा देखील शांत राहील आणि आपण तिला डॉक्टरकडे शांतपणे नेऊ शकू. ”

" ठीक आहे. काय होतेय ते सांगतो तुला. आता  निघतो मी नाहीतर  मला उशीर होईल. आल्यावर बोलतो तुझ्याशी. "
   -------------------------------

सोमवारी ठरल्याप्रमाणे शिप्रा आणि तिचे आई-बाबा दोघेही डॉक्टर जहांगीर ह्यांच्याकडे पोहचले. 

" मे आयऽ कम इन डॉक्टर…! "

" येस,कम इन..! बसा. बोला काय प्रॉब्लेम आहे? "
आईवडिलांनी थोडक्यात सगळा विषय सांगीतला.

" मी तुमच्या भावना समजू शकतो मिस्टर माने.
पण तिला हा त्रास कशामुळे होत असावा असं वाटतयं तुम्हाला?
तिच्या सोबत कोणी काही चुकीचं वागलं आहे का ? 
किंवा तिला कोणता धक्का बसला आहे का ? "

" खरं सांगायचं तर आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. फक्त एकदा तिला आम्ही तिचे खरे आईवडील नाही तर काका-काकू आहोत हे समजले. 
पण तिला हा त्रास त्या आधीपासूनच होत आहे."

" ठीक आहे. तुम्ही शिप्राला आत पाठवा.
मी तिच्याशी बोलतो आणि पुढचे सेशन्स कधी लागतील हे सांगतो.

मिस्टर/ मिसेस माने केबिनबाहेर आले. 
" बाळ शिप्राऽऽ तू आत जा आणि डॉक्टर जे विचारतील त्याची नीट-नीट खरी उत्तरे दे होऽऽ. "

" हो ...आई तू काळजी करू नकोस. मी नीट उत्तरे देईन. "

" हं... बोला मिस शिप्रा..,काय त्रास होतोय तुम्हाला?
स्वप्नात घरातील कोणी दिसत का ?
किंवा आई-बाबा त्रास देतात का? 
आणि तोच त्रास पुन्हा स्वप्नात दिसतो असे तर नाही….! "

" डॉक्टर….! माझी लहान बहीण आहे,अनु. ती मला मारतेय आणि उंच कड्यावरून ढकलून देतेय असं स्वप्न पडतं मला सतत. "

" तुला माहित आहे ना, अनु तुझी चुलत बहीण आहे ते. "

" होऽऽ..पण आम्ही दोघी कधीच तसे वागलो नाही आणि तिला हे माहित नाही की मी तिची सख्खी बहीण नाही ."

" मग घरात तुला काही परकेपणाची वागणूक मिळत आहे का नकळतपणे, ज्यामुळे तू दुखावली जात आहेस ? "

" नाही नाही. असं काहीच नाही. सगळेच माझ्याशी खूप चांगले वागतात. पण मला हा त्रास मे महिन्यापासून सुरु झाला आहे."
" कारण माहित नाही पण हल्ली ते एकच स्वप्न वारंवार पडतं आणि मी कड्यावरून खाली पडतेय ह्या कल्पनेने किंचाळून जागी होते."

"म्हणजे त्या आधी तुला हा त्रास नव्हता."

" अजिबात नाही. पण मे महिन्यात आम्ही नाशिक जवळील एका राजवाड्यात गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यापासुन मला हा त्रास सुरु झाला आहे.

" तिथे तुझ्यासोबत काय घडले ? "

" मला तिथे वेगवेगळ्या आकृत्या दिसू लागल्या आणि  ' मंदाकिनी...
मंदाकिनी... ' 
असे आवाज ऐकू येऊ लागले. "

" बरऽऽऽ.. आणखी काही… ? "

" नाही. बस्स एवढेच. "

"ठीक आहे. तुझ्या आईबाबांना आत बोलावं. "

शिप्राने आई-बाबांना आत बोलवले.


" या मिस्टर आणि मिसेस माने. तुम्ही मला शिप्राला राजवाड्यात झालेल्या भासाबद्दल काहीच बोलला नाहीत. "

"कोणते भास ? याबद्दल शिप्रा आम्हाला कधीच काहीच बोलली नाही. "

." सॉरी आई-बाबा !! तुम्हाला त्रास होईल म्हंणून मी काहीच सांगितलं नाही."

