Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

नशीबच!

Read Later
नशीबच!

कथेचे नाव : नशिबचं!

कॅटेगिरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

सब कॅटेगिरी : काळ आला होता पण...

टीम : अमरावती

     सलग तीन दिवस झाले, पाऊस पडत होता. सूर्यनारायणाचं तर दर्शनही होत नव्हतं. आभाळच फाटलं होतं जणू! न्यूजवर सतत पुराच्या बातम्या समोर येत होत्या. नद्या नाले ओसंडून वाहत होते. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुट्टी जाहीर झाली आणि ऑफिस मधील रमेश पटापट आवरून घरी यायला निघाला.

       सतत कोसळणाऱ्या पावसाने आपली गती थोडी कमी केली होती. पण थोड्याच वेळात तो चांगला बरसणार हे दिसूनच येत होते. काळ्याकुट्ट ढगांनी चांगलेच अंधारून आले होते. पावसामुळे रमेश आज कार घेऊन ऑफिसमध्ये आला होता. लवकरात लवकर घर गाठायची त्याला घाई झालेली होती. त्याचे घरही थोडे दूरच म्हणजे ऑफिस पासून जवळपास आठ दहा किलोमीटरवर होते. जेमतेम दोन किलोमीटरही पोहोचला नसेल आणि पावसाने धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटात रस्त्यावरची नाली परत एकदा खळखळून वाहू लागली. आता त्याची कार रस्त्यावर नाही तर रस्त्यावर तयार झालेल्या नदीतून चालत होती. काही क्षणातच पावसाचा जोर इतका वाढला की गाडी चालवणे ही त्याला अशक्य झाले. रस्त्याच्या एका कडेला झाडाखाली गाडी लावून तो गाडीतच बसून राहिला. पावसाचा जोर खूप जास्त होता. रस्त्यावरची माणसे आडोसा शोधत होती. पाऊस कमी होता म्हणून की काय आता त्यात वाऱ्याचीपण भर पडली. पाऊस उभा आडवा गाडीत शिरू लागला म्हणून त्याने गाडीच्या काचा वर केल्या. एसी सुरू करूनही बंद गाडीत त्याची घुसमट होऊ लागली.


        त्याने गाडीच्या काचांमधून बाहेर नजर टाकले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक चहाची टपरी आणि एक पानपट्टी तेवढी उघडी होती. पावसापासून आडोशाला आलेली माणसे त्या टपरीत उभी होती, चहा ,कॉफी ,नाश्ता... आज टपरीवाल्याच्या धंद्याला बरकत आलेली... गाडीत बसून होणाऱ्या घुसमटीला आणि एकटेपणाला वैतागलेल्या रमेशने त्या टपरीत जायचा विचार केला. एवढ्यात त्याच्या गाडीवर टकटक झाली.

     एक भाजीवाला त्याची भाजीची टोपली घेऊन त्याला त्याच्या गाडीत निवारा मागत होता. रमेशने चटकन दरवाजा उघडून त्याला आत घेतले. नखशिखांत ओल्या झालेल्या त्या भाजीवाल्याने स्वतःला कोरडे करण्याचा निरुपयोगी प्रयत्न केला. रमेश व त्याच्यात जुजबी बोलणे झाले आणि रमेश त्याला " समोरच्या टपरीवर चहा घ्यायला जाऊ "असे म्हणाला.


     "चेष्टा करता का राव? एवढ्या पावसात रस्त्या पल्याड कसं जायचं? काऊन बाबा गरीबाची मजा घेता?"रमेशने दिलेल्या चहाच्या निमंत्रणामुळे भांबावून गेलेला भाजीवाला त्याला बोलत होता .


     "त्यात चेष्टा काय? पाऊस पडतोय, तुम्ही थंडीने कुडकुडत आहात, मी गाडीत बसून कंटाळलो आहे. रस्त्यापलीकडच्या टपरीवर जाऊ, चहा घेऊ, पाय मोकळे होतील. तसेही तुम्ही भिजलेले आहात."

