नशीब (भाग ५ अंतिम)

नशिबात जे आहे ते झाल्याशिवाय राहत नाही.


घरातील सर्वांच्या सपोर्टमुळे सईची नव्याने उभे राहण्यासाठी सुरु असलेली धडपड हळूहळू प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकत होती.

दोन्ही नणंदा रश्मी आणि अस्मी तसेच सासू सासरे आणि स्वतः नवीन सईला हवी ती मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायचे. नवीनला देखील त्याच्या झालेल्या चुकीचे तसेही प्रायश्चित्त करायचेच होते. आता सईच्या पाठी खंबीरपणे उभे राहून तो त्याचे कर्तव्य मोठ्या हिमतीने बजावत होता.

सईदेखील दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मनापासून अभ्यास करत होती.

सईकडे पाहून तसेच तिची जिद्द पाहून घरातील सर्वांनाच तिचा हेवा वाटायचा.

पुढे काही दिवसांतच सईने एक एक करत पाच ते सहा परीक्षा दिल्या. त्यातील दोन तीन पूर्वपरीक्षा ती अपेक्षेपेक्षाही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली.

पुढे सुरू झाली मग मेन्सची तयारी. पुढे पुढे अजूनच अवघड होत जाणारी ही परीक्षा पास होण्यासाठी मेहनतदेखील तितकीच गरजेची होती. सई प्रयत्न तर खूप करत होती परंतु, मनातून तिला भीतीही तितकीच वाटत होती. पण अशावेळी तिचे मनोबल वाढवण्यासाठी तिची हक्काची माणसे खूपच कामी यायची. मग लढण्यासाठी नव्याने तिला पुन्हा पुन्हा बळ मिळायचे.

बघता बघता सईने राज्यसेवा मेन्सदेखील क्लिअर केली. आता तर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोपे नव्हते इतक्या कमी कालावधीमध्ये हे सारे यश मिळवणे.

आता सर्वांच्या अपेक्षादेखील तितक्याच पटीने वाढल्या होत्या. यशाचे शिखर आता थोडेच दूर होते. सईने प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुलाखतीची तयारी सुरू केली. नवीनदेखील तिला हवी ती मदत करण्यासाठी तत्पर होताच. त्याच्या कलेक्टर मित्राचे मार्गदर्शन सईसाठी खूपच उपयुक्त ठरले.

दोन अडीच महिने सईने खूप तयारी केली मुलाखतीची. अनेक व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहिले. नियोजनबद्ध अभ्यास करून अखेर उत्तमरीत्या मुलाखत पार पडली.

आता प्रतीक्षा होती ती निकालाची. सर्वांचे लक्ष सईच्या निकालाकडे होते.

"माझ्या सुनेला यश मिळू दे. आम्ही सर्वजण मिळून तुझ्या दर्शनाला येवू." सासूने कुलदेवीला साकडे घातले सईच्या यशासाठी.

सई आणि नवीनमधील नातेही आता हळूहळू फुलत होते. मागच्या काही महिन्यांपासून सुरू असलेली सईची धडपड त्यात नवीनची तिला मिळालेली उत्तम साथ यामुळे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल आदरयुक्त प्रेमाची भावना निर्माण झाली होती.

दोघांनीही एकमेकांना मनापासून प्रेमाची कबुली दिली. नवरा बायकोमधील हे नाते दिवसागणिक बहरत होते.

अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली. मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. "डेप्युटी कलेक्टर" ही पोस्ट मिळवून सईने सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.

खऱ्या अर्थाने आपल्या माणसांच्या साथीमुळे सईने हे यश मिळवले होते. हे आता सिद्ध झाले.

पोस्ट हाती येताच पत्रकारांनी सईच्या मुलाखतीसाठी हजेरी लावली. तिनेही तिचा खडतर प्रवास मुलाखतीतून स्पष्ट केला.

"या माझ्या माणसांच्या साथीमुळे आज हे यश मला मिळाले अन्यथा ते केव्हाच माझे नव्हते." म्हणत सईने घरातील प्रत्येकाचे नाव घेवून तिला त्या व्यक्तीचा कसा सपोर्ट मिळाला हे जाहीर केले.

दुसऱ्या दिवशी टीव्ही, वर्तमानपत्र तसेच सोशल मिडियावर सईचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले.

सईच्या आई बाबांना तर आनंदाचा सुखद धक्काच बसला, सारे पाहून. डोळ्यांत आसवांची दाटी झाली.

"अखेर पोरीने बापाला खोटे ठरवलेच. शेवटी पोरगी कोणाची आहे. प्रत्येक आव्हान जिद्दीने पेलण्याचे बाळकडू जणू तिच्या रक्तातच आहे."
बोलता बोलता सईच्या बाबांच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले.

मागचा पुढचा कोणताही विचार न करता बापाने लेकीचे घर गाठले. ज्या एरियात पाऊल ठेवण्याची बापाला लाज वाटत होती तिथे आता अभिमानाने सईचे बाबा पेढ्याचा बॉक्स घेवून हजर झाले.

लेकीच्या सासरच्या माणसांनी मोठ्या आनंदाने त्यांचे आदरातिथ्य केले. माणसांची ही श्रीमंती पाहून सईचे आई बाबा अगदी भरून पावले. सर्वांची त्यांनी मनापासून माफी मागितली. लेकीला आशीर्वाद देवून तिला छातीशी कवटाळले. सर्व मतभेद दूर करून सईला तिच्या कुटुंबासह आनंदाने स्वीकारले..

खरंच आपल्या माणसांची अशी साथ असेल तर अर्धा विजय  तिथेच झालेला असतो. पैशा पेक्षाही आपल्या माणसांची साथ किती मोलाची असते  हे आता सईने सिद्ध केले होते. नवीन आणि त्याच्या घरच्यांची परिस्थितीशी असलेली झुंज देखील आता संपली होती.

काही दिवसांतच ट्रेनिंग पूर्ण करून सई डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झाली देखील. एक एक करत सारी स्वप्न सईने पूर्ण केली होती. खरंच लक्ष्मीच्या रूपात येवून सईने हा चमत्कार घडवून आणला होता जणू.

पहिल्याच पगारात सर्वात आधी सईने सासर्यांच्या पायाचे ऑपरेशन करवून घेतले. आणि त्यांना पुन्हा  त्यांच्या पायावर उभे करून नव्याने त्यांना पुनर्जन्म मिळवून दिला.

एक एक करत सारी स्वप्न आता सत्यात उतरत होती. सासूने केलेला नवस पूर्ण करायची वेळ देखील आता निघून चालली होती. सासरे पूर्णपणे बरे झाल्यावर सर्वजण मिळून मग कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले.

देवीच्या कृपेने आता सर्व काही सुरळीत झाले होते. सईमुळे आयुष्यच बदलून गेले प्रत्येकाचे. ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता ते आता सत्यात उतरले होते.
नवीनच्या घरची परिस्थिती आता संपूर्णपणे बदलून गेली आणि यात घरातील प्रत्येकाचा मोलाचा वाटा होता.

खरोखर आयुष्य जगण्यासाठी आणि परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जितकी पैशांची गरज असते तितकीच आपल्या माणसांची साथ देखील मोलाची असते. हो ना.

समाप्त

सदरची कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवाशी तिचा काहीही संबंध नाही.
"जे एकट्याने साध्य होत नाही ते एकीने होते" हे या कथेतून पाहायला मिळते. आपल्या माणसांची साथ असेल तर असाध्यही साध्य व्हायला मग वेळ लागत नाही आणि नशीब बदलायलाही.

धन्यवाद..

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all