नातं - सासू सुनेचं

नातं -सासू सुनेचं

लेख

नाव - नातं -सासू सुनेचं

विषय - स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

फेरी -राज्यस्तरिय लेख / लघुकथा स्पर्धा.

         

                नाती जपण्यात मजा आहे...

                 बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे...

                  जुळलेले सूर गाण्यात मजा आहे...

                  येताना एकटे असलो तरी.,.

                  सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे .

तसं पाहिलं तर सासू सुनेचे नाते हे एक सुंदर नाते आहे. पण

पण त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

काहींचे अनुभव, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, वाचनातून, किर्तन ,

प्रवचनातून ऐकलेल्या कथा, नाटक, टी.व्ही.वरील

मालिका या सर्वांमधून सासू सुनेचे नाते म्हणजे  ' विळ्याभोपळ्या..

सारखे 'हा समज आणखीनच दृढ होतो.प्रत्येक स्री कुणाची..

 मुलगी, कुणाची पत्नी, कुणाची आई,कुणाची सून असते.

' स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असते का हो ?

अर्थातच हे सर्व प्रत्येकाच्या स्वतःच्या विचारांवर, दृष्टिकोनावर,

समजूतदारपणावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा स्त्रीचं..

स्त्रीची शत्रू ठरते. घरात आलेली सून आधीच थोडी गोंधळलेली..

असते. नवीन ठिकाण, नवीन नाते या सर्वांमध्ये जुळवून घ्यायला

तिला वेळ लागणारच. झाडाचं छोटसं रोपटं एका ठिकाणाहून

उपटून दुसऱ्या ठिकाणी लावल्यास ते प्रथम कोमेजते.

व नंतर हळूहळू रूजते. लग्न होऊन आपल्या घरी आलेल्या

मुलीचं सुद्धा असंच होतं. म्हणून प्रथम तिला आपण समजून 

घेतलं पाहिजे. आणि यात एक स्त्री म्हणून सासूचा वाटा जास्त

असतो.


माझ्या मुलाचे लग्न झाले. जेवणावळ आटोपली. आता मुलीची

पाठवणी म्हणजे अगदी भावनिक प्रसंग. मला वाटलं आता..

रडारडी होणार. मी आधीचं थोडी इमोशनल. पण असं काही

झालं नाही. पठ्ठी अजिबात रडली नाही. घरात सून आल्यावर

कसे वागायचे हे मी आधीच ठरवले होते. सासू सुनेचं बदनाम

नातं मला पुढे चालवायचं नव्हतं. सासू सुनेच्या मुख्य समस्या

या ,की ' मी सासू 'हा सुपीरियर कॉम्प्लेक्स म्हणजे श्रेष्ठ पणाचा

अहंगंड असतो.तर ' हम भी कुछ कम नही 'असा अहंकार

सुनेच्या ठिकाणी असतो. या सर्व प्रकारातून सासू-सूना...

एकमेकींवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत

वडील व मुलगा यात कळत नकळत ओढले जातात.आणि

विनाकारण ताण तणाव वाढतो.


पण हे काही घडणार नाही याची खबरदारी घ्यायची असं मी ठरवलं.

सुनेला नवीन घरात , माणसात रुजायला वेळ द्यायचा.

आपलेपणा निर्माण व्हायला थोडा सहवास घडावा लागतो.

नवीन सून घरात आल्यावर तिला दडपण येईल असे

बोलायचे नाही, लगेच आपल्या घरचे नियम सांगायचे नाहीत.

'आमच्याकडे असं चालत नाही '

'तुझ्या सासऱ्यांना असं आवडत नाही'

'माझ्या मुलाला हे आवडतं '

या प्रकारचे वाक्य बोलायचे नाही. तिला तिच्या मनाप्रमाणे वागू 

द्यायचे. तिला दुसरी मुलगीच मानायचे. उशिरा उठणे, कामं..

न करणे याकडे दुर्लक्ष करायचे. असे मी ठरवले होते व त्याप्रमाणे

वागले सुद्धा. तिच्याकडून कोणत्याही अपेक्षा करायच्या नाहीत.

म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही. माझी सून माझ्या..

हाताखाली काम करायला आली नसून ती माझ्या मुलाची

सहचारिणी म्हणून आली आहे. त्या दृष्टीने तिच्याकडे पाहायचे.

या माझ्या विचारांमुळे माझे काम खूप सोपे झाले.


'जीवनातले सुख वाढवायचे असेल तर मग सुख वाटायची

सवय ठेवा.'

नात्यांमध्ये सहजता असेल, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल

तर घराचा स्वर्ग बनवता येतो. मी माझ्या कामाच्या रुटीनमध्ये

काहीच बदल केला नाही.मुलगा- सून दोघांनाही मोकळीक दिली.

अर्थात माझ्या मुलाप्रमाणे सून सुद्धा प्रेमळ मिळाली.

आपल्या प्रेमळपणाने तिने सर्वांना आपलेसे केले. नाते मग ते

कोणतेही असो , दोन्ही बाजूंनी जोडले जाईल, जपले जाईल..