      हो नाही करत रमेश च्या मागोमाग तो भाजीवाला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा घ्यायला निघाला. गाडीपसून जेमतेम दोन पावलंही ते पुढे आले नाही की कर करकर असा आवाज ऐकू आला. रमेशला आवाज झाडाचा वाटल्यामुळे तो वर बघू लागला. एवढ्यात त्या भाजीवाल्याने त्याचा हात घट्ट धरला आणि जोरात ओरडला "साहेब पळा लवकर!" एव्हाना काय घडतय हे रमेशच्याही लक्षात आले होते. जीवाच्या आकांताने त्या दोघांनी टपरीकडे धाव घेतली. झाड वाकत वाकत त्याच्या फांद्या आता जवळजवळ त्यांच्या डोक्याला स्पर्श करणार असे वाटत होते. जेमतेम ते टपरीच्या जवळ पोहोचले आणि कडकड कडकड असा आवाज करत तो महाकाय वृक्ष रमेशच्या कारवर कोसळला. कारचा चकनाचूर झाला होता. दोघांचाही उर धपापत होता. टपरीतले लोक त्या दोघांकडे श्वास रोखून पाहत होते. त्या दोघांना सुखरूप पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तो भला मोठा कडुनिंबाचा वृक्ष रमेश च्या गाडीचा चुराडा करत रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला होता. त्याच्या अजस्त्र फांद्यांनी रस्ता झाकून घेतला होता.

     आपण गाडीमध्ये बसून राहिलो असतो तर... भाजीवाल्याच्या मनात विचार आला आणि तो शहरला.


     नेमकं त्याचवेळी रमेश मनातल्या मनात विचार करत होता, "बरे झाले चहा पिण्याची बुद्धी सुचली.…"
       "साहेब तुम्ही चहा प्यायचा आग्रह केला म्हणून मी आलो. गाडीतच बसून राहिलो असतो तर जागीच खतम झालो असतो." भाजीवाला गहिवरल्या आवाजात रमेश ला म्हणत होता.
       "मी कोण रे तुला वाचवणार! आपल्या दोघांच्याही वाडवडिलांची पुण्याई म्हणायची. नेमकी त्याच वेळेला आपल्याला गाडीतून उतरायची सुबुद्धी झाली. तुझ्याही लक्षात आले व तू मला सूचना देत पळायला सांगितले. गड्या खरं सांगू का, आपला काळ आला होता पण वेळ आली नव्हती!"
         "हे मात्र अगदी खरे! दोघेही शांत व्हा, देवाचे नाव घ्या, अन हा गरमागरम चहा प्या." टपरी वाल्याने त्या दोघांसमोर चहाचे ग्लास धरले होते......

         आज अगदी सुदैवाने म्हणा किंवा काही मिनिटांच्या अंतराने म्हणा, साक्षात मृत्यूला त्यांनी हुलकावणी दिली होती. आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना पाहतो. अशा अनेक घटना आपल्या वाचनात ऐकण्यात येतात. भयंकर अपघात होऊन सुद्धा अगदी नखालाही धक्का न लागता सुखरूप वाचणारी लोकं मी पाहिली आहेत. पुरात वाहून जाणाऱ्यालाही कधी कधी झाडाचा , काडीचा आधार मिळतो आणि तो वाचतो. बॉम्बस्फोट, दरड कोसळणे, विज पडणे यात त्या स्थानापासून काही सेकंदापूर्वी दूर झालेले आणि होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचलेले लोकही आपण पाहतो. अगदी गेला गेला म्हणत असताना , दुर्धर आजाराची चार हात करून, पुढे पुष्कळ वर्ष निरामय आयुष्य जगणारे लोकही या जगात आहेत. भूकंप किंवा इमारत पडणे यासारख्या दुर्घटनेत जमिनीखाली कित्येक दिवस गाडले जाऊन सुद्धा चमत्कारिक रित्या वाचणारे लोकही आहेतच. अशा घटनांमधून देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा आपणास वारंवार परिचय येत असतो.

लेखिका : सौ. आश्विनी गहाणकरी 

टीम अमरावती

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//