Jan 26, 2022
नारीवादी

नसतेस घरी तू जेव्हा

Read Later
नसतेस घरी तू जेव्हा


हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल मळवट आणि गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसुत्र अशी छान सजून ती बसली होती. सगळ्या पाहुण्यांची गर्दी जमली होती. तिची दोन मुले आणि नवरा एका बाजूला उभे होते. सगळे तिचे आप्त, नातेवाईक जवळ असूनही ती बोलत नव्हती. अगदी ऐटीत ती नटूनथटून बसली होती. ना कुणाचा पाहुणचार, ना स्वयंपाकाचे टेन्शन अशी निवांत ती पहिल्यांदाच बसली होती. कामावर जाण्याचे टेन्शन तर मुळीच नव्हते. ती जिथे काम करायची तेथील बायका आल्या होत्या पण ती तशीच बसून होती. ना कसली चिंता ना कसले टेन्शन. थोड्या वेळाने तिचा पार्थिव देह उचलला गेला. मोठ्या दिमाखात ती जात होती. कधीच परत न येण्यासाठी..

तिचा नवरा तिच्याकडे पाहतच उभा राहिला. ती जाताना तिला अडवू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच हुरहुर लागून राहिली होती. लेकरांना मिठीत घेऊन त्याने एकच मोठा टाहो फोडला.

सुमन धुणीभांडी करून जो काही पगार मिळत होता त्यात ती घर चालवत होती. घरात काय हवे नको ते पाहत होती. घरचे सगळे सामान ती स्वतःच्या पैशातून भरत होती. ती जिथे जिथे काम करत होती तिथे तिथे अगदी आपुलकीने बोलून सगळ्यांची मने तिने जिंकली होती. त्यामुळे त्या ठिकाणची माणसे तिच्या मदतीला धावून येत होती. सुमनचे मृदू बोलणे, आपुलकीने सगळी कामे करणे, पडेल ते काम करण्याची तिची तयारी आणि कितीही काम असले तरी हसत समोरच्याशी बोलणे या सर्वांमुळे सुमन सोसायटीमध्ये सर्वांच्या अगदी जवळची व्यक्ती बनली होती.

तिच्या अंगात खूप सारे कलागुण होते, फावल्या वेळेत ती कपडे शिवायची, आजूबाजूच्या लोकांची छोटीमोठी कामे करून त्यातून काही पैसे मिळवायची. सारे काही असूनही तिला तिच्या नवऱ्याची साथ कधीच लाभली नाही. तो नेहमी दारू पिऊन घरातच असायचा, तो काही कामधंदा करत नव्हता. पैशासाठी फक्त सुमनला मारहाण करायचा. तरीही पदरी पडले म्हणून सुमन त्याला सांभाळून घ्यायची. सुमनमुळे घर कसं गजबजलेलं असायचं. ती घरामध्ये काय हवे नको ते पाहायची. सणाला तर तिच्या मनाला उभारी यायची, नेहमी नवीन नवीन पदार्थ बनवून ती देत होती. ती तिच्या संसारासाठी जे जे काही शक्य आहे ते सर्व करत होती. पण त्या सगळ्याची जाणीव कोणालाच नव्हती. घरात तिला काडीमात्र किंमत नव्हती. साधं कुणी तिला तू जेवलीस का? असेही तिला विचारत नव्हते.

एक दिवस सुमन कामावरून आली, कसेतरी होत आहे म्हणून ती झोपून गेली. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला आणि त्याने पाहिले तर सुमन झोपलेली होती. त्याचा राग अनावर झाला. "अजून झोपली आहेस, उठ लवकर, मला भूक लागली आहे. जेवायला बनव." सुमनचा नवरा तिला उठवू लागला. पण आज ती निवांत झोपली होती. कधीही न उठण्यासाठी.