" असुदे आता. पण स्वप्नांचा आणि ह्या राजवाड्याचा काय संबंध असू शकतो डॉक्टर? "

" त्यासाठी आपल्याला संमोहन शास्त्राचा उपयोग  करावा लागेल.नेक्स्ट सेशनपासून आपण त्यावर काम सुरु करूयात. "

" ठीक आहे. मग नेक्स्ट सेशनला भेटू. थँक्यू डॉक्टर. "

--------------------------------

त्यानंतर तिघेही घरी आले. एवढ्यात अनुदेखील घरी आली. 


" मला आजोबांकडून समजलं की शिप्राला काहीतरी त्रास होत आहे. काय झालयं नेमकं तिला ?" आणि त्यामुळेच ती मला टाळत आहे का ? "

" सांगतो. आज तुला सगळ्या गोष्टी सांगायच्याच होत्या. "
 आई-बाबांनी अनुला सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. 

"ओह्ऽऽऽ आत्ता मला सगळा उलगडा होतोय. शिप्राताई इतके दिवस मला का टाळतेय हेही समजलं. पण मी तिला खरंच कधीच दुखावलेलं नाही. "

" आम्हाला माहित आहे ते अनु बाळा. "

" पण आता आपण सगळे मिळून तिला मदत करूयात. "

" होऽऽ. किती गं शहाणं बाळ ते माझंऽऽ !!! "

" अहो, आवरा आता. आज खूप दगदग झाली आहे. उद्या पुन्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. "
--------------------------------

दुसऱ्या दिवशी चौघेही डॉक्टरांकडे गेले.

" या.बसा. आपण थोड्याच वेळात सेशन सूरू करूयात. शिप्रा तू पलीकडच्या केबिनमध्ये बस. त्याठिकाणी माईक आणि कॅमेरा आहे. तिथे चाललेले सेशन तुम्ही इथे हेडफोन लावून ऐकू शकता पण तिथे तुम्हाला फिजिकली प्रेझेंट राहता येणार नाही ओके… ? "

" काही हरकत  नाही डॉक्टर, आम्ही इथून ऐकू. "

" ओके. "

डॉक्टर आणि शिप्रा पलीकडच्या केबिनमध्ये गेले. ़


"शिप्राऽऽ आता मी तुम्हाला सूचना देईन त्या शांतपणे ऐकायच्या आणि मी विचारेन त्याची नीट उत्तरे द्यायची. आता डोळे बंद करा.."

शिप्राने डोळे बंद केले. 

" आता तू्म्ही शांत झोपी गेला आहात.  आता हळूहळू तुम्ही आयुष्यचक्राच्या मागे-मागे जात आहात.
कीती वर्षांच्या  आहात तूम्ही आता? "

" तीन वर्षाची. "

" ओके. अजून पाठीमागे जा. आता तुला काय दिसतंय बाळ शिप्रा ? "

" एक मोठा राजवाडा.भव्य उद्यान.मोठ-मोठाल्या खोल्या आणि खूप सारी माणसं ."

"कोणता राजवाडा आहे? कोण माणसे आहेत तिथे ? आणखी काय पाहू शकतेस तू तिथे ? "

" तिथे मी आणि अनु खेळत आहोत. पण आमची नावे वेगळी आहेत. मला काही आवाज ऐकू येत आहेत तिकडे. "


" कोणते आवाज आहेत."

" मला अनु 'मंदाकिनी' अशी हाक मारतेय तर मी तिला 'हरिप्रिया' अशी हाक मारत आहे. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. हरिप्रिया तेथील राजकन्या आहे तर मी एक मानसकन्या आहे तिथल्या राजांची. "

" हं...पुढे सांग,आणखी काय दिसतंय ? "

" आम्ही दोघीही बागेत खेळतोय. एवढ्यात तिथं राजकुंवरजी आलेत. राजकुंवर म्हणजे आमच्या लहानपणीचे मित्र. एवढेच नव्हे तर माझं प्रेमदेखील. पण एवढ्यात हरिप्रिया रागाने निघून गेली. ती का रागावली? याचे काही उत्तर नाहीये माझ्याकडे. ह्यांनतर मी खूप रडले. दुसऱ्यादिवशी मी हरिप्रियाला विचारलं की " काय झालं, तू का बोलत नाहीस माझ्याशी ?" यावर ती म्हणाली की काहीच नाही. 
असेच काही दिवस गेले. माझं आणि राजकुंवर यांचं प्रेम बहरतच होत. पण मला माहित नव्हत की आमचं प्रेम हेच हरिप्रिया माझ्यापासून लांब जाण्याचं कारण आहे. "

