नातं सासू-सुनेच..कधी गोड कधी तिखट

Nat sasu sunech

नातं सासू-सुनेच... कधी गोड कधी तिखट भाग 1
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
विषय- अरे संसार संसार


हेमांगी,स्वरा आणि कीर्ती तिघीही घट्ट मैत्रिणी. 

तिघ्याही एका सोसायटीमध्ये राहायच्या. 

स्वरा आणि कीर्तीचे एकाच वर्षी लग्न झालं होतं. समोरासमोर घर असल्यामुळे त्यांचं एकमेकींशी बोलणं व्हायचं, येता जाता एकमेकींना हाय हॅलो सुरू असायचं. दोघीही जॉब करत होत्या. संध्याकाळी पार्किंग मध्ये भेट व्हायची, मग दोघींच्या गप्पा रंगायच्या. हळूहळू दोघींमध्ये  मैत्री झाली आणि वर्षभरातच त्या घट्ट मैत्रीणी झाल्या.

हेमांगी लग्न होऊन आली आणि या दोघींनी तिलाही त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. हेमांगी वरच्या फ्लोअर वर राहायची. त्यामुळे येता जाता कधी कधी तिची भेट व्हायची. आता तीही स्वरा आणि कीर्तीची बेस्ट फ्रेंड झाली.


आता तिघींची घट्ट मैत्री झाली. शॉपिंगला जायचं आहे, कुठे डिनरला जायचंय, बाहेर फिरायला जायचंय, तिघीही सोबत प्लॅन करायच्या आणि आपापल्या फॅमिलीला पण सोबत घेऊन फिरायला जायच्या.


रोज ऑफिस मधून आल्यानंतर तिघीही सोसायटी मधल्या गार्डनमध्ये भेटायच्या. पाच मिनिटं का होईना पण भेट नक्की व्ह्यायची. ते त्यांचं नित्याचचं झालं होतं.

गप्पा मारून मूड फ्रेश करणे आणि दिवसभराचा थकवा घालवणे हाच त्यांचा उद्देश असायचा. त्यानंतर घरी आल्या की मग घरकाम अगदी आनंदाने करायच्या.

तिघींची फॅमिली वेल एज्युकेटेड होती, सासू गृहिणी तर सासरे रिटायर झालेले होते. तिघींचे मिस्टरही चांगल्या पदावरून नोकरीवर होते.

सगळ्यांचं सगळ छान चाललेलं होतं. पण जिथे बाया एकत्र जमल्या तिथे कुणाचे गाऱ्हाणे होणार नाही शक्यच नाही. ह्या तिघींच्या बाबतीतही तेच होतं. तिघीही भेटल्या की नेहमी त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांचे आणि सासूचे गाऱ्हाने सांगत असत. सगळं व्यवस्थित असूनही त्यांना माझी सासू अशी माझा नवरा असा म्हणण्यात खूप आनंद वाटत असे.


नेहमीचीच संध्याकाळ होती.. 

हेमांगी, स्वरा, कीर्ती ह्या गार्डन मध्ये भेटल्या होत्या. तिघींनी किटी पार्टीचा प्लॅन केला होता. थोडा वेळ गप्पा मारल्या, सगळंं प्लॅनिंग केल.

नंतर तिघीही आपापल्या घरी निघून गेल्या.

ऑफिसमधून घरी आल्यानंतर मिळालेल्या फावल्या वेळेत टीव्हीवरच्या मालिका पाहत चकाटय़ा पिटणं हा तसाही बायकांचा आवडता छंद. 

गप्पांच्या या फडांचे विषय अनेक, पण त्यातही ‘माझी सासू अश्शी अन् माझी सासू तश्शी’ म्हणत ‘सासूप्रेम’ भलतंच उतू जात असतं. या तिघीही त्याला अपवाद नव्हत्या.

..................

ठरल्या प्रमाणे तिघीही हाटेलमध्ये गेल्या, यावेळी मात्र फॅमिली सोबत नव्हती.
आता तिघीच असल्यामुळे सासूचा विषय निघालाच.

हेमांगीने सासूचा विषय छेडला. ‘माझी सासू भारी खाष्ट आहे, बरं का!’ असं म्हणत तिने नाक मुरडलं.

"परवा मी त्यांची काठाची साडी घालायला मागितली, तर चक्क नाही म्हणाल्या. म्हणतात कश्या नाही ग माझी साडी तू खराब केलीस तर तुझा नवरा थोडेच घेऊन देणार आहे. तुला अशी काठपदराची साडी हवीच असेल तर आण ना तुझ्या आईकडून, तुझ्या आईकडे तर भरपूर साड्या असतील." तिने नाक मुरडलं.


"म्हणत होत्या माझ्या सासऱ्यांनी त्यांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसात गिफ्ट केली होती. अगदीच खडूस आहेत."

क्रमशः

🎭 Series Post

View all