नातं सासू-सुनेच...कधी गोड कधी तिखट भाग 3 अंतिम

Nat sasu sunech

नातं सासू-सुनेच... कधी गोड कधी तिखट...भाग 3 अंतिम

कीर्ती आणि तिची सासू  यांच्यातही नेहमी असचं व्हायचं. त्या खूप ‘परफेक्शनिस्ट’ होत्या, त्यांना सगळं वेळच्यावेळी हवं असायचं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागेवर हव्या असायच्या. तर कीर्ती थोडीशी ‘सो कॉल्ड’ मॉडर्न कल्चरमध्ये राहणारी, फारशी किचनमध्ये न फिरकणारी. तिला स्वयंपाकही जमायचा नाही, मग दोघींचे खटके उडायचे. दोघींनी कधी एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक एक पाऊल दोघीही समोर आल्या असत्या तर नातं नक्कीच घट्ट झालं असतं.

या दोन टोकाच्या बायका एकत्र आल्याने त्यांच्या नात्यांमधला गोडवा कमी झाला होता.

...........................

स्वरा आणि तिची सासू यांच्यातलं नातं हे सासू-सुनेपेक्षा आई-मुलीचं होतं. स्वराचे सासरे गेल्यानंतर तिच्या सासुने वयाच्या साठीनंतर कथ्थक शिकण्याचा ध्यास घेतला. एवढचं नाही तर, त्यांनी स्वरालाही प्रोत्साहन दिलं. त्यामुळे या दोघींमधलं नातं दृढ व्हायला मदतच मिळाली आहे.

मुळात हे नातं रक्ताचं नसलं तरी एका अतुट विश्वासावर आधारलेलं असतं. सुगरणीच्या घरटय़ाच्या विणीप्रमाणे या नात्याचाही एक एक नाजूक धागा बांधला जातो आणि त्यातूनचं उभारतं एक भक्कम घर. 

आपल्या आयुष्यात आलेल्या या नव्या सुनेचा स्वीकार मनापासून करण्याची जबाबदारी तमाम सासूवर्गाची आहे. शेवटी, कुटुंब एकसंध ठेवणं ही जबाबदारी ना एकटय़ा सुनेची.. ना सासूची, ती दोघींची जबाबदारी आहे. हे नातंचं एकमेकांसाठी पूरक आहे. जेवणात जशा तिखट, आंबट, तुरट, गोड ह्या चवी जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे सासू-सुनेच्या या नात्यामुळे कुटुंबातली लज्जत वाढते. प्रेम वाढते.

नव्याने घरात येणारी सून ही भांबावलेली असते. या घरात कसं वागावं, हे तिला समजत नाही, अशा वेळी तिच्या मनाची अवस्था समजावून घेऊन तिला धीर देणे… विश्‍वास देणे, नव्या आयुष्यात नव्या संसारात रुळायला तिला मदत करणे, हे आवश्‍यक आहे. 

तुमच्या घरातील रीतिरिवाज, खाण्या-पिण्याच्या पद्धती, तुमचे संस्कार लगेच कळणार नाही. हे सर्व समजून घ्यायला, आत्मसात करायला आणि त्याप्रमाणे वागायला तिला वेळ द्यावा लागणार आहे. कोण कुणापेक्षा वरचढ आहे, हे सतत दाखवायला जाण्यापेक्षा आणि स्वतःचे वर्चस्व कसे कायम राहील, हा आग्रह धरण्यापेक्षा आपल्यासारखं सुनेला कसं तयार करता येईल, याचा विचार करावा. 

एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना तिच्याकडून चुका झाल्या तरी चिडचिड आदळआपट, राग राग करू नये. “मी असा स्वयंपाक करते म्हणून तिनं तसाच करावा,’ हा आग्रह धरू नये. दूध उतू जाते, तेलच जास्त वापरते, कपडे धुवायला साबण जास्त वापरते, अशा किरकोळ गोष्टीवरून वाद घालू नये.

घरातील पद्धती तिला जरूर समजावून सांगाव्यात, चुकल्यास नाराजी व्यक्त करावी, परंतु तोंडावर कौतुक करून मुलाकडे तिच्या तक्रारी करणे, अशा गोष्टी टाळाव्यात.नुकतंच नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकांत हवा असतो. ते शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकमेकांच्या निकट येण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टी समजावून घेऊन त्यांना त्यांचा वेळ मिळावा, या दृष्टीने प्रयत्न करावा. सुरवातीच्या काळात मुलगा पत्नीकडे अधिक ओढला जाणार, हे नैसर्गिक आहे.

 हे क्षण समजुतीने हाताळायला हवेत. मुलाचं तुमच्यावरील प्रेम कमी होणार नाही, तर यामुळे निश्‍चितच वाढेल. सुनेलाही सासूबद्दल विश्‍वास, प्रेम आणि कृतज्ञता वाटेल. आपले अनुभव सुनेशी अवश्‍य शेअर करावेत; त्यातून तिला मार्गदर्शन मिळेल. पण तुमच्या पद्धतीनेच तिने वागावं हा हट्ट धरू नये. तिनं असंच वागलं पाहिजे ही अपेक्षाही धरू नये. वेळेनुसार योग्य मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवावं. सुनेशी जमवून घेण्याचं आणि नवीन पिढीनुसार आपले विचार बदलण्याचं कौशल्य आत्मसात करावं


आजही आपल्या समाजात अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना सासरी काहींना काही प्रॉब्लेम असतो, सासू आणि सून दोघींनी एक एक पाऊल समोर टाकलं तर दोघींमध्ये दुरावा निर्माण होणार नाही.

समाप्त:

🎭 Series Post

View all