" बर मग… नंतर काय झालं ? तुमचं लग्न झालं का ? 
हरिप्रिया यावर काय म्हणाली ? "

" आम्ही एकमेकांच्या घरी माहित होतो त्यामुळे आमचे लग्न ठरले. हरिप्रिया देखील खुष दिसत होती. ती म्हणाली,
 " तुझं लग्न ठरलं पण थोडावेळ लहानपणीच्या मैत्रिणीला देशील ना लग्नाच्याआधी ?"
 त्यावर मी हो म्हणाले.
 ती मला उंच डोंगरावर फिरायला घेऊन गेली.
आणि तिथे गेल्यावर म्हणाली 
" कोण कुठली तू उचलून आणलेली पोरऽऽऽ,आणि माझी बरोबरी करायला चाललीस तू? तू माझं प्रेम हिरावून घेतलंस. माझे आईवडील हिरावून घेतलेस. याचा एकच दंड तुला मिळेल तो म्हणजे मृत्युदंड. "

हे सांगत असतानाच शिप्रा 'अनु ....... मला सोड' असे किंचाळत उठली. 

आता शिप्राला आपल्याला पडत असलेले स्वप्न आणि अनुला घाबरणे या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. 
एवढ्यात तिकडे अनु चक्कर येऊन पडली. डॉक्टरांनी तिला येऊन चेक केले. 
थोड्याच वेळात अनु शुद्धीवर आली. शिप्राच्या मनातली भीती आता गेली असल्याने ती अनुच्या समोर उभी होती.

अनु उद्गारली " हरिप्रिया तू इथे?"


हे ऐकून सगळ्यांचे डोके चक्रावले. 

अनु पुढे म्हणाली, 
" मला लहानपणापासूनच माहित होते की आपल्या दोघींचा पुनर्जन्म झालेला आहे. पण फरक एवढाच की मागच्या जन्मी मी मानस-कन्या होते तर या जन्मात तू मानसकन्या आहेस. ह्या जन्मात आपण जन्माला आलो पण तू माझा चेहरा घेतलास तर मी तुझा चेहरा घेतला. तुला जो चेहरा त्रास देत होता तो खरा माझा नाही तर तुझाच चेहरा होता. मागच्या जन्मी तू माझ्यासोबत जे काही वागलीस त्याचे फळ म्हणून तुला हा सगळा त्रास होत आहे. "

हे ऐकताच शिप्रा ढसढसा रडू लागली. आणि अनुच्या पायाशी येऊन रडतच म्हणाली….. 

" माफ कर अनु. मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी पण तू कधीच वाईट नव्हतीस.
मी मात्र कायम तुला चुकीचं समजले. मला खरच माफ कर ."

" अग माफ केलं आहे म्हणून तर आज आपण दोघी  इथे आहोत. ये इकडे. मला मिठी मार. माझ्यासाठी कायम तू माझी लाडकी बहीणच आहेस. "

 हे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले.  सगळ्यांना आनंद झाला की दोन्ही मुली पाहिल्यासारख्या एकत्र येऊन हसत होत्या. 
दोघी बहिणी जन्मजन्मांतरीचे नाते अधिकच दृढ करत आपल्या घरी गेल्या.. 
           -----------------(समाप्त)------------------
असे हे शिप्रा-अनूचे नाते जन्मांतरीचे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमधे जरूर कळवा.

 ©मृणाल मोहिते.

नमस्कार वाचक मंडळी..!

मी ईरा चँम्पयन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत माझी  टिम ' बटाट्याची चाळसह उतरले आहे.
आत्तापर्यतं माझ्या प्रत्येक कथांना तूम्ही भरभरून दाद दिलीय तशीच दाद माझ्या ह्या कथेला देवून माझ्या टिमला विजेतेपद मिळवून द्याल ही अपेक्षा.
तुमच्या प्रत्येक लाईकमूळे मी एक पाऊल विजयाच्या दिशेने पूढे जाणार आहे. तरी कृपा करून भरघोस व्ह्यूज देऊन माझी टिम विजयी करा ही विनंती.
धन्यवाद.