तरच ते आणखी भक्कम बनते. माझ्या मुलाची काळजी घेणारी,

त्याला हवं नको ते विचारणारी सून असल्यामुळे एका जबाबदारीतून

सुटल्याचा आनंद मला झाला.


खरंतर आईचे मुलावरचे प्रेम आणि बायकोचे नवऱ्यावरचे प्रेम

या दोन प्रेमात कधी तुलनाच होऊ शकत नाही. दोघींचे प्रेम

अगदी वेगळी असते. बायकोवर प्रेम करायला लागलेला मुलगा

आईवरही तितकच प्रेम करत असतो. पण आई आणि बायको

या दोघींमध्ये भांडणं सुरू झाली, की त्यात त्याचे बिच्याऱ्याचे..

हाल होतात. कोणा एकीची बाजू घेतली तर दुसरीवर अन्याय

होतो. आणि हळूहळू घरातील शांती भंग पावते.

एकमेकांच्या समस्या समजून न घेता परस्परांवर टीका करत 

राहणे योग्य नाही.पूर्वी पुरुषी किंवा सामाजिक रूढी-अत्याचार..

यांना बळी पडलेल्या स्त्रियांना समजून घेण्याची, त्यांना आधार

देण्याची हिंमत स्त्रियांमध्ये नव्हती. म्हणून स्त्रीचं स्त्रीची शत्रू..

ठरायची. आता स्त्री प्रगल्भ झाली आहे. त्यामुळे स्त्रीच स्त्रीच्या

मार्गात आड येण्यापेक्षा एकमेकींना समजून घेतात.

आम्हा दोघींमध्येही असाच समजूतदारपणा असल्यामुळे

आमच्यात कधी भांडण झाले नाही. त्यामुळे आम्हा सासू..

सुनेचे एक अगदी निकोप नाते तयार झाले.


लग्न झाल्यावर तिचे राहिलेले शिक्षण आम्ही पूर्ण केले.

तिच्या गरोदरपणात आम्ही तिची योग्य काळजी घेतली.तिचे

डोहाळे पुरवले. पहिले बाळंतपण रिती प्रमाणे माहेरी असते.

मुलीचे माहेरी जास्त लाड होतात. तिला आराम मिळतो. असा

जुन्या लोकांचा कदाचित त्यामागे विचार असावा. सुनबाई ने...

आम्हाला गोड नातू दिल्यामुळे ती आणखीनच लाडकी झाली.

नातवाच्या बाळलीला मनाला सुखावून जात. ती बघण्यात

दोन-तीन वर्ष कशी गेली कळलेच नाही.


अचानक माझ्या मुलाला परदेशात जाण्याची संधी मिळाली.

त्याची ऑफिस मधील प्रगती निश्चितच अभिमानास्पद होती.

आता परदेशात तो कुटुंबासह जाणार होता. केवळ आम्ही एकटे

पडू म्हणून आम्ही त्याला तिथे जाण्याची संधी सोडायला

लावण्या इतपत आम्ही स्वार्थी नक्कीचं नव्हतो.

' आमचा जरा सुद्धा विचार करू नकोस.तू जरूर जा '

मनावर दगड ठेवून पण वरवर मात्र हास्य दाखवत त्याला आम्ही

परवानगी दिली. जायचा दिवस आला. आवडता स्वयंपाक..

करूनही कोणालाच जेवण गेले नाही. मनातून सर्वच जण

खूप अस्वस्थ होतो. मुलगा, सून,नातू यांच्याशिवाय आपण कसे

राहू शकू. आता परत कधी भेट होईल. अशा अनेक विचारांचे

मनात काहूर माजले होते. जाण्याची वेळ झाली. सुनबाई ने

मला वाकून नमस्कार केला. व माझ्या गळ्यात पडून खूप

रडली. जी मुलगी लग्नात माहेरहून सासरी येताना रडली नाही.

ती सासरहून जातांना रडत होती. मलाही खूप रडायला येत होते.


माझी सून माझी मुलगी झाली होती. प्रेम दिल्यावर प्रेमच मिळते.

हे आजही मी अभिमानाने सांगते. परदेशात मनमुराद स्वातंत्र्य,

पैसा ,चैनीचे जीवन उपभोगल्यानंतर कोणी तिथून कोणाला

परत येण्याची इच्छा होत नाही. पण आमच्या प्रेमाच्या ओढीमुळे

इतर गोष्टी दुय्यम ठरल्या. व मुलगा, सून,नातू भारतात आले.

एवढ्या वर्षाच्या माझ्या अनुभवाने मी एक गोष्ट नक्कीच

सांगू शकते, की सुनेला मुलगी मानल्यानंतर तिला सासर जणू..

माहेरच वाटते. अगदी मनापासून.

स्त्रीला समजून घेणं फारसं अवघड नसतं.

      जबाबदारीसह घेत भरारी..

      नाव आहे तिचे नारी .


लेख आवडल्यास लाईक व कमेंट जरूर करा.

न आवडल्यास क्षमस्व.

समाप्त.

धन्यवाद.


   लेखिका-  सौ.रेखा देशमुख

    टीम - अमरावती