ती लग्न करून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे आयुष्यच बनून गेली. ती खूप काही करत होती. पहाटे पाच वाजता तिची सकाळ होत होती. उठून आवरून नाश्ता बनवण्याची तयारी चालू असायची, नाश्ता बनवून झाल्यावर मग तो निवांत उठायचा. तो उठला की ही त्याच्या अवतीभवती फिरायची. त्याला काय हवे नको ते पाहत होती. मग तिची स्वयंपाकाची धांदल उडत असायची. सगळे लवकर लवकर आवरून ती कामावर जायची. कामे वेळेत पूर्ण करण्याचे टेन्शन तिला नेहमीच असायचे. लगबगीने ती सगळी कामे वेळेत पूर्ण करायची. एखाद्या दिवशी काम जास्त लागले तरी चेहरा नेहमी हसराच असे. तिचा तो प्रसन्न चेहरा पाहून समोरचा नेहमी आनंदी होत असे. अशी सुमन जेव्हा घरात होती तेव्हा घर गजबजून जात होते. ती गल्ली सुध्दा अगदी गजबजून जाई.

आज मात्र सगळेच थांबलेले होते. ना डब्याची चिंता ना स्वयंपाकाचे टेन्शन ना कामाला जायचे टेन्शन. ती मात्र स्वस्थपणे जात होती. तिचा जन्म जणू त्याचे आयुष्य सुखकर करण्यासाठीच झालेला असतो. तो मात्र साधं तिची विचारपूसही करत नाही. तिचे अस्तित्व ती असताना कधीच जाणवत नाही पण ती गेल्यावर तिची कमी प्रत्येक सेकंदाला जाणवते.

सुमन गेल्यावर आजूबाजूचे लोकं सांत्वन करण्यासाठी आले, थोडे दिवस त्यांनी जेवण दिले, पण ते तर किती दिवस देणार? थोड्या दिवसांनी त्यांनी डबे द्यायचे बंद केले. तेव्हा मात्र त्याला हातपाय हलवण्याशिवाय पर्याय उरला नाही. सुमनचा नवरा गवंड्याच्या हाताखाली जाऊन काम करू लागला. जे काही पैसे येतील त्यातून तो दारू प्यायचा आणि उरलेले पैसे घरी द्यायचा. त्याचा एक मुलगा त्या पैशातून थोडेफार राशन आणून काहीबाही जेवण करायचा. त्यातून ते जेवायचे. सुमन असताना घर गजबजून जायचे. येणारे जाणारे थोडा वेळ थांबून तिच्याशी दोन शब्द बोलूनच पुढे जात होते. आता मात्र त्या घराकडे कोणाला बघवत देखील नव्हते. घरात बाई असली की घर भरलेले दिसे. बाईविना ते घर अधुरे राही.

ती असते आदीमाया, घरची लक्ष्मी. पण वेळ प्रसंगी ती काली, दुर्गा सुध्दा बनते. सासरच्यांची मने जपताना माहेर सुध्दा ती उत्तमप्रकारे जपते. सगळी नाती योग्य प्रकारे सांभाळते. सासू सासरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करते. त्यांची योग्य ती काळजी घेते. मुले आजारी पडली की रात्रभर त्यांच्या उशाशी बसून राहते. पण ती आजारी असेल तर साधी विचारपूस करायला कुणाला वेळच नसतो. तिची काळजी घ्यायला कुणाकडे वेळच नसतो.

स्त्री शिवाय घर अधुरे असते. जेव्हा ती एका क्षणासाठी घरात नसते तेव्हा तर तिची कमतरता जाणवतेच शिवाय घर खायला उठते. जर मग ती कामयचीच आयुष्यातून निघून गेली तर मात्र त्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. सुमन गेल्यावर तिच्या नवऱ्याला तिची किंमत कळली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेव्हा मित्रांनो, ती आहे तर सारं काही आहे नाहीतर बाकी सगळं शून्य आहे. म्हणून तिचा आदर करा. आपुलकीने तिची विचारपूस करा. मग ती आई, बहिण, पत्नी, मैत्रीण, मुलगी कोणीही असो. तिचे अस्तित्व ती असताना कधीच जाणवत नाही पण ती गेल्यावर तिची कमी प्रत्येक सेकंदाला जाणवते.

जर ही कथा आवडली असल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.. तुमची एक कमेंट आणि लाईक आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करण्यास नवी उमेद देते.. सो एक लाईक तो बनता है..
धन्यवाद 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..